बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 939

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर / मुंबई , दि. १६ फेब्रुवारी २०२४ :- ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्यारूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की,  त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकीर्दीनंतर आपल्या ‘घनघौर’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हीडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्रातील सद्य प्रलोभनांपासून दूर राहून वैचारिक पत्रकारितेचा एक आदर्श अश्विन अघोर यांनी उभा केला. राष्ट्रविरोधी नरेटिव्ह खोडून काढताना नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करून घेतला. पर्यावरण आणि जैवविविधतेचाही त्यांचा चांगला अभ्यास होता.

ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच मित्र परिवाराला या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अश्विन अघोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. शासन चालवित असताना माध्यमातील अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या चुका लक्षात येतात व त्या चुका दुरूस्त करून अधिक चांगल्या पध्दतीने काम करता येत, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केले.

कोल्हापूर प्रेसक्लबच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, फोटोग्राफर, कॅमेरामन आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन व अन्य मान्यवरांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्यासह सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना, पूरपरिस्थितीसह राज्यात आजवर आलेल्या अनेक संकटकालीन परिस्थितीत पत्रकारांनी खूप चांगले काम करुन आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारांसाठी आम्ही कोरोनाकाळात तपासणीचे विशेष शिबीरांचे आयोजन केले होते. पत्रकार चौकस बुध्दीने, जागृत राहून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. शासनाच्या उणिवा दाखवतानाच समाजातील सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणची चांगली कामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प याचेही लेखन, चित्रण पत्रकारांनी करुन ते समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केली. पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठीचा टॅक्स कमी करण्याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल. तसेच कोल्हापुरात पत्रकार भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर मध्ये आजवर आलेल्या पूर परिस्थिती तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या-त्या वेळी मदतीला धावून येत सहकार्याची भूमिका बजावली आहे, त्यांच्या पुढाकारानेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांसाठीचा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर व कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री व मान्यवरांचे स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे व उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी केले. आभार प्रेस क्लबचे खजानिस बाबुराव रानगे यांनी मानले. सूत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. मुख्यमंत्री कक्षात काम करणारे व कोल्हापूर जिल्ह्यात पुर्वी पत्रकारिता केलेले अमित हुक्केरीकर आणि प्रशांत साळोखे यांचा सन्मान प्रेस क्लबमार्फत करण्यात आला. याचबरोबर पत्रकार समीर देशपांडे यांचा सन्मान 12 वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत अक्षरगप्पा उपक्रम राबविल्याबद्दल व पत्रकार बाबुराव रानगे यांचा सन्मान बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल केला.

पत्रकार पुरस्काराचे मानकरी – उत्कृष्ट पत्रकार संतोष पाटील तरुण भारत, उत्कृष्ट छायाचित्रकार बी डी चेचर सकाळ, उत्कृष्ट पत्रकार टीव्ही विजय केसरकर एबीपी माझा, उत्कृष्ट कॅमेरामन टीव्ही निलेश शेवाळे एबीपी माझा यांना देण्यात आला.

व्हाईट आर्मीकडून मुख्यमंत्री महोदयांना देवदूत पुरस्कार प्रदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कामांसाठी व आपत्ती दरम्यान केलेल्या मदतीसाठी व्हाईट आर्मी या संस्थेने त्यांना देवदूत पुरस्कार देवून सन्मानित केले. हा पुरस्कार व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या हस्ते देण्यात आला.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई, ‍‍दि. १६ : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC)  मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून येणाऱ्या तीन वर्षात २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार असून “महा ऐज” (MAHA-EDGE) महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘महा ऐज’ (उद्योजकता विकास आणि रोजगार वाढ) (MAHA-EDGE)(Entrepreneurship Development and Growth in Employment) उपक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, यांच्यासह या क्षेत्रातील कौशल्य परिषद, विद्यापीठे, उष्मायन केंद्रांचे २० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

‘महा ऐज’ हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि ‘महाप्रित’ चा एक संयुक्त उपक्रम आहे. ज्या अंतर्गत लक्ष्यित समुदायातील दोन लाख लाभार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले  आहे. यापैकी १.५ लाख लोकांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ५० हजार लाभार्थ्यांना राज्यात उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्याची योजना आखली आहे, ज्याचा उद्देश नवीन युगाच्या क्षेत्रात १०० हून अधिक स्टार्टअप्स तयार करणे हा आहे.

केंद्र सरकार आणि सामाजिक न्याय विभाग समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असून ‘महा ऐज’ हा उपक्रम तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर परिणाम करेल, असा विश्वास सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

सचिव श्री. भांगे म्हणाले की, अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी महामंडळ आणि ‘महाप्रित’ सोबत सहकार्य करण्यासाठी सर्व सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) यांचा समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानून केंद्र सरकारच्या पीएम अजय योजनेअंतर्गत २० हजार लाभार्थ्यांना पहिल्या ट्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाने शासन आपल्या दारी सारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महा ऐज उपक्रमांद्वारे युवकांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेल, अशी माहिती महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिंदे यानी यावेळी दिली.

महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठे आणि उष्मायन केंद्रांच्या सहकार्याने या कार्यक्रमातून निवडलेल्या स्टार्टअप्सना त्यांचे उपक्रम तयार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले, महामंडळाने त्या दिशेने आधीच एक पाऊल टाकले आहे आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना आणि इच्छुक उद्योजकांसाठी एक आधार म्हणून काम करण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नागपुरात नव्याने सुरू झालेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) इनक्युबेशन सुविधेसोबत सहकार्य केले आहे. महामंडळाचे ५० नवोदित उद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप्सची भरभराट करण्यासाठी सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभे असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान महामंडळाने २० हून अधिक  सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) सह सामंजस्य करार केले. त्यामध्ये प्रामुख्याने अपोलो मेडस्कील्स सारख्या नामवंत संस्थांचा समावेश आहे. विज्ञान तंत्रज्ञान उद्यान, पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्याशी महा ऐज उपक्रमाच्या अंमलबजावणीस सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या. या उपक्रमाची महामंडळाच्या mpbcdc.in and nbrmahapreit.in  या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे.

यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक  प्रशांत गेडाम, निवृत्त सह सचिव दिनेश डिंगळे, राज्यातील विविध विद्यापीठ, विविध बँका, सामाजिक न्याय विभाग व महामंडळाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

 

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

             मुंबई, दि. १६ : राज्य शासनातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुंबईतील शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महोत्सवाचे नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी  दिल्या.

जिल्हास्तरावर आयोजित होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर, शिक्षण विभागाच्या प्रतिनिधी वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक संजय मोहिते, अशोक लांडगे (वाहतूक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून विविध विभागातील संस्कृतीचे आदान- प्रदान, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात- अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सव होईल. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रदर्शनांचा समावेश असेल. त्यात शस्त्र व हस्तलिखितांचे प्रदर्शन, बचतगटांचे स्टॉल मांडण्यात येतील. पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशाही सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी दिल्या.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं

 

लघु उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘महाखादी कला सृष्टी प्रदर्शन २०२४’चे आयोजन

 मुंबई, दि. 16 : खादी हा केवळ एक धागा नसून विचार आहे. हा विचार जागृत ठेऊन लघुउद्योजकांची प्रगती साधण्यासाठी महाखादी कला सृष्टी 2024 या प्रदर्शनाचे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लघुउद्योजकांच्या कामाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाखादी कला सृष्टीचे उद्घाटन श्री.साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त विकास आयुक्त प्रकाश वायचळ, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सीडबी) महाव्यवस्थापक अंजनीकुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, लघु उद्योग महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, उद्योग विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

श्री.साठे यांनी महात्मा गांधी यांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिल्याचा उल्लेख करून सध्या खादीच्या कपड्यांना अधिक मागणी असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील खादी वापरण्याचे आवाहन करून लघु उद्योजकांना मोठे उद्योजक बनण्याची प्रेरणा दिली आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनास भेट देणारा प्रत्येक जण खादीचा दूत असून खादीचा प्रचार, प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने खादीचे एकतरी उत्पादन वापरून खादीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

श्री.श्रीवास्तव यांनी महाखादी कला सृष्टीसारखे प्रदर्शन हा खादीला प्रोत्साहन देण्याचा उत्सव असल्याचे सांगून सीडबी राज्यशासनासह मिळून विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. फरोग मुकादम यांनी या प्रदर्शनामध्ये पैठणी कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून नागरिकांनी या कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील असून प्रदर्शन हे ग्राहकांना उद्योजकांपर्यंत तसेच उद्योजकांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक माध्यम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आर.विमला यांनी खादी हा सर्वांना एकत्र आणणारा धागा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, कोणताही चांगला बदल हा स्वत:पासून होतो याचा आदर्श गांधीजींनी घालून दिला. आजचे लघुउद्योजक देखील अशा बदलाची सुरुवात लघु उद्योगाच्या माध्यमातून करीत असून शासन अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून लघुउद्योजकांना मदतीचा हात देत आहे, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून मार्केटिंग सुद्धा केले जात आहे. याचा लाभ घेऊन स्वत:ची उन्नती साधावी. लघु उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे असून त्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी. नागरिकांनी खादी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

या प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल्स असून हे प्रदर्शन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १६ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांनीही सर्व शासकीय अधिष्ठातांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अख्यत्यारितील सर्व वैद्यकीय, दंत, अतिविशेषोपचार महाविद्यालये रुग्णालयांमार्फत ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळस मोफत आरोग्य चाचणी, तपासणी करण्यात यावी. ही आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड, एच. एम. आय. एस. प्रणालीमध्ये घेतली जाईल.

ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील १.५० कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी, तपासण्यांकरीता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात येतील. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार करण्यात यावेत,

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करुन देण्याची सुविधा असावी. अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

00000

राजू धोत्रे/विसंअ

 

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’

मुंबई, दि. १६: पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम

पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्री मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. किल्ले हडसर, निमगिरी – हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर – निमगिरी – हनुमंतगड – नाणेघाट – जिवधन येथे गिर्यारोहण  हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध बचतगटांचे प्रदर्शन

या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान, तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स.१० ते रात्री ९ वा. विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शन असेल. दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी, सायं. ६:३० ते ७:३० वा. छत्रपतींची मानवंदना शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा पर कार्यक्रम., सायं. ७.३० ते रात्री ९.३० वा. जाणता राजा (महानाट्य) चे आयोजन. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.३० ते ७.३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा गनिमी कावा हा कार्यक्रम. दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ शिवजन्मोत्सव सोहळा, सायं. ६:१५ ते ७ वा. महा शिवआरती कार्यक्रम, सायं. ६.३० ते ७.३० वारी सोहळा संताचा (नृत्य), सायं ८:३० ते ९.३० वा. शिवशंभु शौर्यगाथा-शिव सह्याद्री (महानाट्य) या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

जळकोट तालुक्याला विकासाचे नवे मॉडेल बनविणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. 15 (जिमाका) : जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात एमआयडीसी उभारण्यास राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असून यापूर्वी मागास म्हणून जात असलेल्या जळकोट तालुक्याला विकासाचे नवे मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

जळकोट येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी श्री. मेडेवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. श्याम डावळे यावेळी उपस्थित होते.

जळकोट येथे नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. आता बसस्थानकाची नवीन इमारत उभा राहणार असून यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 1300 चौरस फुटाच्या या बांधकामामध्ये दहा फलाट, स्वच्छतागृहे, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृह, महिलांसाठी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्षासह विविध आस्थापनांसाठी दुकान गाळ्यांचा समावेश असेल. येत्या वर्षभरात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास ना. बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच जळकोट येथे बस डेपो सुरु करण्याबाबत प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जळकोट आणि उदगीर येथे विविध समाजाचे स्वतंत्र भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकतेच उदगीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनासाठी 14.96 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून ही कामे दर्जेदार आणि विहित कालावधीत होण्यासाठी सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. उदगीर शहरासाठी भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जळकोट शहरातही अशाच प्रकारे भूमिगत गटार योजना राबविण्यासह पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. जळकोट तालुक्यात स्वतंत्र न्यायालय सुरू करण्यासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

राज्य शासनाने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील आणखी 7 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट आणि उदगीर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु असून या कामांना गती देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार गोविंद केंद्रे, उपनगराध्यक्ष  मन्मथ किडे, व्यंकट पवार, श्याम डावळे, श्री. टाले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी प्रास्ताविकात जळकोट बसस्थानक नूतन इमरतीच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली. प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व  भूमिपूजन करण्यात आले.

लोकाभिमूख प्रशासन राबविण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 16 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत, अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जावून नवचैतन्याने लोकाभिमूख प्रशासन राबविण्यास सहाय्यता होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहाने व दर्जेदारपणे पार पडतील, असा आशावाद व्यक्त करुन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्तांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023-2024 चे दिप प्रज्वलन व क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक आर.एल. पोकळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, रमेश आडे, संतोष कवडे, हर्षल चौधरी, प्रबोधिनीचे संचालक अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, राजू फडके, वैशाली पाथरे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी व पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचही जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंचे पथ संचलन होऊन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बुलीदान राठी मुक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांव्दारे श्रीराम भक्तीपर नृत्य आणि हेमंत नृत्य कला मंदीराच्या कलाकारांकडून शिवस्तुती नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून टाळ्यांची दाद व वाहवाह मिळविली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमूने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी चमूचे अभिनंदन केले.

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि. 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. यात पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले आहे. क्रीडा स्पर्धे अंतर्गत दिवसाला क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुध्दीबळ, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थ्रोबॉल, रिंग टेनिस, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, धावणे, जलद चालणे, कॅरम आदी खेळांचा समावेश आहे. स्पर्धेची नियमावली तयार करण्यात आली असून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्थापक, संपर्क अधिकारी व पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 18 फेब्रुवारीला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेतांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रास्ताविकातून दिली.

000

बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १६:  बारामतीच्या शहराला उद्योग-व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात, पर्यायाने परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्यावतीने आयोजित उद्योजक मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खनिजदार अबीरशाह शेख, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. सन २०२८ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी त्यावेळी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर असली पाहिजे. याकरीता राज्य शासन विशेष  प्रयत्न करीत आहे.

उद्योगधंद्याना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. विविध उद्योगपती, व्यापारी यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाधिक उद्योजकांना आकर्षित करुन गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासोबत आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे.  विजेच्या दरात सवलत देऊन अधिकाधिक उद्योजकांना त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

उद्योजकांनी राज्यात माहिती व तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, डेटा सेंटर तसेच खाण उद्योग आदी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘हरित हायड्रोजन धोरण’ करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य आहे. ऊर्जा, वीज निर्मितीसाठी सौर पॅनल वापरण्यावर भर देण्यात येत असून शासकीय इमारती, सौर कृषीपंप तसेच अधिक वीज लागणाऱ्या घरगुती उद्योगधंद्याकरीता सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे श्री.पवार म्हणाले.

नैतिक अधिष्ठानाने उद्योग, व्यवसाय करत असताना ते सचोटीने केले पाहिजे. उद्योग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर आवश्यक आहे. उद्योजक आणि ग्राहक यामध्ये विश्वाचे नाते निर्माण करुन उत्पादनाबरोबर ग्राहकांना उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल’ म्हणून बारामतीची ओळख

अलीकडच्या काळात बारामती तालुका विद्येचे, आरोग्याचे माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यवसायिक अशा सर्व क्षेत्रात बारामतीने सर्वसमावेशक प्रगती साधलेली आहे. परिसरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे राज्यात ‘सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल’ म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये बारामतीकरांचे फार मोठे योगदान असून उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून बारामतीच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

विमानतळ आणि रेल्वेमुळे विकासाला गती मिळते. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी बारामती ते लोणंद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगधंद्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे १०० खाटांची क्षमता असलेल्या मंजूर रुग्णालयांच्याकरीता पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, या रुग्णालयासाठी आणखीन १००  खाटा वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बारामती येथे २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

काळाची गरज ओळखून युवकांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योगांना अधिक कुशल कामगार मिळण्यासह बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक महसूली विभागात ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नमो हब स्किल मॅनेजमेंट प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पुणे विभागाचा ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बारामतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्या आणून त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज परिसरातील उद्योजक छोट-मोठे उद्योग उभारुन उत्पादनाची निर्यात करण्यापर्यंत यशस्वी झाले आहेत. वडिलोपार्जित आणि पारंपरिक उद्योगाचा विस्तार करताना आजच्या पिढीने त्यामध्ये काळानुरूप नवनवीन उद्योग सुरु केलेले आहेत. उद्योग क्षेत्राने अशीच प्रगती करीत शहराच्या विकासातही सहभागी व्हावे, असेही श्री. पवार म्हणाले.

बारामतीतील उद्योजकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेणार

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित विभागाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करुन मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

यावेळी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, उद्योगमित्र पुरस्कार, निर्यातदार लघुउद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बारामती क्लब येथे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

यावेळी बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष श्री. जामदार यांनी विचार व्यक्त केले.

0000

ताज्या बातम्या

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

0
मुंबई, दि. ६: उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

0
मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक, दि. 5: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार...

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...