शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 987

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ९.३५ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची परतफेड ३० जानेवारी, २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची २९ जानेवारी २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ३० जानेवारी २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 9.35 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

००००

 

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ची ७.८९ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.८९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची परतफेड ३१  जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

७.८९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची ३० जानेवारी, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ३१ जानेवारी, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 7.89 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

*****

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे १०० वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सोलापूर, दिनांक 28 ( जिमाका):-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसूली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली जात आहेत. परंतु पुणे विभागात पिंपरी चिंचवड व सोलापूर येथे हे नाट्यसंमेलन आयोजित केले जाणार असून, सोलापूरचे नाट्य संमेलन दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन 100 वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, नाट्य व सिने अभिनेता भाऊ कदम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार तथा संमेलनाचे कार्य अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, विजय साळुंखे, तेजस्विनी कदम, प्रशांत बडवे, मोहन डांगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सोलापूर येथे यापूर्वीही संमेलने झालेली आहेत त्यामुळे सोलापूरकरांना उत्कृष्ट नियोजनाचा चांगला अनुभव असल्याने हे शंभरावे नाट्यसंमेलन अशा पद्धतीने करावे की त्याची देशभरात दखल घेतली जाईल. यापुढे झालेली व पुढील काळात होणारी सर्व नाट्य संमेलनात सोलापूर येथे झालेल्या व येथे पाहुण्यांचे केलेले आदरतिथ्य व दिलेल्या सर्व सोयी सुविधा याची दखल नाट्यसंमेलनानी घेतली पाहिजे तसेच ते देश पातळीवर आदर्शवत ठरले पाहिजे यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत 100 वे नाट्य संमेलन होणार असून, मराठी नाट्य परिषदेने या कालावधीत नाट्य कलावंत ,नाट्य रसिक यांच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे नाटक ठेवायचे तसेच त्यातील सारांश कसा असावा याची सर्व जबाबदारी घ्यावी. या नाट्य संमेलनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. तसेच हे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सोलापूरकरांनी सहकार्य करावे. संमेलनासाठी आपण स्वतः दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश आज नाट्य परिषदेला देत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही नाट्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले तसेच प्रत्येकाने या संमेलनासाठी सढळ हाताने निधी द्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

मराठी नाट्य परिषदेने या संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्याची जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महानायक अमिताभ बच्चन आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

सोलापूर येथील नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्थानिक नाट्य कलाकारांनी ही यात सक्रिय सहभाग घ्यावा. सर्व नाट्यप्रेमी नागरिकांनी या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते भाऊ कदम यांनी केले. हे संमेलन आपल्या घरीच होत आहे असे समजून प्रत्येक सोलापूरातील नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारी सर्वस्वी जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. यापूर्वी सोलापूरकरांनी दोन नाट्य संमेलने व एक बाल नाट्य संमेलन यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे शंभरावे संमेलन ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सोलापूरकर नागरिक सहभाग देतील अशी अपेक्षा व्यक्त करून या संमेलनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना आणावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते भाऊ कदम व मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून शतक महोत्सवी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाट्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय साळुंखे यांनी केले तर आभार प्रशांत बडवे यांनी मानले.

                                                                                    000

जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खंडेराजुरीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

सांगलीदि. 28 (जि. मा. का.) : जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल म्हणून घडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ‍पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 171 व दुसऱ्या टप्प्यात 143 शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मिरज तालुक्यातील 35 शाळांचा समावेश आहे. याच माध्यमातून खंडेराजुरीच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलची सुंदर व देखणी इमारत तयार झाली असून तिचे आज लोकार्पण होत आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्य शासनाने अंगिकारला असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मॉडेल स्कूलच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सरपंचा शुभांगी चव्हाण, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, प्रभारी गट विकास विकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, शिक्षण विस्तार अधिकारी एस. आर. चिकलकी व श्रीमती श्रद्धा कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना चव्हाण यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कंत्राटदार यांच्यासह विविध मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शाळा खंडेराजुरी या शाळेच्या 6 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी 93 लाख 29 हजार एवढा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, खंडेराजुरी गावाच्या रस्ते, पाणी, तीर्थक्षेत्र विकास आदि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामस्थांनीही गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समिती स्तर मिरज तालुक्यातील 36 शाळांना संगणक देण्यात येत असून, पहिला संगणक आज या शाळेला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. तसेच, आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केलेल्या गरजू रूग्णांना डॉ. खाडे यांच्याहस्ते प्रातिनिधीक चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी बँक ऑफ इंडिया मालगावचे शाखाधिकारी श्री. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. इंद्रजीत पाटील, किशोर कांबळे, सुरेश चौगुले, वास्कर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत श्री. स्वामी यांनी, प्रास्ताविक सुलोचना चव्हाण यांनी केले. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायन केले. तद्‌नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. आभार सुधीर आदर्से यांनी मानले.

पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व फायद्यांविषयी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅली; विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दाखविली हिरवी झेंडा

अमरावती, दि. 28 : यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्याचे आहारमधील महत्व व फायदे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाव्दारे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला व रॅलीला विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहे‍ब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पंचवटी चौक येथील डॉ. पंजाबराव देखमुख यांच्या पुतळ्याला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याव्दारे पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गक्रमण करण्यात आले. पंचवटी चौक येथून रॅलीचा शुभांरभ होऊन शहरातील महत्वाच्या रस्ते मार्गाने मार्गस्थ होऊन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या ठिकाणी समारोप झाला.

कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, आत्माच्या संचालिका अर्चना निस्ताने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी झाले होते.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरडधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात पारंपरिकदृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते. आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. पौष्टिक तृणधान्याचे महत्व व त्याचे आहारातील फायदे याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागाव्दारे रॅली, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.

000

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये दर्जेदार सुविधा द्याव्यात – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 28 (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

शासकीय विश्रामगृह मिरज येथे आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तालुका क्रीडा अधिकारी आरती हळींगळी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड आदि उपस्थित होते.

राज्यातील, देशातील मान्यताप्राप्त क्रीडा संकुल अशी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज विषद करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, यासाठी विहित पद्धतीचा अवलंब करून सूक्ष्म आराखडा तयार करावा. तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावे. क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून, निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू दिली जाणार नाही. असे क्रीडा संकुल निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यातील खेळाडुंचा क्रीडा विकास होईल, असे ते म्हणाले. तसेच, प्राप्त निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने करून खेळाडुंना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे वाढीव क्रीडा सुविधा, 400 मी. धावन मार्ग सिंथेटिक करणे, बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे, जलतरण तलाव दुरूस्तीस निधी, कबड्डी, खो-खो खेळासाठी डोम तयार करणे, व्यायामशाळा करणे व त्यासाठी व्यायाम साहित्य खरेदी करणे, वास्तूविशारद पॅनेल मार्फत जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता  मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, सांगली मिरज रस्त्यावरील मुख्य रस्त्यावरून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

किरण बोरवडेकर व आरती हळींगळी यांनी सादरीकरण करून आतापर्यंतच्या कार्यवाहीची व आगामी नियोजनाची माहिती दिली.

000

“विकसित भारत संकल्प यात्रे” च्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी साधला जनतेशी संवाद

ठाणे, दि.28(जिमाका) :- ग्रामपंचायत पोटगाव बरडपाडा येथे दि.27 डिसेंबर रोजी “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. यावेळी विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थींशी कपिल पाटील यांनी संवाद साधला. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी श्री. साईनाथ बासरे यांना घरकुलाची चावी देण्यात आली. कुणाल भोईर यांनी आयुष्यमान भारत योजनेमुळे त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया विनामूल्य झाल्यामुळे त्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले. जलजीवन योजनेंतर्गत तालुक्यात 175 कोटीहून अधिक रक्कमेच्या 203 योजनांची कामे हाती घेण्यात आली. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत 41 हजार 932 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयाचे 15 हप्ते देण्यात आले. तालुक्यात एकूण 125 कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसंदर्भात उपस्थित लाभार्थ्यांशी मंत्री महोदयांनी संवाद साधला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजना लाभार्थीना आभा कार्डवाटप करण्यात आले. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 3 लाभार्थ्यांना श्री.पाटील यांच्या हस्ते लाभ देण्यात आला. यावेळी सौ. चारुशीला गायकर यांनी एन. आर. एल. एम. योजनेंतर्गत 26 बचतगटांनी कर्ज घेतल्याचे सांगितले. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बुडीत मजुरीचे धनादेश देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी विकसित भारत संकल्पनेची शपथ घेतली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी केले. कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रमोद काळे, उपजिल्हाधिकारी श्री.रामदास दौंड, मुरबाडचे तहसिलदार श्री. संदिप आवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महिला व बालविकास अधिकारी श्रीम. कल्पना देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, सहायक गटविकास अधिकारी श्री. सुरुशे, उप अभियंता पाणीपुरवठा श्री. बनकरी, कृषी अधिकारी श्री. रणजीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच भारती भोईर, उपसरपंच विठ्ठल भोईर, माजी सरपंच संजय भोईर, ग्रामसेवक विशाल शेलार व सर्व ग्रा. पं. सदस्य यांनी केले.

000

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना अर्थसहाय्य

सांगलीदि. 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा धनादेश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज देण्यात आला. डॉ. खाडे यांनी खंडेराजुरी (ता. मिरज) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी श्रीकृष्ण पाटील व कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर वावरे यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या गावात प्रत्यक्ष जावून सांत्वन करत धीर दिला. यावेळी खंडेराजुरी येथे मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, कोंगनोळी येथे कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह स्थानिक व्यक्ती, कर्मचारी उपस्थित होते.

खंडेराजुरी येथे श्रीमती सीमा श्रीकृष्ण पाटील (आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पत्नी) यांना व कोंगनोळी येथे सुनिता लक्ष्मण वावरे (आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या आई) यांना महाराष्ट्र शासनामार्फत अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.

राज्य शासनाकडून अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीची मर्यादा दुसऱ्यांदा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, एका महिन्यापूर्वी आपण भेट देऊन वावरे कुटुंबियांचे सांत्वन केले. आज मदतीच्या धनादेशाच्या माध्यमातून आपण या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. तसेच, त्यांचे घर पावसाने पडले असून, त्याच्या दुरूस्तीसाठीही मदत देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अडचणीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सोबत असल्याचे ‌त्यांनी सांगितले. यावेळी सुनिता वावरे यांनी राज्य शासनाने मदत दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

000

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ चा ७४५ कोटीचा निधी १०० टक्के खर्च झाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

सोलापूर, दिनांक 28(जिमाका):-जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण  590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 28 लाख निधी असा एकूण  745 कोटी 28 लाख इतका निधी मंजूर असून 20 डिसेंबर पर्यंत एकूण खर्च  झालेला निधी 190 कोटी 11 लाख इतका आहे. हे प्रमाण कमी असून अर्थसंकल्प तरतुदीच्या 38.75 टक्के आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी समितीने मंजूर केलेला निधी शंभर टक्के खर्च करावा. हा निधी व्यपगत होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची राहील, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री जयसिद्धेश्वर स्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, की सन 2023-24 चा 100 टक्के निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. लवकरच लागणारी आचारसंहिता विचारात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून निधी मार्च 2024 पूर्वी खर्च होईल याबाबत काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण  589 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 28 लाख निधी तर सर्वसाधारण मध्ये 111 कोटीची अतिरिक्त मागणी प्रस्तावित केलेली आहे. अशा प्रकारे 855 कोटी 28 लाखाचा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर ठेवण्यास जिल्हा नियोजन मान्यता देत असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगून अतिरिक्त मागणी केलेला निधीही मोठ्या प्रमाणावर मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सन 2024-25 च्या आराखड्यामध्ये कृषी व संलग्न सेवा 48 कोटी, ग्रामीण क्षेत्र विकास 43 कोटी, जलसंधारण विभाग योजना 61 कोटी, ऊर्जा विकास 48 कोटी, नगर विकास योजना 94, कोटी रस्ते व परिवहन 66 कोटी, पर्यटन तीर्थक्षेत्र संवर्धन व विकास 41 कोटी या पद्धतीने मागणी करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनामधील असमानता आणि जलद गतीने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या बाबी विचारात घेऊन सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी शिक्षण, आरोग्य व राज्य वीज वितरण कंपनीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मांडलेल्या विविध समस्यांच्या अनुषंगाने या सर्व विभागाच्या पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठका आयोजित करून त्याची सविस्तर माहिती घेण्यात येईल. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी यावर अधिक लक्ष घालून सर्व यंत्रणा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. तसेच जिल्ह्याच्या टंचाईच्या अनुषंगाने कालवा समितीची पुढील दोन दिवसात बैठक घेऊन माहे जुलै 2024 अखेरपर्यंत पाणी पुरेल या दृष्टीने नियोजन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र पुढील आठवड्यात सुरू करण्यात येतील. तसेच होटगी येथील विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने तेथील कामे सुरू झालेले असून रनवे व प्रशासकीय इमारतीचे तसेच संरक्षक  भिंतीची कामे जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होतील व त्यानंतर विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून विमान सेवा सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक शासकीय कामकाजात दिरंगाई अथवा टाळाटाळ करत असतील त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन ग्रामसेवकांना शासकीय कामे तातडीने करण्याबाबत निर्देशित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांनी सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी पाईपलाईनच्या कामकाजाविषयी माहिती दिली. हे काम निविदा प्रक्रियेनुसार नोव्हेंबर 2024 आखेर पर्यंत पूर्ण अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार व समिती सदस्य प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा व त्यांचा मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने खालील विषय, समस्या व निधीची मागणी केली.

जन सुविधा योजनेच्या निधीत वाढ करावी, तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधीत वाढ करावी, मंद्रूप येथील मंजूर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, जुळे सोलापूर येथे नाट्यगृह सुरू करावे, समशानभूमीसाठी जागा उपलब्ध करावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई मिळावी, जिल्हा सामान्य रुग्णालयाला सिटीस्कॅन व एम आर आय मशीन तात्काळ उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जातील अडचणी सोडवाव्यात, ग्रामसेवकावर योग्य नियंत्रण ठेवावे, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती सुधारावी, शिक्षकांची रिक्त पदे भरावेत, पिक विम्याच्या आग्रिममधून वगळलेल्या मंडळांना पीक विम्याची रक्कम मिळावी, पाणंद रस्ते साठी निधी मिळावा, धर्मादाय रुग्णालयात आरक्षित बेडबाबतची माहिती दर्शनी भागात लावावी, महा ई सेवा केंद्र लवकर सुरू करावीत, होटगी येथील विमानतळ सेवा लवकर सुरू करावी, सोलापूर शहराला नियमित  व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असल्याने टंचाईच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आदी मागण्या लोकप्रतिनिधी व अशासकीय सदस्यांनी मांडल्या व त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा 20 डिसेंबर 2023 अखेर झालेल्या खर्च तर सन 2024-25 चा प्रारूप आराखडयाची  माहिती बैठकीत सादर केली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी आभार मानले.

000

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 28 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ या सारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्या. तृणधान्याला आता मोठी मागणी आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्ये उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तृणधान्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट – ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावीजागतिक कृषी गणना व शेती विषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावाकृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावीपिकांवरील कीड नियंत्रणासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाटपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर आणखी वाढीव निधीची मागणी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा. विभागाने आर्थिक वर्षात केलेल्या तरतुदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षांत वाढीव निधीची मागणी करता येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे...

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

0
मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी...

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

0
सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील...