रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 985

‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.30 : राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट / पर्यटक निवास ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे, 27 उपहारगृहे असून, निवास व न्याहारी (Bed and Breakfast), महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र (Visitor Centre’s), इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग (IISDA) इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे, 850 हून अधिक लेण्या, 400 च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. 1975 मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये केली जाते. रिसॉर्टस आणि पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे.

या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. ही सवलत 01 ते 08 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही सवलत, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल.

ही सवलत एमटीडीसीच्या लिज प्रॉपर्टीजसाठी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटकांना डिस्काऊंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकाच वेळी करता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार एमटीडीसीने राखून ठेवले आहे. हा प्रोमो कोड वापरून एकावेळी फक्त एका कक्षाचे बुकिंग करता येईल. ज्यांच्या नावावर बुकिंग केले जाईल त्या व्यक्तीने चेक-इनच्या वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा, बुकिंगची  पूर्ण रक्कम जमा करावी लागेल.

सर्व क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी, एमटीडीसी आपल्या ‘आई’ (AAI) उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर करत आहे. या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी, लवकरात लवकर https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. एमटीडीकडून ही ऑफर केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील आणि परदेशातील सर्व महिलांसाठी एक खास भेट आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीद्वारे महिला पर्यटकांना करण्यात आले आहे.

‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणाची राज्यात पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल या धोरणाची कार्यवाही करीत आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

राज्य, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. ३० : ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, यासाठी त्यांचा जन्मदिवस, १५ जानेवारी हा राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून प्रतिवर्षी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास पूर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० हजार तर क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये असे एकूण २ लाख २५ हजार सुधारित अनुदान देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिन साजरा करण्यासाठी भरीव अनुदान उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल मंत्री श्री. बनसोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

राज्य क्रीडा दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

क्रीडा व युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन राज्य क्रीडा दिनानिमित्त करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी केले आहे.

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि.३० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री श्री.आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रेल्वे विभागाच्या जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टयांचे पुनर्वसन करणे, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंगीकृत्त उपक्रम महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्यौगिकी मर्या. (महाप्रित) यांच्या विविध योजना, स्कॉलरशिप योजनेमध्ये ॲटोरिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी यावेळी सादरीकरण करून विविध योजनांची माहिती करून दिली.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे,मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) वंदना कोचुरे यांच्यासह गृह विभाग, नगरविकास विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, विधि व न्याय विभाग,  संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मान

मुंबई, दि. २९ देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला देश विश्वगुरू व्हावा, असेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेऊन कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरु होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते  प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.    

याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्य राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता राय, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले काही प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री.बैस म्हणाले, देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ’माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासीक वारसा जोपासण्याचे काम केले.

या अभियानात महाराष्ट्राने दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली यांचा अभिमान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांना, शहिदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन साजरा केला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यत भारताला  विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्नं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

0000

आयुष्मान भारत मिशनचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावा – डॉ. ओमप्रकाश शेटे

बीड,दि.29 (जिमाका) : जिल्ह्यातील  सर्व वयोगटातील नागरिकांना आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉ. शेटे यांच्या अध्यक्षतेत आयुष्मान भारत/ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांची प्रमुख उपस्थिती  होती. जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय, खाजगी  रूग्णालयांचे प्रमुख याबैठकीस उपस्थित होते. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य  योजनांचा लाभ जिल्ह्यातील  सर्व स्तरातील नागरीकांना मिळावा याकरीता “विकसित भारत संकल्प यात्रा २०२४” अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक डॉ.  शेटे यांनी घेतली.

यावेळी डॉ. शेटे यांनी जिल्हयातील  सध्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत देण्यात येणारे ओळखपत्र अधिकाधिक लोकांना मिळावे, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यातंर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरीकांना या योजनेचा लाभ मिळवा, यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. डॉ. शेटे या जिल्ह्याचे भूमिपुत्र  असल्यामुळे जिल्ह्यातील जनआरोग्य सेवा अधिक सुदृढ व्हावी यासाठीची भावना असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या यादीवर असणाऱ्या ठराविक  खाजगी रूग्णालयात रूग्णांवर इलाज केला जातो. मात्र, शासन यादीवरील रूग्णालयाला ठरवून दिलेले दर हे मागील 10-12 वर्ष जुने असून हे वाढविण्यात यावे, अशी विनंती खाजगी रूग्णालयाच्या उपस्थित प्रतिनिधींनी केली. यावर याबाबत सर्वंकष विचार केला जाईल असे आश्वासन देऊन याबाबत एक समिती नेमली जाईल, यामध्ये शासकीय,निमशासकीय, खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय विभागाचे प्रमुख नेमून अंतिम दर ठरविण्यात येतील, असे श्री शेटे यांनी सांगीतले. यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अधिक आजांराचा समावेश करून रूग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचेही  डॉ. शेटे यांनी यावेळी माहिती दिली.

जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या  शासकीय पायाभुत सुविधांच्या बाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. वर्ष 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी पायाभूत सूविधांकरीता आराखडा निश्चित केला आहे. यासाठी शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या मंजूरी लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे डॉ. शेटे याप्रसंगी म्हणाले.

पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व फायद्यांविषयी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन

अमरावती, दि. 29 : यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्याचे आहारमधील महत्त्व व फायदे याबाबत जनजागृती होण्यासाठी कृषी विभागाद्वारे भव्य मोटरसायकल रॅलीचे गुरुवारी (ता.28) आयोजन करण्यात आले. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला व रॅलीला विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहे‍ब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पंचवटी चौक येथील डॉ. पंजाबराव देखमुख यांच्या पुतळ्याला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याद्वारे पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गक्रमण करण्यात आले. पंचवटी चौक येथून रॅलीचा शुभांरभ होऊन शहरातील महत्त्वाच्या रस्ते मार्गाने मार्गस्थ होऊन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या ठिकाणी समारोप झाला.

कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, आत्माच्या संचालिका अर्चना निस्ताने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी झाले होते.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरडधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात पारंपरिकदृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते. आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. पौष्टिक तृणधान्याचे महत्व व त्याचे आहारातील फायदे याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागाव्दारे रॅली, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.

 यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि.२९ : राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार योजने’अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वर्ष 2023 करिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी 31 जानेवारी  2024 पर्यंत पाठविता येणार आहे.

एकूण 4 विभाग, 35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रुपयांचा पुरस्कार

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रुपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाड्.मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण 6 साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रुपयांची पुरस्कार रक्कम आहे.

‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी  साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार’  (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये)  प्रदान करण्यात येणार आहे.

बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल.  प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे  31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

राज्यशासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.  यासह  या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात  उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली  या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.

ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहीत नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.

मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तर बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग , बाबा खडक सिंग मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयास भेट द्यावी.

0000000

 

आयुष्मान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी – आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे

जालना, दि. 29 (जिमाका) :-  सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत  राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने या योजनेच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. त्यांनी आयुष्मान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, महानगर पालिकेचे  आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक विजय भुतेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयक  विद्या मस्के आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, खाजगी रुग्णालय व सीएससी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुष्य भारत मिशन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले की, प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत आयुष्मान भारत मिशन हे रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. महाराष्ट्रात अनेक सर्वसामान्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा देण्यात येतो. जालना जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्डचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची या कार्डासाठी नोंदणी करावी तसेच स्वस्त धान्य दुकानावर शिधा घेण्यासाठी येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची कार्डासाठी नोंदणी करावी व पात्र लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करावे. हे काम मिशन मोडवर राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.

जालना येथील शासकीय रुग्णालयात मनुष्यबळाची निकड लक्षात घेता तीन आरोग्य मित्रांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी सुचनाही डॉ. शेटे यांनी केली. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करुन आयुष्मान भारत कार्ड वितरणाचा दैनंदिन आढावा घेण्यात यावा, असे सांगून आरोग्य मित्र व जिल्हा समन्वयक यांना किमान वेतन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बैठकीस उपस्थित खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून डॉ. शेटे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  आरोग्य मित्र खूप चांगले काम करत असल्याबाबतची माहिती खाजगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी दिली असता खाजगी रुग्णालये या योजनेविषयी समाधानी असल्याने आनंद वाटला असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी राष्ट्रीय कार्य समजून अधिकाधिक आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेतंर्गत गावागावांत जावून आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करुन लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात येत आहे. दररोज जवळपास दोन हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांची कार्डसाठी नोंदणी करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात  कार्ड वितरणास गती देऊन उदिष्ट वेळेत पूर्ण केले जाईल. प्रारंभी विजय भूतेकर, विद्या मस्के यांनी योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

नॉन पेसा क्षेत्रातील १५९ पदांसाठी पदभरती करणार – विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर

मुंबई, दि. २९ : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या  १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठी जाहिराती ११.०८.२०२३ ते १४.०८.२०२३ या कालावधीत विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १४.०९.२०२३ ते ०३.१०.२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असल्याचे श्री.दिवेकर यांनी सांगितले.

कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यशावकाश आय.बी.पी.एस. संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही सहसंचालक श्री. दिवेकर यांनी म्हटले आहे.

०००००

 

विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

मुंबई, दि. 29 : मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे.

तसेच उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 अनुज्ञप्ती यांना  रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलडब्ल्यू -2 अनुज्ञप्ती यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.

तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना  पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिलता असेल. सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे.  ही वेळेची शिथिलता 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ

 

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...