रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 986

विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास बंदी

मुंबई, दि. 29 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे व हाय राइजर फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग, लेझर बीम प्रदीपन आदींमुळे विमानांचे सुरक्षित येणे-जाणे धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही विमानाच्या लॅण्‍डीग, टेक ऑफ आणि येण्याजाण्यामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देऊ शकेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

नीलेश तायडे/विसंअ

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

  • राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

१०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

१०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

१०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सोलर सिस्टीम व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले.

नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहूर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहूर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बृहन्मुंबई हद्दीत ३१ जानेवारीपर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात फटाके, रॉकेट उडविण्यावर बंदी

मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त  हद्दीत 31 जानेवारी 2024  पर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडविणे किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट, बफर झोन, माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. असे बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या 15 आणि 50 एकर क्षेत्रामध्ये ही बंदी लागू राहणार आहे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ

 

बृहन्मुंबई हद्दीत ५ जानेवारीपर्यंत जमावबंदी

मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांच्या बैठकांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी अपवाद राहील, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

नीलेश तायडे/विसंअ

बृहन्मुंबई हद्दीत ९ जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 जानेवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, अग्नीशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, विना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकते, अशी हत्यारे बाळगणे, स्फोटके वाहून नेणे, प्रेत, आकृती, पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत, नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा, चौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ

पाणलोटसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २९ : जलयुक्त शिवार अभियान २.० शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करुन ही पदे भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गाळमुक्त धरण –गाळयुक्त शिवार अभियानात तलावातील गाळ काढण्याची तरतूद आहे. अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्याने याठिकाणची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. आता यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण याचा सुद्धा समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज जलयुक्त शिवार अभियान २.० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण, वसुंधरा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ नाथ यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा, ए टू झेड चंद्रा फाऊंडेशनच्या के. अवंती आदींची यावेळी उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, 2014 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा अतिशय परिणामकारक पद्धतीने राबविला गेल्यामुळे भुजलपातळीचा स्तर उंचावण्यास मदत झाली. अनेक गावांतील पाणीटंचाई समस्या कमी झाली. आता पुन्हा नव्याने राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास सुरुवात केली आहे. कृषी, मृद व जलसंधारण यासह विविध यंत्रणांचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे जोमाने काम केल्यास हे अभियान यशस्वी होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग घेणे, स्वयंसेवी संस्थांची मदत आणि गावपातळीवर शासकीय यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग अशा एकत्रितपणे हे अभियान पुढे नेण्याची सूचना त्यांनी केली. सध्या याकामी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असेल, तर स्वतंत्र पदनिर्मिती करुन ती पदे भरण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2015-16 ते 2018-19 मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानात अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्याने याठिकाणची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर शेतात हा गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढली. यावर्षीही ही मोहीम अधिक गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. राज्य शासनाने गाळ काढण्यासाठी 20 एप्रिल 2023 रोजी 31 रुपये प्रती घनमीटर इतका दर निश्चित केला आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन या दरात वाढ करण्याची सूचनाही त्यांनी केली. ज्याठिकाणी स्वयंसेवी संस्था गाळ काढण्याच्या कामात सहभागी होण्यास मर्यादा असतील तेथे स्थानिक ग्रामपंचायतींना निधी देऊन ही कामे करण्याचा विचार केला जाईल. तलावातील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण आणि नाला रुंदीकरण ही कामेही हाती घेण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आयुक्त श्री. चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण केले. सध्या या अभियानांतर्गत 5775 गावे निवडण्यात आली आहेत. गाव आराखड्यानुसार मंजूर कामांची संख्या ही 1 लाख 57 हजार 142 इतकी असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात 22 हजार 593 गावात हे अभियान राबविले गेले. त्यामध्ये 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण करण्यात आली. यात, एकूण 20 हजार 544 गावे जलपरिपूर्ण होऊन 27 लाख टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण झाला. एकूण 39 लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी श्री. मुथा यांनीही राज्य शासनाच्या या अभियानात भारतीय जैन संघटना निश्चितपणे पुढाकार घेऊन शासनासोबत काम करेल, असे सांगितले.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महासंकल्प रोजगार अभियानात महानिर्मितीकडून १०४२ उमेदवारांची निवड

  • विजया बोरकर यांची ‘महानिर्मिती’च्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड

मुंबई, दि. २९ :- राज्यात खात्रीशीर, दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनी समोरील आव्हान आहे. यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरणेबाबत, राज्य शासनाच्या “महासंकल्प रोजगार” अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेत १२ प्रातिनिधिक उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले. या समारंभात ते सह्याद्री अतिथीगृह येथे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन, महापारेषणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार, सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

महाराष्ट्रात युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ हजार पदभरती करण्याचा शासनाने निर्धार केला आणि महानिर्मितीने पारदर्शकतेसह जलदगतीने मागील एक वर्षाच्या काळात विविध संवर्गातील १०४२ उमेदवारांची निवड केली ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. शिवाय १५० उमेदवारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. पारदर्शक भरतीमुळे युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतो, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. विजया बोरकर यांची महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचे आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नवीन उत्साहाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 भारत विकसनशील आणि जलदगतीने आर्थिक विकास करणारे राष्ट्र आहे. या आर्थिक विकासाचा कणा ऊर्जा विभाग आहे. आगामी काळात ऊर्जेची मागणी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने ऊर्जा क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी तीनही कंपन्यांनी आपापल्यापरीने सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०३५ पर्यंतचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सद्य:स्थितीत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात  बदल होईल. पंप स्टोरेज, ग्रीन हायड्रोजनसारखे धोरण राज्याने तयार केले आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले की, ऊर्जा पुरवठ्यावर गुणवत्तापूर्ण जीवन,औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे. महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये लवकरच सुमारे १५ हजार भरती प्रक्रिया होणार आहे. त्यांनी मागील दीड वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती देत ऊर्जा विभागाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

प्रास्ताविकातून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबलगन यांनी सांगितले की, मानव संसाधन विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यात येणार असून त्याद्वारे बदली, बढती , टपाल,उच्च श्रेणी लाभ , गोपनीय अहवाल , ई – सेवा पुस्तिकेचा  समावेश करण्यात येणार आहे. राज्यभरात महानिर्मितीचे एकूण 9 हजार 915 प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी 6814 व्यक्तींना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. 2 हजार 103 पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण  देण्यात येत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते १२ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले, त्यात विजया बोरकर (मुख्य अभियंता), राहुल नाळे (उप मुख्य अभियंता), अरुणा भेंडेकर (अधीक्षक अभियंता), जयदीप राठोड (लॅब केमिस्ट), अक्षय शिरसाट (सहाय्यक अभियंता), ज्ञानेश्वर कारंडे (सहाय्यक अभियंता), प्रकृती यादव (सहाय्यक अभियंता), प्रथमेश सोनजे (सहाय्यक अभियंता), सागर बागुल (कनिष्ठ अभियंता), मंगेश लाखे (कनिष्ठ अभियंता), तेजस काटे(कनिष्ठ अभियंता), वैभव सोनवणे(कनिष्ठ अभियंता) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी, तर आभार प्रदर्शन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी केले. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक बाळासाहेब थिटे, संजय मारुडकर, अभय हरणे, कार्यकारी संचालक डॉ.नितीन वाघ, पंकज नागदेवते, उपसचिव नारायण कराड, तसेच मुख्य अभियंते आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

मनीषा सावळे/विसंअ

 

 

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृणाल नेगांधी यांची मुलाखत

मुंबई, दि. २९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकास’ या विषयावर शाश्वत पर्यावरण विकास परिषद आयोजन समितीचे सचिव तसेच बांबू प्रॉडक्शनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक कृणाल नेगांधी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

वाढलेले कार्बन उत्सर्जन, त्यातून झालेला हवामान बदल आणि त्यामुळे निर्माण होणारे संकट लक्षात घेता राज्य शासनाने या समस्येवर शाश्वत उपायासाठी व्यापक आणि महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून बांबू लागवड, शाश्वत शेती आणि पर्यावरण रक्षण अश्या विविध उपक्रम व योजनांवर चर्चा आणि कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. नागरिक आणि शेतकरी यांना या विषयाबाबतची जनजागृती तसेच या उपक्रमांची अंमलबजावणी  याबाबतची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून श्री. नेगांधी यांनी दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. नेगांधी यांची मुलाखत सोमवार दि. 1, मंगळवार दि. 2 आणि बुधवार दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्यामार्फत न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात विविध उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यानी १५ जानेवारी २०२४ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे (२५ हजार व ५० हजार रुपये करिता स्वतंत्र योजना) (गट-अ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखला, शिधापत्रिका, दारीद्र्य रेषेखालील कार्ड किंवा चालुवर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा), आधार कार्ड, बँकेचे पासबुक पहिले पान व फोटो, जो व्यवसाय करणार त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.  अनुसूचित जमातीच्या घरामध्ये २.५ विद्युत संच बसविणे (गट – क) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखला, शिधापत्रिका, दारीद्रय रेषेखालील कार्ड किंवा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा), आधार कार्ड, बँकेचे पासबूक पहिले पान व फोटो इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. या योजनेसाठी अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई,कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या कार्यालयामार्फत विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाईल.

०००००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...