बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 943

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

पुणे, दि. १६ : विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्द‍िष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते बोलत होत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी. परमानंदन, कुलपती डॉ. जी. के. शिरुडे, कुलसचिव डॉ. एस. बी. आगाशे, परीक्षा नियंत्रक डॉ. मित्तल मोहिते, अधिष्ठाता डॉ. डिंपल सैनी, डॉ. बीजू पिल्लई आदी उपस्थित होते.

 विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्वाचे आहे. यादृष्टीने बालाजी विद्यापीठानेदेखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा. आपला पदवी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील.

आज वेगवान प्रगतीसाठी जगात ‘मल्टिटास्किंग’आणि ‘मल्टिस्किलींग’आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे. विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपती, गायक, कलाकार, व्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाशी असलेले नाते कायम ठेवून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

यशस्वी स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री.बैस म्हणाले, बालाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ पुढे आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थींनींसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवणे विशेष आहे अशा शब्दात त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. स्नातकांनी देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ.परमानंदन म्हणाले, अपयश यशाची पहिली पायरी असून चुकांमधून विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमण केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थी यशस्वी झाले तर देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल. देशासाठी काय करता येईल याचा विचार करावा आणि त्यानुसार प्रत्येकाने प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कुलगुरु डॉ. जी. के. शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला विविध विद्या शाखांचे संचालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

00000

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली, 16 : ‘जाणता राजा, मामाच्या गावाला जाऊ या, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन मुलींना विभागून देण्यात आले.  तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल, शिक्ष‍ीका भावना बावने, सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.

या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होते.

000000

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 09 /दि. 16.01.2024

 

मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने (ICAR) माती परिक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले.

मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  झालेल्या बैठकीस  मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सु. म. काळे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोत्रे, मृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिव शुभांगी पोटे, मृद व जलसंधारणचे सहसंचालक पांडुरंग शेळके, कृषी उपसंचालक शरद सोनवणे उपस्थित होते.

कृषी विकास दर वाढवण्यास मातीची गुणवत्ता व पोषकता महत्त्वाची असून यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.  मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

बैठकीत राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन संस्थेचे (ICAR) संचालक नितीन पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण केले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व

नाशिक दि. 16 (जिमाका वृत्तसेवा): सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कला प्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान महाराष्ट्राने पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. हरयाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. समारोप समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि  क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध आठ कला प्रकारातील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवात लोकनृत्य (समूह आणि वैयक्तिक), लोकगीत (समूह आणि वैयक्तिक), घोषवाक्य अथवा एखाद्या विषयावरील सादरीकरण, कथा लेखन, पोस्टर मेकिंग आणि छायाचित्रण अशा कलाप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली.

महाकवी कालिदास कलामंदिर, महायुवा ग्राम, हनुमाननगर, रावसाहेब थोरात सभागृह, महात्मा फुले कलादालन, उदोजी महाराज म्युझियम आदी ठिकाणी या विविध आठ कलाप्रकारातील स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ३१ राज्यातील युवा स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या सादरीकरणाला नाशिककरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. मन मोहवणारे लोकसंगीत, लोकनृत्य यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

महोत्सवाच्या समारोप समारंभात या कलाप्रकारातील विजेत्यांना पालकमंत्री श्री. भुसे आणि क्रीडा मंत्री श्री. बनसोडे तसेच केंद्रीय  क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सुद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे या मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांकास रुपये एक लाख आणि  तृतीय क्रमांक विजेत्यांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विविध कलाप्रकारातील विजेते खालीलप्रमाणे आहेत. 

सांघिक विजेतेपद: १. महाराष्ट्र, २. हरयाणा, ३. केरळ

लोक नृत्य (समूह): १. महाराष्ट्र, २. केरळ, ३.पंजाब

लोकनृत्य (वैयक्तिक) : १. सृष्टी भारद्वाज, उत्तराखंड २. सनी कुमार, हरयाणा

३ धनिष्ठा काटकर, महाराष्ट्र

लोकगीत (समूह): १. केरळ, २. पंजाब, ३ राजस्थान

लोकगीत (वैयक्तिक):  १. पृथ्वीराज (महाराष्ट्र), २. उमा वर्मा ( मध्य प्रदेश) आणि ३. छायारानी मेलांग ( आसाम).

घोष वाक्य सादरीकरण: १. परिशा मिधा (दिल्ली), २.कार्तिकेय शर्मा  (राजस्थान), ३. शिखा (मध्य प्रदेश).

कथालेखन: १. सृष्टी दीक्षित (उत्तर प्रदेश), २. माही जैन (हरयाणा) आणि ३. नव्या एन. (केरळ)

पोस्टर मेकिंग: १. साहीलकुमार (हरयाणा)

२. महक सैनी (चंदीगड) आणि ३. सौराद्युती सरकार( त्रिपुरा).

छायाचित्रण: १. संकल्प नायक (गोवा),  २. सिमरन वर्मा (दिल्ली) आणि

३. फुन फुन लुखाम (अरुणाचल प्रदेश).

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली, १६ : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला.

या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झाला. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे व विवेक मोगल या टीमने पुरस्कार स्वीकारला.

भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या (DPIIT) वतीने राजधानी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे “राज्यांचे स्टार्टअप रँकिंग” पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री. गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी विशेष सचिव सुमिता डावरा, लॉजिस्टिक्स, उद्योग, ग्राहक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे सहसचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत, ज्यात राज्य सरकार, इनक्यूबेटर, एंजेल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणे हे समृद्ध महाराष्ट्राचे ध्येय आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी, मुंबई २०१८ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेने आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्ष २०२२ च्या आवृत्तीमध्ये ७ व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामध्ये, २५ कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकता, बाजारपेठेत प्रवेश, इंक्यूबेशन आणि मेंटरशिप सपोर्ट, फंडिंग सपोर्ट, एनेबलर्सची क्षमता बांधणी, शाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मरचा क्रमांक पटकवला.

महाराष्ट्र राज्यात स्टार्टअप इको सिस्टम बळकट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍ राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.

राज्य सरकारने स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणे, बाजार पेठेचा अभ्यास करणे, वित्तीय व्यवस्थापन करणे यावर ही प्रशिक्षण दिले जात आहे.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.10  / दिनांक 16.01.2024

 

मुंबईत १८ व १९ जानेवारीला देशातील पहिला मध महोत्सव

मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मध माशापालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी  पत्रकार परिषदेत केले.

मंत्रालयातील मंत्रालय आणि  विधिमंडळ वार्ताहर कक्षात श्री. साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती,  मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे. त्यामुळे मधा बरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य, मधाचे व मधमाशांचे विविध प्रकार, व मधापासुन तयार होणारी विविध उत्पादने, तसेच  सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासुन विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक दुपारी 12.30 वाजता आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

मध महोत्सवाच्या माध्यमातून मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात १८ जानेवारीला शेती व मधमाशा पालन, गुणवत्तापूर्ण मध आणि मुल्यवर्धित उत्पादने, १९ जानेवारीला मध व आरोग्य, मधुक्रांतीसाठी महाराष्ट्राचे पाऊल या विषयांवर परिसंवाद होणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा ‘मधुबन’ हा मधाचा ब्रॅंड आहे. हे दर्जेदार मध २० टक्के सवलतीच्या दराने नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहे असेही श्री. साठे म्हणाले.

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव, प्रति किलो पाचशे रुपये, देणारे राज्य आहे. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. राज्यात १० गावांची निवड मधाचे गाव यासाठी करण्यात आलेली आहे. डोंगराळ भाग, मध हा पारंपरिक व्यवसाय असणे आणि फुलोरा या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रशिक्षण व  जनजागृती करण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय मधमाशीचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रिम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे.

राज्यात मधमाशांच्या ५ जाती आहेत. सातेरी, मेरीफेरा, आग्या, फ्लोरिया आणि पोया. यातील सातेरी आणि मेरीफेरा ह्या अंधारात राहणाऱ्या आणि पाळीव मधमाशा आहेत. या  मधमाशांची शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होते.  याच मधमाशीचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाबळेश्वर आणि पश्चिम घाटातील १२ जिल्हे आणि ६३ तालुक्यात सातेरी मधमाशी सापडते.

कोकणात पोयाच्या छोट्या मधमाशांचे अस्तित्व आढळते, विदर्भात सातेरी तर मराठवाड्यात मेरिफेरा या मधमाशीचे जतन करतात. सूर्यफुल, ओवा, जांभुळ, आग्या माशांचे मध असे विविध प्रकारचे मध या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.

यावेळी महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील उपस्थित होते.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

 

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप; यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

नाशिक दि. 16 : जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केले. दरम्यान, या युवा महोत्सवात यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले, तर हरियाणा आणि केरळने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

नाशिक येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या २७ व्या क्रीडा महोत्सवाचा आज सकाळी महायुवाग्राम, हनुमाननगर येथे समारोप झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक वनिता सूद, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. प्रारंभी युवा गीत आणि महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नियोजन केले. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वेळोवेळी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे युवकांच्या या कुंभमेळ्याचे यशस्वीपणे संयोजन करता आले. या महोत्सवाच्या पाच दिवसांत नाशिककरांनी युवकांना भरभरून प्रोत्साहन दिले. त्यामुळे

यजमान महाराष्ट्रासह नाशिककरांच्या आदरातिथ्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, नाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत परिश्रम घेत अवघ्या 20 दिवसांत या महोत्सवाची तयारी पूर्ण केली. त्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनीही या महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. यानिमित्त राज्य शासनाने ‘महा एक्स्पो’चे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील युवक – युवतींमध्ये विचार, संस्कृतीचे आदान- प्रदान होऊन देशाची अखंडता आणि राष्ट्रवादाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक श्रीमती सूद म्हणाल्या, राष्ट्रीय युवा महोत्सव हा विविध रंगांनी भरलेला होता. या महोत्सवात सहभागी युवक – युवतींनी महोत्सवाचा आनंद, अनुभव घेतला. त्यामुळे नवी उमेद आणि उत्साह घेऊन सहभागी युवक- युवती घरी जातील.

श्री. दिवसे म्हणाले की, गेल्या पाच दिवसांपासून हा महोत्सव सुरू होता. या महोत्सवात देशातील 31 राज्यातील साडे सातहजारांवर युवक – युवती सहभागी झाले होते. याशिवाय रोज किमान ५० हजार नागरिक महोत्सवास भेट देत होते. पाच दिवसांत तीन लाख नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. बाहेरून आलेल्या युवकांची 120 हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कमी कालावधीत यशस्वीपणे संयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवा महोत्सवात झालेल्या विविध कला, क्रीडा व वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागाचे सह संचालक सुधीर मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

सहकार्याबद्दल सत्कार

नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वी  संयोजनात सहकार्य केल्याबद्दल श्री. क्षेमकल्याणी यांच्यासह उद्धव निमसे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ॲड. नितीन ठाकरे, सुरेश केला यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह पोलीस, मनपा, जि.प, क्रीडा विभागाचे राज्यभरातील अधिकारी  तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व

महाराष्ट्र संघाने मिळविले सांघिक विजेतेपद

सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कला प्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान महाराष्ट्राने पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. हरयाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. समारोप समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि  क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध आठ कला प्रकारातील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवात लोकनृत्य (समूह आणि वैयक्तिक), लोकगीत (समूह आणि वैयक्तिक), घोषवाक्य अथवा एखाद्या विषयावरील सादरीकरण, कथा लेखन, पोस्टर मेकिंग आणि छायाचित्रण अशा कलाप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली.

महाकवी कालिदास कलामंदिर, महायुवा ग्राम, हनुमाननगर, रावसाहेब थोरात सभागृह, महात्मा फुले कलादालन, उदोजी महाराज म्युझियम आदी ठिकाणी या विविध आठ कलाप्रकारातील स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ३१ राज्यातील युवा स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या सादरीकरणाला नाशिककरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. मन मोहवणारे लोकसंगीत, लोकनृत्य यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

महोत्सवाच्या समारोप समारंभात या कलाप्रकारातील विजेत्यांना पालकमंत्री श्री. भुसे आणि क्रीडा मंत्री श्री. बनसोडे तसेच केंद्रीय  क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सुद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे या मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांकास रुपये एक लाख आणि  तृतीय क्रमांक विजेत्यांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विविध कलाप्रकारातील विजेते खालीलप्रमाणे आहेत. 

सांघिक विजेतेपद: १. महाराष्ट्र, २. हरयाणा, ३. केरळ

लोक नृत्य (समूह): १. महाराष्ट्र, २. केरळ, ३.पंजाब

लोकनृत्य (वैयक्तिक) : १. सृष्टी भारद्वाज, उत्तराखंड २. सनी कुमार, हरयाणा

३ धनिष्ठा काटकर, महाराष्ट्र

लोकगीत (समूह): १. केरळ, २. पंजाब, ३ राजस्थान

लोकगीत (वैयक्तिक):  १. पृथ्वीराज (महाराष्ट्र), २. उमा वर्मा ( मध्य प्रदेश) आणि ३. छायारानी मेलांग ( आसाम).

घोष वाक्य सादरीकरण: १. परिशा मिधा (दिल्ली), २.कार्तिकेय शर्मा  (राजस्थान), ३. शिखा (मध्य प्रदेश).

कथालेखन: १. सृष्टी दीक्षित (उत्तर प्रदेश), २. माही जैन (हरयाणा) आणि ३. नव्या एन. (केरळ)

पोस्टर मेकिंग: १. साहीलकुमार (हरयाणा)

२. महक सैनी (चंदीगड) आणि ३. सौराद्युती सरकार( त्रिपुरा).

छायाचित्रण: १. संकल्प नायक (गोवा),  २. सिमरन वर्मा (दिल्ली) आणि

३. फुन फुन लुखाम (अरुणाचल प्रदेश).

०००

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई, दि. १५ :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल समोर, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम) येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ” आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त  र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. “देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्य, री-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.

महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा, वृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी 50 लाख आहे, तर उपलब्धता केवळ 12 लाख आहे. तसेच एका डॉक्टर मागे साधारणत: 5 क्लिनिकल आणि 5 नॉन-क्लिनिकल आरोग्य सेवकांची आवश्यकता असते. कोविड व त्यानंतरच्या काळात मोठ्याप्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. विकसित देशात वृध्दांची काळजी घेण्याच्या (Old age care) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

भारतात वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षण उच्चत्तम गुणवत्तेचे आहे. वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षणानंतर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवकांसाठी पदविका (Diploma) अभ्यासक्रमांत व प्रमाणपत्र (Certificate) अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्याचे निर्देशीत आहे.

मंडळाद्वारे पॅरामेडिकल गटातील 30 प्रमाणपत्र अभ्यासक्रम व 11 पदविका अभ्यासक्रमात प्रति वर्षी राज्यभरातील 300 संस्थांमधून साधारणत: 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. तथापि, विविध नियामक संस्थांच्या अटी व परदेशात आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी सक्षम यंत्रणेकडे नोंदणी असणे अनिवार्य असल्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‍आता मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्यास प्रारंभ झाला आहे. मंडळाने पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत मागील ३ वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे निकालपत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी प्रक्रियेत पडताळणीसाठी सादर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्र पडताळणी सोयीस्कर झाले आहे.

नोंदणीकरिता अर्ज करण्याची पद्धत

https://www. maharashtraparamedicalcouncil. org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. वैयक्तिक दस्तऐवज, मंडळाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र व गुणपत्र अपलोड करावे व अर्ज शुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे अर्जांची छाननी व पडताळणी करण्यात येईल. कौन्सिलद्वारे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्यावर नोंदणीशुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. अधिक माहितीकरीता मंडळाचे संकेतस्थळ https://msbsvet.edu.in वर माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.

पॅरामेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Laboratory Technician), किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ (Radiography & Ultra-Sonography Technician), हृदयचिकित्सा तंत्रज्ञ (Cardiology Technician), मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ (Neurology Technician), रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician), ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ (Optometry Technician), शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ (Operation Theatre Technician), रक्तशुद्धीकरण तंत्रज्ञ (Dialysis Technician) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

झुरिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

दावोस, दि. 16 :- जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची 2024 ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मोठ्या अपूर्वाईने स्वागत करण्याचे निश्चित केले आहे.

भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

 बृहन्महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत.  इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत.

महेश बिराजदार (मुळचे लातूर), मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे.

श्रीमती किर्तीमालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड), मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील श्री. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे.

शेखर काकडे यांनी पत्नी विद्या, कन्या बिल्वा काकडे (झुरिक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही झुरिकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो.

प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.

००००

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...