गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 993

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर

मुंबई, दि.२० : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत डिसेंबर, २०२३ साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना – तांदूळ मोफत दराने प्रती शिधापत्रिका २० किलो, गहू मोफत दराने प्रति शिधापत्रिका १५ किलो व रु. २०/- दराने प्रति शिधापत्रिका १ किलो साखर (सुलभ पॅकिंगसह) असे आहेत.

बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे दर मुंबई शहर व मुंबई उपनगर (दि. १ डिसेंबर २०२३) नुसार रुपये 68.96  ठाणे विभाग (दि. 4 डिसेंबर 2023) नुसार (36/फ) रु. 69.35/-, ठाणे (41/फ) रु.69.35/-, मुंब्रा (48/फ) रु.69.35/-, वाशी (41/ फ) रु. 69.35/-, भाईंदर (41/फ) रु.69.35/-, कल्याण (38/फ) रु. 69.53/-, डोंबिवली (मुख्य) (39/फ ) रु. 69.53/-, डोंबिवली (उप) (39/फ) – 69.53, उल्हासनगर (मुख्य) (40/फ) रु. 69.61/-, उल्हासनगर (उप) (40/फ) 69.61, अंबरनाथ (46/फ) रु. 69.61/-, बदलापूर (46/ फ) रु. 69.61/-, भिवंडी (37/फ) रु. 69.44/- प्रति लिटर या प्रमाणे असून 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर वाटप करण्यात येईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी कळविले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  जनतेच्या हिताचे अनेक निर्णय  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत 14 दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसांमध्ये कामकाज झाले. अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 12 मंजूर झाली.  लोकायुक्त हे महत्त्वाचे विधेयक मंजूर झाले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. परंतु, तब्बल वर्षभरानंतर ते विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झाला. तसेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी काही विधेयके देखील मंजूर झाली. एकही मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झाले. विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यातआले.

हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली. त्याचवेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले. जेव्हा- जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली. कोणत्याही सरकारने केली नाही इतकी विक्रमी ४४ हजार कोटींची मदत गेल्या दीड वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे. धानाचा बोनस वाढवून हेक्टरी १५ हजारांच्या ऐवजी २० हजार रुपये केला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल आणि बळी राजाला मोठा फायदा होईल. कांद्याची महाबँक आपण स्थापन करत आहोत. समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी ही कांद्याची महाबँक तयार करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरु होती. सर्व सदस्यांनी अतिशय शांतपणे, संयमाने आपली मते मांडली. शासनाला सूचना केल्या. न्यायालयात टिकणारे आणि दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर आम्ही ठाम आहोत. एकीकडे भक्कमपणे न्यायालयात लढण्याची आमची तयारी आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्रे विहित कार्यपद्धती राबवून देण्याचे कामही सुरु आहे. फेब्रुवारीत आवश्यकता भासली, तर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील भरविण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला कुणबी नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचे दोन अहवाल शासनाला सादर झाले आहेत. दुसरा अहवाल तपासण्यासाठी विधी विभागाला पाठविला आहे.त्यानंतर त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे लोकाभिमुख सरकार आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे सरकार आहे. मराठा आरक्षणावर सरकार अतिशय सकारात्मक आहे.  त्यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे सगळ्यांचे काम आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळाली पाहिजे, यावर आम्ही कायम आहोत. याप्रकरणी सुबोधकुमार यांची समिती स्थापन केली होती. त्यांनी अहवाल दिला असून त्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशनात निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात 55 हजार 520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष निव्वळ भार हा 48 हजार 384 कोटी 66 लाख रुपये एवढाच असणार आहे. पायाभूत सुविधा उभारणे, विविध विकास कामे यातून पूर्ण करण्यात येतील. वाढलेली महसुली व राजकोषीय तूट कमी करण्यासाठी उत्पन्न कसे वाढेल आणि खर्चावर कसे नियंत्रण ठेवता येईल ते पाहिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची वाढ होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी यावेळी सांगितले.

विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाही नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्ष उत्पादक  शेतकऱ्यांना  नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली आहे. धानाचा बोनस जाहीर केला आहे. विदर्भातील २९ प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे. तसेच विविध गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार कोटी विदर्भातील प्रकल्पांना  देण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाला १५०० कोटी रुपये निधी दिला आहे. सरकारने विदर्भाचा प्रस्ताव मांडला, या प्रस्तावावर चर्चेदरम्यान समर्पक उत्तरे देत विदर्भाच्या विकासाचा आराखडा मांडला. सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. मराठा, धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

हिवाळी अधिवेशनात एकही तास वाया नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, गेल्या ३३ वर्षात घडले नाही असे यंदाचे अधिवेशन झाले. हिवाळी अधिवेशनात कामकाजाचा  एकही तास वाया गेला नाही. अधिवेशन काळात सुमारे १०१ तास म्हणजेच ५ आठवड्यांचे कामकाज झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. दुधाला ५ रुपये प्रतीलिटर अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, धानाला १५ हजार ऐवजी २० हजार रुपये बोनस देणे असे निर्णय घेण्यात आले. ४३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्यात आले. अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेला एकही मुद्दा चर्चेविना राहिला नाही. मराठा समाजातील गरीबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2023 चे हिवाळी अधिवेशन

विधेयकांची यादी

पूर्वीची प्रलंबित विधेयके  :          10

नवीन पुर:स्थापित            :         17

एकूण    :                                 27

दोन्ही सभागृहात संमत :              18

संयुक्त समितीकडे प्रलंबित          06

मागे घेण्यात आलेली विधेयके      03

एकूण    27

दोन्ही सभागृहात संमत विधेयक

(1)       सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक. 48- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्ठता आणण्याकरीता)

(2)       सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक.49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)

(3)       सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक.45- महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, 2023. (गृह विभाग) (महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 याचे निरसन करण्यासाठी) (गृह विभाग)

(4)      सन 2023 चे वि.स.वि.क्र. 51-  महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग) (5)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.47-  महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2023. (गृहनिर्माण विभाग)

(6)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.46-  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(7)      सन 2022 चे वि.स.वि.क्र.36.- महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग) (8)       सन 2023 चे वि.स.वि.क्र. 52 .- महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 (महसूल व वन विभाग)

(9)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.54.-  महाराष्ट्र स्व्यं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण)

(10)     सन 2023 चे वि.स.वि.क्र.-56 जी.एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ,पुणे, विधेयक 2023 (कौशल्य विकास व उद्योजकता)

(11)     सन 2023 चे वि.स.वि.क्र.57.- जी.एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ, नागपूर, विधेयक, 2023 (कौशल्य विकास व उद्योजकता).

(12)     सन 2023 चे वि.स.वि.क्र. 53.-   महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग) (विद्यापीठाचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग)

(13)     सन 2023 चे वि.स.वि.क्र. 50.- महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) विधेयक, 2023 (कृषी व प.दु.म विभाग)

(14)    सन 2023 चे वि.स.वि.क्र.58.-  महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(15)     सन 2023 चे वि.स.वि.क्र.59.- महाराष्ट्र ललित कला शिक्षण मंडळ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण)

(16)     सन 2023 चे वि.स.वि.क्र.60.- महाराष्ट्र विद्युत शुल्क (सुधारणा) विधेयक, 2023 (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)

(17)     सन 2023 चे वि.स.वि.क्र 62.- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

(18)     सन 2023 चे वि.स.वि.क्र. 61 .- युनिव्हर्सल स्किलटेक विद्यापीठ, वसई, विधेयक 2023. (कौशल्य विकास व उद्योजकता)

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.34.- महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी  कामगार (नौकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(2)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.40- महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते  किंवा  किटकनाशके  यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023

(3)      सन 2023 चे वि.स.वि.क्र.41- किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(4)      सन 2023 चे वि.स.वि.क्र.42- बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5)      सन 2023 चे वि.स.वि.क्र.43- अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,

(6)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.44.- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

मागे घेण्यात आलेली विधेयके

(1)       सन 2023 चे वि.स.वि.क्र.18 .-महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

(2)       सन 2022 चे वि.स.वि.क्र.37.- स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(3)       सन 2023 चे वि.स.वि.क्र 21.- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

 

विधानसभा कामकाज

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर, दि. 20 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.

त्यांनी केलेल्या निवेदनात म्हणले आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या पुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात. ही वस्तूस्थिती आहे. तथापि, असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दुध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर रुपये पाच इतके अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ (SNF) करिता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित ( ऑनलाइन पद्धतीने ) अदा करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त (दुग्ध व्यवसाय विकास) यांच्या मार्फत राबविली जाईल. यासंदर्भात शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी या निवेदनात सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २०: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रवींद्र सभागृहात वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

‘रिंगाण’ या कादंबरीविषयी

‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ साठी पुरस्कार जाहीर झाला. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वातही घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो…. या विस्थापितांच्या दु:खांची तीव्रता या कादंबरीतून वाचकांपर्यत पोहोचवली आहे. केवळ तेवढ्यापुरती ही कादंबरी मर्यादित राहत नाही, तर माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री.अभिराम भडकमकर, डॉ. संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण १२ मार्च २०२४ रोजी कमानी ऑडिटोरियम येथील आयोजित कार्यक्रमात होणार असल्याची माहिती सचिव के. श्रीनिवासराव यांनी दिली.

०००

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.२० :राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा़ असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत

या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ४ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू

नागपूर, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल जागरूक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे पार पाडीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा होऊन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या माध्यमातून आपण सर्व त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतही सकारात्मक चर्चा होऊन शासनाने आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभेत नियम 292 अन्वये उपस्थित अंतिम आठवडा प्रस्तावाला तसेच 293 अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

अधिवेशनात उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेवर टीका झाली होती. मात्र, तीच योजना राबविण्याची मागणी आता पुन्हा होत आहे. परकीय थेट गुंतवणुकीपासून शिक्षण क्षेत्रात राज्य पुन्हा आघाडीवर आले आहे. मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, मुंबई पुण्यातील मिसिंग लिंक, एमटीएचएल, कोस्टल रोड या कामांना गती देण्यात आली आहे.

शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करणार

शाळा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासन ठोस पावले उचलित आहे. माझी शाळा, सुंदर शाळा, महावाचन अभियान आदी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संचमान्यता, शिक्षक भरती आदींच्या माध्यमातून शाळांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. आदर्श शाळा तयार करून या शाळांमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम प्राथमिकस्तरावरच नष्ट करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. यापुढे कुणालाही अतिक्रमण करता येणार नाही असे सांगून यात अधिकारी दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

धारावी : रहिवाश्यांचे जीवनमान उंचावणार

मुंबईतील सुमारे दहा लाख रहिवाश्यांसाठी धारावी पुनर्विकास हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. या माध्यमातून झोपड्यांमधून जीवन व्यतित केलेल्या रहिवाशांना यातनामुक्त करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पातील निविदेच्या अटी कायम ठेवण्यात आल्या असून रहिवाश्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा मिळाव्यात याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये वरच्या मजल्यासाठी पुनर्वसनाच्या सुविधा मिळत नाहीत, तथापि या प्रकल्पामध्ये त्यांना सुद्धा लाभ मिळणार असल्याचे तसेच पात्र लाभार्थ्यांबरोबरच अपात्र लाभार्थ्यांना देखील लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. धारावी क्षेत्रात इमारतींना उंचीची मर्यादा असल्याने तेथील टीडीआर इतरत्र विकणे गरजेचे असल्याचे सांगून हा व्यवहार पारदर्शक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकल्पासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

मुंबईसह राज्यात प्रदूषण कमी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकासाची कामे करणाऱ्या यंत्रणांना धूळ आणि राडारोडा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. मुंबईत डीप क्लिनिंग मोहीम हाती घेण्यात आली असून अँटी स्मोक गनचा वापर करण्यात येत आहे. पुढील टप्प्यात राज्यातील सर्व शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतून एकही हिरा उद्योग सुरतला गेला नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई शहरातून सुरतला हिरा उद्योग केल्याची चर्चा होत आहे मात्र मुंबईतून एकही उद्योग सुरतला गेलेला नाही. एकही उद्योग सुरतला जाणार नसल्याचे मुंबई हिरा उद्योग संघानेही स्पष्ट केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शासनाने प्रयत्न केल्यामुळे मुंबईतून हिरा निर्यात सुरतपेक्षा कितीतरी पटीने वाढून ९७ टक्के झाली आहे. तर सुरतची निर्यात सध्या 2.57 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जेम्स ॲण्ड ज्वेलरीसाठी मुंबई शहरात आधुनिक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ३० एकर जागा महापे औद्योगिक वसाहतीमध्ये देण्यात येणार आहे. मध्यंतरी यू.ए.ई व भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला.  त्यानुसार मुंबईत मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुंबईत हिरा उद्योगात मलबार गोल्ड १७०० कोटी गुंतवणूक करीत असून तुर्की डायमंड, तनिष्कदेखील गुंतवणूक करणार आहे. मलबार गोल्ड कंपनी तर देशाचे मुख्यालय मुंबईत करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल उत्कृष्ट काम करीत असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ड्रग्जवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली. ड्रग्ज व्यवसायावरील कारवाईत 24 हजार जणांवर कारवाई सुरू आहे. राज्यात अनेक नवनवीन प्रयोग आणि प्रकल्प हाती घेण्यात आले असून एन कॉर्ड हे नवीन सेंटर सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन लॉटरी, सेक्स्टॅार्शन यावरही मोठी कारवाई होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात 23 हजार पोलीस भरती

राज्यात 1976 नंतर यावर्षी पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण आराखडे आणि नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून 23 हजार पोलिसांची भरती करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

हरविलेल्या मुली आणि महिलांबाबत माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी चार हजार मुली आणि 64 हजार महिला बेपत्ता होतात. मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात मुली परत येण्याचे प्रमाण सरासरी 90 टक्के, तर महिलांच्या बाबतीत 86 टक्के आहे.

महाराष्ट्रात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असून 2020 मध्ये ते 3,94,017 तर 2022 मध्ये 3,74,038 इतके असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश हे पहिले 5 राज्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

खून होण्याच्या बाबतीत उत्तरप्रदेश- 3491 आणि बिहार – 2930 च्या तुलनेत महाराष्ट्र – 2295 जरी संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असला तरीही प्रती लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20 व्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 16 व्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.

महिलांवरील हल्ल्यांबाबतही लोकसंख्येच्या आधारावर प्रती लाख लोकसंख्येनुसार चा दर ओरिसा- 18.9, राजस्थान- 16.2, केरळ- 14.8, कर्नाटक- 12.2, उत्तराखंड- 11.6, आंध्रप्रदेश- 11.5 यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा दर- 8.6 म्हणजे सातव्या क्रमांकावर, बलात्कारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 16 व्या क्रमांकावर, अपहरणांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर, विनयभंग प्रकरणी महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अपहरण प्रकरणी महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.

राज्यात दंगली होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असे म्हटले जाते. तथापि, मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये यात 5.6 टक्के घट झाली ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर हे सुरक्षित शहर : गुन्ह्यांची संख्या कमी

नागपूरमध्ये एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीतही घट झाली असून 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 3155 कमी गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली. 2021 मध्ये नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर तर 2022 मध्ये देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. खुनांच्या संख्येतही 33 टक्के घट झाली असून देशात दुसऱ्या क्रमांकावरून आता सातव्या क्रमांकावर आले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात नागपूर पाचव्या क्रमांकावर होते ते आता सहाव्या क्रमांकावर असून बलात्काराच्या घटनेत चौथ्यावरुन सहाव्या क्रमांकावर आल्याचे ते म्हणाले. हुंडाबळीच्या केवळ दोन घटना घडल्या असून बालआरोपींकडून 2021 च्या 351 त्या तुलनेत 2022 मध्ये 21 गुन्हे घडल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांसाठी विविध प्रकल्प

पोलिसांसाठी आतापर्यंत 4078 प्रकल्प हस्तांतरित झालेले असून 6453 निवासी/ अनिवासी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 300 प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध झाली असून 4541 प्रकल्प निविदास्तरावरील प्राधान्य मिळालेले तर, 21,148 प्रकल्प नियोजनस्तरावर आहेत. 187 पोलिस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती, 305 सेवा निवासस्थाने प्राधान्यक्रम यादीस सरकारची मंजुरी असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा 1 मध्ये 5260 कॅमेरे लावले असून अमरावती, नांदेड  येथे टप्पा-2 हाती घेण्यात आला आहे.

मराठा आंदोलनातील खटले मागे

मराठा आरक्षण आंदोलनात एकूण 548 खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी पोलिस महासंचालकांनी त्यांच्या स्तरावर अंतिम केलेले खटले 175, शासनाकडे शिफारस केलेले 326, शासनाने मागे घेतलेले 324, शासनाने अमान्य केलेले 2, न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले 286, न्यायालयाचे आदेश प्रलंबित असलेले 23, नुकसानभरपाई न दिल्यामुळे प्रलंबित असलेले 10 तर निकषात न बसणारे 47 खटले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

संत रोहीदास महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि.२० : संत रोहीदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या (लिडकॉम) कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

०००

कोविड व्हेरियंट जेएन १ च्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि. २० : कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले.

कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन 1 या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन 1 या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन 1 व्हेरियंट झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात 3.3 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण सध्या 27.1 टक्के पर्यंत गेले असून जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. फ्रान्समध्ये 20.1 टक्के, अमेरिका 14.2 टक्के, सिंगापूर 12.4 टक्के, कॅनडा 6.8 टक्के, युनायटेड किंगडम 5.8 टक्के, स्विडन येथे 5 टक्के येवढे आहे. देशात 19 डिसेंबर 2023 पर्यंत 2 हजार 311 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 2 हजार 41 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहेत. तामिळनाडू 14 तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत. याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

०००

विधानसभा कामकाज

उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. २० : विदर्भातील सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याने या भागात ७४५० इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन विदर्भ विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनला मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी टास्क फोर्सला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भाचा जलद गतीने विकास करण्यासाठी या भागातील शेतकरी, युवक आणि इतर सर्व घटकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
विदर्भात ११ जिल्ह्यांत २५१७ मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीस संधी आहे. तसेच, समृद्धी महामार्गामुळे विदर्भ – मराठवाडा असे ३ टुरिझम सर्किट तयार करण्यात येणार आहेत. सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी निधी दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोणार सरोवर पर्यटन विकासासाठी ९१ कोटी २९ लाख रकमेच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. गोसीखुर्द येथे १०१ कोटींच्या प्रस्तावास जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्पास मान्यता दिली आहे. सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरु करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित कोल गॅसीफिकेशन द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा २० हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प सुरु करीत आहोत. यामध्ये १० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस, सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी ५२० कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविणार येणार आहे. त्यामध्ये २३८ कोटी ८९ लाख कापसासाठी आणि २८१ कोटी ९७ लाख तेलबिया व सोयाबीनसाठी दिले जाणार आहेत. कापसासाठी ५०० व सोयाबीनसाठी २७० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्य शासनाने गेल्या वर्षी १५ हजार रुपये प्रती हेक्टर दोन हेक्टरपर्यंत बोनस दिला होता. आता आपण यावर्षी २० हजार रुपये बोनस देत आहोत. त्याचा लाभ ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी १४०० कोटी निधी लागणार आहे. राज्य शासन विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करीत आहे. वाशिम तालुक्यात पेनगंगा नदीवर ११ बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. जिगाव प्रकल्पाला गती दिली आहे. वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी खर्च येणार आहे. अमरावतीमधील १०० प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले
विदर्भातील अनुशेष संपविण्यासाठी १०० प्रकल्पांकरिता ६७७७ कोटी रुपये आवश्यक असून २०२३-२४ मध्ये सुमारे २१९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी १५०० कोटी निधी दिला असून जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत १० प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित १७ प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यात बळीराजा जलसंजीवनी योजना राबविली जाते. त्यात ९१ प्रकल्पांचा समावेश आहे. पूर्व विदर्भात ६ हजार ७४ माजी मालगुजारी तलाव आहेत. यातल्या २ हजार ५८८ तलावांची वर्ष २०२५ पर्यंत पुनर्बांधणी करण्यात येईल. त्यासाठी ५३३ कोटी निधी देण्यात येईल. अमरावती येथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आले आहे.
वस्त्रोद्योग धोरणात एकूण चार झोन तयार केले आहेत. विदर्भाचा समावेश झोन १ मध्ये केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याचे नवे खनिज धोरण अंतिम टप्प्यात असून त्याचा मोठा लाभ विदर्भाला होणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
००००

विधानपरिषद कामकाज

विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग, शेती, ऊर्जा, पर्यटन क्षेत्राला बळकटी देऊन विदर्भाचा विकास साधणार

नागपूर, दि. २० : उद्योग, शेती, ऊर्जा, पर्यटन क्षेत्राला बळकटी देऊन विदर्भाचा विकास साधून विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत नियम २६० व २५९ अन्वये प्रस्तावावर चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एकनाथ खडसे, अमोल मिटकरी, निलय नाईक, मनीषा कायंदे, महादेव जानकर, प्रवीण दरेकर, अनिल परब, प्रवीण दटके, सचिन अहीर, शशिकांत शिंदे, सुधाकर आडबाले, किरण सरनाईक, अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. यंदा धानाला 20,000 रुपये बोनस जाहीर केला. 1400 कोटी रुपये त्यासाठी देण्यात येणार आहेत. गेल्यावेळी 15,000 रुपये बोनस दिला होता. अंभोऱ्यात 329 कोटींचा जागतिक जल पर्यटनाचा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. लोणार सरोवराच्या विकासासाठी 91 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्याचे नवीन खनिज धोरण अंतिम टप्प्यात आहे. विदर्भातील ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हते, त्या सर्व जिल्ह्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले आहेत. तसेच एलआयटी (LIT) ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. अकोल्यात सुपरस्पेशालिटीचे काम केले. आता अमरावतीत करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. अमरावती टेक्सटाईल पार्कमध्ये आता एकही जागा शिल्लक नाही.

विदर्भात उद्योग क्षेत्राचा वेगात विस्तार : रोजगार निर्मितीस चालना

नागपुरात सौर ऊर्जेसाठी 18,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. समृद्धी महामार्ग झाल्यामुळे उद्योग विस्तार मोठ्या प्रमाणात होणार आहे. लॅाजिस्टिक पार्क नागपुरात उभा राहत आहे. राज्यात नवीन सरकार आल्यापासून विदर्भात 26 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांसाठी 50,595 कोटी रुपयाचे देकार पत्र दिले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. कोनसरीच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा गुंतवणूक येत आहे. विशेष लक्ष केंद्रीत करुन गडचिरोली जिल्हा राज्याला 50,000 कोटींचा महसूल मिळेल, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

वैनगंगा-नळगंगा प्रकल्प क्रांतीकारक ठरेल

गोसेखुर्दसाठी 1500 कोटी रुपये दिले. 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. वैनगंगा-नळगंगा हा 88,000 कोटींचा प्रकल्प क्रांती करणारा प्रकल्प ठरणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता घेण्यात येईल. जिगाव प्रकल्पाला मोठा निधी दिला. त्यातून बुलढाणा जिल्ह्यात मोठा लाभ त्यामुळे होणार आहे. जुलै 2022 नंतर 32.14 दलघमी पाणीसाठा निर्माण केला. जलसंपदा विभागाच्या 29 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. धरण आणि कालव्याच्या दुरुस्तीचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेषतः आदिवासी क्षेत्रात 8041 हेक्टर अतिरिक्त सिंचन निर्माण होणार आहे.

विदर्भाच्या अनुशेषाची चर्चा होत असते. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जेव्हा हा प्रश्न मांडला, तेव्हा बळीराजा जलसंजीवनीच्या माध्यमातून त्यांनी मोठी मदत केली. 80 टक्के प्रकल्प हे विदर्भातील होत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल उत्कृष्ट काम करीत असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहे. ड्रग्जवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार आहे. ड्रग्ज व्यवसायावरील कारवाईत 24 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात अनेक नवनवीन प्रयोग आणि प्रकल्प हाती घेण्यात आले असून एन कॉर्ड हे नवीन सेंटर सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन लॉटरी, सेक्स्टॅार्शन यावरही मोठी कारवाई होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

राज्यात २३ हजार पोलिसांची भरती

राज्यात 1976 नंतर यावर्षी पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण आराखडे आणि नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून 23 हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. हरविलेल्या मुली आणि महिलांबाबत माहिती देताना श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी चार हजार मुली आणि 64 हजार महिला बेपत्ता होतात. मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात मुली परत येण्याचे प्रमाण सरासरी 90 टक्के, तर महिलांच्या बाबतीत 86 टक्के आहे.

महाराष्ट्रात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असून 2020 मध्ये ते 3,94,017 तर 2022 मध्ये 3,74,038 इतके असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश हे पहिले 5 राज्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

खून होण्याच्या बाबतीत उत्तरप्रदेश- 3491 आणि बिहार – 2930 च्या तुलनेत महाराष्ट्र – 2295 जरी संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असला तरीही प्रती लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20 व्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 16 व्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.

महिलांवरील हल्ल्यांबाबतही लोकसंख्येच्या आधारावर प्रती लाख लोकसंख्येनुसारचा दर ओरिसा- 18.9, राजस्थान- 16.2, केरळ- 14.8, कर्नाटक- 12.2, उत्तराखंड- 11.6, आंध्रप्रदेश- 11.5 यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा दर- 8.6 म्हणजे सातव्या क्रमांकावर, बलात्कारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 16 व्या क्रमांकावर, अपहरणांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर, विनयभंग प्रकरणी महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अपहरण प्रकरणी महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.

राज्यात दंगली होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असे म्हटले जाते. तथापि, मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये यात 5.6 टक्के घट झाली ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर हे सुरक्षित शहर : गुन्ह्यांची संख्या कमी

नागपूरमध्ये एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीतही घट झाली असून 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 3155 कमी गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली. 2021 मध्ये नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर तर 2022 मध्ये देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. खुनांच्या संख्येतही 33 टक्के घट झाली असून देशात दुसऱ्या क्रमांकावरून आता सातव्या क्रमांकावर आले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात नागपूर पाचव्या क्रमांकावर होते ते आता सहाव्या क्रमांकावर असून बलात्काराच्या घटनेत चौथ्यावरुन सहाव्या क्रमांकावर आल्याचे ते म्हणाले. हुंडाबळीच्या केवळ दोन घटना घडल्या असून बालआरोपींकडून 2021 च्या 351 त्या तुलनेत 2022 मध्ये 21 गुन्हे घडल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांसाठी विविध प्रकल्प

पोलिसांसाठी आतापर्यंत 4078 प्रकल्प हस्तांतरित झालेले असून 6453 निवासी/ अनिवासी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 300 प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध झाली असून 4541 प्रकल्प निविदास्तरावरील प्राधान्य मिळालेले तर, 21,148 प्रकल्प नियोजनस्तरावर आहेत. 187 पोलिस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती, 305 सेवा निवासस्थाने प्राधान्यक्रम यादीस सरकारची मंजुरी असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा 1 मध्ये 5260 कॅमेरे लावले असून अमरावती, नांदेड  येथे टप्पा-2 हाती घेण्यात आला आहे.

मराठा आंदोलनातील खटले मागे

मराठा आरक्षण आंदोलनात एकूण 548 खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी पोलिस महासंचालकांनी त्यांच्या स्तरावर अंतिम केलेले खटले 175, शासनाकडे शिफारस केलेले 326, शासनाने मागे घेतलेले 324, शासनाने अमान्य केलेले 2, न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले 286, न्यायालयाचे आदेश प्रलंबित असलेले 23, नुकसानभरपाई न दिल्यामुळे प्रलंबित असलेले 10 तर निकषात न बसणारे 47 खटले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

०००

दत्तात्रय कोकरे/राजू धोत्रे/प्रवीण भुरके/विसंअ/

०००

बाजारगांव कंपनीतील स्फोट प्रकरणी चौकशी सुरू – मंत्री डॉ. सुरेश खाडे

नागपूर, दि २० : नागपूर जिल्ह्यातील चाकडोह, बाजारगाव येथील संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रे उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या कारखान्यात स्फोट होऊन ९ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित सर्व विभागांमार्फत चौकशी सुरु असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

नियम 97अन्वये अल्पकालीन चर्चा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रवीण दटके, सचिन अहिर, शशिकांत शिंदे  यांनी उपस्थित केली होती. त्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते.

नागपूर येथील अमरावती रोडवर असलेल्या चाकडोह बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्रिज इंडिया लि. या कारखान्यात १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या स्फोटाच्या घटनेतील मृत कामगारांपैकी ८ कामगार हे कामगार राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना कामगार राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार निवृत्तीवेतन मिळणार आहे. तर उर्वरित १ मृत कामगाराच्या वारसाला नुकसान  भरपाई मिळणार आहे.  याबाबत व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रु. २० लाख सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. ५ लाख देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. पी.एम.केअर फंडातून आर्थिक मदत मिळण्याबाबत नागपूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ९ मृत कामगारांच्या एका वारसदारास कंपनीमार्फत नोकरी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने मृत कामगार मिता ऊईके आणि ओमेश्वर मच्चीरके यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

सोलार इंडस्ट्रिज इंडिया लि. या कारखान्यात संरक्षण विभागाकरीता लागणाऱ्या विस्फोटकांचे उत्पादन केले जाते. कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे ३४०० असून कारखान्यातील कामगारांना किमान वेतन देण्यात येत आहे. कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ या इमारतीत टी.एन.टी. आणि आर.डी.एक्स. या कच्च्या मालाचा वापर करुन हॅण्ड ग्रेनेड बनविण्यासाठी लागणाऱ्या पेलेटसची निर्मिती केली जाते.

17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर 2 मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते.या ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असतांना सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याने कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला व 3 पुरुष कामगारांचा समावेश आहे.

घटनास्थळास नागपूर जिल्हाधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक, अपर संचालक व वरिष्ठ अधिकारी, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा विभागाचे अधिकारी, बॉम्ब शोध व निकामी पथक, दहशतवाद विरोधी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ, पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल उपस्थित असून कार्यवाही सुरू आहे, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

0000

प्रवीण भुरके/ससं/

—————————

 

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...