बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 995

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

नागपूर दि. 18 :  गडचिरोली  जिल्हा क्रीडा संकुलाची गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलात सुविधा निर्माण करणे आणि युएनडीपी अंतर्गत शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित साटमआमदार डॉ. देवराव होळीक्रीडा व युवक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ताउपसचिव सुनील हांजेउपसंचालक शेखर पाटीलसुहास पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी मार्फत दरवर्षी दिल्ली येथे आयोजित होते. यामध्ये राज्यस्तरावर विजयी झालेला संघ सहभागी होतो. त्यासाठी जिल्हाविभाग आणि राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे आयोजन 1417 व 19 वर्षाखालील गटात करण्यात येते. यामधून जिंकलेला संघ दिल्लीला राष्ट्रीयस्तरावर खेळण्यासाठी निवडला जातो. त्यासाठी मुलींच्या जिल्हास्तरावर फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे क्रीडा मंत्री श्री. संजय बनसोडे यांनी सांगितले.

गडचिरोली सारख्या आदिवासी भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. प्रशासकीय इमारतव्यायाम शाळा बांधकामइनडोर बॅडमिंटन हॉल व डोम टाईप मल्टीगेम इनडोर हॉलची कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचनाही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

चंद्रपूर दि. 18 : वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी या शेतीविषयक विकसनशिल प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत, नागपूरचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, नोडल अधिकारी (स्मार्ट)  प्रज्ञा गोळघाटे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रीती हिरळकर, नोडल अधिकारी (स्मार्ट)  नंदकुमार घोडमारे, उपविभागीय कृषी अधिकारी तथा वरोराचे तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, भद्रावतीच्या तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी वरोरा तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कापूस उत्पादक शेतकरी विकास धेंगळे व भानुदास बोधाने यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकाच्या लागवडीचे वेळापत्रक व अर्थशास्त्र या दोन्ही बाबींवर चर्चा केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घेत कृषी विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर वरोरा तालुक्यातील मौजा एकार्जुना येथील उत्कृष्ट कापूस प्रकल्पास भेट दिली. या भेटीदरम्यान एकार्जुना संशोधन केंद्रात आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी बिटी व नॉनबिटी कापसाच्या विविध प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली. यावेळी सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञान, ट्रायकोकार्ड वापर व कामगंध सापळ्यांचा वापराबाबत चर्चा करण्यात आली. कापसाचे उत्पादन 30 ते 35 टक्के वाढीसाठी तसेच ठिंबक सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत डॉ.  गेडाम यांनी कृषी विभागास सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान डॉ. गेडाम यांनी जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, चिनोरा (ता. वरोरा) येथे भेट देऊन तेथील स्मार्ट प्रकल्पातंर्गत जिनिंग प्रेसिंग युनिटची पाहणी केली तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी शेती निगडीत विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा केली.

स्मार्ट प्रकल्पातंर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राची उभारणी प्रकल्पास भेट दिली. पीएमएफएमई (PMFME) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुनील उमरे यांच्या तेलघाणी युनिटचे उद्धाटन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या शेतावरील सेंद्रीय ऊस उत्पादन व सेंद्रीय गूळ निर्मिती केंद्रास भेट देण्यात आली.

00000

विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण- मंत्री धनंजय मुंडे

नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

अकोला जिल्ह्यातील महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील भांडारपालाने कीटकनाशकांच्या केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, संबंधित भांडारपालास निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच या अपहाराच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार संबंधित भांडारपालावर अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा शासनाचा अंतिम उद्देश आहे. मात्र कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकारी शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सामग्रीचा अपहार करत असेल, तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्री. मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासंदर्भातील कारवाई गतीने पूर्ण केली जावी. याबाबत सत्यशोधक समितीच्या अंतिम अहवालात सर्वकाही स्पष्ट होईल व दोषीवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

————————

जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई– मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर, दि. 18 : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि.अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

यावेळी श्री वळसे पाटील म्हणाले, जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती या बँकेबाबतच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी  10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी प्रादेशिक उपसंचालक, (साखर), अमरावती यांची नियुक्ती केली असून त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी तपासणी अहवाल  सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्ज मंजूर प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणे, कर्जदाराची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रक्कम उचल देणे, कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणे, शासन मान्यता न घेता एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविणे इत्यादीमध्ये अनियमितता आढळून आल्याने या बँकेची चौकशी करण्यासाठी दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये सहकार आयुक्तांनी  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जि. अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषीं असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

——————

गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची कामे सुरू– मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 18 : धारासुर येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची तसेच इतर आवश्यक कामे सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

धारासुर ता. गंगाखेड, जि. परभणी येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची तसेच इतर आवश्यक कामे करण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, प्राचीन गुप्तेश्वर  मंदिराच्या संरक्षित स्मारकाच्या फक्त जतन व संवर्धनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात रुपये 14 कोटी 95 लाख रुपये रकमेची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या स्मारकाच्या जतन व संवर्धनासाठी दुसऱ्या टप्प्याचे 13 कोटी 98 लाख रुपये इतक्या रकमेची कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. स्मारकाच्या जतन व संवर्धनासाठी पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. तथापि मंदिराच्या जतन दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांना दर्शनाची कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भगवान महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे तसेच मंदिराच्या इतर सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

———————- 

ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी संगणकीय सोडत– मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर दि. 18 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात  येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधी दिला नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.

यावेळी श्री वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सद्यस्थितीत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांच्याकडून 7300 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पास 2023 -24 करिता रुपये 96.39  कोटी इतका अतिरिक्त नियतव्यय मंजूर केल्याचे 3 नोव्हेंबर 2023 च्या पत्रान्वये केंद्र शासनाने कळविले आहे. या मंजूर नियतव्ययानुसार प्राप्त होणाऱ्या निधीच्या अधीन राहून ऊस तोडणी यंत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची राज्यस्तरावर संगणकीय सोडत काढण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुषंगिक बदल करण्याचे काम महाआयटी विभागाकडून सुरू आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य सरकार राज्यस्तरीय योजना आणण्याबाबत शेतकरी, साखर कारखानदार, ऊस तोडणी संघटना यांच्याशी चर्चा करेल, असे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

———————–

बाधित शेतकरी अनुदानापासून वंचित नाही– मंत्री अनिल पाटील

नागपूर, दि. १८ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सन 2022 च्या पावसाळ्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीकरीता पात्र बाधित शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी अनुदानापासून वगळला नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात आल्याबाबतचा प्रश्न सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ई-केवायसी न केलेल्या 14165 शेतकऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याकरीता त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी गाव पातळीवरील क्षेत्रीय यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना सूचना दिलेल्या आहेत.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

————————

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखाच्या मदतीची कार्यवाही सुरु– मंत्री अनिल पाटील

नागपूर दि. १८ : शेतकरी आत्महत्याप्रकरणी नियमानुसार पात्र ठरलेल्या संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना रुपये एक लाख याप्रमाणे मदत देण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरू आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने कृषी विभाग व विविध विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

मराठवाडा तसेच अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबतचा प्रश्न सदस्य रमेश कराड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी “कृषी समृध्दी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.   शेतमालाला हमीभाव, पीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली.

शेतकऱ्यांना केवळ रुपये एक भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” सन २०२३-२४ पासून राबविण्यास २३ जून, २०२३ रोजीच्या कृषी  विभागाच्या   शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून प्रतिवर्ष रुपये ६०००/- शेतक-यांना देण्यासाठी ‘नमो किसान शेतकरी महासन्मान’ निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अथवा वेळ प्रसंगी राज्य शासनाच्या निधीतून मदत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे 

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यतामंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. १८ : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त  पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) पद्धतीद्वारे शिक्षण पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ४५६ विद्यार्थ्यांच्या निकालास विलंब झाला असून सद्य:स्थितीत हे निकाल लागले आहे. प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे निकाल उशिराने लागले. मुंबई विद्यापीठात कुलगुरू प्रभारी नाहीत. ते पूर्णवेळ आहेत. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठात नवीन परीक्षा निकाल पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही पद्धत लागू करण्यास अडथळे निर्माण झाले. या अडचणीतून विद्यापीठ आता बाहेर पडत आहे. मुंबई विद्यापीठात ६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठ विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ३७२ परीक्षा घेते. पदव्युत्तर दूरस्थ: शिक्षण अभ्यासक्रमाचे निकाल वगळता सर्व निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

श्री. नीलेश तायडे/विसंअ/

 ————————-

पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी चौकशी अहवालानंतर कारवाई करणार– मंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. १८ : पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) येथे तीन ट्रकमध्ये ८८ हजार १२५ किलो तांदूळ सापडला आहे. या तांदळाची किंमत  ४५ लाख ८६ हजार ९७१ रुपये आहे. याप्रकरणी  अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापडलेला तांदूळ तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

पुलगाव येथील सापडलेल्या तांदळाबाबत विधानसभा सदस्य रणजित कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

पणन मंत्री श्री. सत्तार म्हणाले, पोलिसांनी केलेल्या तपासानुसार याप्रकरणी दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 22 स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील.

0000

श्री. नीलेश तायडे/विसंअ/

—————————–

साकव दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणार– मंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही साकवांची प्राधान्याने दुरुस्ती करणार

नागपूर, दि. १८ : राज्यातील साकव दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येईल. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही साकवांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये निधी प्राधान्याने देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य राजन साळवी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, जामदाखोरे (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील सावडाव – नेलें, मिळंद-हातदे या गावांना जोडणारा लोखंडी साकव सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला. या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नेर्ले येथे १४ किलोमीटर अंतराचा वळसा मारुन जावे लागत आहे. याशिवाय, वैभववाडी तालुक्यातील नेर्ले व राजापूर तालुक्यातील सावडाव या गावांना जोडणारा वाघोटन नदीवरील साकव आणि राजापूर तालुक्यातील मिळंद-हातदे या दोन गावांना जोडणारा साकव योजना बाह्य रस्त्यावर आहे. या साकवांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.

दरम्यान, राज्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपये आवश्यक असून त्यातील ६५० कोटी रुपये केवळ कोकण विभागातील साकवांच्या दुरुस्तीसाठी लागणार आहे. साकव बांधकाम करणे खर्चाची कमाल आर्थिक मर्यादा रु. ६०.०० लाख असून ही मर्यादा वाढविण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन असल्याची माहिती मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य शेखर निकम, ॲड. यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, अजय चौधरी आणि ॲड. आशिष जैस्वाल यांनी चर्चेत भाग घेतला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 —————-

संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना दिलासा देणार– मंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. १८ : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, संत्रा निर्यातदारांना बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे संत्रा पीक हे परदेशी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत पाठवावे लागले. त्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी राज्य शासनाने १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल.

विदर्भात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम संत्र्यांचे उत्पादन होते, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात फळे, फुले व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत एकूण ४५ आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात ७ निर्यात सुविधा केंद्र असून, विशेषतः संत्र्यासाठी कारंजा घाडगे, जि. वर्धा व वरुड, जि. अमरावती येथे संत्रा निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) व भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (ICAR-Central Citrus Research Institute) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने विदर्भासह इतर राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, क्षेत्रभेट व कार्यशाळा इत्यादी आयोजित केल्या आहेत. या संस्थेमार्फत सन २०२१ ते २०२३ या कालावधीत जवळपास ४००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच रोगमुक्त लिंबूवर्गीय लागवड साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी एकूण ४ सामंजस्य करार करण्यात आले असून त्याअंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त साहित्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. सत्तार यांनी लेखी उत्तरात दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 18 – मराठी भाषा संवर्धनासाठी  सर्वतोपरी  प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.

मंत्री श्री. केसरकर यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले.

मराठी भाषेचा इतिहास जतन करणारे संग्रहालय वाई येथे उभारण्यात येणार आहे. मुंबई येथे मराठी भाषा भवन निर्माण होत आहे. विभागाच्या सर्व मंडळ व संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे, असे मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाचे विविध निर्णय, शिक्षक भरती प्रक्रिया, जिल्हानिहाय बिंदूनामावली, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अभियान आदी विविध बाबींची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अतिरिक्त महासंचालक स्पेशल ऑपरेशन प्रवीण साळुंखे, पोलीस सह आयुक्त श्री. जैन, सीआरपीएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक पद्माकर रणपिसे तसेच  विशेष पोलीस महानिरिक्षक संदीप पाटील, गड़चिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा आदी उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करून, निर्देशही दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नक्षलवादी कारवायांमुळे पीडित होऊन विस्थापित होणारे तसेच नक्षलवादी विचारसरणीचा त्याग करून जे शरण येतात, त्यांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे. या प्रक्रीयेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा. विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्या वारसांच्या अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीने करण्यात याव्यात. नागपूर- गडचिरोली मार्गावरील मॉडर्न फायरिंग रेंजचे काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे. गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या पोलीस स्थानकांच्या २५ अधिकारी व ५०० कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या सर्व नेमणूका स्थानिक पातळीवर होणार आहेत.

महाराष्ट्र पब्लिक सिक्यरिटी अँक्ट – हे जनसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणण्याबाबतही विचार विनिमय झाला. शहरी माओवादी रोखण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मायनिंग कॉरिडॉरच्या रस्त्यांचा विकास तसेय या परिसरातील मोबाईल टॉवर्सची कामे वेगाने पूर्ण व्हावीत याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या संबंधित जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एसटी बसेसची प्रभावी सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

०००

 

जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार शोकसंदेशात म्हणतात की, डिंगोरे गावाच्या परिसरातील अंजीराची बाग परिसराजवळ रविवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास अपघात होऊन आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून कर्तव्य बजावावे तसेच वाहनचालकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बचाव, मदतकार्य सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.

०००

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

नागपूर, दि. १८ : – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

या चर्चासत्रप्रसंगी विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गाने काय दिले, या विषयावरील  चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाची सौम्या राजेश, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेची श्रध्दा माटल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची आशिया जमादार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचा सिद्धार्थ कढरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जळगावची दिपाली शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा शुभम गुरुम, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीची धनश्री म्हाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचा राजशेखर रगटे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबईची संस्कृती पटनाईक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची अरुंधती सरोदे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची लिंटा टॉमसन आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची करिष्मा कावळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामुळे लोकशाहीच्या या मंदिरात प्रत्यक्ष बसण्याची संधी  मिळाली असे स्पष्ट करून अभ्यास वर्गात झालेल्या मार्गदर्शनामुळे संसदीय लोकशाहीची संकल्पना आत्मसात करता आली.  विधिमंडळाची कार्यप्रणाली, संसदीय समित्यांची रचना व कार्य, विविध आयुधे या माहितीसह विधिमंडळाचे कामकाज पाहता आले, या अभ्यास वर्गात सहभागी विद्यार्थांसाठी आनंदाचा क्षण असल्याची चर्चा झाली.

विधिमंडळाचे  कामकाज पाहताना लोकशाहीत संवाद हा महत्वाचा भाग असल्याची जाणीव झाली.  संवादातून प्रश्न सोडवले जातात, यासाठी राज्याच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून विधिमंडळ सदस्य वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात हेही पाहता व अनुभवता आले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होणे हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय क्षण आहे. या  अभ्यास वर्गातील झालेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मक दृष्टी  निर्माण  होऊन हा अभ्यासवर्ग प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा अनुभव देऊन गेला अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या चर्चासत्रानंतर राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप झाला.

००००

एकनाथ पोवार/वि.स.अ.

 

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला शोक

नागपूर, दि. १७:  चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल शालेय शिक्षण, मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोक संदेशात श्री. केसरकर म्हणतात, डॉ. कीर्तने यांना लेखन आणि संशोधनाचा वारसा आईकडून मिळाला. संगीत विश्वातदेखील त्या रमल्या. सतारवादनाचे शिक्षण घेतले. नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये जाऊन त्यांनी घोडेस्वारी, बंदूक चालवण्याचेही शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात कला शाखेत मराठी विषय घेऊन त्या प्रथम आल्या होत्या.

डॉ.कीर्तने यांनी कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णन, चरित्रात्मक अशा प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांची डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व, बहुरुपिणी दुर्गा भागवत, दुर्गाबाई रूप शोध, गानयोगी पं द.वि. पलुस्कर, आठवणी प्रवासाच्या, चेरी ब्लोसम, पॅशन फ्लॉवर, माझ्या मनाची रोजनिशी, पाऊलखुणा लघुपटाच्या, लघुपटाची रोजनिशी, कॅलिडोस्कोप, हिरवी गाणी, वेडा मुलगा आणि शहाणी माकडे आदी काही पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ. कीर्तने यांनी भारतातील पहिली महिला डॉक्टर डॉ.आनंदीबाई जोशी, संगीताचे सुवर्णयुग, साहित्यिका दुर्गा भागवत या लघुपटांची निर्मिती देखील केली होती.

डॉ.कीर्तने यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

०००

 

नागपूर जिल्ह्यात दीड वर्षात पाच हजार कोटींची कामे प्रगतिपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

 नागपूर दि. १७ : नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) यांनी के.डी.के. कॅालेज जवळ, व्यंकटेश नगर, गोरा कुंभार चौक नंदनवन येथे या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आले. आज भूमिपूजन करण्यात आलेले सर्व उड्डाणपुल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यक्षेत्रातील आहे.

 

यावेळी मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सर्वश्री आ.चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अॅड. आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपण ही कंपनी मी मुख्यमंत्री असताना स्थापन केली आहे. शासकीय कामांमध्ये विशेषतः रेल्वेच्या कामांमध्ये लागणारा विलंब लक्षात घेऊन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यपूर्तता करण्यात या कंपनीचा नावलौकीक आहे. पूर्व नागपुरातील सर्व उड्डाणपुले लवकरात लवकर पूर्णत्वास येतील याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच आमदार कृष्णा खोपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पाचही उड्डाणपुल नियोजित वेळेत पूर्ण होतील, असे सांगितले.

नागपूर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, क्रीडांगणे, शैक्षणिक संस्था यासंदर्भातील कार्याने गती घेतली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पुढील काळात जोमाने काम करण्याची आमचे प्रयत्न आहेत. जिल्हा व महानगराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबोधित केले. महारेलमार्फत आज मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलांचे लोकार्पण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्ह्यामध्ये महारेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे होत असून राज्यामध्ये उड्डाणपुलांचे काम महारेलने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. पूर्व नागपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. शहरामधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत असून नागपूरकरांना येत्या काळात कोणत्याच वस्तीला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. काही दिवसात हे शहर २४ तास पाणीपुरवठा देणारे शहर होईल,  असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यांनी केले. आ. कृष्णा खोपडे यांनीही नागपुरातील पाच उड्डाणपुलांचे भूमिपुजन झाल्याबद्दल आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केला.

आज लोकार्पित झालेले राज्यातील 9 उड्डाणपुल

  • नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 559 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल

प्रकल्पाची लांबी – 742.20 मी.  किंमत  रु. 65.55 कोटी

  • नागपूर जिल्ह्यातील काटोल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 282 बी येथील दोन मार्गिका उड्डाणपूल

प्रकल्पाची लांबी – 610 मी.   किंमत  रु. 57.77 कोटी

  • चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 27 येथील दोन मार्गिका उड्डाणपुल

प्रकल्पाची लांबी – 553.63 मी.   किंमत  रु. 46.14 कोटी

  • नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 95 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल

प्रकल्पाची लांबी – 793 मी.   किंमत  रु. 39.14 कोटी

  • जळगाव जिल्ह्यातील जळगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 147 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल

प्रकल्पाची लांबी – 1005.62 मी.  किंमत  रु. 53.91 कोटी

  • सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 465 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 718.75 मी. किंमत  रु. 35.19 कोटी
  • सांगली जिल्ह्यातील भिलवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 117 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल

प्रकल्पाची लांबी – 1020.30 मी. किंमत  रु. 88.78 कोटी

  • ठाणे जिल्ह्यातील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील तुर्भे येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरणप्रकल्पाची लांबी – 1732 मी.   किंमत  रु. 155.78 कोटी
  • मुंबईतील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील मानखुर्द येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरण प्रकल्पाची लांबी – 835 मी. किंमत रु. 86.91 कोटी .

आज भूमीपूजन झालेले नागपुरातील 5 उड्डाणपुल

  • रेशीमबाग चौक ते के. डी. के कॉलेज चौक आणि टेलिफोन एक्सचेंज ते भांडे प्लॉटपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 2310 मी.किंमत रु. 251 कोटी
  • मसुरकर मार्ग, लाडपुरा येथील चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौकपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपुल

प्रकल्पाची लांबी – 564 मी. किंमत रु. 66 कोटी

  • जुना भंडारा रोड, बागडगंज येथील लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर येथे दोन मार्गिका उड्डाणपुल प्रकल्पाची लांबी – 1351 मी. किंमत रु. 135 कोटी
  • मिडल रिंग रोड, खरबी येथील राजेंद्र नगर चौक ते हसनबाग चौक येथे दोन मार्गिका उड्डाणपुल

प्रकल्पाची लांबी – 859 मी. किंमत  रु. 66 कोटी

  • वर्धमान नगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप (शिवाजी चौक) ते निर्मल नगरी (उमरेड रोड) येथे तीन मार्गिका उड्डाणपुल प्रकल्पाची लांबी – 2724 मी. किंमत रु. 274 कोटी

०००

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...