मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 929

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 – संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

मराठी ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा होण्यासाठी पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची वर्गवारी करून ते विषय विद्यापीठांना द्यावेत, या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात यावे, तसेच ते संशोधन शाळा महाविद्यालयांमधून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागासोबत करार करण्याची सूचना त्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करुन या बैठकीस सर्व विद्यापीठांच्या मराठी भाषा विभाग प्रमुखांना निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहण्यास सांगावे असेही त्यांनी सांगितले. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा तर कवितेचे गाव योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडाचा समावेश करून ही योजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, कार्यकारी समिती सदस्य डॉ.गणेश चंदनशिवे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, प्रशासकीय अधिकारी तथा सदस्य सचिव गिरीश पतके आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व्हावे हे विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने विविध विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाच्या विविध ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी पुस्तके, ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत. ग्रंथ तयार करताना शेवटच्या पानावर वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथाबाबतचे संक्षिप्त वर्णन द्यावे. तसेच विश्वकोशमध्ये ग्रंथसूची खंडाची नोंद घ्यावी. मराठी ग्रंथसूचीचे खंड सर्व ग्रंथालयात संग्रही ठेवावेत. दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरणाद्वारे जतन करून उत्कृष्ट साहित्य महाजालावर उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविला जाणार आहे, यादरम्यान त्यांना उत्कृष्ट वाचन करायला लावावे तसेच मराठी गाणी ऐकवावी. मराठीबाबतच्या विविध ऐतिहासिक बाबींची विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी.

बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प

महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. त्यांचा भाषा वैज्ञानिक अभ्यास करून बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प राबविण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. सर्व कार्यालयांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांसोबत मराठीतच बोलले पाहिजे, असे आवाहन करून बोलीभाषा संवर्धनासाठी पारितोषिक देण्याची सूचनाही त्यांनी केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 860 गावांमध्ये मराठी भाषेसंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यासाठी अनुदान देण्याचे निर्देश देऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात अनुदानाचे वितरण करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊन राज्याबाहेर वाराणसी, पानिपत आदी ठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

अमळनेर होणार पुस्तकांचे गाव तर उभादांडा या कवितेच्या गावाच्या कामाला गती

पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम तातडीने सुरू करून तेथे वाचकांना सर्वोत्कृष्ट पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पुढील टप्प्यात ही योजना तात्काळ सुरू करावी. त्याचप्रमाणे कवितांचे गाव योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा येथील कामाला गती द्यावी, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. मराठी कवींच्या दर्जेदार रचना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यादृष्टीने त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत कवितांसारखेच रुपांतर करण्याची सूचना त्यांनी केली. मराठी भाषा सर्वांच्या तोंडी रुळावी या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आकर्षक जिंगल्स तयार करून सर्वत्र ऐकवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – जिल्हाधिकारी राजेंद्र  क्षीरसागर

विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी, बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी

मुंबई, दि. १२ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील  नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी तसेच नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मेळाव्यात सहभाग होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

वांद्रे पूर्व येथे नमो महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात  आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी रवींद्र सुरवसे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, मुंबई उपनगर, संदीप गायकवाड, सहायक आयुक्त मुंबई शहर व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री.पा.कोकाटे,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किशोर केरलीकर, शासकीय तंत्रनिकेतन मुंबईचे प्रशिक्षण अधिकारी काशिनाथ धुळशेटे, वरिष्ठ संरक्षण अधिकारी गिरीधर चौरे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश देठे,जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी योगिता शंभरकर, उद्योग निरीक्षक विवेक लोखंडे यांसह इतर विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, या रोजगार मेळाव्यामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांची माहिती तातडीने नोंदवावी. दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. राज्यातील नामांकित स्टार्ट अप, शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल उमेदवारांना माहिती देण्याकरिता असतील. उमेदवारांना करियर विषयक माहिती देण्याकरिता समुपदेशन सत्र होणार आहे. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. याची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून  जास्तीत जास्त युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा यशस्वी करावा.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूची जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000

 

विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण प्रक्रियेत योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस             

मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करत असताना आपण राजभाषा आणि मातृभाषेचा प्रचार – प्रसार करावयास हवा. इतर देशातील नागरिक त्यांच्या देशाची भाषा अभिमानाने बोलतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या भाषांचा जास्तीत जास्त वापर करावयास हवा. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचे उद्द‍िष्ट असून, पदवीधारक विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचा दुसरा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या के.सी.महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.  दीक्षांत समारंभात ३२ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट मंडळाचा इतिहास धैर्यवान व्यक्ती आणि त्यांच्या दृढ संकल्पावर आधारित आहे. देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातील लोक भारतात आले. त्यापैकी काही प्राध्यापक – शिक्षकांनी इतर शिक्षकांना रोजगार  मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. आज या संस्था शिक्षण आणि सेवा क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. हे धोरण २१ व्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह शिक्षण व्यवस्थेच्या नियमन आणि प्रशासनासह सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना करण्यासाठी असल्याचे सांगून ‘एचएसएनसी’ विद्यापीठाने  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची  प्रभावी अंमलबजावणी करुन इतर विद्यापीठांसाठी मापदंड प्रस्थापित करावे असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.  विद्यापीठाने आपल्या माजी विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठ विकास व विस्तार कार्याशी जोडण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी भाषेबाबत देखील आत्मनिर्भर झाले पाहिजे असे सांगून युवकांनी मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा जास्तीत जास्त वापर करावयास हवा, असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्यासोबतच  ज्ञान वाढवण्यासाठी इंग्रजीसह इतर देशांच्या भाषा देखील शिकाव्या असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठता आणि नैतिकता या मूल्यांमुळे भारत विश्व गुरू बनला असून, विद्यार्थ्यांनीही ही मूल्ये जोपासत आपल्या क्षेत्रात देशसेवा करावी असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला ‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, ‘एचएसएनसी’ मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, सचिव दिनेश पंजवानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जयेश जोगळेकर, मंडळाचे माजी अध्यक्ष किशु मनसुखानी, कुलसचिव भगवान बालानी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक आदी उपस्थित होते.

०००

Maha Governor presides over Convocation of HSNC University

Mumbai – Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the Second Annual Convocation of the HSNC Cluster University at the K C College Auditorium, Mumbai. Degrees were awarded to 32 graduating students.

Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, President of HSNC Board Anil Harish,  Secretary Dinesh Panjwani, former President of the Board Kishu Mansukhani, Vice Chancellor of HSNC University Dr. Hemlata Bagla, Heads of Department,  graduating students, teachers and parents were present.

 

000

 

कोयना प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील            

मुंबई, दि. १२ :- कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्तांचे येत्या काही महिन्यात १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सांगली डॉ. राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पुनर्वसन विभागाचे उप सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, कोयना प्रकल्प पुनर्वसित लाभार्थीस देय जमीन वाटप करताना न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे.  पात्र लाभधारकास जमीन देण्याबाबतचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करावेत. सातारा जिल्हाधिकारी यांनी पात्र लाभार्थींच्या याद्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्यात.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या महसूल, वन, ऊर्जा या विभागाकडील प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच पुनर्वसितांच्या वसाहतीमध्ये नागरी सुविधा देणे व गावठाण संदर्भात निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

मुंबई, दि. १२ : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.

पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. १२:  जुन्नरचे माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिवंगत बेनके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री सुनिल टिंगरे, संग्राम जगताप, दिलीप मोहिते, निलेश लंके, अशोक पवार, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, पोपटराव गावडे , विलास लांडे, प्रदीप गारटकर, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे आदी उपस्थित होते.

कुकडीच्या धरणाबाबतचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, शिवनेरी किल्ला परिसरातील कामे, पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न अशा माध्यमातून जुन्नरच्या विकासात माजी आमदार दिवंगत बेनके यांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की दिवंगत बेनके यांनी १९८५ मध्ये जुन्नरमधून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यांनतर सतत चार वेळा विधीमंडळात निवडून गेले. त्यांच्याकडे प्रत्येकाला आपलेसे करण्याची हातोटी होती तसेच त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी लहान कार्यकर्त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला. स्व. वल्लभ बेनके यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहू, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण करुन बेनके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, दिवंगत बेनके यांच्यासह बेनके कुटुंबाने तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे जवळचा सवंगडी गमावला आहे.

दिवंगत बेनके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील निष्ठावान सहकारी गमावला असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी  मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरींची सलामी व मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचे पुत्र आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

०००

दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 12 : बालकांचे हित, विकास व कल्याण करण्याच्या हेतूने दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटी कार्यरत आहे. बालकांचे हित व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकरिता संस्थेच्या घटनेप्रमाणे मुंबई नागरी सेवा नियम 1959 मंजूर आहे. मात्र हे नियम 64 वर्षापूर्वीचे असून कालबाह्य आहेत. त्यामुळे सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्याची कार्यवाही करून प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री  तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मुंबई शहर पोलीस आयुक्त लखमी गौतम, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे,  दि चिल्ड्रेन्स एड् सोसायटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा नियामक परिषदेचे सदस्य मिलींद तुळसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे आदी उपस्थित होते.

सोसायटीच्या मानखुर्द येथील जागेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विकास आराखडा तयार करण्याबाबत सूचना करण्यात आली होती, त्यांनी आराखडा केलेला असल्यास या विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे सूचीत करीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मानखुर्द येथे सोसायटी संचलीत मंदबुद्धी बालगृह आहे. या बालगृहाचे नाव दिव्यांग मुलांचे विशेष बालगृह, तसेच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम दिव्यांग मुलांचे बालगृह करण्याची कार्यवाही करावी.

सोसायटीचे पेट्रन, आजीव सभासद असून यामधील काही सदस्य मृत्यू पावले आहेत. तसेच बऱ्याच सभासदांचे पत्ते मिळून येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत धर्मादाय कायद्यानुसार सर्व बाबी तपासून अशा सभासदांची नावे कमी करण्याबाबत व सोसायटीचा सर्व अभिलेख अद्ययावत करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अशा सभासदांबाबत प्रसिद्धी देवून नंतरच त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. बोर्ला येथील सोसायटीच्या जमिनीवर उच्च न्यायालयाच्या परवानगीने विभागाने योजना तयार करावी. या योजनेच्या माध्यमातून विकास साधावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बोर्ला येथील जमिनीच्या सद्यस्थितीबाबत अवगत केले. विभागाने अतिक्रमण थांबविण्यासाठी तातडीने कार्यवाही करून सोसायटीच्या जमिनीवर महिला व बालविकास विभागाचे सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने विकास करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त श्री. नारनवरे यांनी माहिती दिली. संबंधित विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

पुणे, दि.१२ :  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.

पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

०००

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण; ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण              

मुंबईदि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवार13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी  6-30 वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी सन 2023 साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन 2023 साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळेनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती सुहासिनी देशपांडे आणि सन 2023 साठी अशोक समेळसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती नयना आपटे आणि सन 2023 साठी पं. मकरंद कुंडलेतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन 2021 साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन 2022 साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय सन 2022 आणि सन 2023 साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान केले जाणार आहेतसन 2022 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये श्रीमती वंदना गुप्ते (नाटक)मोरेश्वर अमृतराव निस्ताने  (उपशास्त्रीय संगीत)अपर्णा मयेकर (कंठसंगीत)हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला)शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी),  लता सुरेंद्र (नृत्य)चेतन दळवी (चित्रपट)प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन)पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत)डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान)अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

सन 2023 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक)पं.ह्रषिकेश बोडस  (उपशास्त्रीय संगीत)रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत)कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला)शाहीर राजू राऊते (शाहिरी),  सदानंद राणे (नृत्य)निशिगंधा वाड (चित्रपट)अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन)शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत)यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान)उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणी सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.  

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

दिव्यांगत्व हे अपंगत्व नव्हे, तर समाजाचा आधारस्तंभ

0
सोलापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने राबविण्यात आलेले ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ हे केवळ एक वैद्यकीय प्रमाणपत्र मोहिम नव्हे, तर दिव्यांग व्यक्तींच्या आत्मसन्मानाचा,...

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

0
मुंबई, दि. २९: पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

0
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

0
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा  किताब मिळविला आहे,...