सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 80

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकर मार्गी लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. १६ : गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात 50 एमबीए क्षमतेचे उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे संयंत्र मोठे असल्याने लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून 25 एमबीए क्षमतेचे रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र यामुळे काही प्रमाणात विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन 50 एमबीए क्षमतेचं रोहित्र बसवण्याचे काम सुरू असून ते 22 जुलैपर्यंत ते पूर्ण होईल.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून देवरी येथे 100 एमबीए क्षमतेचे नवीन ईएचव्ही सबस्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासोबतच  दुसरे एक ईएचव्ही सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून 30 जुलैपर्यंत वर्क ऑर्डर दिली जाईल. पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर आमगावमध्ये डिसेंबरपर्यंत एक नवीन कॅपेसिटर बँक उभारण्यात येणार आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल आणि वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या सुटेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला, बालकांचा शोध घेण्यात यश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल

मुंबई, दि. १६ : राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य चित्रा वाघ, प्रज्ञा सातव यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

राज्यात महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. जर लहान मुले बेपत्ता झाली, तर अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो.

नागपूर शहरात एकूण 5897 बेपत्ता प्रकरणांपैकी 5210 व्यक्तींचा शोध लागला असून हे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. हे प्रमाण 96-97% पर्यंतही पोहोचते. लहान मुलांसाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 4193 मुला-मुलींचा शोध लागला. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे. महिलांसाठी स्वतंत्र ‘ऑपरेशन शोध’ राबवण्यात आले. एका महिन्यात 4960 हरवलेल्या महिला आणि 1364 बालकांचा शोध लावण्यात आला. याशिवाय, 106 महिला व 703 बालके अशी सापडली की ज्यांची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, मात्र ते बेपत्ता होते, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सेलमध्ये महिला पोलीस अधिकारी प्रमुख असतील. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘एडीजे’ दर्जाच्या आयपीएस अधिकारी नेमण्यात आल्या आहे. काही महिला-मुली मानवी तस्करीच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच “भरोसा” हे वन स्टॉप केंद्र महिलांना समुपदेशन, संरक्षण व कायदेशीर मदत पुरवते. घरगुती हिंसाचार, कौटुंबिक वाद यामुळे घर सोडलेल्या महिलांना या केंद्राचा उपयोग होतो. शालेय स्तरावर ‘पोलीस काका-दीदी’ उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षण, चांगला/वाईट स्पर्श यावर जनजागृती केली जाते. आता यामध्ये ‘मिसिंग पर्सन’ बाबतची माहितीही समाविष्ट केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹८.३२ आहे, जो पुढील टप्प्यात ₹७.३८ रुपयांवर येणार आहे. तुलनेत, तमिळनाडूचा दर ₹९.०४, गुजरात ₹८.९८ आणि कर्नाटक ₹७.७५ रुपये इतका आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर कमी राहील. तसेच टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

सदस्य अभिजीत वंजारी यांनी राज्यातील वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारली. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपप्रश्न विचारले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्युत खरेदी आता ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे दीर्घकालीन (२५ वर्षांचे) करार असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. परंतु यावरील आक्षेपांमुळे आता सगळ्याच कॅटेगरीमध्ये दर कमी झाले आहेत. ७० टक्के ग्राहक १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे असून त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे. त्याचबरोबर, १०० युनिटच्या वर वापरावरही दरकपात होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजनांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून बूस्टर पंपासाठी नवीन योजना आणली आहे. सिंगल पोल योजनेचा खर्च फक्त ₹१५,००० रुपये आहे. शेतकऱ्यांना गरजेनुसार १० एचपी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे. याबाबतची काही तक्रार असल्यास सोलर युनिफाईड पोर्टलवर समाधान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात स्मार्ट मीटर आणि वीज वापरावर नियंत्रण असावे यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहे. यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अचूक वीज वापर मोजता येणार असून भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

लिफ्ट इरिगेशनसाठी स्वतंत्र सोलरायझेशन प्रपोजल तयार करण्यात आले आहे. डार्क झोन्समध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीने वीज देण्याचा विचारही केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

‘एमआयडीसी’ मधील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी भविष्यात बहुमजली पार्किंगचा विचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : राज्यातील सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रांमध्ये (एमआयडीसी) पार्किंगची समस्या दिसून येत असून यासाठी सध्या एमआयडीसीकडील मोकळ्या जागेचा वापर केला जाईल. भविष्यातील तरतूद म्हणून बहुमजली पार्किंग सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रांत पाटील यांनी तळोजा ‘एमआयडीसी’मध्ये पार्किंगची समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

तळोजा ‘एमआयडीसी’बाबत गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, तळोजा ही मोठी एमआयडीसी आहे. येथे येणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. सध्या येथे १४० पार्किंगची सुविधा उपलब्ध असून अधिकच्या पार्किंगसाठी ‘एमआयडीसी’ने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येथील एका कंपनीच्या वॉशिंग सेंटरसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पार्किंग सुविधेबाबत कळविण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

  • स्पष्ट, कायदेशीर स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. १६ : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात झालेल्या अनियमिततेची माहिती समोर आली असून ती धक्कादायक आहे. नियमबाह्य खरेदी प्रकरणांत दोषी असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळातील गंभीर गैरव्यवहारांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप असल्याने त्यांना निलंबित करण्यात येईल. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याला केवळ निलंबित करून करून भागणार नाही, तर स्पष्ट कायदेशीर नोटीस देत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर स्पीकिंग आर्डर देऊन बडतर्फ केले जावे. त्यावर परिवहन मंत्री यांनी स्पीकिंग ऑर्डरचे निर्देश देऊन त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जाईल, असे सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर जाऊ नये, यासाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. १६ : राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी विविध विभागांमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. विशेषतः गृह आणि आपत्ती निवारण विभागाला याची अधिक आवश्यकता भासते. तथापि, सीसीटीव्हीचे फुटेज कुणाला उपलब्ध करुन द्यावे, याबाबतची आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नये, याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केले जाईल. त्याचप्रमाणे शासकीय आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी

मुंबई, दि. १६ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा कालावधी ५ वर्ष करण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय व्हाट्स ॲपवर फिरत आहे. हा शासन निर्णय हा खोटा असून, जनतेच्या फसवणुकीचा प्रकार आहे. असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दि.०९.०७.२०२४ च्या शासननिर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वी सहा महिने तर सध्या हा कालावधी वाढवून ११ महिन्यांसाठी कार्यप्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतिमाह ६०००, आयटीआय अथवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह ८०००,पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह १०,००० इतके विद्यावेतन देण्यात येते हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असते, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ/

परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

Milind Kadam M4B

मुंबई दि. १६: बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कार्पोरेट कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा, अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात ते बोलत होते.

Milind Kadam M4B

मंत्री लोढा  म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. जनता दरबाराच्या माध्यमाने जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान होईपर्यंत कार्यरत राहून लोकशाही अधिक बळकट करू, असेही त्यांनी म्हटले आहे. एफ विभाग कार्यालयातल्या जनता दरबारात प्रशासनाच्या विविध बारा विभागांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. हे या जनता दरबाराचे वैशिष्ट्य ठरले. समस्या घेऊन आलेल्यांना  एकाच छताखाली अधिकारीही उपलब्ध होत असल्याने आमचे हेलपाटे वाचले, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. अनधिकृत पार्किंग केलेली बेवारस वाहने, वाहतूक नियंत्रणाचे प्रश्न, पाण्याचा दाब, शिधा वाटपातील समस्या यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडले. या जनता दरबारात तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यातील २०० हून अधिक नागरिकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे समाधान केले. त्याचबरोबर उर्वरित नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष न करता  समस्यांचे निराकरण करावे असे आदेश मंत्री मंत्री लोढा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

जनता दरबारात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, महापालिका एफ दक्षिण विभागातील सहायक आयुक्त महेश पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

डॉ. दीपक टिळक विचारवंत, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असणारे डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. ‘केसरी’चे विश्वस्त संपादक तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत ‘केसरी’ सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व लोकशिक्षणाचा ध्यास जनसामान्यांसमोर मांडला. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक बहुआयामी व्यक्तिमत्व गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १६ : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली.

यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावातील शेतकऱ्यांना जमीन वाटप प्रकरणासंदर्भात राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने आयोजित सागरी शिखर परिषद २०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, परिवहन व बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ आदी उपस्थित होते.

‘भारत मेरीटाम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाम व्हिजन २०४७’ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग

केंद्र सरकारच्या मेरीटाईम व्हिजनचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारने ‘इंडिया मेरीटाईम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाईम व्हिजन २०४७’ तयार केले आहेत. या दोन्ही व्हिजनचा अभ्यास करून, महाराष्ट्रासाठी एक मजबूत मेरीटाईम व्हिजन तयार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. या धोरणासाठी आजच्या चर्चासत्रातील सर्व शिफारशी संकलित करून आम्ही त्या अमलात आणू.

मुंबई ही आपली आर्थिक, व्यावसायिक,  मनोरंजन आणि आर्थिक राजधानी आहे. मुंबईला भारताचे आर्थिक इंजिन बनवणारे मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट ही बंदरे आहेत. ही दोन बंदरे मुंबईला आघाडीवर घेऊन आली. आता आपण जागतिक सप्लाय चेनमध्ये शक्ती बनण्याचा संकल्प करत आहोत, त्यामुळे बंदरांची क्षमता, कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यावर वाढवण बंदरासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न हाती घेण्यात आले. प्रारंभी प्रकल्प १००% महा पोर्टकडे होता, परंतु, त्याचा व्याप पाहता केंद्र सरकारला प्रमुख भागीदार करण्यात आले. वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि महाराष्ट्र हे नेतृत्व करण्यास तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑफशोअर विमानतळ आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी

भारताचे पहिले ‘ऑफशोअर विमानतळ’ वाढवण बंदराशेजारी उभारले जात आहे. यामुळे जलमार्ग, रेल्वे, रस्ता आणि हवाई मार्गांची मल्टिमोडल जोडणी मिळेल. यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात जलवाहतूक, शिपबिल्डिंग आणि शिप रीसायकलिंगसाठी मोठी संधी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

वाढवण बंदराला जोडणारे रेल्वे जाळे तयार करण्याचाही प्रयत्न करत करण्यात येत आहे. सागरमाला प्रकल्पामुळे ही कनेक्टिव्हिटी खूपच सोपी झाली आहे. वाढवण पोर्टवर मल्टी-मोडल कार्गो हाताळणी क्षमता निर्माण होईल. नॉन-मेजर पोर्ट्सही अधिक कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण त्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. भविष्यात आपण केवळ कार्गो हाताळणीपुरते मर्यादित राहणार नाही, तर शिपबिल्डिंग, शिप रीसायकलिंग, वॉटर ट्रान्सपोर्टच्या दिशेने जाऊ शकतो. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-नवी मुंबई भागात जलवाहतुकीची खूप मोठी संधी आहे. यामुळे नागरिकांचे जीवनमान खूप सुकर होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गमुळे जलद मालवाहतूक आणि २४ जिल्ह्यांचा थेट लाभ

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे १५-१६ जिल्ह्यांना जेएनपीटी बंदराशी जलद जोडणी मिळाली असून, जिथे माल पोहोचण्यासाठी ६-७ दिवस लागत होते, तिथे आता तो प्रवास १० तासांपेक्षा कमी वेळेत होतो. वाढवण बंदरालाही ‘ऍक्सेस कंट्रोल्ड’ रस्त्यांद्वारे समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येत आहे, ज्यामुळे २४ जिल्ह्यांना थेट बंदर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

कोकणातील पारंपरिक बंदरांचा इतिहास सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकणातील काही बंदरे ५००-६०० वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध होती. त्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा उजाळा देत आहोत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती बंदरांमुळे आर्थिक इंजिन झाली आहे.

महाराष्ट्राला मेरीटाईम क्षेत्रात आघाडीवर नेणारे पाऊल – बंदरे विकास मंत्री नितेश राणे

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, मेरिटाईम समिट हे शिखर संमेलन केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राला देशाच्या मेरीटाईम क्षेत्रात आघाडीच्या स्थानी नेण्यासाठी घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, भारत जागतिक मेरीटाईम हब होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टी आणि मेरीटाईम क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी दिशा मिळाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचा वापर करत बंदराधिष्ठित विकास, सागरी उत्पादन आणि किनारपट्टी वाहतुकीस चालना दिली आहे. महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन आहे. अरबी समुद्र ही केवळ आपली भौगोलिक सीमा नाही, तर ती एक संधीने भरलेली अमर्याद शक्ती आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

आपला दृष्टिकोन केवळ क्षमतेच्या वाढीपुरता मर्यादित नाही, तर तो शाश्वततेवर आधारित आहे. ग्रीन लॉजिस्टिक्स, मल्टीमोडल इंटिग्रेशन, आणि किनारी समुदायांचे सबलीकरण हे सागरी धोरणाचे मुख्य भाग आहेत. आज महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प म्हणजे वाढवण बंदर. हे कार्यान्वित झाल्यावर, जगातील सर्वोच्च १० खोल समुद्र बंदरांपैकी एक ठरेल. येथे उच्च दर्जाचे कंटेनर हाताळणी, खोल पाण्याची उपलब्धता आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स सुविधा असेल. हे बंदर महाराष्ट्रासाठीच नाही, तर भारताच्या जागतिक व्यापारातल्या भूमिकेसाठीही गेमचेंजर ठरेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

नेदरलँड्स दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय संधी खुल्या झाल्या आहेत. या दौऱ्यात अनेक संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. तसेच राज्यातील सहा ‘आयटीआय’चे आधुनिककरण होणार असून त्याद्वारे दरवर्षी ७,००० युवकांना आधुनिक सागरी कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र सरकारने ‘शिपबिल्डिंग, शिप रिपेअर व शिप रीसायकलिंग पॉलिसी २०२५’ जाहीर केली. या धोरणांतर्गत प्रकल्पांना भांडवली अनुदान, कौशल्य विकासासाठी वित्तीय प्रोत्साहन, जलद परवानगी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र भारताच्या मेरीटाईम परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी तयार असून आपल्याकडे धोरण, जमीन, पायाभूत सुविधा आणि नेतृत्व आहे. आता भागीदार हवे असून यासाठी हे समिट महत्वाचे असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

सेठी यांनी प्रास्ताविकात राज्यातील बंदर विकासात करण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा, कनेटीव्हीटी याबद्दल माहिती दिली.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी !

अहिल्यानगर, दि. १६ – जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे. गेल्या पाच महिन्यांत या निधीच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात. कक्षाचे काम डॉ. निळकंठ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य स्वप्निल कच्छवे व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून नागरिकांनी थेट येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.

सन २०२५ या वर्षात मागील सहा महिन्यात रुग्णांना देण्यात आलेली मदत

जानेवारी – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये,

फेब्रुवारी – २८ अर्जांना २२ लाख ७५ हजार रुपये,

मार्च – ४३ अर्जांना ३२ लाख २५ हजार रुपये,

एप्रिल – २९ अर्जांना २४ लाख ७० हजार रुपये,

मे – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये,

जून – ३२० अर्जांना २ कोटी ७३ लाख ६३ हजार रुपये,

१३ जुलैपर्यंत – १०३ अर्जांना ८७ लाख ३० हजार रुपये,

१ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात जवळपास चारपट वाढ झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास व कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया :

अर्जदारांनी निधीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्चित (जीओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे), आधारकार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे बंधनकारक आहेत.

अर्जदारांनी ही कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, २ रा मजला, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत किंवा ई-मेलद्वारे (aao.cmrf-mh@gov.in) पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासता येते.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जीव वाचविणाऱ्या या वैद्यकीय मदत उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे करण्यात आले आहे.

००००

श्री गुंडी यात्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती 

मुंबई, दि. १६ : राजभवनातील प्राचीन श्री गुंडी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. १५) देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले व भाविकांसमवेत आरती केली.

यावेळी राज्यपालांनी मंदिर परिसरातील दुर्गा माता, महालक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तींचे देखील दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्री गुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

00000

लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्र्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 16:- ‘केसरी’चे विश्र्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

000

लोकाभिमुख सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला

मुंबई, दि. १६:- ‘लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,’ अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू, दैनिक केसरीचे विश्र्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक जयंत टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, लोकमान्य टिळक आणि त्यांचे नातू दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. डॉ. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...