सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 908

चारचाकी वाहनांच्या आकर्षक व पसंती क्रमांकाद्वारे ४१ लाख रुपयांचा महसूल

मुंबई, दि. १३ : नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

परिवहन कार्यालयाच्या एमएच 03 ईएल या श्रृंखलेत विशेष करून 0001 या क्रमांकासाठी 4 लाख रूपये, दोन वेगवेगळ्या क्रमांकांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये, 8 वेगवेगळ्या पसंती क्रमांकासाठी प्रत्येकी 70 हजार रुपये, 16 पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये, एका पसंती क्रमांकासाठी 22 हजार 500, 49 वेगवेगळ्या आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये, 98 विविध आकर्षक व पसंती क्रमाकांसाठी प्रत्येकी 7 हजार 500 रुपये, 54 पसंती क्रमांकांसाठी 5 हजार रूपये, अशा प्रकारे एकूण 229 आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी 38 लाख 22 हजार 500 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  12 फेब्रुवारी पर्यंत एकूण 234 अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी एकूण 41 लाख 73 हजार 633 रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.

तसेच एकाच क्रमांकाला एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास त्या वाहन क्रमांकाचे लिलाव करून अर्जदाराला पसंती क्रमांकासाठी विहीत केलेल्या शासकीय शुल्का व्यतिरिक्त, अतिरिक्त शुल्क जमा करावे लागते. त्यानुसार या कार्यालयामध्ये 0901, 5050, 3333, 1111 व 6699 या पाच क्रमांकांसाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्याकरीता अर्ज सादर केला होता. या पाचही क्रमांकासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले होते. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला व त्या – त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी एकापेक्षा अतिरिक्त शुल्क संबंधित कार्यालयात जमा करून क्रमांक आरक्षित केला. या पाच क्रमांकांसाठी लिलावाद्वारे एकूण 3 लाख 51 हजार 133 रूपये शासकीय महसूल प्राप्त झाला आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉइंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांची मालिका एमएच 03 ईएफ (MH03EF) ही पूर्ण झाल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच 03 ईएल ही नवीन मालिका 6 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या श्रृंखलेत आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज डॉ. कराड यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत केंद्राच्या विविध योजना तसेच राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचतगटांना द्यावयाचा अर्थपुरवठा, चांगले काम करणाऱ्या गटांना कर्ज उपलब्ध करुन देणे, शहरी व ग्रामिण भागातील बचत गटांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना, रेशन कार्ड व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याबाबतही डॉ. कराड यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, आयुष्मान कार्ड ही योजना म्हणजे आरोग्याची काळजी घेणारी योजना असून लोकांना आरोग्यावर होणारा आकस्मिक खर्चाचा भार कमी करणारी ही योजना आहे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना ह्या गरिबांना अर्थ सहाय्य करणाऱ्या योजना असून त्यातून रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेसाठी लाभ घेतांना आधार कार्ड संलग्नता असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावे,सए निर्देश डॉ. कराड यांनी दिले.

०००००

 

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई, दि.१३: महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे ‘श्वान पथक’ सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे पुरावे मिळणार आहे. त्यामुळे महिला अत्याचार गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत होईल.  वितरीत करण्यात आलेला निधीमधून या पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे.

रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या निधीचा उपयोग करून रेल्वे, लोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना ‘बॉडी वॉर्म कॅमेरे’ देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे गोळा करण्यासाठी  निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील तपास कार्य जलद गतीने पूर्ण  करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने संवदेनशील भागात फिरत्या गस्त वाहनांची संख्याही वाढविण्यात येईल. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबविण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

ग्रंथोत्सवास उत्साहात प्रारंभ

ग्रंथ आहेत जीवनाची प्रेरक शक्ती -ऋषिकेश कांबळे

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- मानवी जीवनाच्या प्रवासाच्या उद्वहनाचे विवेचन ग्रंथांमध्ये केले जाते. या जीवनाच्या परिक्रमेचा वेध  घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. ग्रंथ हेच जीवनाची प्रेरक शक्ती  आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी आज येथे केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ‘छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन झाले.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले ग्रंथदिंडीचे स्वागत

प्रारंभी सकाळी क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. तेथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. तसेच श्री. सावे यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.  ग्रंथदिंडीत त्यात विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ग्रंथ दालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहाय्यक संचालक ग्रंथालय सुनील हुसे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कैलास आतकरे, राजशेखर बालेकर, समता दर्शन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा वासाडीकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथ प्रेमींची उपस्थिती  होती.

ग्रंथांतून मिळते सामर्थ्य

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ऋषिकेश कांबळे की, मनाची जोपासना ग्रंथ करत असतात. ग्रंथ वाचनातून भावनांची प्रेरक शक्ती प्राप्त होत असते. जीवनाचे संकल्प करण्याचे आणि ते प्रत्यक्ष आणण्याचे सामर्थ्य ग्रंथामधून व्यक्तीला मिळत असते. जीवन विकासाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय  उपाय नाही.  उत्क्रांतीची प्रक्रियात श्रद्धा,प्रेम, आदरद्वेष, करुणा अशा विविध भावनांची ग्रंथाच्या वाचनातून माणसाला  प्रचिती येते.  संत वाड.मयाने परोपकाराची, समतेची भावना आपल्या साहित्यातून वाढीस लावली व माणूस म्हणून जगण्याची भावना केंद्रस्थानी ठेवून समतेचा संदेश दिल. ग्रंथ वाचनातून सर्व भावनांचे प्रगटीकरण होत. अनुभवसिद्धता मानवाला वाचनातून येत असते. अभिव्यक्तीसाठी ग्रंथाचे महत्त्व  अनन्यसाधारण आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

बुधवार दि.१४ चे कार्यक्रम

दुसरा दिवस  सकाळी 11 वा. मंथन विषय ‘वाचन संस्कृती संवर्धानात माझा खारीचा वाटा’, अध्यक्ष डॉ. दादा गोरे, सहभाग दै.सकाळ चे मराठवाडा आवृत्ती संपादक संतोष शालीग्राम,  लेखाधिकारी शरद भिंगारे, साहित्यिक डॉ. ललित अधाने, साईबाबा वाचनालयाचे सचिव दुष्यंत आठवले, प्रकाशक भास्कर सरोदे.दुपारी 2 वा. परिसंवाद विषय : सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासासाठी विविध योजना, दुपारी 4 वा.समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. धर्मराज वीर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची उपस्थिती असेल.

ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुभाष साबळे, समन्वय समिती  सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, शिक्षणाधिकारी (माध्य) एम.के.देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कार्यवाह मसाप डॉ. दादा गोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींनी केले आहे.

00000

 

 

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १३ : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक  होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूरचा (माफसू)  ११ वा दीक्षान्त समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच रोजगार निर्मिती करुन ग्रामीण भागात उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात उद्योग सुरु करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विद्यापीठातील प्राध्यापक – स्नातकांनी २०२२ या वर्षी ‘लम्पी’ त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती असे सांगून मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या दीक्षान्त भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अनिलकुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेतक्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर आहे. पोषण सुरक्षेची समस्या दूध, अंडी, मासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.  वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होत असून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारोहात १७९० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली.

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसु’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरु, इतर विद्यापीठांचे कुलगुरु, विभाग प्रमुख, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

०००

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात २ हजार गाईंचे वितरण करणार; आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी ! – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 13: (जिमाका वृत्त) आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोनही तालुक्यांसाठी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते धडगाव तालुक्यात बचत गटांना शेळी वाटप, महिला गृहिणींना गॅस कनेक्शन वितरण व वनपट्टेधारकांना लाभाच्या योजनांचे वितरण करताना बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथूर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, देवेंद्र वळवी व पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, आदिवासी भागातील सर्व रस्ते जून अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील. या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रूग्णालये, तालुका मुख्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा थेट रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळण-वळण व त्या भागातील उद्योग व्यवसायांच्या भरभराटीसही चालना मिळणार आहे. त्यात दुधाळ गाईंचे वाटप केल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस येणार आहे. तसेच वनपट्टेधारतांना शेळ्यांचेही वितरण केले जाणार आहे. धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचेही वितरण करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली आदिवासी, दुर्गम भागातील महिलांचे चुलीच्या धुरापासून बिघडणारे आरोग्य  लक्षात घेवून उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्य जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. येणाऱ्या काळात आदिवासी दुर्गम भागातील महिलांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमात ४२ गटांना शेळी गट प्रमाणपत्र, ८८१ महिलांना गॅस कनेक्शन तर १०३ वनपट्टेधारकांना प्रत्येकी १० शेळी, बोकड वितरण करण्यात आले.

00000

शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १३ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहन वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

यासंदर्भात, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी करुन रोषणाई करणे, रांगोळी काढणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

शिवजयंती उत्सवाच्या आरंभी राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या आधी व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हास्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ प्रसारण अशा पद्धतीने समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

राज्य शासनामार्फत दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दि. १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभरात विविध उपक्रम

दरम्यान,  शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण वन विभागामार्फत हटविण्यात आले.

दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील दिवाण –ए – खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून श्री. मुनगंटीवार यांनी यावर्षी दिनांक २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी माता मंदिरास चांदीचे छत्र अर्पण केले.

सन २०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचेमार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

दिनांक १ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दि. ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दि. १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार ऐकवण्यात येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू – काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा आरंभ १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. “मराठा साम्राज्याचे चलन” या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये कॉफीटेबल बुक तयार करण्यात येणार आहे.

राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १३: राज्यातील बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध पावले उचलली आहेत. बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यापासून ते बांबूपासून निर्मित विविध वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न अधिक गतीने करावे. बांबूपासून बनणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी कौशल्य विकासाची याला जोड द्यावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

मंत्रालयात आज महाराष्ट्र बांबू  विकास नियामक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्राच्या बांबू प्रचार आणि लागवड समितीचे सदस्य आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाळ रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान उपमुख्य वन संरक्षक  (बांबू) श्रीनिवास राव यांच्यासह नियामक मंडळातील सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीला राज्य बांबू विकासासंदर्भातील अटल बांबू योजना, राष्ट्रीय बांबू योजना, स्फूर्ती योजनांची अंमलबजावणी आढावा सादरीकरणाद्वारे घेतला. जे शेतकरी बांबू लागवड करु इच्छितात, त्यांना प्रोत्साहन देणे, बांबू उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी प्रदर्शन दालने तयार करावीत. कौशल्य विकासासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची मदत घ्यावी, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि इतर योजनांची सांगड घालून एकात्मिक पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ती राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बांबू रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी बांबू ऊतीसंवर्धन रोपवाटिका तयार करावी. बांबू पॅलेट आणि बांबू चारकोलसाठी आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने प्रकल्प अहवाल तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी, याबाबतही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना बॅकांकडून अडवणूक होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यात अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करुन बांबू हे उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असल्याचे दाखवून दिले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रकल्पांना इतर शेतकऱ्यांच्या भेटी आयोजित करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव – पालकमंत्री उदय सामंत

रायगड दि.12 (जिमाका): महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. ही संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केले आहेत. यामुळे आपल्या लोककला, संस्कृती यांचे जतन होणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदान अलिबाग येथे आयोजित महा संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महिला व बालवकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,  आदी उपस्थित होते

आज पहिल्या दिवशी आयोजित अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद लाभला.  स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती, मर्दानी खेळ, पोवाड्याच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही कोकणात न राहता ती जगभरात गेली आहे. 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचा रायगडकरांनी आस्वाद घेवून, अशीच भरभरुन दाद द्यावी.असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले.

दि.16 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला स्वयं सहायता समूहानी आयोजित विविध जिल्हास्तरीय वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते झाले. महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व महिलांशी चर्चा केली. तसेच माहिती घेतली.तसेच महिलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे – न्या. भूषण गवई

नागपूर,दि. १२ : न्यायालयातील वाढत जाणाऱ्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पध्दतीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. याच बरोबर दिवाणी प्रकिया संहितेच्या कलम 89 मधील तरतुदी अंतर्गत जास्तीत जास्तीत प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेकरीता संदर्भीत करावेत असे प्रतिपादन सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, मुख्य मध्यस्थी संनियंत्रण समिती मुंबई, उच्च न्यायालय मध्यस्थी संनियंत्रण उपसमिती नागपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिम्बोयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे आयोजित विभागीय मध्यस्थी परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष तथा मुख्य मध्यस्थी देखरेख समितीचे अध्यक्ष नितीन जामदार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम, न्यायमूर्ती नितीन सांबरे, नागपूर खंडपीठातील अन्य न्यायमूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भातील 600 न्यायाधीश व 30 प्रशिक्षीत मध्यस्थी विधीज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.

न्याय सबके लिए या नालसा गीताद्वारे परिषदेची सुरूवात झाली. सर्व मान्यवरांनी कुंडीतील रोपांना जल अपर्ण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. परिषदेमध्ये उपस्थितांना मध्यस्थी कायदा 2023 व मध्यस्थीच्या अनुषंगाने विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेमध्ये जी. एच. रायसोनी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मध्यस्थी विषयावर नाट्य सादर केले.

परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती नितीत जामदार, न्यायमूर्ती नितीन सांबरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. सुराणा, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एस. ए. अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे सदस्य अनिलकुमार शर्मा, जिल्हा सेवा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील, नागपूर जिल्हयातील न्यायीक अधिकारी, नागपूर खंडपीठातील व जिल्हा न्यायालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

0
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व...

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...