रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 1008

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे उद्या नागपुरात उद्घाटन

नागपूर, दि.8: राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे उद्या शनिवार (दि.09) रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र’हे ब्रीद समोर ठेवून आयोजित नमो महारोजगार मेळाव्याला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. विदर्भातील बेरोजगारांसाठी महत्त्वाचा असणारा हा महारोजगार मेळावा ‍दि. 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.

000000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

नागपूर, दि. 8 :  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 8:  राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी (एमआरओ) एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान येथील एमआरओ केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारचा हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी विविध स्तरावर  प्रयत्न सुरू असून अनेक योजना अंमलात येत आहेत. देशातील  देखभाल, दुरुस्ती व तपासणी सुविधा केंद्राचा (एमआरओ) वस्तू व सेवा कर हा 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या धोरणामुळे हवाई क्षेत्राशी निगडीत अनेक कंपन्या एमआरओ केंद्र सुरू करण्यासाठी पुढे येत आहे. देशात नवीन 27 केंद्रे सुरू झाली असून यापैकी अनेक सुविधा केंद्रे महाराष्ट्रात आहेत. नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्गो हबसाठी अनुकूल हवाई वाहतूक धोरण प्रत्यक्षात साकारण्यास हे केंद्र सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास उपमुख्यमत्र्यांनी  व्यक्त केला.

जगात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, पर्यटन, कायदा व सुव्यवस्था या बाबींसाठी होत आहे. राज्याच्या नवीन वाहतूक धोरणात एमआरओ, विमानतळांच्या धर्तीवर हेलिपॅडची निर्मिती या बाबींचा अंतर्भाव राहील. देशात हवाई वाहतूक क्षेत्राची लक्षणीय वाढ होत असून याचा राज्याला लाभ होण्याची गरज यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

खासदार प्रफुल्ल पटेल, एअरबस हेलिकॉप्टरच्या ग्राहक सहाय्य सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंडामेर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलिकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी आदी यावेळी उपस्थित होते.

00000

राजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

नवी दिल्ली, दि. 8 :  : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी  करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व डॉ. प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार श्री. तडस यांनी संत जगनाडे महाराजांबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देतात .

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी  संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

ऑनलाईन गेमिंग संदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या विधेयकामुळे पायबंद बसणार

नागपूर, दि. 8 :- जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले जीएसटी सुधारणा विधेयक आज मंजूर करण्यात आले.

जीएसटी सुधारणा विधेयक सभागृहात मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर कराच्यासंदर्भातील निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेतला जातो. त्यानुसार राज्यांना अधिनियमात सुधारणा करावी लागते. ऑनलाईन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यती (अश्वशर्यती) याबाबतीत आणि इतर काही छोट्या कलमांमध्ये अधिक व्यापकता आणण्याची गरज होती.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अलीकडेच 18 ऑगस्ट, 2023 ला केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 मध्ये उपसमितीच्या शिफारशीनुसार दुरुस्त्या केल्या. आता केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा यात समानता आणण्याची गरज होती.  त्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात आपण सुधारणा करीत आहोत. ही सुधारणा तातडीने करण्याची गरज होती.  पण त्यावेळी अधिवेशन सुरु नव्हते.  त्यामुळे सरकारने अध्यादेश काढला. (दि.26 सप्टेंबर, 2023 – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा अध्यादेश, 2023). आता या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आपण हे विधेयक आणलेले आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या जीएसटी सुधारणा विधेयकाची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाइन गेमींगच्या संदर्भात पळवाटा शोधून कमी कर भरण्याची वृत्ती या गेमचालकांची होती. त्याला पायबंद घालण्यासाठी  ऑनलाइन गेम ‘कौशल्याचे गेम’ (गेम ऑफ स्किल) असल्यामुळे आकारलेल्या शुल्कावर 18 टक्केच कर ते भरत होते. हे सर्व गेम 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याची आवश्यकता होती. त्यामुळे यासंदर्भात नियुक्त अभ्यास समितीने हे खेळ “गेम ऑफ स्किल” नसून “गेम ऑफ चान्स” आहेत, असा निष्कर्ष काढला.

यासंदर्भातील उपसमितीने एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर 28 टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलला केली होती.  कौन्सिलनेही ही शिफारस मान्य केली, त्यानंतर  मागच्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याप्रमाणे कायदा दुरुस्ती मंजूर केली. आज आपल्या राज्याच्या कायद्यात बदल करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

०००००

 

चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय स्तरावर प्रदान

नागपूर, दि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपिलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.

विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, चिटफंड अधिनियम, 1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, चिटफंड चालवताना काही वेळा वाद निर्माण होतात. त्यावेळी चिटफंड चालवणाऱ्या कंपन्या कलम 69 नुसार राज्य कर विभागातील चिटस् सहनिबंधकांकडे दाद मागतात. चिटस् सहनिबंधकांच्या निर्णयाने जर समाधान झाले नाही तर कलम 70 नुसार त्यांच्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या सुधारणेमुळे हे अधिकार खालच्या स्तरावर म्हणजेच सहनिबंधकांकडे राहणार असून त्यामुळे अपील निकाली काढण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे.

००००

 

विधानसभा प्रश्नोत्तरे :

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू -इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री श्री. सावे म्हणाले की, सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

 

००००

महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधानपरिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, परिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रमही ऐतिहासिकच ठरणार आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करुया. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करूया. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

विधानपरिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले की, परिषदेमुळे शिक्षक, पदवीधर, लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधानपरिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी

  •   कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार
  • दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  • अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासह सर्व मुद्यांवर  सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा

नागपूर, दि. ८ : अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. कांदानिर्यात आणि इथेनॉलनिर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. दुधउत्पादकप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन  शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री श्री. शाह आणि श्री. गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सभागृहाला दिला.

०००

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोहिणी पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

000

शैलजा पाटील/वि.स.अ 

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...