बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 942

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई, दि. 16 : आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार

ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी श्री. जैन यांची चर्चा झाली.

जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावरदेखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे ५००० नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रित आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स ४००० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल. अशा प्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. ‘महाप्रित’चे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दावोस येथील महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे (महाराष्ट्र पॅव्हेलियन) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसह उद्योग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

54 व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस येथे यावर्षी मी पुन्हा आलो आहे, गेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. यावर्षी उत्पादन, अन्न प्रक्रिया, डिजिटल- नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी  गुंतवणूक येईल, यावर विशेष भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईल, यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सुरजागड इस्पात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, 16 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली. गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.

गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

000

 

 

 

 

 

वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

मुंबई, 16 : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या.

 आ. रमेश पाटील, विविध प्रशासकीय अधिकारी आणि पालघर, डहाणू आणि वाढवण बंदर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वाढवण बंदर परिसरात किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. हे बंदर समुद्रात होणार असल्याने भूसंपादनाची त्याला आवश्यकता नाही. केवळ रस्ते आणि रेल्वेसाठी जी जागा लागेल, त्यासाठी बाजारभावाप्रमाणे चौपट मोबदला देण्यात येईल. तसेच जे मासेमार प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. प्रकल्पबाधित मासेमारांच्या पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे.÷ त्यांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यात येईल.

या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून, त्यात स्थानिकांनाच मोठ्या संख्येने रोजगार मिळेल, हे सुनिश्चित केले जाईल. मासेमारांच्या मुलांचे रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, हॉस्पीटल इत्यादी सुविधा इत्यादींकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष दिले जाईल. या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातच अत्याधुनिक फिशिंग हार्बरची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, या भागात जेएनपीटीमार्फत विविध विकास कामे सुद्धा केली जावीत, असेच नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि त्यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना याची एक पुस्तिकाच प्रकाशित करुन ती संबंधितांना देण्यात यावी, त्यामुळे कुणाच्याही मनात कोणती शंका राहणार नाही, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.

००००

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न

पुणे, दि. 16 : भारताला 2047 पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील बुद्धीवान युवा पिढी पुन्हा भारताकडे स्थलांतर करील, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.

चऱ्होली बु. येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू हृदयेश देशपांडे, अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाच्या चेअरपर्सन श्रीमती पूजा पाटील, विविध विद्याशाखांचे अधीष्ठाता, विभागप्रमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते.

देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेसाठी देशात  सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे, असे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, देशात 50 टक्के भारतीयांना कृषी क्षेत्र रोजगार प्रदान करत असताना कृषी, पशुवैद्यकशास्त्र, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन तसेच फलोत्पादन क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने काही गावांना दत्तक घ्यावे आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांचा विकास करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विविध विद्याशाखांमध्ये अग्रक्रम मिळविलेल्या, पदकप्राप्त तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राज्यपाल पुढे म्हणाले, विकसित भारताच्या अनुषंगाने युवकांनी आपल्या कल्पना मांडाव्यात. चांद्रयान मिशन, सूर्य मिशन, आशियाई आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे यश यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्याची भावना निर्माण झाली आहे. हीच भावना युवकांनी आपल्या हृदयात ठेवावी आणि संपत्तीचे निर्माते आणि स्टार्टअप्सचे प्रवर्तक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी नवोन्मेषक आणि जोखीम घेणारे उद्योजक बनावे. आता भारतानेही स्वतःचे नवीन उद्योजक निर्माण करण्याची वेळ आली असून आपले व्यवस्थापन पदवीधर, अभियंते, शास्त्रज्ञ त्यांच्या स्वत: च्या जागतिक दर्जाच्या कंपन्या, सल्लागार कंपन्या तयार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल पुढे म्हणाले, जगातील अनेक देशांनी वेगवेगळ्या काळात विकसित राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तसेच आपत्तींना तोंड देत अनेक देश विविध क्षेत्रात आघाडीवर आले आहेत. जगातील अनेक देश व्यापार आणि गुंतवणुकीसाठी चीनला मोठा पर्याय शोधत असताना त्याचा लाभ भारताला होऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षीत, पुन: प्रशिक्षीत आणि त्यांची कौशल्यवृद्धी कशी करतो यावर हे अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू श्री. देशपांडे यांनी यांनी स्वागत आणि विद्यापीठ अहवाल सादर केला. या पदवीप्रदान सोहळ्यात 847 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षण तज्ज्ञ भरत अमलकर, सर्वोच्च न्यायालयातील अभियोक्ता जे. साई दीपक, रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष रॉबर्ट वॉल्टन, संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार ले. जन.विनोद खंदारे (निवृत्त), चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांना मानक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. याप्रसंगी जे. साई दीपक आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते विद्यापीठातील विविध विद्याशाखात अग्रस्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदके, पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

00000

 

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

मुंबई, दि. १६ :- प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषी; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण; सहकार; मराठी भाषा; शालेय शिक्षण; सांस्कृतिक कार्य; मत्स्यव्यवसाय; वने; पाणीपुरवठा व स्वच्छता; अल्पसंख्याक; पणन; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता; मदत व पुनर्वसन; फलोत्पादन; रोजगार हमी; परिवहन अशा १६ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ; सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील; सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील; कृषी मंत्री धनंजय मुंडे; मराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर; अल्पसंख्याक तथा पणन मंत्री अब्दुल सत्तार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील; फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.

विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्र, नवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरु असतात. या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. अशा योजनांचा आढावा घेऊन, त्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरु ठेवावी आणि कोणती बंद करावी याची कारणमिमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत. साधारण ५० कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेता येईल. तसेच ५० कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठीचा केंद्र शासनाचा हिस्सा वेळेवर मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करताना १५वा वित्त आयोग, समान विषयास केंद्र शासनाकडून मिळणारा निधी यांचाही वापर करावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात. राज्य शासनाचे उपक्रम, कार्यक्रम ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करावेत. जनतेला दिलेली आश्वासने वेळेअगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी रोजगार, मत्स्यव्यवसाय तथा सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिव राजेशकुमार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अमुस ओ.पी.गुप्ता, कृषी विभाग तथा फलोत्पादन विभागाचे अमुस अनुप कुमार, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कौशल्य, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करुया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 16 : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यू सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता सुरक्षा समितीचा सदस्य आहे. त्यामुळे आपल्या हातून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही, असा संकल्प करुन चंद्रपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सकारात्मक जनजागृती आणि शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिस विभागामार्फत जिल्ह्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ करताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंचावर प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अपघात घडणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे. यासाठी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सप्ताह, पंधरवडा किंवा महिनाभर हे अभियान न राबविता 365 दिवस रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावे. भविष्यात अपघात शून्यावर आणायचे असतील तर तरुणांना वाहन सुरक्षेच्या कायद्याचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

एखाद्याचा जीव वाचविणे हे सर्वात पुण्याचे काम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यादी करून त्याचा आराखडा तयार करावा व शासनाकडे त्वरीत पाठवावा, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हाच महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. हा चेहरा अपघातांमुळे विद्रूप होऊ नये. इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा हेवा करावा, असे अपघातमुक्त चंद्रपूरचे नियोजन झाले पाहिजे. चंद्रपूर, बल्लारपूर व इतर ठिकाणी ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’सह सीसीटीव्ही बसवावे. जिल्ह्यातील सर्व ‘स्पीड ब्रेकर’वर सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘रेडियम’ आणि बोर्ड लावावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक चौथ्या मिनिटात देशात अपघातामुळे एक मृत्यू होतो. ही मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. रस्ता सुरक्षेबाबत नियमांची जनजागृती आणि अंमलबजावणी ही पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 2022 आणि 2023 मध्ये 31 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात एकही अपघात आणि मृत्यू झाला नाही. बहुतांश नागरिक पोलिस दिसल्यावर हेल्मेट किंवा सिटबेल्ट लावतात. पोलिसांसाठी नव्हे तर नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी याचा वापर करावा.

मनपा आयुक्त पालीवाल म्हणाले, मोबाईल आणि गाड्या अपडेट होत आहे. मात्र त्याप्रमाणे ते वाहन चालविण्याचे ‘स्किल अपडेट’ होणे गरजेचे आहे. कॅन्सरपेक्षा जास्त मृत्यू रस्ता अपघातात होतात. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून जागरुक नागरिक निर्माण होणे गरजेचे आहे.

दारुबंदीच्या काळात कमी अपघात

अपघातांची अनेक करणे असून शकतात.  मानसिक तणाव, मद्यप्राशन करीत वाहन चालविणे अशा स्वरूपात अपघातांचे विश्लेषण केले जाते. दारुबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी होती. आता मात्र ती वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्य चौकात मद्यविक्रीचे परवाने दिले जात आहेत, ही शोकांतिका आहे, याबाबत पुढे असे परवाने देऊ नये, असे मत यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

प्रभावी जनजागृतीवर भर

रस्ता सुरक्षा अभियानात लोकांच्या हृदयाला भीडेल अशी जनजागृती करण्यात यावी. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर घोषवाक्य स्पर्धा आयोजित करावी. निबंध स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट स्पर्धकांसाठी पारितोषिक ठेवावे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुद्रांक शुल्क अभय योजना

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यत सूट दिली आहे. तसेच दंडामध्येही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत असून पहिला टप्प्या 31 जानेवारी 2024 पर्यंत तर दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. योजनेची व्याप्ती, मिळणारी सूट व अर्ज करावयाची पद्धती याविषयीची माहिती…

या योजनेंतर्गत 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या दरम्यान नोंदणी केलेल्या दस्तांसाठी पहिल्या टप्प्यात ज्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापेक्षा कमी आहे अशा दस्तांवरील मुद्रांक शुल्कासह दंडात 100 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 1 लाखांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्कावर 50 टक्के तर दंडात 100 टक्के सवलत आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एक लाखापर्यंत मुद्रांक शुल्कासह दंडाच्या रकमेतही 80 टक्के सवलत असणार आहे. तसेच एक लाखांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्कावर 40 टक्के तर दंडात 70 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोंदणी केलेल्या दस्तांसाठी 25 कोटी रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्कात 25 टक्के सवलत मिळणार आहे. दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90 टक्के सवलत आहे. तसेच दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास 25 लाख दंड वसूल करुन उर्वरित दंडाच्या रकमेला सूट देण्यात येईल. 25 कोटी रुपयापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर 20 टक्के सवलत दिली असून एक कोटी रुपये दंड म्हणून वसूल करुन उर्वरित दंडाच्या रकमेस सूट देण्यात येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 25 कोटीपर्यंतच्या मुद्रांक शुल्कात 20 टक्के तर दंडाची रक्कम 50 लाखांपेक्षा कमी असल्यास 80 टक्के सवलत देण्यात येईल. 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क असल्यास 10 टक्के सवलत दिली जाईल. तर दोन कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात येऊन उर्वरित रकमेस सूट देण्यात येईल.

योजनेची व्याप्ती

ही योजना निवासी, वाणिज्य विषयक, औद्योगिक तसेच कृषी विषयक प्रयोजनासाठीचे खरेदीखत, भाडेपट्टे, विकसन करार, साठेखत, विक्री करार, वाटपपत्र, बक्षीसपत्र आदी दस्तांसाठी लागू आहे. म्हाडा, सिडको, महानगरपालिका, विविध विकास प्राधिकरणे, एमआयडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आदी विविध प्रकारच्या दस्तांसाठी लागू आहे.  31 डिसेंबर 2020 पूर्वीच्या नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजांसाठी ही योजना लागू राहील. परंतु मुद्रांक शुल्क नसलेल्या कोऱ्या कागदावरील मालमत्तेच्या हस्तांतरण दस्तऐवजांसाठी ही योजना लागू होणार नाही.

अर्ज करण्याची कार्यपद्धती

अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांना समक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण असल्यास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या 8888007777 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अभय योजनेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासास चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांना नवीन घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. मुद्रांक शुल्काचा कमी भरणा केला असल्याने मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया प्रलंबित असलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण तातडीने पूर्ण होण्यासाठीही अभय योजनेची मदत होईल.

00000

विभागीय माहिती कार्यालय, पुणे

‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव-2024’ या विषयावर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. महात्मा गांधी यांच्या “खेड्याकडे चला” यापासून प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असून त्यासाठी मंडळामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 18 व 19 जानेवारी रोजी देशातील पहिला ‘मध महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि. 18 जानेवारी 2024  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 17 जानेवारी, 2024 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर;पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

जळगाव,दि.16 (जिमाका वृत्तसेवा)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी  योजना समाजातील‌ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

चित्ररथामध्ये सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती उपायोजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजना, अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत गाय गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य ,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा प्रतिकृती योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती  या एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर दि. 16 : नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस, गारपीट यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे  शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान  भरपाई  देण्याकरिता  विभागातील सर्व जिल्ह्यांनी  येत्या तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तसेच वाळू डेपो कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.   

श्रीमती  बिदरी  यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विषयांवर आढावा बैठक झाली.  यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे आणि भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपायुक्त दीपाली मोतियेळे, अतिरीक्त जिल्हाधिकारी आशा पठाण (नागपूर), श्रीकांत देशपांडे (चंद्रपूर), नरेंद्र फुलझेले (वर्धा), धनाजी पाटील (गडचिरोली) यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.

‍राज्यात 26 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान  व  पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यासह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनपत्र प्राप्त झाले होते. याप्रमाणे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांकडून प्राप्त माहितीनुसार एकूण 55157.43 हेक्टर  बाधित क्षेत्रासाठी 7464.851 लक्ष  निधीची मागणी अहवाल सादर केला होता. पुढे 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 1 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यास अनुसरुन विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या 19 जानेवारी पर्यंत  नव्याने माहिती पाठविण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले.

जमीन महसूल वसुलीबाबत बैठकीत माहिती घेण्यात आली. विभागात ठरवून दिलेले  825 कोटींचे उद्दिष्ट जमीन महसूल व गौण खनीजाच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील यंत्रणांनी जोमाने कामाला लागावे तसेच उद्दिष्टपुर्तीची दखल जिल्हाधिकारी ते तलाठीपर्यंतच्या संबंधित अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या  गोपनिय अहवालामध्ये घेण्यात येणार असल्याचेही श्रीमती बिदरी यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने मागील वर्षी वाळू धोरण जाहीर केले असून विभागातील सर्व  जिल्ह्यामध्ये वाळू डेपो कार्यान्वित करण्याकरिता राज्य शासनाची पर्यावरण मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. वाळू डेपोच्या ठिकाणी वेव्हींग ब्रिज उभारण्यासह  उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन सर्व जिल्ह्यांनी येत्या 26 जानेवारी पासून वाळू डेपो कार्यान्वित करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.  ई-चावडी सॉफ्टवेअरमध्ये निर्देशित 21 गाव नमुन्यांची 100 टक्के नोंद पूर्ण करुन विभागातील 8696 गावांमधील  वसूलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिले.

मुख्यमंत्री  सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विभागात एकूण 277 उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. यापैकी 186 उपकेंद्रासाठी  शासकीय जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. तर 48 उपकेंद्रासाठी अंशत: जमीन उपलब्ध झाली आहे. उर्वरित 43 उपकेंद्रांसाठी खाजगी मालकीची जमीन महावितरण कंपनीला उपलब्ध करुन देण्यास आवश्यक मदत देण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...