मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 913

मंत्रिमंडळ निर्णय

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी ७ हजार किमी रस्ते व पूल बांधणार

मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरले आहे. ३ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी ७ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून १० किमी च्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून ५ किमी च्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी पूल उभारण्यात येतील.

—–०—–

वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ, आता मिळणार दरमहा १८ हजार

राज्यातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता  प्रशिक्षणार्थींच्या (इंटर्नशिप) विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा 18 हजार रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना इंटर्नशिप कालावधीसाठी 18 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

या विद्यार्थ्यांना पूर्वी 11 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होते ते आता  फेब्रुवारी, 2024 पासून दरमहा 18 हजार रुपये देण्यात येईल. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना (Foreign Medical Graduates-FMGs) आंतरवासिता प्रशिक्षण कालावधीमध्ये हेच विद्यावेतन देण्याचा निर्णय झाला आहे.

—–०—–

वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण; ना नफा, ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार

अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरविण्याबाबत सर्वंकष सुधारित रेती धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे.

वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. नदी/खाडीपात्रातून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन या करीता संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर असेल.

स्वामित्वधनाची रक्कम :- मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रति ब्रास (रुपये 267/- प्रति मेट्रिक टन) व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरीता 600 रुपये प्रति ब्रास (रुपये 133/- प्रति टन) इतकी स्वामित्वधनाची रक्कम अनुज्ञेय राहील. यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशासतशा  लागू करण्यात येतील. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी, वाहतूक परवाना सेवा शुल्क व नियमानुसार शुल्क आकारण्यात येईल. शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास (22.50 मेट्रिक टन) पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येईल. वाळू डेपोतून वाळू वाहतूकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल.

वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येईल.

नदी/खाडी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकीर, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील.

ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.

—–०—–

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी “Scheme for augmenting Nursing Education- Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges” या केंद्राच्या योजनेत प्रति परिचर्या महाविद्यालय रुपये १० कोटी इतका निधी देण्यात येईल. त्यापैकी केंद्र शासन ६० टक्के प्रमाणे रुपये ६ कोटी व राज्य शासन ४० टक्के प्रमाणे ४ कोटी निधी देणार आहे. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी प्रति परिचर्या महाविद्यालय 32 कोटी 97 लाख आवश्यक असून या खर्चासही मान्यता दिली आहे.

जळगांव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) या परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94  लाख  इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील.

—–०—–

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

वित्त विभागाच्या 1 एप्रिल 2010 च्या शासन निर्णयानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत 1 ऑक्टोबर 2006 पासून लाभ देतांना या कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल.

या बरोबरच मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या (10:20:30) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती सेवा योजनेत 1 जानेवारी 2016 पासून लाभ देतांना या कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यात येईल.

या निर्णयामुळे अंदाजे रु.22 कोटी 79 लाख 9 हजार 116 इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे रु.3 कोटी 61 लाख 92 हजार इतका वार्षिक आवर्ती खर्च येईल.

—–०—–

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अति विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा; राज्यातील कमी विकसित भागांना फायदा

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अति विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील कमी विकसित भागांमधील उद्योगांना याचा फायदा होईल.

राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत.  यानुसार थ्रस्ट सेक्टर (प्राधान्य क्षेत्र) व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीस वाव असलेल्या आणि उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.  यामध्ये सेमी कंडक्टर, मोबाईल डिस्प्ले, हायड्रोजन फ्यएल सेल, लॅपटॉप, संगणक, सर्व्हर, लिथियम बॅटरी, सोलर पॅनल, औषधी व रासायनिक उद्योग आदी उद्योगांना याचा लाभ मिळेल. या क्षेत्राला प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी हे प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नंदूरबार आणि धुळे अशा कमी विकसित प्रदेशामध्ये असावेत आणि 10 हजार कोटी स्थिर भांडवली गुंतवणूक आणि 4 हजार लोकांना रोजगार देणारे असावेत. त्यातील 4 हजार कोटी रुपये गुंतवणूक पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीत करणे आवश्यक आहे.

अ,ब,क,ड येथील पात्र अँकर युनिट्सना (प्रणेता उद्योग) प्रकल्प उभारण्यासाठी 100 टक्के मुद्रांक शुल्क माफी, 15 वर्षे विद्युत शुल्क माफी, 10 वर्षांपर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा 50 टक्के परतावा, 10 वर्षांकरिता जास्तीत जास्त 4 टक्के अनुदान तसेच 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे 10 वर्षांसाठी वीज दर सवलत, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि टेक्नीकल नो-हाऊ मधील गुंतवणूक स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमाल 30 टक्के मर्यादेत, कॅप्टीव्ह व्हेंडर्सद्धारे केलेल्या स्थिर भांडवली गुंतवणुकीवर प्रोत्साहने,  जमिनीच्या दरात 25 ते 50 टक्के सवलत आणि औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित भागांमध्ये प्रकल्पास एकूण 110 टक्के स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 20 वर्षांसाठी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 20 वर्षांकरिता स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 100 टक्के या प्रमाणे प्रोत्साहने देण्यात येतील.

—–०—–

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित १ कोटी २१ लाख दरवर्षी खर्च करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही योजना केंद्र आणि राज्य शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत असून केंद्र शासनाचा वाटा ६० तर राज्य शासनाचा वाटा ४० टक्के आहे. केंद्राने २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास

सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना स्वत:चे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी गुरु तेग बहादूर नगर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी ४१ हजार ५०० चौ. मिटर क्षेत्रावर २५ इमारती व त्यात १२०० सदनिका होत्या. या इमारती पाडून टाकण्यात आल्या आहे. मात्र रहिवाशांच्या व्यतिरिक्त उर्वरित जमिनीवर व्यावसायिक झोपड्यांचे अतिक्रमण आहे.

म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमून या जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल.  यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या पुनर्विकासासाठी प्रत्येक इमारतीतील किमान ५१ टक्के किंवा पुनर्वसन योजनेमधील एकूण भाडेकरु किंवा रहिवाशांच्या किमान ६० टक्के भाडेकरुंची सहमती आवश्यक आहे. या संदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अधिक्षतेखाली उच्चाधिकार समिती हा प्रकल्प राबविण्यावर संनियंत्रण ठेवेल.

—–०—–

एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन; मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश

एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा (भाडेपट्टा) समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात विकासकाला जमीन खरेदीसाठी ५० टक्के मुद्रांक शुल्क माफीची सवलत देण्यात येते.  यासंदर्भातील २००८ च्या शासन निर्णयातील मुद्रांक शुल्क माफी याबाबीमध्ये भाडेपट्टा ही बाब देखील समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. मुद्रांक शुल्क माफीची सवलत विकासकास जमीन खरेदी करताना अथवा जमीन भाडेपट्टयावर देताना या दोन्ही पैकी केवळ एका वेळेस अनुज्ञेय राहील.

—–०—–

भुदरगड तालुक्यात कायमस्वरुपी विनाअनुदानीत नवीन समाजकार्य महाविद्यालय

भुदरगड तालुक्यात मौजे पाल येथे युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी या संस्थेस कायमस्वरुपी विना अनुदानित तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज हे १०० टक्के डोंगरी तालुके असून येथील विद्यार्थ्यांना समाजसेवेच्या शिक्षणासाठी परिसरात कोणतीही शैक्षणिक संस्था नसल्यामुळे ८० ते ९० कि.मी. दूरवरील कोल्हापूर सारख्या ठिकाणी जावे लागते.  त्यामुळे विशेष बाब म्हणून या संस्थेस अटी व शर्तींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली.

—–०—–

पुणे जिल्ह्यातील निमगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १४ :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे लिफ्ट बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली. बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन वभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निमगाव येथील खंडोबा मंदिर उंचावर असल्याने याठिकाणी भाविकांना विनासायास जाता येण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोपवेची मागणी केली होती. त्याठिकाणी रोपवेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लिफ्ट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लिफ्टसह इतर सुविधांसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यास मंजुरी मिळाली आहे. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यास येथे चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते. या सुविधांच्या उभारणीसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. सार्वजनिक हितासाठी येथील जमिनीचा वापर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेला नि:शुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी. संबंधित यंत्रणेने लिफ्टची सुविधा करताना सर्व खबरदारी घ्यावी, त्याची देखभाल दुरूस्ती पाहावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

निमगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भक्त निवास, अॅम्फी थिएटर, बगीचा, पार्किंग, कार्यालय, प्रसादालय, स्वच्छतागृहे, स्कायवॉक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. लिफ्टमधून दिव्यांग, वृद्ध, महिला, बालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एकावेळी २६ नागरिकांना लिफ्टमधून जाता-येता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्याचसोबत, वृध्द कलावंतांच्या  पेन्शन योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. यावेळी मंत्री श्री. मुनगुंटीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, हे सर्व कलावंत आणि त्यांची कला ही अनेक पिढ्यांचे समाधान करत आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची प्रथा, परंपरा आहे. आपला देश संस्कृतीप्रधान आहे, एखाद्याच्या योगदानाचे मनापासून कौतुक करणे, त्याला दाद देण्यासाठी विशाल हृदय लागते. महाराष्ट्र शासनाने ही सहृदयता जपली आहे. आपल्या मराठी माणसाचं आपण कौतुक करणं यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी मान्यता आणि कृतज्ञता दर्शविणारा हा सोहळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अभिनय, लेखन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, दिग्दर्शन या विविधांगी कलांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे.

समर्पित भावनेने काम करणाऱ्या वृद्ध कलावंतांना राज्य शासन मदत करते. त्यासाठी असणारी वयोमर्यादा आपण ५० वर्षे इतकी ठेवली. या वृध्द कलावंतांच्या पेन्शन मध्येही आपण लवकरच वाढ करीत असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात ७५ चित्र नाट्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, महासंस्कृती उत्सव घेतला. रसिकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी यामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना भरभरुन दाद दिली. राज्यात सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी तयार केलेली समिती काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले, महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे.

राज्याबाहेर जाऊनही आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत.  दरवर्षी  तीन मराठी चित्रपट कान्स फिल्म महोत्सवासाठी पाठवतो. पुरी ते पंढरपूर हा ओडिशा राज्यासोबत आपण कार्यक्रम करत आहोत. इतर राज्यासोबत आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत. यावर्षी राज्याच्या सर्व जिल्ह्यात पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव आयोजित केला आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार रक्कम यावर्षीपासून तीन लाख रुपये तर जीवनगौरव पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

यामध्ये, यावेळी सन 2023 साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन 2023 साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळे, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी सुहासिनी देशपांडे आणि सन 2023 साठी अशोक समेळ, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी नयना आपटे आणि सन 2023 साठी पं. मकरंद कुंडले, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन 2021 साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन 2022 साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात आला.

तसेच सन 2022 आणि सन 2023 साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान करण्यात आले. सन 2022 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये वंदना गुप्ते (नाटक), मोरेश्वर अमृतराव निस्ताने  (उपशास्त्रीय संगीत), अपर्णा मयेकर (कंठसंगीत), हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला), शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी),  लता सुरेंद्र (नृत्य), चेतन दळवी (चित्रपट), प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन), पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत), डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान), अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले. श्रीमती गुप्ते यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

 सन 2023 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक), पं.ह्रषिकेश बोडस  (उपशास्त्रीय संगीत), रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत), कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला), शाहीर राजू राऊते (शाहिरी),  सदानंद राणे (नृत्य), निशिगंधा वाड (चित्रपट), अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन), शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत), यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान), उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे यांनी केले, तर आभार सहसंचालक श्रीराम पांडे यांनी मानले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चतु:शृंगी परिसरातील दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजऩ़

पुणे, दि. १३ : चतु:शृंगी परिसरातील १ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना मंदिराचे दर्शन सोपे व्हावे याकरीता सरकत्या जिन्याची (एक्सिलेटर) व्यवस्था करण्यात येईल,असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, मंदिर देवस्थानचे विश्वस्त नंदू अनगळ, उद्योजक कृष्णकुमार गोयल, माजी नगरसेवक आदित्य माळवे, शाम सातपुते, रवी साळेगावकर, दत्ता खाडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुण्यातील चतु:शृंगी देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे प्रतिरुप म्हणूनही चतु:शृंगी देवीला ओळखले जाते. त्यामुळे शारदीय नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

चतुःश्रृंगी देवीचे मंदिर हे डोंगर माथ्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना देवीच्या दर्शनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी मंदिर परिसरात सरकत्या जिन्याकरीता (एक्सिलेटर) तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंदिर देवस्थान समितीला केल्या. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुन किंवा लोकसहभागातून यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना श्री.पाटील यांनी चतु:शृंगी मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

विशेष मतदार नोंदणी मोहिमेसाठी मुंबई शहर व उपनगर जिल्हा आणि मुंबई महापालिकेची संयुक्त आढावा बैठक

मुंबई दि. १३: आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकराचा मताधिकार सुनिश्चित व्हावा या हेतूने, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार विशेष मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, विशेष कार्य अधिकारी डॅा. सुभाष दळवी, मुख्य  निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक, पल्लवी जाधव, मुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत १८ वर्षावरील नागरीकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई महापालिकेकडे असलेल्या उपलब्ध  माहितीच्या आधारे  या मतदारांपर्यंत पोहचण्याचे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडील उपलब्ध माहिती तपासून मतदार यादीत यादीतील नावांची खात्री करून घेणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खाजगी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी समन्वय साधून नवमतदारांच्या नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्याबाबत  सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी  सहकार्य करेल – आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल

बृहन्मुंबई महानगर पालिकेशी संलग्न सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका, अशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक आणि नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून  नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महापालिका सर्वतोपरी  सहकार्य करणार, असे आश्वासन आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले. तसेच सर्व संबंधितांनी निवडणुकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांनी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, असे सांगून मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in   /  Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

०००

कलाकारांनी मुंबईला नवी दृश्य ओळख करून द्यावी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १३ : दृश्य कला व वास्तुकला नगरांना तसेच महानगरांना दृश्य ओळख करून देतात.  ‘गेटवे ऑफ इंडिया’ मुंबईची तर ‘इंडिया गेट’ दिल्लीची दृश्य ओळख करून देतात. ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ने न्यूयॉर्कला तर ‘आयफेल टॉवर’ने पॅरिसला दृश्य ओळख करुन दिली आहे. कला व वास्तुकलेत समृद्ध असलेल्या भारतातील कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात मुंबईला एक नवी दृश्य ओळख देणारी कलाकृती निर्माण करावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. अशा प्रकारच्या नव्या दृश्य कलाकृतीमुळे देशाचा इतिहास, समृद्ध वारसा व जीवनमूल्ये जगापुढे येतील असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (कलाकार विभाग) उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १३) जहांगीर कलादालन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभ काळे यांना ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धातुकला क्षेत्रातील कलाकार विवेकानंद दास यांना ६३ वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी दृश्य कला क्षेत्रातील १५ कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आले.

आपण स्वतः काष्ठ कलाकार असून वेळ मिळेल त्यावेळी काष्ठशिल्पे व देवतांच्या मूर्ती तयार केल्या असल्याचे सांगून लाकूड पाहिल्यावर आपल्या मनात त्यात लपलेली कलाकृती दिसू लागते असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कलाकृती पाहिल्या त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, असे श्री. बैस यांनी सांगितले.  देशातील अनेक गावांमध्ये कलाकार आहेत, परंतु त्यांचे शोषण होते. हे शोषण बंद झाले पाहिजे व गावागावातील छुप्या कलाकारांना पुढे आणले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तू व वारसा कलाकृती पर्यटन वाढविण्यासाठी, लोकांमध्ये अभिमानाची भावना जागवितात तसेच रोजगार सृजनासाठी मदत करतात. मात्र आपल्याकडे इतिहासाची व वारस्याची उपेक्षा होताना दिसते. यादृष्टीने, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कॉर्पोरेट्स व व्यावसायिक घराण्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्राकडे अजिंठा – वेरूळ लेणी, शिवकालीन किल्ले, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी जगप्रसिद्ध वारसा स्थळे आहेत. वारसा जतनाच्या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

जे जे कला महाविद्यालयाने देशाला जी के म्हात्रे व राम सुतार यांच्यासारखे मूर्तिकार तसेच  एमएफ हुसेन, अकबर पदमसी, एस एच रझा, के के हेब्बर, वासुदेव गायतोंडे, तैयब मेहता यांसारखे चित्रकार दिले.  या महान कलाकारांच्या कलाकृती असलेले स्थायी प्रदर्शन भरवून मुंबईला दृश्यकलेची राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला महत्व देण्यात आले असून नजीकच्या काळात राज्य कला संचालनालयातील १५० पदे भरण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

कुलाबा या भागात जहांगीर कला दालन, वस्तू संग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांसारख्या अनेक संस्था असल्यामुळे कुलाबा हा महाराष्ट्राची कला राजधानी आहे असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.  कला प्रदर्शनातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील कलाकार नूरील भोसले, सुनील विणेकर, प्रसाद मेस्त्री, नागनाथ घोडके, सचिन पखाले, पूजा पळसंबकर, अनिकेत गुजरे, मुकेश पुरो, प्रसाद गवळी, अभिषेक तिखे, श्रवण भोसले, साक्षी चक्रदेव, योगेश आबुज, प्रसाद निकुंभ व सोहेब कुरेशी या कलाकारांना प्रत्येकी ५०,०००/- रु. पारितोषिक रक्कम असलेले ६३ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १३ (जिमाका) : खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मिनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. ‘गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी’ या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.

ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एसटी बस प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.

एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे अशा प्रकारे तिचा सांभाळ करायला हवा, असे आवाहन करुन मुख्यमंत्र्यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. ते म्हणाले की, एस.टी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एसटी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होत आहे. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. एसटी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्यात. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एसटी चालक-वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एसटी कॅन्टीन चांगले असावे. तिथल्या अन्नाचा दर्जा उत्तम असावा. गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या आठ महिन्यांपासून आपण ‘हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा मी लवकरच आढावा घेणार आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ‘हात दाखवा एसटी थांबवा’ या उपक्रमामुळे लोक आणि एसटीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एसटी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एसटी ला नफ्यात आणू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.

सचिव पराग जैन यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक  सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.

०००

 

अनाथ मुलांसाठी गृह प्रकल्पांमध्ये प्राधान्य हवे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. १३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्राधान्य असावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज राष्ट्रीय स्तरावरील बेघर मुलांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे व जीवन संवर्धन फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या परिषदेचा विषय ‘फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ नेविगेटिंग आणि नेटवर्किंग फॉर होमेलेस चिल्ड्रेन’ हा होता.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मुलांची बेघर होण्याची विविध कारणे विशद केली. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये मुले आणि महिला मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होऊन अनेकदा बेघर होतात. तसेच कौटुंबिक भेदभाव, हिंसाचार, कौटुंबिक आर्थिक समस्या, कुटुंबामध्ये असणारी असुरक्षितता यामुळे सुद्धा मुले बेघर होतात, असे सांगितले.

अनाथ व बेघर मुलांची अनेकदा तस्करी होते. या मुलांचा अनेक घातक व्यवसायात कामगार म्हणून गैरमार्गाने कामांमध्ये वापर केला जातो. मुलींना विविध कारणाने व विविध अमिषे दाखवून पळवून नेले जाते व त्यांचे विविध प्रकारे शोषण केले जाते. अनेक बालगृह आणि आश्रम शाळांमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत असतात. समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

तसेच लहान मुलांचे संदर्भात काम करणाऱ्या शासकीय व सेवाभावी संस्था यांच्या कर्मचा-यांचे सक्षमीकरण करणे, लहान मुले व महिलांच्या कायद्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. गिरीष प्रभुणे, रवींद्र गोळे, डॉ. गणेश भगुरे, कमलेश प्रधान उपस्थित होते.

०००

 

 

औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : पुणे जिल्ह्यातील तळवडे, पिंपरी चिंचवड, नागपूर जिल्ह्यातील चाकडोह काटोल येथे कारखान्यात स्फोट होऊन अनेक कामगारांचा मृत्यु झाला. मृतांमध्ये महिला कामगारांची संख्या लक्षणीय होती. औद्योगिक विकासात आघाडीवर असणाऱ्या राज्यात अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

राज्यात सर्व औद्योगिक कारखान्यांची तत्काळ तपासणी करुन बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई करावी. कार्यरत मजुरांना आवश्यक सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याबाबत सर्व उद्योजकाना सक्त सूचना देण्यात याव्यात, प्रत्येक उद्योग आस्थापनांना त्यांच्या उद्योगामध्ये महिला कामगारांना लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा. सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट करावे. सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावे. अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे. अपघातग्रस्त कुटुंबांना कारखान्याने तत्काळ आर्थिक मदत करावी.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना संचालक, औद्योगिक सुरक्षा यांना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १३ : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २२ : वर्ल्डवन एनर्जी कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात चांगली सुरुवात केली असून येत्या...

गडचिरोली देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

0
गडचिरोली, दि. २२ (जिमाका) : राज्यात सर्वांधिक वनाच्छादित अशा गडचिरोली जिल्ह्याची ओळख ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ म्हणून आहेच, परंतु आता हा जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व...