मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 832

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे व दि. २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.

०००

पीएलराठोड/ससं/

 

प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी जाहीर

जळगाव दि. २६ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा

उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांच्याकडील ना हरकत दाखला, भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खासगी संस्था यांच्या मालकीची जागा/ मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमतीपत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्टर्स झेंडे,कापडी बॅनर

सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावतीआवश्यक आहे.

खासगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे

खासगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खासगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी,व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

प्रचार वाहन परवानगी

प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.

उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय

उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी

संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ध्वनीक्षेपकाची परवानगी

प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते.त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

शाळेच्या मैदानावरील सभा

संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी  उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती

उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर ( शेवटचे 48 तास ) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.

फ्लेक्स,बोर्ड,झेंडे,होर्डिंग्स,बॅनर व पोस्टर

संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे,पोस्टर,बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोडशो

उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.

000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

नागपूर, दि.23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरिता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे.  यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

मतदान केंद्रावर मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आणि सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मतदारासंघातील क्षेत्रीय अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासाठी मतदान घेण्याबाबतचे  प्रशिक्षण संपन्न..

सोलापूर, दि. २३ (जिमाका): जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील  निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांच्याकरिता निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतदानाचे संपूर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होणार आहे. या निवडणूकमध्ये एम-३, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्हीव्हीपॅट मशीनचा वापर आहे. यासाठी विहित नियम व मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेसंबधी प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक वाचा तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख यांनी पीपीटीद्वारे मतदान केंद्राची तयारी, मॉक पोल घेणे, प्रत्यक्ष मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तयार करणे, सर्व मशीन्स सीलबंद करणे, मतदान प्रक्रियेसंबधी विविध प्रपत्रे भरणे, मतदान यंत्रे, मतदान साहित्य व सीलबंद पाकिटे जमा करणे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मतदान पथकाची जबाबदारी, मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे, मतदानापूर्वी मतदान दरम्यान आणि मतदान संपल्यावर येणाऱ्या विविध व वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्राध्य्क्षासाठी काय करावे आणि काय करू नये, हॅंडबुक २०२३, चेकलिस्ट २०२३, आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट २०२३ मध्ये देण्यात आलेल्या माहितीपुस्तीकेचे वाचन करावे. दिव्यांग मतदारासाठी मतदान केंद्रावर तयार करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करावी. मतदान केंद्रावर व त्याच्या सभोवताली निवडणूक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

टपाली मतदानापासून  मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा मतदारसंघातील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी घेऊन या प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

टपाली मतदान पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व टपाली मतदान प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, त्यांना प्रशिक्षण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ,अतिरिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ,टपाली मतदान प्रक्रिया नोडल अधिकारी व सदरील सर्व प्रक्रियेत नियुक्त अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते .

टपाली मतदान प्रक्रिया कशी राबविण्यात यावी याबाबत नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सदरील टपाली मतदान प्रक्रिया ही जे शासकीय कर्मचारी आहेत व इतरत्र कार्यरत आहेत , जे 85 वर्षा पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, कोविड बाधित असणारे नागरिक , दिव्यांग व्यक्ती व मतदाना दिवशी अत्यवश्यक सेवेत असणार आहे , त्यांच्या करिता राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास पात्र मतदारांनी 12 D अर्ज भरून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्या पर्यंत पोचविण्यात यावे हे आवश्यक आहे .सदरील अर्ज हे BLO व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. मतदानाच्या 3 दिवस अगोदर सदरील सेवे करिता केंद्र टपाली मतदान प्रक्रिया करिता कार्यान्वित असणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदान करणाऱ्या मतदारांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या.

दिव्यांग मतदारांना ‘सक्षम’ची मदत

रायगड दि. 23 जिमाका-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत, अशा व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या ‘सक्षम’ अॅपवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हील चेअरची विनंती करता येत असून मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.रायगड मतदारसंघात एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार आहेत. यापैकी 2 हजार 933 महिला तर 5 हजार 133 पुरुष मतदार आहेत.

सक्षम अॅपवर अंधत्व, अल्प दृष्टी, बहिरेपणा, कमी श्रवणशक्ती, शारीरिक व्यंग, मानसिक आजार (मानसिक सामाजिक अपंगत्व), कुष्ठरोग, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, मस्कुलर डिस्ट्रोफी, अॅसिड हल्ल्यातील बळी, भाषण आणि भाषेतील अपंगत्व, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, स्पेक्ट्रम विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोगासह क्रॉनिक न्यूरोलॉजिकल विकार, हिमोफिलिया, थैलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमियासह रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. तेथे पिण्याचे पाणी, प्रतिक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड. असतील.

मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपीची व मदतनीसाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि.23 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत श्री. एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहुल तिडके,  अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर – 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदारांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकूण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

10 – नागपूर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकूण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.

11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकूण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.

12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकूण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

13-चंद्रपूर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकूण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.

निरीक्षकांची नियुक्ती

भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, एससीएस, भारतीय वनसेवा, राजपत्रित  अधिकारी  हे जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक,पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले जातात. सन 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील निरीक्षक अधिका-यांचे प्रशिक्षण भारत निवडणूक आयोगाकडून दि.11.03.2024 रोजी नवी दिल्ली येथे व आभासी प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून या निरीक्षक अधिकाऱ्यांची निवडणूक टप्प्यांनुसार लोकसभा मतदार संघामध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात 5 जनरल निरीक्षक, 6 खर्च निरीक्षक व 3 पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

   कायदा व सुव्यवस्था : 13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

      लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 निप:क्षपाती व शांततापूर्वक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्याअंतर्गत दि.22 मार्च रोजी  सकाळी 6 वाजेपर्यंत 308 परवाना नसलेली शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 77 हजार 148 शस्र परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्त्रांच्या अनुषंगाने ताब्यात घेणे, जप्त करणे किंवा मुभा देणे इ. कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित कार्यवाही सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी प्रमाणे 13 हजार 141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दि.16 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून, प्रथम टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची दि.19 व 20 मार्च 2024 या कालावधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय सरमिसळ करण्यात आलेली असून प्रथमस्तरीय सरमिसळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन्सची विभागणी करण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहितेबाबत :- भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च च्या प्रसिद्धीपत्रकान्वये लोकसभा  सार्वत्रिक निवडणूक- 2024  चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यानुसार  महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्तीची थोडक्यात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 साठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) कळविण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत अंमलात आणावयाची तत्वे सर्व संबधितांना निदर्शनास आणण्यात आलेल्या आहेत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथकाच्या प्रमुखांना दि.16 मार्च ते दि.6 जून या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करुन फौ.प्र.संहिता-1973 च्या कलम (129), (133), (143) व (144) खालील शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत राज्य शासनाच्या एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करणे वा आचारसंहितेमधून सूट देणे या करिताचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरिता छाननी समिती गठित करण्यात आलेली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सर्व पक्षांना व अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक संभाषणाच्या घसरत्या पातळीबद्दल व प्रक्षोभक भाषण टाळण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भातील महाराष्ट्र राज्याचा 24, 48 व 72 तासाचा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला  आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. मतदान केंद्रांवरील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांना कळविण्यात आले आहे.

माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष

राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्यूजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे.  जिल्हा स्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अधिनस्त माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

माध्यम  पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडिओ/ संदेश यांचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती व अपिलीय समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सुरु आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार मार्गदर्शिका तयार केली आहे. सदर मार्गदर्शिका राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण दोन कोटी 72 लाख 40 हजार मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी दोन कोटी 17 लाख 92 हजार, हिंदी 40 लाख 86 हजार) व इंग्रजी 13 लाख 62 हजार मतदार मार्गदर्शिका छपाई करुन त्याचे वाटप करण्याबाबत संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सदर मार्गदर्शिकेची छपाई करुन जिल्ह्यांना वाटप करण्याची कार्यवाही संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस व मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यासाठी संबंधित विभागास कळविण्यात आलेले असून कामगारांसाठी  मतदाना दिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय दि. 22 मार्च रोजी उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे. गृह विभागाकडून कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतची व सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

        85 वर्षावरील  वरिष्ठ नागरिक, दिव्यांग  मतदारांना गृह मतदानाची सुविधा

85 वर्षावरील  वरिष्ठ नागरिक तसेच 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व  असलेले मतदार यांना त्यांची इच्छा असल्यास गृह मतदान सुविधा राज्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूकांमध्ये प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तथापि, त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. मात्र गृह मतदानाच्या सुविधेसाठी अर्ज केल्यास त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.

नवी दिल्ली येथे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते ‘लोकसभा पूर्वपीठिका -२०२४’ चे प्रकाशन

नवी दिल्ली, दि. 23: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले.

निवासी आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यावेळी उपस्थित होते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करताना निवासी आयुक्त रुपिंदरसिंग म्हणाले की, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल त्यांनी महासंचालनालयाचे कौतुक केले.

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि दिल्लीस्थित महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना लोकसभा मतदारसंघांविषयी साद्यंत माहिती देणारी पूर्वपीठिका प्रकाशित करण्यात येते. यावर्षीही 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वपीठिका प्रका‍शित करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल.

लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेत वर्ष 1977 पासून 2019 पर्यंत राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल, मतदारसंघनिहाय विजेते आणि उपविजेते ठरलेल्या उमेदवारांच्या मतांची माहिती व टक्केवारी देण्यात आली आहे. तसेच 1977 पासून राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे मतदारसंघनिहाय नावेही देण्यात आली आहेत. याखेरीज मुख्य राज्य निवडणूक अधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस निरीक्षक व सर्व जिल्हा माहिती अधिकारी यांचे दूरध्वनी व फॅक्स क्रमांकांची माहिती देण्यात आली आहे. पूर्वपीठिकेतील या एकत्र माहितीचा प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना महाराष्ट्रात पाच टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांचे वार्तांकन करताना मोलाची मदत होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या संकेतस्थळाच्या स्कॅनकोडचा समावेश करण्यात आला आहे, ज्याद्वारे स्कॅनकोडचा उपयोग करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे प्रकाशित करण्यात येणारी अद्ययावत माहिती पाहता येणे सहज शक्य होणार आहे.

यासोबतच निवडणूक आयोगाकडून निर्गमित महत्त्वाच्या एप्स, पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक  कार्यक्रम, लोकसभा मतदारसंघातर्गत विधानसभा मतदार संघ, मतदार व मतदान केंद्रांबाबत माहिती, देशभरात होणाऱ्या  निवडणुकीचा सात टप्प्यांचा नकाशा, राज्यात होणाऱ्या  निवडणुकीचा पाच टप्प्यांचा नकाशा, वर्ष 2024 मधील मतदारांची एकूण लोकसंख्येची माहिती देण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता, वृत्तपत्रांसाठी पेड न्युज, सोशल मीडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आणि निवडणूक आयोगाने खास निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘चुनाव का पर्व’ या चिन्हांचा समावेश आहे.

ही पूर्वपीठिका पाहण्यासाठी खालील संकेतस्थळास भेट द्या.

https://heyzine.com/flip-book/7c314f0651.html

पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याशी संबंधित विषयांच्या नियमांचा अभ्यास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज ‘वाचन लेखन दिवस’ अंमलात आणण्याचे निर्देश दिले होते. त्यास प्रतिसाद देत आज जिल्हा प्रशासनाने ‘एक दिवस अभ्यासाचा’ हा अनुभव घेतला. ‘पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकीसाठी कर्मचारी-अधिकारीप्रशिक्षित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. जिल्ह्याभरात तब्बल १००० हून अधिक अधिकारी-कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले.

निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक नोडल अधिकारी, त्यांचे अधिनस्त कर्मचारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना सोपविण्यात आलेले कामकाज बिनचूक व वेळेत व्हावे यासाठी  कामकाजाच्या विषयाच्या नियमांचा अभ्यास करावा, आणि आपापल्या विषयात पारंगत व्हावे, ही भूमिका घेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आज वाचन लेखन दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा मुख्यालयापासून ते तालुकापातळीवर प्रत्येक ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वाचन लेखन व्यवस्था करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज जिल्हा मुख्यालयात तसेच १०६ फुलंब्री मतदार संघासाठी गरवारे फिल्म्स लिमिटेड चिकलठाणा, १०७ औरंगाबाद मध्य साठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा, १०८ औरंगाबाद पश्चिम साठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा रेल्वेस्टेशन रोड, १०९ औरंगाबाद पूर्व साठी सेंट फ्रांसिस हायस्कूल जालना रोड येथे स्थापित केलेल्या वाचन लेखन अभ्यास कक्षास भेट दिली. पाहणी केली.  तेथे जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी थोडावेळ संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत काम करताना आपल्याला नेमके काय काम करावयाचे आहे त्या नियमांची, कार्यपद्धतीची इत्तंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपापल्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने कामकाजाच्या प्रत्येक बाबीचा बारकाईने व सखोल विचार करुन नियम व कार्य पद्धती मुद्देनिहाय लेखी स्वरुपात दिली आहे. त्यामुळे जर आपण या पद्धतीचे लक्षपूर्वक वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष काम करतांना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळेच आजचा हा वाचन लेखन दिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले,असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा मतदारसंघनिहाय या अभ्यासासाठी प्रत्येक ठिकाणी नियमांच्या पुस्तिका, वाचन लेखन सामुग्री उपलब्धता करण्यात आली होती. आज दिवसभर सकाळी १० वा. पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. शांत वातावरणात प्रत्येकाने आपापले विषय वाचून अभ्यासले. आवश्यक टिपणे काढली. सर्वच ठिकाणी अल्पोपहार, चहा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवून निवडणूक विषयक नियमांचा, कायद्यांच्या, करावयाच्या कार्यवाहीच्या पुस्तिकांचा अभ्यास केला.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा ‘द पिंक फोर्स’ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

मागच्या वेळीच्या लोकसभेच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून मतदार जनजागृती कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुका स्तरावर तालुका नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. जिल्हा कक्ष आणि चौदा तालुक्याचे टीम मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा काम करत असून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सायकल रॅली, विद्यार्थ्यांची रॅली, विविध स्पर्धा,  कॉलेज कॅम्पस ॲम्बेसिडरची नियुक्ती, सावली सभा, बस स्थानकावर जिंगल, जाऊ तिथे शपथ घेऊ, मतदानावर बोलू काही  यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात आयोजन केले करण्यात आले असून यावर्षी मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास श्री. कटियार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, मोर्शीचे तहसीलदार उज्वला ढोले, मोर्शीचे गटविकास अधिकारी देवयानी पोकळे, मोर्शीचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ.नितीन उंडे, मोर्शीचे गटशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

मुंबई,  दि.23: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून 33 कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्चसुद्धा अंतर्भूत आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली  आहे.

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही 30 डिसेंबर 2020 च्या तरतुदीनुसारच सुरु आहे. हे दूध दर ठरविताना डेअरी उत्पादक आणि महानंदा यांच्याकडून दर मागविण्यात आले. त्या दराची सरासरी ही 27.70 रुपये प्रति 200 मि.लि. टेट्रापॅक अशी आली. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे दर अधिक होते, तर 4 कंपन्यांनी न्यूनतम दर दिले. त्यांच्याशी वाटाघाटी करुन हा दर 26.25 रुपये असा ठरविण्यात आला. यात सर्व प्रकारच्या करांचा समावेश आहे, तसेच यात अतिदुर्गम भागातील 427 आश्रमशाळांपर्यंत पोहोचविण्याचा खर्चसुद्धा अंतर्भूत आहे. महानंदाने दिलेल्या दरांशी तुलना केली तर सरकारची 33 कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे आदिवासी विकास विभागाने म्हटले आहे.

2022 च्या निकषानुसार केंद्रीय पद्धतीने ई-निविदा : समाजकल्याण आयुक्त

ई-निविदा प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी 24 जून 2022 रोजी केंद्रीय पद्धतीने एकसमान निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तीच पद्धत अनुसरुन सर्वांत कमी दर देणाऱ्या पुरवठादारासोबत शासन स्तरावर वाटाघाटी करुन भोजन पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

2019 चे दर आणि 2023 चे दर यात अंतर असले तरी विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या आहारात झालेले बदल आणि या वस्तूंच्या दरात झालेले बदल लक्षात घेता, हे दर वाजवी आहेत. 443 शासकीय वसतीगृहे आणि 93 शासकीय निवासी शाळांतील 58,161 विद्यार्थ्यांना 2 वेळचे जेवण तसेच इतर सोयीसुविधा देण्यात येतात.

भोजनात गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, डाळ, भाजीपाला, कंदभाजी तर नाश्त्यासाठी उसळ, पोहे, उपमा, शिरा यापैकी एक. दूध, अंडी, कॉर्नफ्लेक्स, प्रत्येक दिवशी ऋतुमानाप्रमाणे फळ, मांसाहार करणाऱ्यांना आठवड्यातून दोनदा मांसाहार, शुद्ध तूप इत्यादी आहार देण्यात येतो, असेही सामाजिक न्याय विभागाने म्हटले आहे.

००००००

 

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...