रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 82

‘एक जिल्हा, एक उत्पादन- २०२४’ पुरस्कार; महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

नवी दिल्ली, दि.१५ : ‘एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत  महाराष्ट्राने चमकदार कामगिरी  केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.

भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री  पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांची नाविन्यपूर्णता, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले.

महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ हा उपक्रम केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे. या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांनीही सुवर्णपदक मिळवले आहे. राज्याच्यावतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे यश

महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे.  या अंतर्गत खालील जिल्ह्यांना आपल्या वैशिष्ट्पूर्ण कृषी उत्पादनांसाठी पुरस्कार पटवावले :

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक

जागतिक स्तरावर विशेष ओळख असलेला रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे.  हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नागपुरी संत्र्यांना रौप्यपदक

नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे.  रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक महामुनी यांनी स्वीकारला.

अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक

अमरावती जिल्ह्याने मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावती जिल्ह्याने हे यश संपादन केले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी हा पुरस्कार  स्वीकारला.

नाशिकच्या द्राक्षे आणि मनुक्यांना विशेष उल्लेख पुरस्कार

नाशिक जिल्ह्याने द्राक्षे आणि मनुक्यांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी ‘अ’ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे आणि या यशाने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.

गैर-कृषी क्षेत्रातील यश

अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ‘ब’ श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे.  कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.

०००

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

मुंबई, ‍‍दि. १५ : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थसहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या निवडीनुसार व्यवसाय करण्यास अर्थसहाय्य करण्यात येते.  जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता अनुदान उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० ऑगस्ट, २०२५ पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई, कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.२ सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार -सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 15 : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा समावेश असणार आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार असून, तिच्या शिफारसींमुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे राज्यस्तरावर योग्य निरीक्षण होण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती शहरी, ग्रामीण आणि शालेय स्तरावरील रुग्ण शोध मोहीम, उपचार, तसेच पुनर्वसन यासाठी कार्यपद्धती निश्चित करेल आणि राज्यभरातील कामकाजाचे मार्गदर्शन करेल.

बैठकीत राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी अनुदानवाढीची मागणी मांडली. सध्या राज्यात कुष्ठरोगावर उपचार करणाऱ्या 12 स्वयंसेवी रुग्णालयांमध्ये 2,764 खाटा आहेत, तर पुनर्वसन करणाऱ्या 11 संस्थांमध्ये 1,825 खाटा मंजूर आहेत. यातील रुग्णालय तत्त्वावरील संस्थांना प्रति खाटा प्रतिमाह रु. 2,200 तर पुनर्वसन संस्थांना रु. 2,000 इतके अनुदान मिळते. हे अनुदान वाढवून रु. 6,000 प्रति खाटा करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार करून वित्त विभागाकडे सादर केला असून, लवकरच तो राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक जोरदारपणे करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. “कुष्ठरोग शोध मोहीम, उपचार आणि निर्मूलन या त्रिसूत्रीवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करावे. आशा सेविका, शालेय आरोग्य तपासणी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा,” असेही ते म्हणाले.

या बैठकीस आमदार सुलभा खोडके, विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचे प्रतिनिधी, आरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड, कुष्ठरोग सहसंचालक डॉ.सांगळे, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000

संजय ओरके/वि.सं.अ/

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १५ : कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबाडी पाणीपुरवठा योजनेऐवजी शिवना टाकळी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजना जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कन्नड शहराच्या नागरिकांसाठी वाढत्या गरजेनुसार योग्य व शाश्वत पाणीस्रोतांचा विचार करून, दोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

OOOO

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे,  की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत आहे.  याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल “Model Y” आज भारतात लाँच करण्यात आले असून, या कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर ६०० किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून, तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000

मोहिनी राणे/ससं/

 

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंधासाठी देखील महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले असून ते 18 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. सांगली जिल्हा बार्टी, TRTI (आदिवासी विभाग), सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यावेळी अमली पदार्थ प्रतिबंध जनजागृतीही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी लागणारा आर्थिक खर्चाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. त्यासाठी शासन विद्यार्थ्यांच्यासोबत असून बार्टी, TRTI (आदिवासी विभाग), सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत मदत केली जाते. या संस्थामार्फत प्रतिवर्षी प्रतिसंस्था 750 विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते व पुणे, दिल्ली येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठीचा खर्च शासनाच्या या संस्थांमार्फत दिला जातो. या योजनांची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार या सर्व संस्थांना एकत्र आणून त्यांच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी जिल्ह्यातील 57 महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाविद्यालयात व परिसरात अमली पदार्थ सेवन, विक्री होत असल्याचे आढळल्यास याबाबतची माहिती प्राध्यापकांनी तात्काळ प्रशासनास द्यावी. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. अमली पदार्थ सेवन व विक्रीवर पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक महाविद्यालये आहेत. त्यामुळे त्यांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य वयामध्ये योग्य मार्गदर्शन मिळणे फार महत्वाचे आहे. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही आवश्यक आहेत. त्यासाठी शासनाच्या विविध संस्था विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. विद्यार्थ्यांनीही याचा लाभ घ्यावा. तसेच, अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे व इतरांनाही दूर राहण्याबाबत प्रवृत्त करावे. यासाठी शिक्षक, समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, प्रशासन आपल्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सारथीच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील, श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. बी. पी. लाडगांवकर कार्यक्रमस्थळी तर दूरदृश्यप्रणालीव्दारे आदिवासी संधोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) आयुक्त समीर कुर्तकोटी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे प्रभारी व्यवस्थापक संचालक शिवाजी पाटील, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आदि उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी या उपक्रमामुळे संस्थांच्या विविध योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यातून जिल्ह्यातील युवकांना चांगला लाभ होणार आहे, असे प्रतिपादन केले. सारथीच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासनाच्या विविध संस्थांच्या होत असलेले हे अभियान उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. बी. पी. लाडगांवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली पाटील व प्रा. डॉ. सी. जे. मगदूम यांनी केले. डॉ. व्ही.जे. सावंत यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली.

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्यावतीने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज राज्यपाल बागडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलाशचंद्र काला, सचिव ॲड. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी आदी मान्यवरांसह  प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यपाल बागडे म्हणाले की, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर होता. गुरुकुल परंपरेमुळे विद्यार्थी सर्व विषयात पारंगत होत असे. आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर अधिक भर द्यावा. तसेच  ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचविण्याबाबत दक्षता घ्यावी. याशिवाय खेळांवरही भर द्यावा. शाळांमध्ये मैदान हे अवश्य असावे. खेळांमधून मुलांची शारीरिक विकासासह बौध्दीक क्षमताही वाढते. आपला देशात जगात सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखला गेला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मनोगतही व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

०००

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावा. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी येवू नये, याची संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 16 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. अपर आयुक्त अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज कुमावत, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी विभागीय लोकशाही दिनात दाखल एकूण 16 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. सदर दाखल प्रकरणांवर पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करुन अंतीम अहवाल सादर करण्याच्या सूचना सिंघल यांनी संबंधित विभाग प्रमुखांना केल्या.

विभागीय लोकशाही दिनासाठी सामान्य प्रशासन विभागाव्दारे 3 स्वीकृत अर्ज, 10 अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रारी) तसेच 3 प्रकरणे वेळेवर दाखल झालीत. यात एक प्रकरण महिला लोकशाही दिन अंतर्गत समाविष्ट होते, असे एकूण 16 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली असून ही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना सिंघल यांनी यावेळी केल्या.

०००

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यपालांनी नॅचरल शुगर युनिट मधील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन तेथील विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. तसेच युनिटची पाहणी केली. तसेच युनिटच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.वानखडे, युनिटच्या अध्यक्षांसह उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, पोलिस अधिकारी श्री. थोरात, महागावचे तहसीलदार अभय मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम आदी उपस्थित होते.

नॅचरल शुगर युनिटच्या भेटीनंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुंज येथून नांदेडकडे प्रस्थान केले.

०००

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केंद्राची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत माहिती जाणून घेतली. मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

0
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

0
मुंबई, दि. १७: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र...

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...