मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 928

रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.१२ (जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला झाला. यावेळी कै.दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ, पात्र प्रकल्पबाधितांना सदनिका वितरण, अग्निशमन केंद्र मुख्यालय आधारवाडी आणि प्रभाग क्षेत्र कार्यालय, अमृत २.० अंतर्गत गौरीपाडा येथे ९५ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे, या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन झाले. त्याचबरोबर सिटी पार्क आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत प्राप्त ई-बसेसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्षात लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज कल्याण डोंबिवलीच्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. कल्याण-डोंबिवली शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पांचे भूमिपूजन होत आहे. कल्याण शहराला मोठा इतिहास आहे. कल्याण पश्चिममध्ये उल्हासनगरसारखे हॉस्पिटल उभे करावे. सिटी पार्क उभे राहिले आहे. यामुळे नागरिकांना विरंगुळयासाठी एक उत्तम साधन मिळाले आहे. शहरासाठी आवश्यक चांगल्या पर्यावरणाकरिता नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत. मुंबईप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीमध्येही डीप क्लिनिंग अभियान सुरू करावे, यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, लोकांसाठी ज्या सुविधा द्यायच्या त्या प्रमाणिकपणे दिल्या पाहिजेत. कल्याण- डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक लागेल तेवढा निधी पुरविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, स्मार्ट शहराची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे, याचा विशेष अभिमान आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह भिवंडी आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत आहेत.  त्यांना राज्य शासनाच्या मदतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. आज ज्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले, त्यांचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात प्रकल्पबाधित पात्र लाभार्थ्यांना सदनिका चावी वाटप करण्यात आल्या.

०००

 

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. १२ : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवून ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती करावी. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये व गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी  सावंत यांनी आज दिल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील जनतेला पुरविल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा तसेच विभागातील पद भरती प्रक्रियेचा आढावा डॉ. सावंत यांनी पुणे येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस अतिरिक्त संचालक (कुटुंब कल्याण) डॉ. नितीन अंबाडेकर, तर दृकश्राव्य प्रणालीद्वारे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार,  आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, संचालक (वित्त) श्री. मेनन, अतिरिक्त संचालक (आरोग्य सेवा) स्वप्निल लाळे,  विभागीय उपसंचालक, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचाही मंत्री डॉ. सावंत यांनी आढावा घेतला. माता आणि भगिनींसाठी राज्यात राबविण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित, बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या जागरूक पालक – सुदृढ बालक, पुरुषांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानांची अधिकृत आणि वयोगटानुसार सविस्तर माहिती सादर करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

राज्यात ७०० आपला दवाखाना स्थापन करण्याचे विभागाचे लक्ष्य असून आतापर्यंत ३४७ आपला दवाखान्यांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे बांधकाम झालेली रुग्णालये जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत तसेच रुग्णालयात औषधांची उपलब्धता राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक तालुक्यात फिरता दवाखाना कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. राज्यात विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध रुग्णालयांची बांधकामे पूर्ण करावीत, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

000

निलेश तायडे/विसंअ/

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.१२ (जिमाका) :- राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उल्हासनगर महानगरपालिका सूपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी,आमदार डॉ.बालाजी किणीकर,प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सूपर स्पेशालिटी रुग्णालय ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हे शासन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठाणे जिल्ह्यातून कॅशलेस सेवा देणारे पहिले रुग्णालय सुरू करण्यात आले, त्यानंतर आता हे उल्हासनगर महानगरपालिकेचे कॅशलेस सेवा देणारे दुसरे सूपर स्पेशलिटी रुग्णालय. अशाच प्रकारे काही दिवसातच मीरा-भाईंदर येथेही कॅशलेस सेवा देणारे सूपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहोत.

ते म्हणाले, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची चिंता भेडसावते. मात्र आता शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती ही दीड लाखाहून पाच लाखावर आणली आहे. त्यामुळे आता कोणालाही आपल्या रुग्णाच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून पाच लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहेत.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणे, मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून चार हजार रुपये कोटी रुपयांची मदत राज्य शासनाला मिळणार असून त्यातून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे राज्य प्रगतीपथावर आहे. विशेषतः कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या विषयांवर राज्य शासनाकडून नियोजनबद्ध काम करण्यात येत आहे. लेक लाडकी योजना, एसटीमध्ये 50% मोफत सवलत, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी अशा विविध माध्यमातून शासन महिलांसाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लवकरच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्राच्या बळकटीकरणाबाबतचे कामही सुरू होणार आहे. ठाण्यातील 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

राज्य शासन आरोग्य व्यवस्था अधिकाधिक उत्तम दर्जाची करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका तेजल बोडके-नागरे यांनी केले.

000

१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुंबई, दि. १२ : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे होते. सावकारांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी आज १७ कातकरी कुटुंबांना परत मिळाली. अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यासाठी पुढाकार अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. या कुटुंबांना जागांचे सातबारे देण्यात आले.

या समस्या आहेत, प्रामुख्याने पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरींच्या. अवघे २०० रुपये हाती ठेऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकाविलेल्या जमिनी सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये एक समिती गठीत केली होती. या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला. त्यातून मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या. आता वेदनांची आणि अश्रूंची जागा खंबीर आधाराने आणि त्यातून जीवनाच्या स्वप्नपूर्तीने घेतली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची संवेदनशीलता फळाला आली होती. स्वत: जमीनदार असून झोपडीत राहणाऱ्या कातकरी समाजाप्रती देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आग्रही होते. अनाथांचे आरक्षण असो, की कातकरी समाजाच्या यातना, नियमात बसवून हे प्रश्न कसे सोडवायचे, यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह.

अर्थात यासाठी सातत्याने पाठपुरावा आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांचाही असायचा. गेल्याच आठवड्यात सह्याद्रीवर कातकरींच्या या समस्यांवर एक व्यापक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि आज हा कार्यक्रम आयोजित झाला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज केवळ सातबारे दिले नाहीत, तर त्यांची पुढचीही व्यवस्था करुन दिली. आता त्यांना जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य सीमांकन आखून द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, संविधानाने त्यांना दिलेले अधिकार. पण, त्यांना त्यापासून वंचित रहावे लागले. त्यांचे जे होते, तेच त्यांना परत केले. हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे. आता खऱ्या आदिवासींना सर्व लाभ मिळावे, असा जीआर जारी करा. भविष्यात कुणी जमिनी हडपू शकणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी. आज ज्या १७ जणांना जमिनी दिल्या, त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन, कुणी त्यांना धमकाविते का, याची माहिती घेत रहा. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. विवेक पंडित यांनी २०१४ ते २०१९ या आणि नंतरच्या काळात श्री. फडणवीस यांनी सातत्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना, ‘पक्ष न पाहता प्रश्न सोडविणारा नेता मी वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला’, असे गौरवोद्वार काढले.

या नागरिकांना दिला जागेचा ७/१२

रवी हावरे, सुभाष धोडी, दशरथ खाले, बेबी धाडगे, सखू बाबर, संतोष बाबर, मालती जाधव, काळूराम वाघे, भीमाबाई वाघे, विमल तुंबडे, शिमगी वाघे, वसंत पागी, गोपाळ वाघ, चंदर खाले, यमुना गावित, जान्या धोडी, इंदू वाघे या 17  कातकरी समाजातील जमीन मालकांना सातबारा वाटप करण्यात आले. हे सर्व भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कातकरी आहेत.

000

शैलजा पाटील/विसंअ/

गाळमुक्त धरण : गाळयुक्त शिवार योजना  

विशेष लेख :

विविध जलस्त्रोतांमधून आपल्याला पाणी उपलब्ध होत असते. मात्र या उपलब्ध जलस्त्रोतांपैकी अनेक बंदिस्त जलाशयांमध्ये पाण्याबरोबर गाळ साचून राहिला आहे‌. वर्षानुवर्ष पाण्यात राहिलेला आणि कुजून सुपीक झालेला हा गाळ असतो. मात्र, हा गाळ काढण्याची संधी त्याच्यातील पाण्यामुळे मिळत नाही. गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे .या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेची अंमलबजावणी  करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेत धरणातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करूनशेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईलअसे नियोजित आहे. या वर्षातआत्तापर्यंत, 841 जलाशयामधून 69 लाख 54 हजार 458 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहेज्यामुळे जवळपास 6780 लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला.

जलस्त्रोतात गाळ साठणे ही क्रिया कायमस्वरुपाची असल्यानेगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरुपी राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेतर्गंत गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून रु.31 प्रति घ.मी. यानुसार व गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प वअल्पभूधारक शेतक-यांना एकरी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत (प्रति घन मीटर रु 35.75 प्रमाणे) अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधी मधून म्हणजेच सन 2023-2024 याआर्थिक वर्षात जलयुक्तशिवार 2.0 या योजनेच्या लेखाशिर्षातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे मूल्यमापन अवनी ॲपमार्फत करण्यात येणार आहे यानुसार या योजनेचा तपशील :- एकूण 34 जिल्ह्याअंतर्गत अंतिम निवड झालेल्या एकूण अशासकीय संस्था-278 तर 1773 जलाशय साठे. गाळउत्खनन पूर्ण –69 लाख 54 हजार 458 घन मीटर. अशासकीय संस्था यांच्यामार्फत गाळउत्खनन 34 जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे. जलसाठ्यातून गाळकाढण्या करिता प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या 1622 आहे. प्रशासकीयदृष्ट्या निदर्शनास आलेल्या जलसाठ्यांची संख्या 841 आहे. तांत्रिक मान्यता मिळालेल्या जलसाठ्यांची संख्या 1020 आहे. गाळ काढण्याचे काम करण्यात आलेल्या जलसाठयांची संख्या 599 आहे.

गाळ उत्खनन करण्याचे खर्च अंदाजे लक्ष 44 कोटी घनमीटर आहे.प्रतिवर्षी अंदाजित खर्च( सन 2023-2024)  501कोटी रूपये.गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतर्गंत अंदाजे उत्खनन करण्यात आलेला एकूण 69 लाख 54 हजार 458 घन मीटर ( अवनी ॲप + लोकसहभाग) इतका गाळ हा अद्यापपर्यंत काढण्यात आला आहे. या योजनेमुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार असून याद्वारे शेतमालाचे उत्पादन वाढण्यासही मदत होणार आहे.

दत्तात्रय कोकरे,

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई – 32.

कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत  

रायगड दि. १२ (जिमाका):  अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये अलिबाग शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिक शासकीय कामानिमित्त मोठ्या संख्याने अलिबाग शहरात येत असतात. तसेच अलिबाग शहर हे प्रसिद्ध पर्यटन केंद्र असल्याने शहरास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे अलिबाग शहरात तसेच शेजारील गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा महत्त्वाची असल्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अलिबाग शहरात कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारणे कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री.सामंत यांच्याहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रशासक तथा अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, या यंत्रणेमुळे पोलिसांना काही गोष्टी शोधण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे. अलिबागच्या सीसीटीव्ही सर्व्हीलेन्स यंत्रणेचे लोकार्पण झाले असून महाड व रोहा शहरात ही यंत्रणा उभारणीसाठीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व शहरामध्ये अशा पध्दतीची यंत्रणा उभारण्यासाठी नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच अलिबाग पोलीस ठाणे येथे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. या कंट्रोल रूममध्ये एकाच वेळी 64 कॅमेराचे फुटेज पाहता येईल इतक्या मोठ्या आकाराची UHD स्क्रीन बसविण्यात आली आहे. या कंट्रोल रूम मध्ये ANPR व FR साठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली असून या सॉफ्टवेअरमुळे अलिबाग शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची माहिती गोळा करता येणार आहे. तसेच FR प्रणालीमुळे संशयित गुन्हेगारांस शोधण्यास पोलीस दलास मदत होणार आहे. हा प्रकल्प  शहरातील पोलिस विभाग व वाहतूक पोलीस विभागाच्या कामकाजासाठी उपयुक्त होणार असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस दलास सुलभ होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँड पथकाने सलामी दिल्यानंतर लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

बारा बलुतेदारासाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ :- बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही आज येथे दिली.

प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाईल. बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तेर- ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. ऋणमोचन येथील संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारकाच्या तसेच पंढरपुरातील नामदेव महाराज समाधीस्थळ विकासासाठी गती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी

राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कोविड काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातील काही व्यक्तिंनी आत्महत्या केली होती, अशांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

बैठकीत सुरवातीलाच बारा बलुतेदार ओबीसी समाज संघटनांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी ओबीसी समाजाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी म्हणणे मांडले, त्यावर मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कुठल्याही समाजावर अन्याय्य होऊ देणार नाही, याचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायलालयात टिकणारं आरक्षण दिले जाईल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहोत. त्यामुळे कुठल्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. एकाच्या ताटातला घास अन्य दुसऱ्याच्या ताटात दिला जाणार नाही, याबाबत बारा बलुतेदार समाज बांधवांनी निश्चिंत रहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी शिष्टमंडळातील योगेश केदार यांच्यासह माजी आमदार हरिभाऊ राठोड, बालाजी शिंदे, सोमनाथ काशिद, डॉ. पी. बी. कुंभार, बाळासाहेब सुतार आदींनी समाज बांधवांच्यावतीने मांडणी केली.

०००

चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निर्देश

  • चर्मकार विकास आयोग होणार पुनर्जिवित

मुंबई, दि. १२ – शासनाने गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका, नगरपालिकांना दिल्या आहेत. चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच चर्मकार विकास आयोगाला पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवंडी येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दिले.

चर्मकार समाजबांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार विलास लांडे, माजीमंत्री बबनराव घोलप, महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास उर्वरित कर्जमाफी करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महामंडळाला दिल्या. परदेश शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे सांगून रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामधील रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

चर्मकार समाजातील युवकांसाठी प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र, उत्कृष्टता केंद्र तसेच स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी गोवंडी येथे महामंडळाला दोन एकर जागा देण्यात आली असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे, हा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करुन महापालिकेने हे केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉल्स दिले असून रस्ता रुंदीकरण अथवा इतर कारणांमुळे विस्थापित होणाऱ्या स्टॉल्सधारकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यायी जागा देण्याच्या सूचना देतानाच या गटई कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याच्या दृष्टीने विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महामंडळाकडून घेतलेल्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी विशेष योजना लागू करण्याच्या दृष्टीने विभागाने तपासणी करावी तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन स्टॉल्स तयार करावेत, तसेच वांद्रे येथील चर्मकला विद्यालयातील रिक्त पदे भरून येथे प्रशिक्षण सुरु करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर समिती तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईतील २२० शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले असून तेथील प्रशिक्षणाचा तसेच विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

बैठकीस भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय गोतिसे, भाऊसाहेब कांबळे, रमेश बुंदिले, अशोकराव माने, गोपाळसिंह बच्छिरे, रविंद्र राजुस्कर, उमाकांत डोईफोडे आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

०००

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 – संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

मराठी ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा होण्यासाठी पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची वर्गवारी करून ते विषय विद्यापीठांना द्यावेत, या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात यावे, तसेच ते संशोधन शाळा महाविद्यालयांमधून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागासोबत करार करण्याची सूचना त्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करुन या बैठकीस सर्व विद्यापीठांच्या मराठी भाषा विभाग प्रमुखांना निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहण्यास सांगावे असेही त्यांनी सांगितले. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा तर कवितेचे गाव योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडाचा समावेश करून ही योजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, कार्यकारी समिती सदस्य डॉ.गणेश चंदनशिवे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, प्रशासकीय अधिकारी तथा सदस्य सचिव गिरीश पतके आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व्हावे हे विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने विविध विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाच्या विविध ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी पुस्तके, ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत. ग्रंथ तयार करताना शेवटच्या पानावर वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथाबाबतचे संक्षिप्त वर्णन द्यावे. तसेच विश्वकोशमध्ये ग्रंथसूची खंडाची नोंद घ्यावी. मराठी ग्रंथसूचीचे खंड सर्व ग्रंथालयात संग्रही ठेवावेत. दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरणाद्वारे जतन करून उत्कृष्ट साहित्य महाजालावर उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविला जाणार आहे, यादरम्यान त्यांना उत्कृष्ट वाचन करायला लावावे तसेच मराठी गाणी ऐकवावी. मराठीबाबतच्या विविध ऐतिहासिक बाबींची विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी.

बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प

महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. त्यांचा भाषा वैज्ञानिक अभ्यास करून बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प राबविण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. सर्व कार्यालयांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांसोबत मराठीतच बोलले पाहिजे, असे आवाहन करून बोलीभाषा संवर्धनासाठी पारितोषिक देण्याची सूचनाही त्यांनी केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 860 गावांमध्ये मराठी भाषेसंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यासाठी अनुदान देण्याचे निर्देश देऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात अनुदानाचे वितरण करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊन राज्याबाहेर वाराणसी, पानिपत आदी ठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

अमळनेर होणार पुस्तकांचे गाव तर उभादांडा या कवितेच्या गावाच्या कामाला गती

पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम तातडीने सुरू करून तेथे वाचकांना सर्वोत्कृष्ट पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पुढील टप्प्यात ही योजना तात्काळ सुरू करावी. त्याचप्रमाणे कवितांचे गाव योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा येथील कामाला गती द्यावी, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. मराठी कवींच्या दर्जेदार रचना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यादृष्टीने त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत कवितांसारखेच रुपांतर करण्याची सूचना त्यांनी केली. मराठी भाषा सर्वांच्या तोंडी रुळावी या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आकर्षक जिंगल्स तयार करून सर्वत्र ऐकवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

0
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

0
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा  किताब मिळविला आहे,...

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू – क्रीडा...

0
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल...

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे...

0
पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने...