गुरूवार, जुलै 24, 2025
Home Blog Page 783

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४; बीड जिल्हा प्रशासन तयार

बीड, दि. १२ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपूर्ण तयार झाली आहे.

बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सर्व विधानसभा मतदार संघतील  एकुण 2355 मतदान केंद्रावरील मतदान अध्यक्ष व त्यांची टीम त्यांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली.  2355 केंद्रांवर 10,432 अधिकारी कर्मचारी आपले मतदानाचे काम उद्या पार पाडतील . यामध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र , 55 महिला मतदान केंद्र, 22 युवा मतदान केंद्र चालक आहेत. याशिवाय 1 पोलिस तथा 1 होमगार्ड  कर्मचारी असणार आहे. बीड विधानसभा मतदार संघात असणाऱ्या मतदान केद्रांच्या केंद्रांध्यक्षांना व चमुला जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या  नेतृत्वात प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच निवडणुकीच्या काळात नेमलेले नोडल अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ आहे. यामध्ये 6 सहाय्यक निवडणुक अधिकारी असून 228 गेवराई या विधानसभा मतदार संघाचे ओंकार देशमुख, 229 माजलगाव चे गौरव इंगोले, 230 बीडच्या कविता जाधव, 231 आष्टीचे प्रमोद कुदळे, 232 केजचे दिपक वजाळे, 233 परळीचे अरविंद लाटकर हे आहेत. जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन यांना करावे लागत असुन निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान व मतमोजणी होईपर्यंत सतर्क राहणार आहेत.

मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त

लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्याय दृष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या निर्देशाप्रमाणे मतदानाकरिता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अपर पोलीस अधीक्षक-02, उपविभागीय पोलीस अधिकारी- 07, पोलीस निरीक्षक -18, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक-220, पोलीस अंमलदार 3373, होमगार्ड -2194, पॅरामिलीटरी फोर्स / केंद्रिय सशस्त्र बल -07 कंपनी, दंगल नियंत्रन पथक 06, जलद प्रतिसाद पथक-02, पोलीस वाहने -273 असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बीड जिल्हयात ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट नेमण्यात आलेले आहेत. सर्व बंदोबस्तावर पोलीस अधीक्षक बीड हे करडी नजर ठेऊन आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही समाजकंटकांनी मतदान प्रक्रियेमध्ये बाधा आणल्यास कायद्यान्वये कार्यवाही केली जाणार आहे. सदर लोकसभा निवडणुक संदर्भाने सोशल मीडियावर सायबर सेल बीड बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

मतदानासाठी प्रशासनाकडुन संपुर्ण चोख तयारी करण्यात आली असून आता मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडुन लोकशाहीने दिलेला हक्क बजावावा.

०००

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया….

मुंबई, दि. १२: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २६ -मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांत १५२- बांरीवली, १५३ – दहिसर, १५४ – मागाठणे, १६० – कांदिवली, १६१ – चारकोप, १६२ – मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १५८- जोगेश्वरी पूर्व, १५९ – दिंडोशी, १६३ – गोरेगांव, १६४ – वर्सोवा, १६५ -अंधेरी पश्चिम, १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात १५५- मुलुंड, १५६ – विक्रोळी. १५७ -भांडुप पश्चिम, १६९ – घाटकोपर पश्चिम, १७० – घाटकोपर पूर्व, १७१ मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात.  २९ – मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात १६७ – विलेपार्ले, १६८ – चांदिवली, १७४ कुर्ला, १७५ – कलिना, १७६ वांद्रे पूर्व, १७७ – वांद्रे पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. १७२ – अणूशक्ती नगर आणि १७३ – चेंबूर या  विधानसभा मतदारसंघाचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात होतो.

निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कसे शोधावे मतदार यादीत नाव?

VOTERS’ SERVICES PORTAL (eci.gov.in) या लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले मतदान केंद्र, यादी क्रमांक शोधता येणार आहे. किंवा स्वत: बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. तसेच व्होटर हेल्पींग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भाग विषयी माहिती मिळवू शकता.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्रे मतदानासाठी वैध

मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत जाणून घ्या

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रातील उमेदवाराची माहिती जाणून घेऊ शकतात. Election Commission of India (eci.gov.in) अथवा या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा ‘नो युवर कॅन्डीडेट’ (know your candidate) या ॲपवर माहिती मिळेल. २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २१ उमेदवार, २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदरसंघात २० उमेदवार, २९ – उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, ३०-दक्षिण मध्य मुंबईत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

या जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

उन्हाळ्यापासून बचावासाठी उपाययोजना

मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुठे संपर्क साधाल

सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकता. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C vigil App)तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

०००

श्रध्दा मेश्राम (स.सं)

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.१२ (जिमाका) : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला.

सज्ञान झालात.. पण सुजाण झालात का.., वेड मतदान करण्याचे.., 20 मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश देणारे फलक हातात घेवून मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

अठरावं वरीस मोक्याचं.. असा संदेश देत नवमतदारांनाही मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. वसंत व्हॅली, खडकपाडा सर्कल, साई चौकपर्यत सदर रॅली काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

138 कल्याण मतदार संघातील स्वीप नोडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅली काढण्यात आली. 20 मे रोजी नक्की मतदान करा.. अशा घोषणा देत या रॅलीत कल्याण मोमीस समूहाचे सदस्य देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

०००

मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

मुंबई, दि. १२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दि. २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर निर्देश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी कार्यरत कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींना बंधनकारक आहे. खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील अधिकारी- कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देशही श्री. यादव यांनी दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देण्याबाबतच्या निर्देशाचे, सूचनांचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांच्या मालकांनी व व्यवस्थापनाने योग्य ते पालन करून काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले आहेत.  मतदानाच्या दिवशी आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येणार आहे.

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात येते. तसेच काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये काही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नये, यासाठी हे श्री. यादव यांनी निर्देश दिले आहेत.

०००

शैलजा पाटील/स.सं

मतदान ओळखपत्र नसेल तरीही मतदान करता येणार – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. १२ : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. या पैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लीप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदान ओळखपत्र असलेला मतदार मतदान करू शकतो. शिवाय ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा, तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांनी वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

०००

शैलजा पाटील/स.सं

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

             जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सहा. व्यवस्थापक राहुल गुप्ता,  पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

            बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. १९- औरंगाबाद मतदार संघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत.  जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत. त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत. जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून  सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४  कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली.

            बैठकीस मार्गदर्शन करतांना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत, यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृद्ध, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी, त्यांना विनात्रास मतदान करता यावे, याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  तसेच अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्या असे निर्देश त्यांनी दिले.

००००००

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ११ : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

*****

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट

मुंबई, दि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यात नंदुरबार मतदारसंघामधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, मावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, पुणेमधील 2018 मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

राज्यातील चौथ्या टप्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारांनी मतदान करावे यासंदर्भात जागृतीही करण्यात येत असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

 

पवन राठोड/ससं

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

मुंबई, दि. 11 – राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारी/ निवडणूक निर्णय अधिकारी/ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहे. आदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयोगाकडून जिल्हा व राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहे. राज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणुकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोट्या बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

****

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, दि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. 17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी श्री.यादव यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000000

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision -...

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  ‘विद्यार्थी सहाय्यता...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा –...

0
सातारा दि.२३  : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा...

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात...

0
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही...