बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 889

जैन संत आचार्य विद्यासागर जी महाराज यांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 18: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिगंबर जैन संप्रदायाचे संत आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे जीवन ज्ञानसाधना, कठोर तपस्या व  आत्मकल्याणासाठी समर्पित होते. संस्कृत व प्राकृत भाषांचे गाढे अभ्यासक असलेल्या विद्यासागर जी महाराजांनी प्रवचने, लिखाण तसेच काव्याच्या माध्यमातून आयुष्यभर जनसामान्यांचे प्रबोधन केले व त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.

त्यांच्या समाधीमुळे एक महान राष्ट्रसंत व समाजसुधारक आपल्यातून निघून गेला आहे. परंतु, त्यांचे विचार धन शाश्वत असून लोकांना उन्नत जीवन जगण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक सिद्ध ठरेल. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

00000

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे दि.१८: संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्‍ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची श्री. सामंत यांनी पाहणी केली. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, गणेश निबे, किशोर धारिया, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर  येथे २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रास्त्रांविषयी कुतूहल असते. त्यांना आधुनिक शास्त्रासोबत संरक्षण साहित्य जवळून पाहण्याची ही संधी आहे.

संरक्षण अभियांत्रिकी उद्योगांनाही प्रदर्शनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्स आणि इतर उद्योगांना उद्योग विस्तार आणि या क्षेत्रातील संधीविषयी प्रदर्शनातून माहिती मिळणार असल्याने उद्योग क्षेत्राशी निगडित प्रतिनिधींनी प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी केले.

प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या  एमएसएमईना निःशुल्क दालन उपलब्ध करून द्यावे. सर्व उद्योग संघटनांच्या बैठका घेऊन त्यांना आमंत्रित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रदर्शनातील चार दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील १ लाखाहून अधिक विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देणार आहे. त्यांना १ हजार प्रकारचे तंत्रज्ञान पाहण्यासोबत भारतीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि.18: महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. यादृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल  त्याला शेततळे, ठिबक सिंचन, एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवीत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला.

शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे असल्याने या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत व त्याचे संवर्धनही केले पाहिजे.

महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात . ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी  पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर,इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन  अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि.18: पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-2024 बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.

पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे, यानिमित्ताने त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक – सचिव सुमंत भांगे

मुंबई, ‍‍दि.18 : राज्यातील मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक असून या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे यांनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

मातंग क्रांती महामोर्चा शिष्टमंडळाने श्री. भांगे  यांची  नुकतीच भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आयोजित बैठकीत श्री. भांगे यांनी शिष्टमंडळास आश्वासित केले.

मातंग क्रांती महामोर्चा शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात  अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करणे, जातीनिहाय जनगणना करणे, मातंग समाजाला वेगळे आठ टक्के आरक्षण देणे, अण्णाभाऊ साठे स्मारक (चिराग नगर) याची लवकर निर्मिती करणे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कर्जासाठीच्या जाचक अटी कमी करणे, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांचे फोटो अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सर्व कार्यालयात लावणे या मागण्याचा समावेश आहे.

यावेळी  बार्टीचे महासंचालक सुनील वारे , हिंदुस्थान ऍग्रो चे अध्यक्ष डॉ.ढोकणे पाटील, शिष्टमंडळातील सदस्य अशोक ससाणे, मोहनराव तुपसुंदर, सुदाम आवाडे,  राजेंद्र साठे, देवेंद्र खलसे, सुनिता तुपसुंदर, श्रावण नाटकर, शामराव सकट,  दिलीप कसबे, राजेश पवार, नानाभाऊ पाटोळे,  अनिल साठे, श्रीमती छबुबाई सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मातंग समाजाच्या संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे दि. 18 जानेवारी 2024 रोजी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी मोहनराव  कांबळे यांनी आमरण उपोषण केले होते. सामाजिक न्याय विभागाच्या विनंतीवरून त्यांनी उपोषण मागे घेतले होते. त्याअनुषंगाने शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

00000

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम; पंधरवड्यात एक लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

मुंबई , दि. 18 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

या मोहिमेंतर्गत 1 लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 23 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे  नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

सन 2022-23 मध्ये राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर ‘विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या  उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

0000

शिवसृष्टी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. १७ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला येथे पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी मंत्री श्री. भुजबळ यांनी केली त्यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, आर्किटेक्चर सारंग पाटील यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्प बांधकाम करताना व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखील याठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. प्रकल्पाची कामे वेळेत करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश ही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधिताना दिले.

तत्पूर्वी, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा निधीतून स्वामी मुक्तानंद शाळेच्या आवारात बांधण्यात आलेल्या ग्रीन जिमचेही उद्घाटन करण्यात आले.

अशी आहेत शिवसृष्टी प्रकल्पातील प्रस्तावित कामे….

शिवसृष्टी प्रकल्पासाठी साधारण ११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

➡️ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 फूट उंचीचा सिंहासनाधिष्टित मेघडंबरीसह पुतळा

➡️ महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व महाराजांचे सेनापती यांचे भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन

➡️ माहिती केंद्र व कार्यालय

➡️ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

➡️ ऑडिओ व्हिज्युअल हॉल

➡️ पुस्तक व साहित्य विक्री केंद्र

➡️ स्वच्छतागृह, उपहार गृह, गार्डन व वाहनतळ

०००

 

म्हसळा नगर पंचायत हद्दीत पिण्याचे मुबलक, स्वच्छ पाणी मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड दि. १७ (जिमाका) : म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी ४३ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

म्हसळा येथील कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे.  म्हसळा तालुक्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधी  उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शासनाच्या योजनांचा जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, राज्य शासनामार्फत यावर विशेष भर दिला जात आहे.  यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली.  शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक सहाय्य, शेतीसाठी 0 टक्के व्याजाने कर्ज पुरवठा, वीज, पाणी, रस्ते विकासासाठी शासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.  तसेच राज्यातील महिला आणि मुलींचा मान सन्मान वाढविणे, 8 लक्ष रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च व तंत्र शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, म्हसळा तालुक्यातील मोठमोठ्या विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली असून पर्यटकांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. येत्या वर्षभरात या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  म्हसळा शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी 43 कोटी रुपये मंजूर झाल्याबद्दल आभार मानले तसेच म्हसळा तालुक्यात नगर पंचायत कार्यालय आणि तहसिलदार प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन  देण्याची मागणी  केली.

गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रुपये वितरित – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १७ :  वाराणसी, ऋषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्री रामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या गोदा आरती उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठीचा ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला आज वितरित करण्यात आला.

ही कार्यवाही  जलद गतीने व्हावी यासाठी एक स्थानिक समिती गठित करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या.

जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तात्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदा आरती साठी आवश्यक पायाभूत सोई सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता पायाभूत सोयींसाठी मागितलेला निधी उपलब्ध झाल्याने गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफार्म तयार करणे, भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट, तसेच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

०००

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण

५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

मुंबई, दि. १७:  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषणपुरस्कार,  गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

नुकताच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रवींद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांनी केले आहे.

राज्य शासनाने नेहमीच मराठी चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी सोडविण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून या क्षेत्राला मदतीची भूमिका घेतली आहे. चित्रपटांसाठीचे रखडलेले अनुदान हा महत्वाचा विषय तातडीने मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मार्गी लावला. चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध परवानगी वेळेत मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय, या क्षेत्रातील विविध कला घटकांसाठी देण्यात येणारे पुरस्कार वेळेत देण्यासंदर्भातील वेळापत्रक तयार केले आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षातील पुरस्कारही यावर्षी देण्यात येणार असून यापुढील काळात प्रत्येक पुरस्कार हा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेला प्रदान करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ठरवले आहे. या सर्व पुरस्कारांच्या रकमाही दुप्पट केल्या आहेत. तसेच गोरेगाव आणि कोल्हापूर येथील चित्रनगरीच्या विकासातील सर्व अडथळेही दूर केले असून या दोन्ही ठिकाणी आता चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठीच्या आवश्यक सोयी सुविधा एकाच ठिकाणी व सहजतेने एक खिडकी योजनेतून उपलब्ध होणार आहेत. तसेच राज्यभर कोठेही शासकीय व सार्वजनिक जागा चित्रिकरणाकरता आता निःशुल्क उपलब्ध करून देण्याचाही निर्णय मंत्री श्री.  मुनगंटीवार यांनी घेतला आहे

०००

ताज्या बातम्या

विधानसभा इतर कामकाज

0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देणार -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
मुंबई, दि. १२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबियांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट...

कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0
मुंबई, दि. १५ : कोकणातील वीज पुरवठा अधिक सक्षम, नियमित व तक्रारमुक्त होण्यासाठी कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा, अशा...

नागपूर, अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा मंत्री गिरीश महाजन व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

0
मुंबई दि. १५ : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा कामांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेऊन सिंचन...

राज्य क्रीडा विकास निधीसाठी  १४ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर –मंत्री दत्तात्रय भरणे

0
मुंबई, दि. १५ : राज्यातील गुणवंत, गरजू आणि प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने ‘राज्य क्रीडा विकास निधी’ अंतर्गत...