बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 996

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजारगाव दुर्घटनास्थळाला भेट

नागपूर दि. १७ : नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव

नागपूर, दि. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दिले.

मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तात्काळ बाजारगावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.

या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.  गिरीश केशरावजी तिडके असे तरुणाचे नाव असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा. रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा. मौदा नागपूर) यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

०००

 

बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक  छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

बाजारगाव स्फोट दुर्घटनास्थळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

नागपूर, दि. १७ : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करावे, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे तसेच स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.

०००

हक्क, कर्तव्यांबाबत सदैव जागरुक राहण्याची गरज – विधानमंडळ सचिव विलास आठवले

नागपूर, दि. १७ : संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात  कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे उपस्थित होते.

सचिव श्री.आठवले म्हणाले की, लोकसभा, विधानसभा ही महत्त्वाची सभागृहे असून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमुळे संसद, विधिमंडळ तयार होते. संसदेत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ तर विधानमंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लोकांच्या भावना, आकांक्षाचा विचार करुन जनहिताचे निर्णय घेतले जातात.

देशहिताच्या दृष्टीने कायदे करण्याचा संसदेला तर राज्यहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेने दिलेला आहे, असे सांगून श्री. आठवले म्हणाले की, घटनेतील तरतुदीशी सुसंगत कायदा, विधेयक तयार करण्यापूर्वी या विषयातील तज्ज्ञ, संबंधित विभाग  यांचे अभ्यासपूर्ण मत विचारात घेऊन ते प्रारूप तयार केले जाते. कायदा, विधेयकाच्या प्रारुपाला मंत्रिमंडळात मान्यता देऊन ते संसद व विधिमंडळासमोर मांडले जाते. अशा कायद्याची, विधेयकाची ओळख  सभागृहाला संबंधित खात्याचे मंत्री करुन देतात. यावर प्रत्येक सदस्याचे मत विचारात घेतल्यानंतर राष्ट्रपती, राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याला राजपत्रात प्रसिद्धी दिली जाते. तद्नंतर हा कायदा अंमलात येतो. संविधानात अनेक तरतुदी असून राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांची वेगवेगळी कार्ये असल्याचे श्री.आठवले यांनी सांगितले.

संसद, विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी मंडळाला पार पाडावे लागते. तर कायद्यानुसार सुरू असलेल्या कामकाजावर लक्ष ठेवणे व कायद्याचा अर्थ लावण्याचे काम न्यायमंडळ पार पाडते, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या अभिभाषणाबद्दल श्री. आठवले यांनी सांगितले,  नवीन संसद, नवीन विधानसभा व अर्थसंकल्पापूर्वी अभिभाषण होते. या भाषणात देशात, राज्यात सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणांचा उहापोह केलेला असतो. लोकांच्या हिताच्या, जिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा संसद व विधिमंडळात केली जात असून संविधानिक बाबीने याकडे पाहिले जाते. सामाजिक, औद्योगिक, आर्थिक विकासासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात जनतेला अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद केली जाते. यामध्ये वित्त विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. आठवले यांनी आपल्या भाषणात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी,  प्रश्नोत्तराचा तास, स्थगन प्रस्ताव, अल्पसूचना, विशेष सूचना, औचित्याचा मुद्दा, अंतिम आठवडा प्रस्ताव, शासकीय विधयके, अशासकीय विधेयके याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधिमंडळ सचिव श्री. आठवले यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकची विद्यार्थिंनी पूजा इंगळे हिने आभार मानले.

०००

 

 

विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद – विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे

नागपूर, दि. १७:  संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्या शिवाय सभागृहात बोलत यावे, काम करता यावे यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्य घटनेत असल्याचे विधान मंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी सांगितले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात आज ‘विधीमंडळ, कार्य, विशेषाधिकार’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

संसद आणि राज्यातील विधान मंडळाचे सदस्य यांनाच विशेषाधिकार असल्याचे सांगून सचिव श्री. भोळे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, आणि महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना विशेषाधिकार नाहीत. संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना त्यांची कर्तव्य व्यवस्थित पार पाडता यावीत हा विशेषाधिकारांचा उद्देश आहे. ब्रिटिश पार्लमेंट सदस्यांना ज्या प्रमाणे विशेषाधिकार आहेत, त्याच धर्तीवर आपल्या देशातील संसद आणि विधानमंडळ सदस्य यांना विशेषाधिकार आहेत. विशेषाधिकारांमध्ये कोणतेही अधिकार कमी करता येत नाहीत अथवा वाढविता येत नाहीत. या विशेषाधिकारांनुसार सर्व सदस्यांना भाषण स्वातंत्र्य दिले आहे. सभागृहात सदस्याने केलेल्या भाषणावर, टीका, टिप्पणी यावर न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. त्याशिवाय सभागृहाचे सत्र सुरू होण्यापूर्वी ४० दिवस आणि सत्र संपल्यानंतर ४० दिवस सदस्याला अटक करता येत नाही. तो विधिमंडळ सभागृहाचा हक्कभंग होतो. एखाद्या सदस्यास अटक केल्यास त्याची माहिती विधानमंडळ सभागृहात द्यावी लागते. अध्यक्ष, सभापती यांच्या पूर्व परवानगी शिवाय विधानमंडळ परिसरात कोणालाही अटक करता येत नाही. विधानमंडळाच्या गोपनीय प्रक्रियांची माहिती प्रसिद्ध करता येत नाही. सभागृहाच्या परवानगी शिवाय सदस्य न्यायालयात साक्ष देऊ शकत नाही. सभागृहातील चर्चेविषयी न्यायालयात चर्चा करता येत नाही. तसेच न्यायालयातील सुनावणी विषयी सभागृहात चर्चा करता येत नाही, असे विशेषाधिकार संसद आणि विधानमंडळ सदस्यांना असल्याचे श्री. भोळे यांनी सांगितले.

श्री. भोळे म्हणाले की, विशेषाधिकार जपण्यासाठी विशेषाधिकार समिती असते. विशेषाधिकारांचे उल्लंघन झाल्यास तो हक्कभंग होतो. हक्कभंग प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर तो हक्कभंग समितीकडे येतो. मग त्यावर प्रक्रिया होऊन समिती दोषी व्यक्तीस शिक्षेची शिफारस करते. शिक्षा कोणती करायची याचा निर्णय अंतिमतः सभागृह घेते. शिक्षा वेगवेगळ्या प्रकारची असते, जसे वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिलगिरी व्यक्त करणे, कारावासाची शिक्षा देणे. आतापर्यंत जास्तीत जास्त ९० दिवसांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. दोषी व्यक्तीस सभागृहासमोर आणून समज देणे. सभागृहाची नापसंती दोषी व्यक्तीस कळवणे अशा शिक्षा असतात. तसेच हक्कभंग प्रकरणी  मोठ्या मनाने माफ करणे ही सभागृहाची भूमिका असते. पण  त्याचबरोबर सभागृहाचे पावित्र्य राखणे, त्याचा मान, सन्मान अबाधित राखणे महत्त्वाचे असते. त्यासर्व दृष्टीकोनातून शिक्षा सुनावली जाते. एखादे प्रकरण गंभीर असेल तर त्याविषयी कठोर निर्णय घेतला जातो. या विशेषाधिकाराच्या संरक्षणासाठी विविध ३५ समिती कार्यरत असतात. सभागृह हे त्यांच्या हक्काविषयी जागरूक असते, असेही श्री.भोळे यांनी सांगितले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईची विद्यार्थिनी वेनिसा लेविस हिने आभार मानले.

०००

आता मुंबई प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वच्छता मोहीमेत मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

मुंबई दि. १७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या‍ चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड)  स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

एन विभागातील अमृत नगर सर्कल येथून सकाळीच या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. स्वच्छता करण्यासाठीचे ग्लोव्हज हातात घालून मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अमृतनगर सर्कल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर एन विभागातील कामराज नगर व घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय परिसरात मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. एम पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टिळक नगर, भैरवनाथ मंदीर मार्ग, एफ उत्‍तर विभागातील भैरवनाथ मंदीर मार्ग, येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ घेण्यात आली.

विविध अत्याधुनिक संयंत्राच्या सहाय्याने स्व‍च्छता

अतिरिक्त मनुष्यबळासह विविध संयंत्राच्या सहाय्याने वॉर्डतील कानाकोपऱ्यांची स्व‍च्छता करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह मुंबईकर नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग  घेतला.

प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई शहरांतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ही स्वच्छता मोहीम प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता अभियानासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम नक्कीच उपयुक्त ठरेल. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच जाणवेल. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभाग वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने मुंबई आपल्याला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवलीच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविणार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘आपला दवाखाना’ ची संख्या वाढविण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहीमेच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राजावाडी रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा मानस

राजावाडी रुग्णालय मुंबईकरांठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता १००० बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करा

रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

स्वच्छता अभियान बनले लोकचळवळ

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ फक्त महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न राहता ही लोकचळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकराचा सहभाग यात आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचाऱ्यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेणार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वच्छता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते.  लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेण्यात येणार असून स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे.

यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे श्री. शिंदे म्हणाले. मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही , तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटर,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहे. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असुन आतमधील  तुटलेले, फुटलेले रस्ते,  फुटपाथ, खराब शौचालये  तातडीने दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत.

या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था–संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.

मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेटचाआनंद

टिळकनगर येथील मैदानावर खेळाडूंशी संवाद साधत स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. टिळकनगर मैदान येथे मुले क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनाही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. बॅटिंग करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त

नागपूर, दि.१७: नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

०००

ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. १६ (जिमाका) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्त्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या बरोबर राहून गावाच्या विकासासाठी गतीने काम करून प्राप्त निधी विहीत मुदतीत खर्च करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.

   सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करावा त्यामध्ये विविध प्रकारच्या पुरस्कारांचा समावेश करावा, असे सूचित करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहन असून या माध्यमातून प्रत्येक गावागावात शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. याचा लाभ तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावा. ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, त्यांना काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात,  शासन दरबारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले.

   मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा कणा आहे. त्यांनी तळागाळापर्यंत काम केले तरच पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या ग्राम विकासाच्या योजनांची योग्य अंमलबावणी होण्यासाठी मदत होवू शकते. शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य असून ग्राम विकास अधिकारी मोठ्या उत्साहाने पुढेही काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व पुरस्कारार्थीं व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजय गायकवाड, प्रविण देसाई व धनश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामसेवकांच्या जबाबदाऱ्या व ते करत असलेली विविध प्रकारची कामे याबद्दल विवेचन केले.

यावेळी सन 2010-11 ते 2022-23 या पुरस्कार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन वृषभ आकिवाटे यांनी केले.

०००

शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. १६ (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ग्रामपंचायत कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास सरपंचा सारिका शिंदे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज तहसीलदार अर्चना मोरे-धुमाळ, मिरजच्या गटविकास अधिकारी  डॉ. संध्या जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदि उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रसारित

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या संबोधनात त्यांनी केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण, दर्जेदार प्राथमिक सोयी सुविधा यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून युवा व महिला वर्गाचे सबलीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी इतरांपर्यंत या योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हे देशव्यापी अभियान जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून सुरू असून, ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. या माध्यमातून गावागावात शासन व प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजनांबाबत जागृती व प्रबोधन या माध्यमातून केले जात आहे. या योजनांसाठी पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा व इतरांनीही त्यासाठी प्रेरित करावे, असे ते म्हणाले.

कामगार विभागाच्याही इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत. त्याचा लाभ कामगारांना दिला जात असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 70 हजारहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले.

स्वागत डॉ. शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी या अभियानाचा हेतू व माहिती विषद केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रथयात्रेंतर्गत विविध विभागांच्या स्टॉलना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीत रथयात्रा

बेळंकीसह आज जिल्ह्यातील भाटशिरगाव, कांदे (ता. शिराळा), ताडाचीवाडी, बाणुरगड (ता. विटा खानापूर), जानराववाडी (ता. मिरज), भिवर्गी, पांडोझरी (ता. जत), मोहिते वडगाव, अंबक (ता. कडेगाव), कुकटोळी, म्हैसाळ एम. (ता. कवठेमहांकाळ), पडवळवाडी, अहिरवाडी (ता. वाळवा), धावडवाडी, नेलकरजी (ता. आटपाडी), पुणदी (वा), रामानंदनगर (ता. पलूस) आणि कवठेएकंद, नागाव क. (ता. तासगाव) येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत रथयात्रा पार पडली.

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...