सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 882

मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक सबलीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

डॉ. काझींमुळे अंजुमनला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख

मुंबई, दि. २० : अंजुमन – ई – इस्लाम ही राष्ट्रप्रेमी शिक्षण संस्था असून आपल्या दीडशे वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने देशाच्या आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या आर्थिक – सामाजिक सबलीकरणात मोठे योगदान दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाधिक महिलांना शिक्षण संस्थांच्या नेतृत्वाची संधी दिली तसेच संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पद्मश्री सन्मान हा अंजुमनच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

अंजुमन-ई-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा साबू सिद्दीक पॉलिटेक्निक संस्थेच्या प्रांगणात नुकताच सोमवारी (१९ फेब्रुवारी) जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

सत्कार सोहळ्याला ‘अंजुमन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष डॉ. शेख अब्दुल्ला, कोषाध्यक्ष मोईज मियाजीवाला, अबू आझमी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सैयद, डॉ. झहीर काझी यांचे कुटुंबीय  व इतर निमंत्रित उपस्थित होते.

डॉ. काझी यांना पद्मश्री देऊन शासनाने केवळ अंजुमन संस्थेचाच नव्हे, तर मुंबई आणि महाराष्ट्राचा गौरव केला असे सांगून अंजुमन संस्थेने स्थापनेपासून कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण तसेच महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींना तसेच युवा वर्गाला शिक्षित तसेच कौशल्य प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे सांगून ‘अंजुमन’ने युवकांना कौशल्यासोबतच उद्यमशील होण्यास प्रोत्साहित करावे, असे राज्यपालांनी सांगितले.  कृत्रिम प्रज्ञेच्या आजच्या युगात संस्थांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम प्रज्ञेचे लाभ आणि तोटे याबद्दल शिकवले पाहिजे असे सांगून अंजुमनने या कार्यात पुढाकार घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी शिक्षणाला मूल्य शिक्षण व संस्कारांची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा ‘अंजुमन’च्या १.१० लाख विद्यार्थ्यांचा तसेच ३५०० शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आहे असे सांगून ‘अंजुमन’ने चित्रपट, क्रीडा, विज्ञान यांसह अनेक क्षेत्रात देशाला नामवंत विद्यार्थी दिले असे डॉ. काझी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

अभिनेते दिलीप कुमार, कादर खान, क्रिकेटपटू गुलाम परकार, सलीम दुराणी, यशस्वी जयस्वाल, सरफराज हे अंजुमनचे विद्यार्थी असल्याचे सांगताना अंजुमनचे ५० टक्के विद्यार्थी फी देऊ शकत नाहीत तर ६० टक्के विद्यार्थी प्रथम पिढीतील शिक्षण घेणारे असल्याचे डॉ.काजी यांनी सांगितले.  अंजुमन ने एमआयटी बोस्टन व वेस्टमिन्स्टर विद्यापीठ लंडन यांचेशी सहकार्य केल्याचे त्यांनी  सांगितले.

संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. काझी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचा, सामाजिक सेवा कार्याचा तसेच ‘अंजुमन’च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला.

०००

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. २०: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

धोंडीराम अर्जुन/स.सं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आदींनीही जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी स्वराज्य सर्किटची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आग्रा, दि. 19: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान डिवचला गेला त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणे हा रोमांचकारी क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी ‘ज्योतिर्लिंग सर्किट’च्या धर्तीवर ‘स्वराज्य सर्किट’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वराज्य सर्किटची निर्मिती करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी याच शिवजयंती सोहळ्यात बोलताना केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिसाद देत, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली.

सलग दुसऱ्या वर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आणि आग्रा किल्ल्यात दरवर्षी अशीच उत्साहात शिवजयंती साजरी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या शिवजयंतीचे आयोजन केल्याबद्दल  अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

या शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. बघेल, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मंगेश देसाई सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देशाचा इतिहास आणि भूगोल बदलला गेला असता. काही लोक जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात  पाऊल ठेवले ती ठिकाणे जोडणारी स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानसही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवराय म्हणजे हजारो सूर्यांची ताकद आहे. त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दांडपट्टा या शस्त्राला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. दांडपट्टा पूजनही यावेळी करण्यात आले.

अशा जयंती सोहळ्यांमधून शिवाजी महाराजांप्रमाणेच पराक्रम गाजवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री. बघेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

शिवजयंती सोहळ्यात बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,

ज्योतिर्लिंग सर्किट तयार केले तसे स्वराज्य सर्किट करावे व गड किल्ले जोडावे.

महाराज फक्त राज्यापुरते नव्हते तर देशासाठी होते म्हणून महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आग्रा किल्ल्याबाहेरही हजारो शिवभक्तांनी हा सोहळा एलईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहिला. अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सर्व पाहुण्यांचे स्वागत, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले व आग्रा येथे शिवजयंती सोहळा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श असून त्यांनी ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान दाखवला, औरंगजेबाच्या समोर झुकले नाहीत त्याच आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करून मानवंदना देण्यासाठी शिवजयंतीचे आयोजन केले असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतातून शिवभक्त या शिवजयंतीसाठी आग्र्यात दाखल झाले होते.

दीप प्रज्वलनाने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात झाली. सरकटे बंधूंनी महाराष्ट्र गीत, छत्रपती शिवाजी महाराज गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा पराक्रमावर लेझर शो, सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. ‘महाराष्ट्र राज्याचे चलन’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.

या शिवजयंती सोहळ्याला शिवप्रेमींनी अतिशय उत्साही प्रतिसाद दिला. शिवछत्रपतींचा जयजयकार संपूर्ण आग्रा किल्ल्यात दुमदुमला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे दि.१९: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, गणेश निबे,  पोलीस उप अधीक्षक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य आणि देश घडविला. त्यांनी देशाचे संरक्षण कसे करावे हे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या जयंतीदिनी संरक्षण क्षेत्रातील निर्मितीचे नवे दालन साकार होत असल्याचा आनंद आहे. पुणे जिल्हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन  करण्यात आले आहे. या भूमीतून भारतीय संरक्षण दलाला शक्तिशाली आणि आत्मनिर्भर  करण्यासाठी  महाराष्ट्र अग्रेसर राहील असा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.

एमएसएमई उद्योगांचे संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान- संरक्षण राज्यमंत्री अजय भट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्या संरक्षण  सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे. पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून श्री.भट यांनी महाराजांना अभिवादन केले.

प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदल कटिबद्ध असल्याचे सांगून ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष २०४७ पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे  यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

श्री.निबे यांनी प्रास्ताविकात नव्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात निबे डिफेन्स प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

मुंबई, दि. १९ – बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे  वाढवून दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षांना बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार ३२० केंद्रांवर १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तर, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्रदेखील ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. परीक्षा निकोप व्हाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्यात येत आहेत.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 19 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले,  सहसचिव श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.19: मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून स्वप्नातील मुंबई साकार करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पर्यटन विभाग, सिडको, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या माध्यमातून आयोजित मुंबई टेक विक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, हंगामा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज रॉय, गोकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंदाल, ड्रीम इलेव्हनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन, बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमरजानी आणि हाबटेकचे अक्रीत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लोकमतचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुंबईच्या विकासाबाबत मुलाखत घेतली. श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोसह पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प सुरु आहेत. मुंबई बदलत आहे, याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शहरातील वाहतूक आणि प्रदूषण समस्याही दूर करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. कोस्टल रोडचे काम पूर्णत्वास आले असून पुढील महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल. मुंबईला बदलण्यासाठी मेट्रो तीन प्रकल्प आणि सर्वात लांब भुयारी मेट्रोही प्रगतीपथावर आहे. प्रत्येक मुंबईकराला भविष्यातील मुंबई पाहून आनंद वाटेल. ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून चार प्रकल्प लवकरच सुरु होतील. 2014 मध्ये मुख्यमंत्री  झाल्यानंतर उद्योगपतींची बैठक घेतली होती. त्यामुळे अनेक उद्योग मुंबईत आले आता मात्र मुंबईत उद्योगांसाठी जागा अपुरी पडत आहे. मुंबईत अपुऱ्या जागेमुळे नवीन महामार्ग बनवू शकत नसल्याने मेट्रोचे जाळे तयार करीत आहोत.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई जोडण्याचे काम झाले असून कमी वेळात वेगाने पोहोचता येत आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असून तिसरी मुंबई तयार होत आहे. कोस्टल रोडसुद्धा अटल सेतूला जोडला गेल्याने नवी मुंबईचे अंतर कमी झाले आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, कॉरिडॉर, भुयारी मेट्रो, टनेल यामुळे मुंबईतून एका तासात कुठेही जाता येणार असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या 11 किमी भुयारी मेट्रो आहे, ती पुढील तीन वर्षात 375 किमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या पाच वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास कामे सुरू आहेत.

डेटा सेंटर, तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात युवकांना रोजगार

स्टार्ट अप आणि इको सिस्टीममुळे युवक बंगळुरू, हैदराबादकडे जात होते. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर येथे स्टार्टअप कार्यान्वित केले आहे. 2016 ला देशाला आकर्षित करेल अशी स्टार्टअप पॉलिसी राज्याने तयार केली. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सेंटर तयार करीत आहे. अॅमेझॉन, गुगल या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली आहे. गुगलशी पुण्यात सामंजस्य करार झाला आहे. पुणे वेगाने तंत्रज्ञान शहर बनत असून नागपूर, पुणे, मुंबईत तंत्रज्ञान कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचा युवक इतर राज्यात नोकरीला जाणार नाही, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.   

2028 मध्ये एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था

राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याने येत्या 2028-29 मध्ये देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा हिस्सा असणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्रा’ द्वारे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्य शासनात तंत्रज्ञाचा वापर

चांगल्या आणि पारदर्शी सरकारसाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाचा आणि एआयचा वापर शासनामध्ये होत आहे. सामान्य नागरिकांना निधीचे वाटप, योजनेचा लाभ, विद्यार्थी शिष्यवृत्ती डीबीटीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून 300 शासकीय योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

कौस्तुभ धवसे आणि नीरज रॉय यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प लॉन्च करून प्रकल्पांचे क्यू आर कोडही स्कॅन केले.

कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा

मुंबई, दि. १९ : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावातदेखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेले अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असे मुख्यमंत्री पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज आली.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया केला होता.

शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस

ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरू होईल असे राज्यपालांनी सांगितले.

जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षान्त समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.19) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षान्त समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू-साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.

जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा व सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असे सांगून, जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या व आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमानआचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.

संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र

मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्त्व आहे व ज्ञानाइतकी  दुसरी पवित्र गोष्ट नाही.  यासाठी स्नातकांनी ज्ञानासाठी समर्पित व्हावे असे आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले.

ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग व आळस हे मुख्य अडथळे आहेत असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन (के. व्ही.) कामत तसेच वेद व जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा.दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्याशाखांमधील पीएच. डी. स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...