रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 87

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.

दौलतनगर ता. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात मिरगाव ता. पाटण येथील ग्रामस्थांचे भूस्खलनामुळे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्याअध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आदी उपस्थित होते.

मिरगाव येथील जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाल्याने 147 कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 47 कुटुंबे पूर्णतः भूस्खलीत झाली आहेत. 98 कुटुंबाचे स्थलांतरण निवारा शेडमध्ये तात्पुरता स्वरुपात करण्यात आले आहे. या बाधित कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन करण्याचे काम शासन करीत असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, येत्या डिसेंबरअखेर किमान 100 घरांची कामे तात्काळ पूर्ण करून बाधित कुटुंबांना ताबा देऊन पुनर्वसित करावे. तसेच उर्वरित काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. या कामात विलंब लावू नये. बांधकाम पूर्ण करण्याच्या कामात अडवणूक करणाऱ्यां विरोधात पोलिस विभागाचे सहकार्य घेऊन कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

बैठकीस संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, बाधित कुटुंबातील प्रमुख उपस्थित होते.

०००

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी
  • गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये सायरन

नागपूर, दि.  १२ : विदर्भातील नागपूर वन विभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी ‘मार्वल’मार्फत एका विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत ‘मार्वल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.  हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघात, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी

या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण 3 हजार 150 कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित हे कॅमेरे लावण्यात येतील. गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेऱ्यांशी जोडले जातील.  कॅमेरे वाघ, बिबट्यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात  असणार आहे. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये या कॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील.

करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात  875, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 525, नवेगाव  व्याघ्र प्रकल्पात 600 तर नागपूर वनक्षेत्रात 1 हजार 145  हे कॅमेरे व सायरन जोडले जातील.

नागपूर विभागात वरचेवर वाढणारे वाघांचे हल्ले लक्षात घेऊन पालकमंत्री बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी विविध आढावा बैठकीमध्ये या बाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी, यादृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करु असे त्यांनी सांगितले होते. याबाबत राज्याचे वन मंत्री यांच्या समवेत एक व्यापक बैठक घेऊन या कराराबाबत निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण नियोजनानंतर आज या करारावर स्वाक्षऱ्या करुन लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी वन विभाग व मार्वल कंपनीला दिले.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर, क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, आर. जयराम गौडा, उपवन संरक्षकविनीत व्यास, उपसंचालक अक्षय गजभिये,  सहाय्यक वनसंरक्षक पुजा लिंबगावकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

????????????????????????????????????

धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसेल असे नियोजन करुन विकास कामे करावीत. असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पार पडली, यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते.

????????????????????????????????????

या बैठकीस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार काशिराम पावरा, मंजुळा गावित, राघवेंद्र पाटील, पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी (ई-उपस्थिती), जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा नियोजन अधिकारी संतोष वानखडे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संजय सैंदाणे, यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

????????????????????????????????????

पालकमंत्री रावल म्हणाले की, “विकासकामे ही केवळ कागदावर न राहता रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सक्षमीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून कामांचे प्रभावी नियोजन करण्यात यावे. जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशाच विकासात्मक कामांना व योजनांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्ता राखून विकासकामे पूर्ण करावीत. यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक आणि समन्वयाने कामे करावे. सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे महाविद्यालयात रूग्णांसाठी बससेवा उपलब्ध करून द्यावी. तालुका क्रीडा संकुलसाठी जागा शोधावी, हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नागरिकांना देण्यासाठी जनजागृती करणे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 12 गावासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करावा, महावितरणकडून बसविलेले नादुरुस्त मीटर बदलण्यात यावेत. सर्व शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा वापर वाढवावा. धुळे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नियोजन करावे, महिला भवनात बचतगटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तु विक्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिला मॉल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन महिला मॉल तयार करावेत.

जिल्ह्यातील सर्व शाळांची दुरुस्ती करण्यात यावी. दुर्गम भागातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक आहे अशा ठिकाणी जास्त शिक्षकांची नेमणूक करावी. सामाजिक न्याय भवनात अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव द्यावा, दोंडाईचा शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे. कृषी विभागाने  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नाविण्यपूर्ण योजना सुचवून त्या राबविण्यात याव्यात. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात पशुधन वाढीसाठी नियोजन करून योजना राबवावी, महानगरपालिका आणि नगरपालिकेने मच्छिमारांना मासे विक्रीसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, पारंपरिक मच्छीमारांची प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे, माशांचे संवर्धन करण्याबरोबरच त्या माशांची प्रजाती वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मत्स्यपालन व्यवसायाला चालना द्यावी. जिल्हा वार्षिक योजनेत देण्यात येणाऱ्या निधीतून गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा, जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करताना लोकप्रतनिधीनींच्या सूचना लक्षात घ्याव्यात. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळाचे संवर्धनासाठी विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री रावल यांनी दिल्या.

बैठकीत  1 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-2025 मध्ये झालेल्या खर्चास मान्यता देणे, तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 वर्षांतील 30 जून अखेर खर्चास मान्यता देण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्य आयुक्त, समाज कल्याण, धुळे कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या महत्वपूर्ण योजना घडीपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

‘विकसित महाराष्ट्र 2047′ सर्वेक्षणामध्ये धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मत नोंदवावे – पालकमंत्री रावल

विकसित महाराष्ट्र 2047  व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. यात राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा तयार करताना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा व आकांक्षा देखील प्रतिबिंबित व्हाव्यात या हेतूने त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागरी सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणामार्फत राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी या महत्त्वाच्या मुद्यांवर नागरिकांचे विचार जाणून घेण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी यावेळी केले.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण – पालकमंत्री

संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

०००

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी ३२ लाख ५९ हजार ४९७ म्हणजेच ८०.११% मतदारांनी नावनोंदणी फॉर्म (Enumeration Forms – EF) भरून सादर केले आहेत. ही लक्षवेधी कामगिरी वेळेआधीच साध्य झाली आहे.

ईसीआयनेट (ECINet) या नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व ४० जुने अ‍ॅप्स समाविष्ट करण्यात आले आहेत आणि यामध्ये आतापर्यंत ४.६६ कोटी फॉर्म डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यात आले आहेत.

राज्यात ७७,८९५ बूथस्तर अधिकारी (BLOs) कार्यरत आहेत आणि त्यांच्यासोबत २०,६०३ नव्याने नियुक्त BLOs कार्यान्वित आहेत. एकूण ३८ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs), २४३ विधानसभा मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ९६३ सहाय्यक EROs या कामावर लक्ष ठेऊन आहेत.

या कार्यात राजकीय पक्षांनीही भाग घेतला असून १.५ लाख बीएलए (BLA) घराघरात जाऊन सर्व मतदारांची माहिती संकलित करत आहेत. ४ लाखाहून अधिक स्वयंसेवक वृद्ध, दिव्यांग व इतर संवेदनशील गटांतील मतदारांना सहाय्य करत आहेत.

२४ जून २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रत्येक मतदाराला २५ जुलै २०२५ पर्यंत EF फॉर्म सादर करावा लागेल.

ज्या मतदारांनी अद्याप पात्रता कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांनी ही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करता येतील. हे कागदपत्र सादर करण्यासाठी स्वयंसेवकांची मदत देखील घेतली जाऊ शकते.

१ ऑगस्ट २०२५ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांना त्यांच्या नावाचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी विहित मुदतीपूर्वी फॉर्म सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

  • देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे

नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे येत आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्रात देशाची वाटचाल स्वावलंबनाकडे सुरू आहे. स्वावलंबन व सामरिक सज्जतेकडे वाटचाल करत असलेल्या देशाच्या प्रवासात ‘एनएडीपी’तून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी योगदान देत सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीत पदव्युत्तर व्यवस्थापन पदविकेच्या (PGDM) पहिल्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी मा. राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड संजय हजारी, मुख्य संचालक, राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी डॉ. जे. पी. दास, संचालक (मानव संसाधन), म्युनिशन्स इंडिया लिमिटेड जे. पी. नाईक यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीमध्ये व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका (PGDM) च्या पहिल्या बॅचच्या दीक्षान्त समारंभाला उपस्थित असल्याचा आनंद असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, केवळ पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण राष्ट्रासाठी ही एक मैलाचा दगड ठरणारी घटना आहे.  देशाच्या संरक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या प्रवासात या अकादमीतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. ही अकादमी भविष्यात भारतातील संरक्षण उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रातील एक उत्कृष्ट विद्यार्थी केंद्र बनणार असून त्याचा पाया आज घातला गेला असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

राज्यपाल पुढे म्हणाले की, संरक्षण साधने विदेशातून आयात करावी लागायची. परदेशावर अवलंबून राहावे लागायचे. आता मात्र संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासह संशोधन व आधुनिकीकरण पाहायला मिळत आहे.

सध्याचे युद्ध हे मनुष्यापुरते मर्यादित राहणार नसून तंत्रज्ञानावर आधारित राहणार आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता आपल्याला उच्च दर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान गरजेचे आहे. या अकादमीच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान अवगत होणार आहे. संरक्षण क्षेत्र हे आता सर्वांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे पुढे जाण्याच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याचे असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

एनएडीपीतून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली. या सर्वच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी संरक्षण क्षेत्रातील विविध कंपन्या, संस्थांमध्ये उपलब्ध झाली आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम एनएडीपी मार्फत राबविण्यात येतो.

०००

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी भावना पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे.  या ऐतिहासिक आनंददायी घटनेचा जल्लोष साजरा करण्यासाठी पोवई नाका येथील शिवतीर्थावर शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आणि वीरश्रीने भारलेल्या पोवाड्यांनी संपूर्ण शिवतीर्थ दुमदुमले. भगव्या पताकांनी सजवलेल्या शिवतीर्थावर सहासी खेळांचे प्रदर्शन,  लेझीम खेळत शिवभक्तांनी आनंद साजरा केला.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. यासाठी गेले दोन वर्ष शासन पाठपुरावा करत होते.  संस्कृतिक कार्य विभागाने याच्यासाठी खूप प्रयत्न केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा होता. परदेशात याबाबत सतत बैठका होत होत्या. अन्य देशांनी या प्रस्तावासाठी भारताला पाठिंबा देणे यासाठी राजनैतिक स्तरावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. त्याला यश आले आहे. शिवप्रताप दिनासाठी ज्या किल्ल्याचे महत्त्व आहे, असा आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा या यादीत समावेश आहे. यासाठी सर्व जिल्हावासीयांच्या वतीने आनंद व्यक्त करतो.

पालकमंत्री देसाई म्हणाले, प्रतापगड आता देशाच्या आणि जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे, शौर्याचे एक जाणते ज्वलंत उदाहरण म्हणून ठळकपणे अधोरेखित झाला आहे. प्रतापगड आता आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पर्यटन मंत्री म्हणून काम करत असताना गड किल्ले पर्यटनाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपण केला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, पन्हाळा यांचे फोर्ट टुरिझमचे सर्किट डेव्हलप करण्यात येत आहे. गडांचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यानिमित्त आपला आनंद, जल्लोष साजरा करण्यासाठी आज आपण शिवभक्त, शिवप्रेमी शिवतीर्थावर एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याच्या प्रति असणारी आपली श्रद्धा या ठिकाणच्या या आपल्या जल्लोषातून व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनीच आभार मानले पाहिजेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर पाठपुरावा चालू होता. या प्रयत्नांना यश आल्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांना जगाच्या नकाशावर नेण्याचे काम झाले आहे. यामुळे जगभरातील इतिहास प्रेमी, पर्यटक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी, अभ्यासासाठी भेटी देतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी मदत होईल. या कामगिरीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य विभाग अशा सर्वांचे आभार मानले.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ल्यांची नोंद होत असतानाच्या कार्यक्रमाचे प्रसारण

जागतिक वारसा स्थळांमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत परिपाठाच्या वेळी जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रतापगड किल्ल्याचा समावेश होत असतानाचे चित्रीकरण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. सर्व शाळांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार तालुका कराड विद्यार्थी व शिक्षक यांनी तयार केलेल्या विविध व्हिडिओंचे जिल्हाअधिकारी संतोष पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.

०००

कर्करोग उपचार व दिलासादायक वागणुकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका): कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी, यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी इतर मागास वर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय  केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका वर्ग व इतर तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, कर्करोग रुग्णालयात नवीन उपचार पद्धतीसाठी आवश्यक मशिनरीसाठी निधीची तरतूद वेळोवेळी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह १६ जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा या रुग्णांना दिलासादायक वर्तनाने सहकार्य करणे आवश्यक असते. कर्करोग रुग्णालयातील सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले.

मंत्री अतुल सावे म्हणाले की, शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्तम सेवा येथे मिळते. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून सर्वांनी रुग्णांना तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार करण्यामध्ये सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी कर्करोग रुग्णालयातील विविध विभागाची पाहणी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार केणेकर यांनी केली व तसेच रुग्णांसोबत संवाद साधला. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ..शिवाजी शुक्रे यांनी केले तर आभार विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी मानले.

०००

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका) – शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला.

जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस राज्याचे इमाव कल्याण, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर,  प्रदीप जयस्वाल, अनुराधा चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, रस्त्याचे मोजमाप बरोबर होण्यासाठी रस्त्याचे मध्यबिंदू नकाशानुसार घ्या. त्यासाठी नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्त मोजणी करावी. परवानगी असलेली बांधकामे जर रस्त्याच्या हद्दीत येत असतील तर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्या. जेथे आवश्यक आहे तेथे गुंठेवारी करुन बांधकामे नियमानुकूल करा. मोहिमेत जे लोक बाधीत होत आहेत त्यांना म्हाडामार्फत घरे देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय अन्यत्रही वसाहती म्हाडामार्फत उभारुन घरे देण्याची प्रक्रिया राबवावी. या मोहिमेसाठी सर्व धर्मियांचे सहकार्य लाभत असून त्याद्वारे हे शहर सुंदर बनविण्याचा सगळ्यांचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले. याच मोहिमेत आता जे रस्ते महामार्ग प्राधिकरणात येतात त्यांचा विकास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सावे यांनी सांगितले की, अतिक्रमण निर्मूलनासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासना सोबत आहेत. असे असतांना ही मोहिम राबवितांना लगोलग रस्त्याचे काम पूर्ण करावे. त्यास दिरंगाई करु नये. अतिक्रमणे काढल्यामुळे आता विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले आहेत. ते तात्काळ हलविण्यात यावे. वीज कंपनीला त्यांच्या वाहिन्या ह्या भुमिगत करावयाच्या असल्यास त्याचाही प्रस्ताव त्यांनी द्यावा.

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी माहिती दिली की, शहर विकासआराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी होत आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचे बांधकाम पाडण्यात येणार नाही. मात्र, त्यांचे चिन्हांकन होऊन त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. रस्त्याच्या मध्यबिंदूबाबत काही ठिकाणी लोकांचे आक्षेप आहेत. तेथे नगररचना विभाग व भूमी अभिलेख विभाग हे संयुक्त मोजणी करुन नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच ही मोजणी करुन लोकांना गुंठेवारी लावून त्यांची बांधकामे नियमानुकूल करणे, भुसंपादन असल्यास ती प्रक्रिया राबविणे व संबंधितांना यथोचित मोबदला देणे ही कामे करता येतील,असेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त म्हणाले की, अनेक ठिकाणी जेथे प्रार्थना स्थळांची बांधकामे होती तेथे संबंधितांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सहकार्य केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी शासनाचे सर्व विभाग एकत्रितपणे राबवित आहेत. शहराचा विकास व्हावा, या उद्देशानेच ही मोहिम राबविली जात आहे.

आमदार केणेकर यांनी सांगितले की, सर्व विभागांचा समन्वय यामुळे ही मोहिम निर्विघ्नपणे राबविली जात आहे. या मोहिमेमुळे प्रामाणिक नागरिक सुखावला आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

आमदार जयस्वाल म्हणाले की, शहर विकासासाठी आम्ही सदैव सोबत आहोत. रस्ते चांगले व्हावेत, हे शहर सुंदर व्हावे यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत.

आमदार श्रीमती चव्हाण म्हणाल्या की, ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे, मिळकत कार्ड आहे, अशांचे पुनर्वसन व्हावे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी त्या जागांचा तात्काळ विकास करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

०००

‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१२: यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याही ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच  इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व  राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्री. गायकवाड यांनी  प्रकल्पाविषयी माहिती दिली.

०००

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदींची भावनिक प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “मराठा साम्राज्याचा उल्लेख होताच सुशासन, सैन्यशक्ती, सांस्कृतिक गौरव आणि सामाजिक कल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर येतो. या महान शासकांनी अन्यायाविरुद्ध न झुकण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे.” त्यांनी 2014 मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले, “रायगडावरील ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली.” त्यांनी सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देऊन मराठा इतिहासाची माहिती घेण्याचे आवाहन केले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 किल्ल्यांचा समावेश

या यादीत मराठा साम्राज्याच्या 12 भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले—रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील एक किल्ला—जिंजी यांचा समावेश आहे. या किल्ल्यांना ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ या संकल्पनेअंतर्गत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ (Outstanding Universal Value) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मराठा स्थापत्यशास्त्रातील माची स्थापत्य, जे गडाच्या सुरक्षिततेसाठी आणि युद्धकौशल्यासाठी अद्वितीय आहे, याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हे स्थापत्य जगातील इतर कोणत्याही किल्ल्यांमध्ये आढळत नाही.

महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे योगदान

या यशामागे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) तसेच संस्कृती मंत्रालयाच्या सहभागाने हा टप्पा गाठता आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांचे आभार मानले आहेत. शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले, ज्यामुळे या यशाला गती मिळाली.

मराठा स्थापत्यशास्त्राचे अद्वितीय वैशिष्ट्य

मराठा किल्ल्यांचे माची स्थापत्य हे त्यांच्या रणनीतिक आणि अभेद्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे बांधकाम हे मराठा साम्राज्याच्या युद्धकौशल्याचा आणि मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या निर्मिती आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. युनेस्कोच्या मान्यतेमुळे या स्थापत्यशास्त्राला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक जतनाला चालना

या युनेस्को मान्यतेमुळे मराठा इतिहासाला जागतिक व्यासपीठावर नवा गौरव प्राप्त झाला आहे. यामुळे पर्यटन, इतिहास संशोधन आणि सांस्कृतिक जतनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

ताज्या बातम्या

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

0
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात...