रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 1007

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त उद्या प्रधानमंत्री मोदी लाभार्थ्यांशी साधणार संवाद

ठाणे,दि.8 (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दि.9 डिसेबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध शासकीय योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्धरीतीने पोहोचतील, हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली आहे. ठाणे जिल्ह्यातील काल्हेर ग्रामपंचायत, ता.भिवंडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मुख्य कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायत काल्हेर, ता.भिवंडी, जि.ठाणे येथे सकाळी 11.00 वा. मान्यवरांचे आगमन होणार असून सकाळी 11.05 वा. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सकाळी 11.05 ते 11.15 वा. मान्यवरांचे स्वागत होणार आहे. सकाळी 11.15 ते 11.25 वा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल. सकाळी 11.25 ते 11.35 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.ठाणे श्री.मनोज जिंदल (भाप्रसे), जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री, ठाणे ना.शंभूराजे देसाई, केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज ना.कपिल पाटील हे आपले मनोगत  व्यक्त करणार आहेत. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र/लाभ वाटप केले जाणार आहे. यानंतर लाभार्थ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर शपथ घेतली जाणार आहे.

दुपारी 12.30 वा. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्री यांचे स्वागत होणार आहे. दुपारी 12.35 वा. लाभार्थ्यांसमोर ‘कहानी मेरी जुबानी’ या लघुपटाचे प्रदर्शन होणार आहे. दुपारी 12.38 वा. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 5 लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12.50 वा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लाभार्थ्यांना संबोधणार आहेत.

0000

 

केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी- मुख्य सचिव मनोज सौनिक

नागपूर दि. 8 : केंद्र शासन विविध लोकहितपयोगी योजना राबवित असते. अशा केंद्रपुरस्कृत योजना राज्यातही राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले.

 नागपूर येथील हैदराबाद येथील हाऊस मुख्य सचिव कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्य सचिव श्री. सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीला मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव मकरंद देशमुख यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

आयुष्मान भारत योजनेची माहिती ऑनलाइन पोर्टलला योग्य पद्धतीने भरण्याच्या सूचना करीत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले की, ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करावी. त्यासाठी केंद्र शासनाने दिलेला निधी प्राधान्याने खर्च करावा. भारतनेट बाबत स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल व इतर संबंधित विभागांची बैठक बोलवावी.

   तसेच मुख्य सचिव श्री सौनिक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, भारतनेट या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

०००००

राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नवी दिल्ली, 8 : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी  करण्यात आली.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व डॉ. प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराजांबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते.त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देतात .

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी संत जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

‘मानवी हक्क दिना’निमित्त आयोगाचे सदस्य सचिव दिलीप गावडे यांची ९ व ११ डिसेंबरला ‘दिलखुलास’ तर १० डिसेंबरला ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 10 डिसेंबर रोजी असणाऱ्या ‘मानवी हक्क दिनानिमित्त’ राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव दिलीप गावडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी 10 डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिवस’ म्हणून निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण हा त्या देशातील लोकशाही व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. सामान्य जनतेच्या मानवी हक्काचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्षम व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तर राज्य पातळीवर राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या दिनानिमित्ताने नागरिकांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत, याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगाची रचना, कार्यपद्धती आणि अधिकार काय आहेत याबाबत सविस्तर माहिती राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव श्री. गावडे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आयोगाचे सदस्य सचिव श्री. गावडे यांची मुलाखत शनिवार  दि. 9 आणि  सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत रविवार, दि. 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

 

शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील- केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

दुग्धव्यवसायास चालना देण्यासाठी काऊफार्म तयार करण्याच्या सूचना

 

चंद्रपूर, दि. 08 : शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देवून शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

क्रीडा संकुल, वरोरा येथे विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरळकर, वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे नरेंद्र जिवतोडे, कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी तसेच जयकुमार वर्मा, देवराव भोंगळे, राहूल पावडे, अतुल देशकर, चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा, संध्या गुरनुले आदी उपस्थित होते.

वैनगंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मागील 2 वर्षात विशेषत: चंद्रपूर आणि वरोरा तालुक्यात उत्कृष्ठ काम झाले याचा आनंद आहे, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले,  जिल्ह्यातील 52 शेतकरी उत्पादक कंपन्या महासंघाला जुडल्या आहेत. महासंघाच्यावतीने सर्व कंपन्यांना नवनवीन योजनांची माहिती देऊन नवीन उद्योग उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. महासंघामध्ये जिल्ह्यातील 15 तालुक्याचे 15 संचालक आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उद्योग कसे उभे करता येईल? हा त्यांचा प्रयत्न आहे. स्मार्ट प्रकल्पात प्रकल्प संचालक आत्मा विभागाच्या वतीने विदर्भामध्ये उद्योग उभारणीत चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी आहे, याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांचे कार्य वाढवावे, त्यातून शेतकऱ्यांचा नक्कीच विकास होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  52 शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये 45 हजार शेतकरी कुटुंब या महासंघाला जोडले आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांचे भवितव्य आहे. याकरीता सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना नेतृत्व देऊन फार्मर प्रोडूसर कंपन्या तयार केल्यास शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल व दलालाच्या कचाट्यातून सुटका होईल. तसेच विविध उत्पादनाला भारतीय बाजारपेठ तर मिळेलच पण निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होईल. नागपूर येथील ॲग्रो व्हिजनमध्ये जसे मार्गदर्शन झाले त्याचप्रमाणे वर्षभर मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, जिल्ह्यामध्ये जसे फार्मर प्रोडूसर कंपन्या तयार केल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे, नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करण्यात आले आहे. या कंपनीने 1300 कोटी रुपयाचे द्राक्षे निर्यात करुन येथील शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. सह्याद्री कंपनीसारखेच जिल्ह्यात काम व्हावे, तरच शेतकरी समृद्ध, संपन्न आणि कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हिंगोलीमध्ये गोदावरी फॉर्म, सांगली येथे झुकेरी फॉर्म, सातारा येथे ॲग्रो व्हिजन फार्मर कंपनी यासारखेच, महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग जिल्ह्यात यशस्वी कसे करता येईल? यासाठी सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. फार्मर प्रोडूसर कंपन्याकरीता दोन योजना आहेत. यामध्ये 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेत 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाने केली आहे. शेतकऱ्याचा माल थेट निर्यात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात पोर्ट ट्रस्ट उभारण्यात येत आहे. या पोर्टच्या माध्यमातून जगात माल निर्यात करता येईल यामुळे शेतकऱ्यांना अधिकच फायदा मिळेल.

जगाच्या मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे असल्यास उत्पादनात 100 टक्के गुणवत्ता असावी. उत्तम क्वालिटी, पॅकेजिंग, ब्रँडिंग असावे. येणाऱ्या काळात या पोर्टवरून देशाच्या कानाकोपऱ्यात माल निर्यात करण्यासाठी व्यवस्था केली जाईल. या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांचा माल पॅकेजिंग करून विकल्यास दीडपट भाव शेतकऱ्यांना मिळेल व शेतकरी संपन्न व समृद्ध होईल. सर्वांच्या प्रगती व विकासाकरीता मदर डेअरीला विदर्भात आणले आहे. मदर डेअरीच्या कच्च्या दुधाची खरेदी साडेचार लाख लिटर आहे. हि दूध खरेदी 30 लाख लिटरवर नेण्याचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील दूध चांगला भावाने खरेदी केल्या जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला चालना द्यावी. नागपूरला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊ उघडण्यात येत आहे. व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने अशाचप्रकारचे मोठे गाईचे हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यात व्हावे यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी करावी. मदर डेअरीसाठी अनेक योजना तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्य व केंद्र शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. बुट्टीबोरीमध्ये 650 कोटी रुपये खर्च करून मोठा प्लांट उभा राहत आहे. ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात येऊन आतंरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यात येईल. या खाद्यपदार्थासाठी लागणारे 30 लाख लिटर दूध विदर्भ व मराठवाड्याच्या जिल्ह्यातून नागपूरला येणार असून दुधाचा महापूर विदर्भात तयार करण्याकरीता सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

दुग्ध उत्पादन जिल्ह्यात वाढावे यासाठी 12 लाख गायी राज्य सरकार देणार आहे. गोटफार्मच्या धर्तीवर काऊ फार्म तयार करावा व दुध उत्पादनाच्या वाढीस चालना द्यावी. वर्षभर हिरवा चारा मिळाल्यास दूध उत्पादन वाढेल यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी पशुखाद्यासाठी पुढाकार घ्यावा. विदर्भात 30 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असेल तर पशुखाद्य देखील विदर्भातच व्हावे या दृष्टीने प्रयत्न करावे. चांगल्या क्वालिटीचे पशुखाद्य कमी दरात विकल्यास त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होईल, याकरीता 20 ते 25 पशुखाद्याचे कारखाने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पूर्व विदर्भात साडेसहा हजार मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मत्स्य व्यवसाय केल्यास करोडोने उत्पन्न वाढेल. येणाऱ्या काळात मत्स्य उत्पादनाला सामोरे जायचे आहे. तसेच गहू, तांदूळ, कापूस लावून शेतकऱ्यांचे भले होणार नसून यासाठी क्रॉप पॅटर्न बदलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रास्ताविकेत बोलतांना वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे नरेंद्र जीवतोडे म्हणाले, विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी 15 तालुक्यातील संचालकांनी मिळून निर्णय घेतला की, 15 ही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या एका सूत्रात बांधून त्या कंपन्यांना प्रशिक्षित करून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून 24 प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी साधारणतः दहा प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे 50 कोटी रुपयाचे टर्नओव्हर चालू झाले आहे. जिनिंग तसेच सर्व प्रक्रिया उद्योग सुद्धा सुरू झाले.

 

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचविणे  हा विकसित भारत संकल्प यात्रेचा ‘संकल्प’ – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ०८ : केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे हा ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चा संकल्प असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शनिवार, दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सी विभागात माधव बाग, कावासजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय)  चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे, नियोजन विभागाच्या संचालक डॉ.प्राची जांभेकर आदींसह सहायक आयुक्त, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड, मुद्रा योजना, आरोग्य, जेनरिक औषधे, उद्योग विभागाच्या विश्वकर्मा आणि एक्सलेटर योजना तसेच सुकन्या समृद्धी योजना, जनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना आदींची माहिती आणि लाभ घरोघरी पोहचविण्यात येत आहेत. या संदर्भात प्रचार-प्रसारासाठी सध्या मुंबई महानगरात चार वाहने फिरत आहेत. या वाहनांसोबत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी योजनांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. तसेच ज्या विभागात यात्रा जाणार असेल, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देखील समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये दहा दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रेची वाहने नागरिकांना विविध योजनांची माहिती देत आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत ही वाहने प्रभागनिहाय फिरणार आहेत.

मुंबईकरांना आवाहन ;

गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना योजना समजावून सांगण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आपल्या परिसरात जेव्हा ही वाहने येतील तेव्हा मुंबईकरांनी विविध योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले की, विकसित भारत संकल्प यात्रेसोबत  संपर्क अधिकारी नेमावेत. योजनेची माहिती असलेली माहितीपत्रके घरोघरी वाटपासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले. आतापर्यंत मुंबईमध्ये ७६ ठिकाणी ही यात्रा पोहोचली असून, त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

0000

शैलजा पाटील/विसंअ
 

विधानपरिषद लक्षवेधी

अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक- उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर,दि.8 : मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानपरिषदेत महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसार, इमारतींचे मालक भोगवटादार गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचे फायर ऑडिट परवाना अग्निशामक यंत्रणेमार्फत करून घेण्यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मुंबई अग्निशमन दलामार्फत उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी या इमारतीस सशर्त देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याबाबत अग्निसुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पध्दतीमध्ये जतन करुन त्याबाबतचे अभिप्राय संबंधितांना पाठविले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलामार्फत एकूण 6 हजार 975 अग्निस्वयंसेवकांना तसेच 2 हजार 50 अग्निरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘आहार’ या संघटनेकरिता उपहारगृहातील 381 कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील व 5 मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दाखविण्यात आलेली आहेत. मुंबईतील 69 मॉल्सची तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईतील जनतेच्या जनजागृतीकरिता दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल असा अग्निसुरक्षा सप्ताह तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम राबविण्यात आला आहेत. मुंबईतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्राच्या भेटीदरम्यान अग्निसुरक्षेबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदस्य सचिन अहीर, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000000

एमआयडीसीतील इंडिया बुल्सला दिलेली जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू- उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 8 : नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडियाबुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या प्रकल्पास दिलेली सर्व जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील विकसित न केलेल्या जमिनी परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सचिन अहिर, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, अतिरिक्त सिन्नर औद्योगिक वसाहतींमध्ये इंडिया बुल्स कंपनीला जमीन वाटप करण्यात आली होती. मात्र, कंपनीने वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये विकास करण्याची कार्यवाही केली नसल्याने जमीन परत देण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एमआयडीसी कायदे व न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रकल्पबाधित झालेल्यांना वाटप करण्यात येणाऱ्या एकूण ४८२ भूखंडापैकी आतापर्यंत २८२ भूखंडाचे वाटप करण्यात आले असून २०० भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण करण्यास बहुसंख्यांचा विरोध असल्यास ही एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचा विचारही करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००००

समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांचेप्रभावी अंमलबजावणी करणार- मंत्री दादाजी भुसे 

नागपूर, दि ८: समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व सोयीसुविधांसह रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देतांना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील १६ ठिकाणांवर सर्व सोयीसुविधांसह पेट्रोल, डिझेल पंप, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, चहा- नाश्ता अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करणे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. वेग मर्यादा फलक, चिन्ह फलक, सूचना फलक अशा उपाययोजना फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरियर्स बसविण्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने माहितीपत्रके, फलक लावण्यात आलेले आहेत.

हा महामार्ग ज्या ८ जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागाचे प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध देण्यात आली आहेत. या पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकाचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्य करण्यात येतात. या उपाययोजना महामार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

वन्य प्राण्यांसाठी ज्या भागात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्या-त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरिकेट लावण्यात आले आहे.

मंत्री श्री भुसे म्हणाले, संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असतांना झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे १३ प्रवासी मृत्यूमुखी पडले व २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली असून या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ०२ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

अपघातग्रस्त वाहनाची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने केली आहे. वाहनाची नोंदणीकृत आसन क्षमता 17+1 अशी असताना या वाहनांमधून बेकायदेशीर रित्या 34प्रवासी प्रवास करत होते. या वाहनास वेग नियंत्रक बसविलेले नव्हते. तसेच वाहनाच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, वाहन चालकास प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालवण्यात येत होते.वाहनाचा कर वैध नसताना वाहन रस्त्यावर आणले इत्यादी त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.या महामार्गामुळे 900 किमी अंतर वरून 700 किमी अंतर झाले आहे.वेळ,आणि डिझेल, पेट्रोलची बचत देखील होत आहे.१५ जिल्ह्याचा विकास होत आहे.तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.या महामार्गामुळे मुंबई-नागपूर ही शहरे जवळ आली आहेत. हा एक सकारात्मक प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अपघातातील १३ मृत प्रवासीयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये पाच लाख याप्रमाणे एकूण रुपये ६५,००,०००/-(रुपये 65 लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी: ६६८२२ टायर तपासणी, रिफ्लेक्ट नसलेली ९४८ वाहन, ब्रेथ ॲनालाइजर 21265, लेन कटिंग 4931, ओव्हर स्पीड 612, नो पार्किंग 5898, दोषी वाहने, 10581, एकूण दंड वसूल 27लाख 25 हजार 455 करण्यात आला आहे. तसेच समृद्धी महामार्ग 1 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 4 हजार 500 वाहनचालकाचे समुपदेशन करण्यात आले आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रस्त्यावरील व महामार्गावरील अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तसेच विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,सदस्य अनिल परब,अनिकेत तटकरे,राजेश राठोडयांनी सहभाग घेतला होता.

०००००

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा – राज्यपाल रमेश बैस

नागपूर, दि.८ : केंद्र शासनाने सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आज राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील डिफेन्स अकॅडमी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी उपस्थित होते.

राज्यपाल आणि पालकमंत्री यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसीत भारत संकल्प यात्रा महत्वाची ठरणार असून, याद्वारे चिन्हीत करण्यात आलेल्या 17 योजनांचा प्रचार-प्रसार करून त्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान विश्वकर्मा, पंतप्रधान किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो फर्टिलायझर्स इत्यादी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचे राज्यपालांनी अधोरेखित केले.

विकसित भारत यात्रेचा मूळ उद्देश शासनाच्या योजनांच्या प्रसारासोबतच लाभार्थ्यांना वेळेत लाभ देणे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 111 गावात ही यात्रा पोहोचली असून, 7 हजारांवर नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ.गावीत यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकसित भारत संकल्प यात्रेतून देश विकासमार्गावर अग्रेसर होणार असल्याचा विश्वास खासदार श्री. मेंढे यांनी व्यक्त केला. यासोबतच केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रगतीविषयी माहिती त्यांनी दिली. श्री. भोंडेकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांची माहिती दिली.

राज्यपालांच्या हस्ते विविध योजनांचे 22 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले. तुमसर येथील पवन कटनकर व लाखनी उमेद महिला बचतगटाच्या उषा कावळे या लाभार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. राज्यपालांनी विकसित भारत संकल्प उपक्रमांतर्गंत सहभागी शासकीय विभागांच्या स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

श्री. कुर्तकोटी यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी कोरंबी येथील पिंगळेश्वरी मातेच्या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.

00000

प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. ८ :- केंद्र सरकारच्या ‘हर घर, नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत सुरू असलेली कामे अभियानस्तरावर पूर्ण करावीत. यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांतील त्रुटी दूर करून सादर कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील जल जीवन मिशनमधील योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील आढावा घेतला. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री किरण लहामटे, देवेंद्र भुयार, राजू कारेमोरे, इंद्रनील नाईक, मनोहर चंद्रिकापुरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, घरगुती नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. या योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दुरुस्त करून प्रस्ताव सादर करावेत. तसेच त्रुटी ठेवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करावी. वित्त, नियोजन आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे आढावा घ्यावा, अशाही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विधानसभा लक्षवेधी :

मीरा भाईंदर क्षेत्रात कॅन्सर रुग्णालयासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंत्री उदय सामंत

नागपूर,दि. 8 : मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, जागा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. यात भूखंड क्रमांक २१० हा रुग्णालय आणि प्रसूतीगृहासाठी आरक्षित आहे. तर भूखंड क्रमांक २११ हा वाचनालय आणि सामाजिक सभागृहासाठी आरक्षित आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णालयासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मागवण्यात येईल. तसेच जागा आरक्षण बदलाबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल. हे आरक्षण पूर्णपणे बदलण्याच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात कर्करोग रुग्णालयासाठी यापूर्वी निधी देण्यात आला असून निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.

मीरा भाईंदरचा विकास आराखडा लवकरच

मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा अद्याप अंतिम झाला नाही. या आराखड्याबाबत सदस्य आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा राज्य शासनाकडे आलेला आहे. या आराखड्याबाबत हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून हा आराखडा लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे. कर्करोग रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे ती सुविधा लवकरच मुंबई महानगर क्षेत्रातील आणि मीरा भाईंदरमधील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे सांगून सदस्य गीता जैन यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.

००००

महाड येथील कंपनीतील स्फोटप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही  कामगार मंत्री सुरेश खाडे

 नागपूर दि. 8: महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते.

महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीमध्ये सात कामगार ठार झाल्याची घटना नोव्हेंबर 2023 मध्ये घडली होती. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान आणि भरपाई देण्यात आली आहे. याशिवाय राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत जे लाभ देय आहेत ते देण्यात येत आहेत. याशिवाय त्यांच्यापैकी काही कामगारांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर झाले आहे. त्याचबरोबर योग्य ती मदत या कामगारांच्या वारसांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून संबंधितांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गणपत गायकवाड यांनीही सहभाग घेतला.

000

आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी आदर्श कार्यपध्दती तयार करणार- आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत

नागपूर, दि.8 : राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील आरोग्य सुविधेबाबत सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सावंत बोलत होते.

आरोग्यमंत्री श्री.सावंत म्हणाले, आरोग्य व्यवस्थेत उपलब्ध संसाधनांचा 100 टक्के वापर चांगल्या पद्धतीने करणे, विभागातील आशाताईंपासून डॉक्टर, नर्स या मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे आणि रुग्णांसोबत आत्मियतेने वागण्याबाबतची आदर्श कार्यपध्दती (एसओपी) करण्याचे काम सुरू आहे. रुग्णालय इमारत आदी संसाधनांची दुरुस्ती करून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचे काम सुरू आहे.

आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत केली आहे. राज्यातील 12 कोटी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज वाढली आहे. आरोग्य व्यवस्थेत वाढ होणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ होणे अपेक्षित आहे. सन 2012 पासून बिंदूनामावली तयार नव्हती ती करण्यासाठी देखील एसओपी करण्याचे काम सुरू असून मॉडेल आरोग्य यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील, असेही त्यांनी सांगितले.

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक

भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात शवपेट्या नादुरुस्त असल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवावे लागल्याचा प्रकार घडला होता. या रुग्णालयातील शवागारात शवपेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी देऊन शवपेट्या खरेदी करण्याच्या सूचना आजच देण्यात येतील. हे रुग्णालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. रुग्णालयातील असुविधेबाबत लवकरच मा.मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी सभागृहात सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रताप सरनाईक, बच्चू कडू, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.

०००

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

नागपूर, दि. ८ – नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दुर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी दिलेल्या उत्तरात मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाच्या सुरु असलेल्या उपयायोजनांमुळे बालकांचा मृत्युदर कमी होत आहे. नवजात शिशुंची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात आजारी नवजात शिशूच्या उपचाराकरिता एकूण 52 विशेष नवजात काळजी कक्ष (SNCU) स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्वसनाच्या उपचाराकरिता (सीपीएपी)मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या कक्षात बालरोग तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विशेष नवजात काळजी कक्षामधील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे  प्रशिक्षण राज्यस्तरावरुन घेण्यात आले असल्याची माहिती मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.

याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुसज्ज प्राथमिक अतिदक्षता केंद्र (PICU) तसेच बालरोग व नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) उपलब्ध आहेत. तेथे रुग्णखाटा व्हेंटीलेटरसह उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या बालकांना रुग्णालय प्रशासनातर्फे सुयोग्य उपचार देण्यात येतात. कुठलाही रुग्ण उपचाराविना वंचित राहत नाही. सर्व आजारी नवजात शिशुकरिता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधे, तपासण्या तसेच वाहतूक लाभ देण्यात येतो. तसेच नवीन सुविधा वाढविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सन 2018-19 मध्ये 37 विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत होते, तर सन 2023-24 मध्ये 52 विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत आहेत. माता व नवजात बालकांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी रुग्णालयांना प्रथम संदर्भ सेवा केंद्र म्हणून स्थापित केले आहे व तेथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रक्ताची सोय, सोनोग्राफी, सिझेरीयन सेक्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच मोफत संदर्भ सेवा आजारी नवजात बालकांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यात माता व बालकांच्या आरोग्याकडे सतत व विशेष लक्ष दिल्याने अर्भक मृत्यू दर 16 तर बालमृत्यु दर 18 झालेला आहे. देशातील मोठ्या राज्यांमध्ये हा दर कमी करण्यामध्ये राज्याचा तिसरा क्रमांक आहे. यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. तसेच पायाभूत सविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालये यांची आवश्यकतेनुसार नवीन निर्मिती करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सदस्य रवी राणा, योगेश सागर, प्रताप अडसड, राजेश एकडे, राम सातपुते यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

0000

ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा- मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 8:  ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य संजय केळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 93 इमारती / संरचनेत एकूण 194 शाळा व बालवाड्या भरत आहेत. शिक्षण विभागामार्फत 34 शाळा व 11 बालवाडी दुरुस्ती करण्याकरिता केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत माहे मार्च, 2023 पासून या शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. या शाळांच्या इमारती (शाळा व बालवाडीसह) ऑडिट करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तालिकेवर नियुक्त असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्समार्फत स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्य:स्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 34 शाळा व 11 बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी घेऊन निविदा मागविण्यात आल्या. सद्य:स्थितीत ही कामे महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये सुरु असून, सुमारे 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीची निकड व उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीचे कामे महानगरपालिका हाती घेत आहे. तसेच या शाळांच्या इमारतींची तपासणी व सुरक्षा उपाययोजना इ. बाबी लक्षात घेता, शाळांचे दुरुस्ती व नुतनीकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

0000

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...