सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 855

सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 जीडीपी जास्त आणि वित्तीय तूट मर्यादित

 केंद्र सरकारचे ७ हजार कोटीचे अनुदान राज्याला प्राप्त

मुंबई, दि. १ : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत.  यामध्ये सर्व स्तराचा विचार करण्यात आला असून हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचेसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्याचे सकल उत्पादन (जीडीपी) जास्त आहे. वित्तीय तूट तीन टक्के असावी असे मानक आहे. या मर्यादेत आपले राज्य नेहमीच राहिले आहे. वित्तीय तूट तीन टक्के पेक्षा मर्यादेत असल्याने राज्याला पन्नास वर्षासाठी  यावर्षी ७ हजार कोटी बिनव्याजी कर्ज दिलेले आहे,चालू वर्षात महसुली तूट दहा हजार कोटींनी कमी होईल असा  विश्वास  श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, पायाभूत प्रकल्पांना चालना मिळून बेरोजगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी तरतूद, एनडीआरएफच्याना निकषापेक्षा जास्त मदत, एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय, नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी तरतूद, गरीबांना आनंदाचा शिधा, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ यामुळे पुरवणी मागण्याच्या तरतुदीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी  अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी, कृषी, सेवा, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्राकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाबरोबरच लोककल्याणकारी व सामाजिक योजनांना सरकार प्राधान्य देत आहे, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करीत आहोत. अयोध्यात महाराष्ट्र सदन उभारणे आणि संभाजी महाराजांचे स्मारकांसाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच मातंग, बारा बलुतेदार, घरेलू कामगार आणि अल्पसंख्याक या सर्वांच्या मागण्यानुसार स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याची जीएसटी वसुली अडीच लाख कोटी रुपयांची असून देशात प्रथम स्थानी असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले, धनगर समाज बांधवांसाठी 22 योजनांसाठी गेल्यावर्षी 142 कोटीची तरतूद, मदत पुनर्वसन विभागासाठी 12 हजार 274 कोटीची तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची तरतूद 22 हजार कोटी पेक्षा जास्त केली आहे. नगर विकास विभागात पायाभूत सुविधांसाठी 20 हजार 171 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागासाठी 4827 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 13 लक्ष 5 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी 1270 कोटी मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी आठ लक्ष शेतकऱ्यांना 678 कोटीचे वितरण करण्यात आले आहे.

श्री. केसरकर म्हणाले, मोदी आवास घरकुल योजनेसाठी पंधराशे कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. लेक लाडकी योजनेसाठी अनुदान वितरित करण्यात येईल. महिलांसाठी 17 शक्ती सदन सुरू असून एकूण 50 कार्यान्वित करण्यात येणार आहेत,  वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

पुणे रिंग रोडसाठी 60% भूसंपादन झाले असून जून 2024 पर्यंत संपूर्ण भूसंपादन करण्याचा शासनाचा मानस आहे. विरार बहुउद्देशीय वाहतूक मार्गाबद्दल 104 गावांची मोजणी झाली असून सहा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणंद रस्ते योजनेसाठी 800 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.   सौरऊर्जेसाठी प्राधान्य , मराठवाड्याच्या सिंचनासाठी  2800 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र व ज्योतिर्लिंग शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना विविध कामांसाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

००००

किरण वाघ/विसंअ

 

अभ्युदय नगर येथील म्हाडा वसाहतीचा समूह पुनर्विकास – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 1 : अभ्युदय नगर (काळाचौकी) येथील म्हाडा इमारतींचा म्हाडामार्फत विकासकाची नियुक्ती करुन समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळामार्फत मध्यम उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गटांसाठी सन 1950 ते 1960 च्या दरम्यान 56 वसाहतींची निर्मिती केली होती. या वसाहतीमध्ये अंदाजे 5000 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. 50 ते 60 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतींमधील काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास होणे व रहिवाश्यांचे राहणीमान उंचविणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येतो. म्हाडा वसाहतीतील मुख्य रस्त्यालगत व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतीचा पुनर्विकास जलद गतीने होत आहे. परंतु आतील बाजूस व मोक्याच्या ठिकाणी नसलेल्या इमारतींचा पुनर्विकासही जलद गतीने होणे गरजेचे आहे. म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करताना उत्तम दर्जाच्या इमारती व सोयी सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने संपूर्ण वसाहितीचा एकत्रित पुनर्विकास होणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता, अभ्युदय नगर (काळाचौकी) येथील म्हाडा वसाहतीतील इमारतींचा म्हाडामार्फत विकासकाची नियुक्ती करुन समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या वसाहतीचे एकूण क्षेत्रफळ 4000 चौ.मी. पेक्षा अधिक असल्याने पुनर्विकास प्रकल्प 4 चटई क्षेत्रफळ निर्देशांक आणि 18 मी. रुंदीचा रस्ता या अटीच्या अधिन राहून मंजूर करण्यात येणार आहे. या वसाहतीला मंजूर करण्यात येणाऱ्या 4 च.क्षे.नि. पैकी 3 च.क्षे.नि. च्या वरचा उर्वरित 1 च.क्षे.नि. गृहसाठ्याच्या स्वरुपात मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त चटई क्षेत्रफळापोटी म्हाडास प्राप्त होणारा गृहसाठा किमान आधारभूत ग्राह्य धरून, म्हाडास अधिकाधिक गृहसाठा देणाऱ्या व निविदेच्या आर्थिक व भौतिक अटींची पूर्तता करणाऱ्या विकासकाची पुनर्विकासासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने निविदा पध्दतीने अंतिम केलेल्या विकासकामार्फत होणार असल्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या विकासकास वसाहतीतील एकूण सभासदांच्या 51 टक्के संमती पत्रे म्हाडास सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

या प्रकल्पांमधील मूळ गाळेधारकांचे, रहिवाशांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करणे किंवा तात्पुरत्या निवासासाठी पर्यायी जागेचे भाडे देणे (ट्रांझीट रेंट), कॉर्पस फंड इत्यादी जबाबदारी पुनर्विकास प्रकल्पासाठी नियुक्त विकासकाची राहील, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./

 

धनगर समाजासाठी असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार शक्तिप्रदत्त समिती – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.1 : धनगर समाजाप्रती शासन संवेदनशील असून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच धनगर समाजासाठी असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. सावे म्हणाले, धनगर समाजासाठी आदिवासी उप योजनांच्या धर्तीवर 13 योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, घरकुल, वसतिगृह, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना, एमपीएमसी, युपीएससी परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण यांचा समावेश आहे.धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशनाच्या अनुषंगाने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यासगटाने, मध्यप्रदेश, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड व उत्तरप्रदेश या राज्यांतील अनुसूचित जातीजमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने अवलंबिलेल्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन अहवाल सादर करावयाचा आहे. सद्य:स्थितीत या अभ्यासगटाने मध्यप्रदेश, बिहार, तेलंगणाया राज्यांचा अभ्यासदौरा केला असून उर्वरित राज्यातील अभ्यास करुन एकत्रित अहवाल सादर केल्यानंतर या अहवालातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नियमानुसार तपासून त्यानुषंगाने योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./

विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 1 : उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य शासनाने विकासाचा अटलसेतू पार केला असून समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरुन बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानसभेत नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. गेल्या दोन वर्षांत दावोसमध्ये पाच लाख कोटींच्या परदेशी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. गेल्यावर्षीच्या करारांपैकी 80 टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून सुमारे तीन ते साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पूरक उद्योगांमुळे आणखी काही लाख लोकांना रोजगार मिळेल. देशातला पहिला ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय. राज्याला एक ट्रीलियन डॉलर्स इकॉनॉमी बनविण्याचा निर्धार असून तो आम्ही नक्की पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना मदत

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे. निर्धारित वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. साडे सहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांच्या कर्जफेडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. राज्य शासन बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29 हजार 520 कोटी रुपये बँक खात्यावर जमा केले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेपासून प्रोत्साहन घेत राज्य सरकारनेही ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजना सुरू केली आहे. पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1720 कोटी रुपये जमा झाले होते. नुकतेच दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटीचे 3800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून एकूण 5520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. या दोन्ही योजनेअंतर्गत 35 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाले आहेत. अवेळी पाऊस, गारपीट अशा अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षांत 15 हजार 212 कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिली आहे.

राज्य शासनाने 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून सुमारे 99 हजार 103 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून सुमारे 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. वैनगंगा-नळगंगा सर्वेक्षण सुरु असून पैनगंगाचा डीपीआर तयार आहे. लवकरच ही कामे सुरु होतील. वशिष्ठीमधून समुद्रात वाहून जाणारे पाणी मध्यम बंधारे बांधून कोकणात वळविण्यात येत आहे. मराठवाडा वॉटरग्रीडलाही चालना देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत दोन कोटी 80 लाख एकर जमीन संरक्षित केली आहे. नुकसान झालेल्या 64 लाख 41 हजार शेतकऱ्यांना तीन हजार 49 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 55 लाख 21 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार 641 कोटी थेट जमा झाली आहेत. धानाला हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस देण्याचा जीआर निघाला आहे. दोन हेक्टरपर्यंत ही मर्यादा आहे. त्यामुळे प्रत्येकी 40 हजारांचा बोनस धान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार 190 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचे 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. लवकरच बँक खात्यात डीबीटीद्वारे ते पैसे जमा होतील. मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यांतील एकूण 77 हजार 207 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, संत्रा, लिंबू इत्यादी पिके बाधित झाली आहेत. त्याचे पंचनामे सुरू असून त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झाला. तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भूजलात घट झालेले 31 तालुके आहेत. हे सर्व लक्षात घेऊन आधीच उपाय योजना करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा कमी आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईकरांना तूर्तास कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण

राज्यातील महिला, भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नुकतेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. ‘लेक लाडकी’ योजनेमुळे 18 वर्षांपर्यंतच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये नुकतीच 20 टक्के वाढ केली आहे. त्यांना सुधारित मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले आहेत. यामुळे या अंगणवाडी सेविकांचे काम सुलभ आणि गतीने होईल. अंगणवाडी केंद्रांमधील 20 हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. बचत गटांच्या भाग भांडवलात, सीआरपींच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आशासेविकांना देखील न्याय दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदा आणि सुव्यवस्था बळकट

शासन कोणत्याही गुन्हेगारीचे समर्थन न करता आकसापोटी कुणावरही अन्याय केला जाणार नाही, तथापि कायदा मोडणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मुंबई, पुणे येथे ड्रग्जच्या विरोधातली मोहिम तीव्र केली आहे. कायदा सुव्यवस्थाही बळकट असल्याचे त्यांनी सांगितले.

पदांची भरती

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना 75 हजारांच्या तीनपट म्हणजे एक लाख 61 हजार 841 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 45 हजार 152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सहा हजार पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत, हे शासनाचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. अनुकंपा तत्त्वावर सुमारे तीन हजार 334 उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. राज्यभर आता नमो महारोजगार मेळावे सुरु आहेत, नागपूर, लातूर, अहमदनगर मेळाव्यात 20 हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले आहेत. पुढे अजून बारामती, ठाणे येथे महारोजगार मेळावे याच आठवड्यात होणार असून शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वा तीन कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र नंबर वन

गेल्या पावणेदोन वर्षांत आपला महाराष्ट्र सर्वंच क्षेत्रात नंबर वन आहे. एक लाख कोटीपेक्षा अधिक विदेशी थेट गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकवर आहे. आठ लाख कोटी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या कामातही महाराष्ट्र नंबर वन आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी आणि जीएसडीपी मध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. निर्यातीमध्ये, स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आपण उभारला तिथेही महाराष्ट्र नंबर वन आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही आपला महाराष्ट्र नंबर वनच आहे. स्वच्छतेत देखील महाराष्ट्र नंबर बनला आहे. मुंबईमध्ये दर आठवड्याला डीप क्लीन मोहिमेत तर सहभागी झालो. यामुळे रस्त्यावरची धूळ कमी झाली, उपनगरे, समुद्र किनारे, रस्ते स्वच्छ होत आहेत. मुंबईतले प्रदुषण कमी झाले आहे. ही मोहीम आता राज्यव्यापी होत आहे. राज्यभरात स्वच्छतेची स्पर्धा सुरू झाली आहे.

पायाभूत सुविधा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा तिसरा टप्पा आता सुरू करत आहोत. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग आता लवकरच खुला होत आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. मुंबई कोस्टल रोड, मेट्रो तीन, पुणे मेट्रो, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लवकरच लोकार्पण होणार आहे. नागपूर-गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग, कोकण कोस्टल रोड, कोकण एक्सप्रेस वे, महाराष्ट्रात सात हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे ग्रीड केले जात आहे. त्यामुळे चांदा ते बांदा जोडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकरांसाठी सुविधा

मुंबईकरांना मालमत्ता करात 736 कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. अनेक वर्षे रखडलेल्या एसटीपी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुंबईच्या महापालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन सुविधा सुरु करण्यात आली आहे. लंडन, न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 आणि कोस्टलची सुमारे 200 अशा एकूण 320 एकर जागेवर सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना शुद्ध हवा आणि मनोरंजनासाठी हक्कासाठी जागा मिळेल.

राज्यातील एसटी बस स्थानकांचा मेकओव्हर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान गिनिज बुकमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ तयार करत आहे. मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जात आहेत. धारावीकरांना स्वतःचे हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे. मुंबईतील जुन्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास सुरू केला आहे. म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, बीएमसी, महाप्रितच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गड-किल्ले, अध्यात्मिक स्थळांचं संवर्धन

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारले जात आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाल यांच्या स्मारकासाठी जागा दिली आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थानाचे भव्य स्मारक उभारले जात आहे. 12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड आणि कार्ल्याच्या एकविरादेवी येथे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदूमिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पूर्णत्वास आले असून केवळ पुतळ्याचे काम सुरु आहे. अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात वर्ग केला आहे. याबाबत पाठपुरावा सुरु आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर, बारवांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्णय झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी दिला आहे. बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळाची निर्मिती केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळालाही तत्वतः मान्यता दिली आहे. गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी, मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना, श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय असे असंख्य निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण..

मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका सुरुवातीपासून होती. 10 टक्के आरक्षण दिलेय आणि त्याची अंमलबजावणीसाठी करून 26 फेब्रुवारीपासून कायदाही लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता पोलिस आणि शिक्षक भरती सुरू आहे. तिथेही मराठा आरक्षणाचा लागू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या बारा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ५ मार्च २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ५ मार्च २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ६ मार्च २०२४ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ६ मार्च २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ६ मार्च २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी सप्टेंबर ०६ आणि मार्च ०६  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

 

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ५ मार्च २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ५ मार्च २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ६ मार्च २०२४ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ६ मार्च २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ६ मार्च २०३५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी सप्टेंबर ०६ आणि मार्च ०६  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

आंतरराष्ट्रीय युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत बांगलादेश युवा सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 1 : भारत व बांगलादेशातील नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य, मैत्रीपूर्ण संबंध तसेच सहकार्याची भावना वाढविण्याच्या दृष्टिने केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून भारतभेटीवर आलेल्या बांगलादेशातील 100 युवा प्रतिनिधींनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.  आंतरराष्ट्रीय युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

बांगलादेशच्या मुक्ती लढ्यापासून भारताचे बांगलादेशशी मैत्रीपूर्ण संबंध असून हे संबंध काळाच्या कसोटीवर टिकून आहेत. भारत व बांगलादेश दोघेही युवा राष्ट्र म्हणून उदयास आले असून अलिकडल्या काळात भारताप्रमाणे बांगलादेशने देखील उल्लेखनीय प्रगती केली आहे. बांगलादेश व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – आदानप्रदान, अध्यापक आदानप्रदान व सांस्कृतिक सहकार्य वाढल्यास त्याचा उभय देशांना फायदाच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी उपस्थित बांगलादेशचे युवा प्रतिनिधी संदीप कुमार घोष व रिफत आरा रिफा यांनी भारत भेटीमुळे आपली भारताविषयी समज अधिक व्यापक झाली असल्याचे सांगितले. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन, आग्रा येथील ताज महाल, मुंबईतील टाटा कर्करोग हॉस्पिटल, गेटवे ऑफ इंडिया, चित्रनगरी, वास्तू संग्रहालय आदी पाहून आनंद झाल्याचे त्यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले.

ढाका येथील भारतीय उच्चायोगातील राजनितीक अधिकारी राजीव जैन, युवा मंत्रालयातील अधिकारी आगम मित्तल, नौशाद आलम व सागर मंडल, बांगलादेश युवा शिष्टमंडळाचे नेते संदीप कुमार घोष व  रिफत आरा रिफा तसेच प्रतिनिधिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

००००

100 – member Bangladesh Youth Delegation meets Maharashtra Governor

Mumbai 1 : A 100- member Youth Delegation of Bangladesh visiting India under the International Youth Exchange Programme met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Fri (1 Mar).  The visit of the Bangladesh Youth Delegation was organised by the Ministry of Youth Affairs and Sports, Government of India with a view to promote friendship, understanding and goodwill among the people of the two countries.

Rajiv Jain, Political Representative of the Indian High Commission in Bangladesh, Agam Mittal, Naushad Alam, Sabir Mondal from the Ministry of Youth Affairs, representatives of Bangladesh Delegation Sandeep Kumar Ghosh and Rifat Ara Rifa were present.

0000

 

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. १ : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

‘हा निर्णय लाखो कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनंही हितकारक ठरेल,असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की, दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करुन सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी, कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शवली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील बाजारामधील चढ-उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबतीत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल.’

मुख्यमंत्री म्हणाले की, वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळं निवृत्तीवेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो. म्हणूनच आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदनशील राहिलो आहोत. निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व मान्य केलंय. याविषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद-संपर्कात होतो. ज्या-ज्यावेळी या संघटनांनी या विषयावर चर्चेची, बोलण्याची मागणी केली. त्या-त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला. समितीच्या अहवालावरही बैठका घेण्यात आल्या. मंत्रिमंडळातील सहकारी, कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी, तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. यात उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान वित्तमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील ८० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच २००५ मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या, पण भरती प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जूनी निवृत्तवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीबाबत…

शासनाने दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०१५ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या १३ लाख ४५ हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी ८ लाख २७ हजार इतके आहेत. त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर ५२ हजार ६८९ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा ७ हजार ६८६ कोटी रुपये इतका आहे. याशिवाय एकूण वेतनावरील खर्च १ लाख २७ हजार ५४४ कोटी इतका आहे.

तुलनात्मक अभ्यास समितीविषयी…

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती १४ मार्च २०२३ रोजी स्थापन केली गेली होती. दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारसी- अहवाल सादर करणार होती. या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांचा समावेश होता. या समितीनं अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून, अहवाल सादर केला आहे.

००००

संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोलापूर, दि. 1(जिमाका) :- राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो. तरी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

वडवळ ता. मोहोळ येथे आयोजित मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे, मोहोळ तहसिलदार सचिन मुळीक, शेतकरी, ग्रामस्थ, युवा मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ज्या नागरिकांना मतदार कार्ड नाही त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी. जे अन्य इतर दाखले भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकाकडे उपलब्ध होत नसतील तर त्यांना स्वयंघोषणा पत्राच्या आधारे मतदार कार्ड उपलब्ध करून अशा वंचित घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने  247 (अ.जा) मोहोळ विधानसभा मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र देण्यात आले आहेत, हे खूप कौतुकास्पद काम झाले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगून मतदार कार्ड उपलब्ध झालेल्या प्रत्येक नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त जाती जमाती मधील नवीन 131 मतदारांना ओळखपत्र,  61 जणांना रेशनिंगकार्ड व 612 जणांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी श्री. देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विविध दाखले वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व 131 नवीन मतदारांना मतदार कार्ड उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. या सर्व मतदारांना मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येणार असल्याचेही सांगितले.

वडवळ येथील शालेय विद्यार्थ्यानीनी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने काढलेल्या रांगोळीची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी करून शालेय विद्यार्थिनीनीच्या मतदार प्रबोधनासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

000

ठाणे येथील ‘नमो महारोजगार’ मेळाव्यासंदर्भात आयुक्त निधी चौधरी यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ठाणे येथील ‘राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य नाविन्यता कौशल्य सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत ४ व ५ मार्च रोजी प्रसारित होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागांतर्गत सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी राज्य शासनामार्फत विभागस्तरीय, राज्यस्तरीय ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच अंतर्गत ठाणे जिल्ह्यात  ६ आणि ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन, होणाऱ्या विविध रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन, शासकीय आणि खासगी संस्थाचा सहभाग, नोकरी युवक, युवतींच्या मुलाखती, महा एक्स्पोबाबत सविस्तर माहिती आयुक्त चौधरी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्रीमती चौधरी यांची मुलाखत सोमवार दि. ४ आणि मंगळवार दि. ५ मार्च २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यु ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

 

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...