मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 831

नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत; शिवाय दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही

ठाणे, दि.27 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च  2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

या पार्शवभूमीवर जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 06 जून 2024 पर्यंत) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, त्यानुसार निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिनगारे यांनी लागू केले आहेत.

00000

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepuppss.in आणि https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असेही परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. २७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले.

मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी ७ वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे, वैद्यकीय  अधिकारी वैभव पाटील, मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील माळी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, श्री. बोडस, अरूण लोंढे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सायकल पट्टू, क्रीडा प्रेमी, नागरिक, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीतील सहभागींचे अभिनंदन करून, ७ मे रोजी मतदान करणे व इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले.

विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक – राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सायकलपटू, पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली.

०००

 

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे

मुंबई, दि. २७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आयोजित लॉजिस्टिक उद्योगाच्या पाचव्या ‘लॉजिक्स इंडिया – २०२४’ या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे उद्घाटन मंगळवारी (दि. २६) हॉटेल वेस्ट-इन गोरेगाव मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाही, तर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.

राज्यात २७ सार्वजनिक विद्यापीठे असून लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची क्षमता विद्यापीठांकडे आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील निर्यात महासंघासोबत काम करावे, अशी सूचना आपण विद्यापीठांना करू असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

उद्घाटन सत्राला शिपिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक शाम जगन्नाथन, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष अश्वनी कुमार, शारजा येथील सैफ झोनचे वाणिज्य संचालक रईद बुखातिर, फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष परेश मेहता तसेच विविध देशांमधील लॉजिस्टिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रायगड, दि. २७ (जिमाका): रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले.

रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी.  आवश्यकतेनुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.

वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी.  ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी.आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री.जावळे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात बनवली जाणारी आदर्श मतदान केंद्र सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाची तारीख लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देताना सोबत एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.

 

०००

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दिनांक 26 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :  मतदार जनजागृती संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्यासह अधिकारी तसेच जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, केड्राई, उद्योग, आरोग्य संस्था व स्वीपचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या काळात ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी होती, त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. याबाबत सर्वच नोडल अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु यासाठी शासकीय यंत्रणांसह सर्वच स्तरातील नामांकित संस्था, युवक व नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यादृष्टीने मतदान जनजागृती करण्यासाठी पुरेसा कालावधी असून जनजागृतीच्या दृष्टीने वाव आहे. यासाठी सर्वांचेच प्रयत्नशील योगदान आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करावयाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, या निवडणुकीसाठी तरूण नवमतदार सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महाविद्यालयातील युवकांनाही मतदार जनजागृतीसाठी सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने तसेच महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी मुक्त संवाद साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील. याबाबत चर्चा केली. या साधकबाधक चर्चेतून आलेल्या सूचनांचे व उपक्रमांचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, जिल्ह्यात मतदान जनजागृती करण्यासाठी  वोट कर नाशिककर, मी ठरवेल माझा खासदार व हातभर तक्रारींना वोटभर उपाय असे उपक्रम त्याचप्रमाणे मतदारदूत या संकल्पनेतून, पथनाट्यातून जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. शाळा व महाविद्यालय स्तरावरही मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमधील सिनेकलाकार, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, खेळाडू यांचाही सहभाग मतदान जनजागृतीसाठी केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी यावेळी उपस्थित संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार मानले.

 

000

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

चंद्रपूर दि. २६ : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारी वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील, अशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला नोटिसीद्वारे एम.सी.एम.सी समिती खुलाशाची विचारणा करू शकते. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे, असे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो.

जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास मान्य नसल्यास जिल्हास्तरीय समितीला माहिती देवून राज्यस्तरीय समितीकडे 48 तासाच्या आत अपील करता येते. राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवितात. या निर्णयाविरूद्ध उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तसांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम असतो.

संशयित पेडन्यूजची उदाहरणे: प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने संशयित पेडन्यूजसंदर्भात काही उदाहरणे दिली आहेत. यात 1) साधारण एकाचवेळी निरनिराळ्या लेखकांच्या बायलाईन नमुद करून स्पर्धा असलेल्या प्रकाशनामध्ये छापून येणारे छायाचित्र व ठळक मथळे दिलेले समान लेख. 2) निवडणूक जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांची स्तुती करणारे लेख. 3) उमेदवाराला समाजाच्या प्रत्येक समुहाचा पाठिंबा मिळत आहे व तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेल, असे नमुद करणारे वृत्त. 4) उमेदवाराला वारंवार अनुकूल असणारे वृत्त प्रकाशित करणे. 5) प्रत्येक वाक्य पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने लिहून एखादा पक्ष / उमेदवार याच्याकडून केल्या गेलेल्या कार्याने दुसरा पक्ष / उमेदवार यांचे निवडणूकविषयक भवितव्य संपुष्टात येत असल्याचा दावा करणारे वृत्त.

समाज माध्यमांवरही लक्ष : उमेदवार अथवा नोंदणीकृत पक्षांनी आपल्या प्रचारासाठी कोणत्याही माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही. मात्र, हे करत असताना या माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकूराचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. या जाहिरात मजकूराच्या माध्यमातून कोणाचेही चारित्र्यहनन होऊ नये, समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये, नैतिकता, सभ्यता यांचा भंग होऊ नये, शत्रूत्व-तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेमध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे.

समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर कक्ष 24 बाय 7 कार्यान्वित असून सोशल मीडीयावरील तक्रारीकरीता 8888511911 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

०००

निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

 पुणे, दि. २६: महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महसूल उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले की, आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी निवडणूक आराखडा योग्यरितीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठीदेखील योग्य नियोजन करावे. पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देशही विभागी आयुक्तांनी दिले.

यावेळी पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते लोकसभा पूर्वपीठिका-२०२४ चे प्रकाशन

अमरावती, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली विदर्भातील (नागपूर-अमरावती विभाग) सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विभागीय आयुक्तांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले. नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, अमरावतीचे विभागीय माहिती उपसंचालक अनिल आलुरकर, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हा माहिती अधिकारी सर्वश्री हर्षवर्धन पवार, मंगेश वरकड, गजानन कोटुरवार, यासेरोद्दिन काझी, श्रीमती अर्पणा यावलकर, सहायक संचालक विजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल डॉ. पाण्डेय यांनी  माहिती विभागाचे कौतुक केले.

श्री. रामदासी यांनी पूर्वपिठिकेचे महत्त्व विषद करीत माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असे सांगितले. ही पुस्तिका नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूर्वपीठिकेची ठळक वैशिष्ट्ये :

पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघनिहाय मतदार व मतदान केंद्राबाबत माहिती, विदर्भात (नागपूर-अमरावती विभाग अंतर्भूत) झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वर्ष 2004 ते 2019चे निकाल तसेच मतदारांची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, इतर अधिकारी, तसेच विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ,माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती आदींसह  निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचार संहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, पेड न्यूज, सोशल मीडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आदींचा समावेश आहे.

०००

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ. सुमंत पांडे यांची मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात’ ‘पाण्याचे नियोजन आणि महत्त्व’ या विषयावर जल साक्षरता केंद्र, यशदा, पुणे, येथील माजी कार्यकारी संचालक तथा ‘चला जाणूया नदीला’ च्या राज्यस्तरीय समितीतील अशासकीय सदस्य, जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. आपण दैनंदिन कामांसाठी जे पाणी वापरतो त्यातील बहुतांश पाणी भूजलातून येते. आपल्याकडे स्थिर आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक संसाधने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगल्या आरोग्यासाठी गोड्या पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा वापर वाढत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता पडू नये, तसेच भूजल संवर्धनासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च रोजी ‘जागतिक जल दिन’ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य लक्षात घेता ‘पाण्याचे नियोजन आणि महत्त्व’ या विषयावर जल अभ्यासक डॉ. पांडे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. पांडे यांची मुलाखत बुधवार दि. 27, गुरुवार दि. 28,  शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...