सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 782

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

मुंबई उपनगर, दि.०६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ करीता मुंबई उत्तर पश्चिम  मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंद वहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांकदिनांकवार आणि वेळ या क्रमाने) : 

प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5.

द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5.

तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5.

तपासणीचे ठिकाण : 

निवडणूक निर्णय अधिकारी, 27-  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ,  अर्थ व सांख्यिकी सभागृह,  प्रशासकीय इमारत, आठवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051

तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/ उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

00000

 

मतदान जनजागृती व मतदान केंद्रावर देण्यात येत असलेल्या सुविधा विषयी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

प्रश्न :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती व मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे.

जिल्हाधिकारी : 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ व 43 माढा मतदारसंघांमध्ये एकूण 36 लाख 56 हजार 833 मतदार आहेत. यामध्ये 18 लाख 90 हजार 572 पुरुष व 17 लाख 14 हजार 976 महिला आहेत आणि  285 तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण 3617 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयीचे कामकाज ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे.  मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. टॉयलेट आणि मोबाईल टॉयलेटची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. जास्त ऊन असल्यामुळे पहिल्या फेज व दुसऱ्या फेजमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. आम्ही या अनुषंगाने यावेळी विशेष म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर ग्लुकोज आणि ओ.आर.एस. मिश्रित असलेले तीन ते चार थंड पाण्याचे जार ठेवण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग असेल त्या ठिकाणी आम्ही तेथील मतदारांसाठी बसण्यासाठी बेंच व चेअरची सुविधा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या मतदार केंद्रामध्ये पाच पेक्षा जास्त मतदान बूथ असेल त्या ठिकाणी वोटर असिस्टंट बूथ ची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक बूथ क्रमांकाला कलर कोडिंग केलेला आहे. कलर कोडींगप्रमाणे टी-शर्ट घातलेले स्वयंसेवक त्या ठिकाणी मदतीसाठी सज्ज असतील. मागील वर्षी सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 60.06% मतदान झाले होते. यावर्षी 70 टक्के पर्यंत मतदान होईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न केले जात आहे.

प्रश्न : लोकशाहीत मतदानाचं काय महत्त्व आहे याविषयी काय सांगाल.

जिल्हाधिकारी : भारतीय लोकशाहीमध्ये मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. खूप कष्ट, यातना त्यानी सहन केले तरी त्यांनी माघार घेतली नाही. 1857 ते 1947 पर्यंत 190 वर्षात मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष झालेला आहे या मोठ्या संघर्षातून आपल्याला मतदानाचा मिळालेला हक्क आपण बजावला पाहिजे. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण मतदान करावे. खूप ऊन आहे कसे बाहेर जावे हे सर्व अडचणी येतील तरी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करावे आणि सर्वांनी मतदान करावे.

प्रश्न : सोलापूर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत याबद्दल सांगावे.

जिल्हाधिकारी: जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 42 सोलापूर लोकसभा मध्ये 06 विधानसभा मतदारसंघाचा समाविष्ट आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर आणि पंढरपूर या मतदारसंघाचा समावेश होतो. 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, माढा सांगोला, माळशिरस तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

प्रश्न : वंचित, बेघर, तृतीयपंथी आणि ज्येष्ठ नागरिक या मतदारांसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी काही उपक्रम राबवले आहे का ?

जिल्हाधिकारी: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 285 तृतीयपंथी मतदार आहे. त्यांच्या नावनोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पारधी, बहुरूपी आणि भटक्या विमुक्त जमातीतील मतदारांसाठी मतदान नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून 59 कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 1934 नवमतदारांना मतदान कार्डचे वाटप करण्यात आले तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून काही प्राथमिक स्वरूपामध्ये पुरस्कार देऊन नवमतदारांचा सन्मान करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदा वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृह मतदान प्रक्रिया राबवली होती. 85 वय वर्षापुढील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन बूथ लेव्हल ऑफिसर यांनी गृह मतदाना विषयी माहिती देऊन त्यांना गृह मतदानचे पर्याय निवडणे विषयी विचारणा करण्यात आली होती ज्यामध्ये 3500 लोकांनी पर्याय निवडले होते. या साडेतीन हजार लोकांच्या घरी मायक्रो ऑब्झर्वर, पोलीस, या पथकांना पाठवून आम्ही ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली. आमचा हाही प्रयत्न होता की वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांनी मतदान केंद्रात येऊन जर मतदान केले तर इतर सामान्य मतदारांसाठी प्रेरणादायी असेल. इतके वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार जर मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदान करत असतील तर निश्चितच सामान्य मतदारांना याची प्रेरणा मिळून ते देखील मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचतील.

प्रश्न : नवमतदारांसाठी काही उपक्रम राबविले आहे का ?

जिल्हाधिकारी : जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून नवमतदारांसाठी कार्यक्रम राबविण्यात आले.  यामध्ये एक लाख 25 हजार नवमतदारांनी मतदानामध्ये नाव नोंदवले आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी 115 कॉलेजमधून विविध कार्यक्रम घेऊन नवं मतदारांची नोंदणी केली. सोलापूर शहरांमध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या कामगारांना मतदानाच्या दिवशी संबंधित औद्योगिक आस्थापनाकडून सुट्टी देण्यात येत नाही अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या सर्व औद्योगिक आस्थापनांची तसेच चेंबर ऑफ कॉमर्सची बैठका घेऊन कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याविषयी सूचना दिल्या. लोकप्रतिनिधी कायदा 1950 अनन्व्ये कलम 135 ब मध्ये खाजगी, निमसरकारी, कंत्राटी कामगारांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्याची सूचना आहेत. काही औद्योगिक आस्थापनाने आम्हाला सांगितले की जर एखादा कामगार मतदान करून आल्यानंतर आम्हाला जर त्यांनी शाहीचे बोट दाखवले तर त्याचा आम्ही सत्कार व सन्मान करू.

प्रश्न : कामगारांना मतदान बूथ पर्यंत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही व्यवस्था केली आहे का?

जिल्हाधिकारी : प्रत्येकाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याचा प्रयत्न करावा जर कोणी खूप आजारी असेल, दिव्यांग मतदार असतील त्यांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे.

प्रश्न: मतदान ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कोणती कागदपतत्रे मतदानासाठी ग्राह्य असतील ?

जिल्हाधिकारी : मतदान ओळखपत्र व्यतिरिक्त शासनाकडून देण्यात आलेल्या 14 शासकीय ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदार मतदान केंद्रावर दाखवू शकतात. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक यासारखे ओळखपत्र दाखवून मतदार मतदान करू शकतो. बी.एल.ओ. कडून प्रत्येक मतदाराला वोटर स्लिप दिली जाणार आहे त्या वोटर स्लीपच्या पाठीमागे कागदपत्रांची माहिती दिलेली आहे.

प्रश्न : आदर्श मतदान केंद्र कशा पद्धतीने उभारले आहे.

जिल्हाधिकारी : 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये 02 पिंक सेंटर उभारण्यात आले आहे. त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये महिला असतील. तसेच प्रत्येक मतदारसंघ निहाय 02 दिव्यांग मतदान केंद्र आणि 02 युवा केंद्र असतील अशा पद्धतीने उभारी करण्यात आली आहे स्त्री व पुरुष यांची वेगळी रांग असेल.

प्रश्न : टपाली मतदानाविषयी काय सांगाल

जिल्हाधिकारी : रँडमजेशन नुसार 42 व 43 लोकसभा मतदारसंघातील जे अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत.  त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये मतदान करता यावे याकरीता इलेक्शन ड्युटी स्लिप दिलेले आहेत ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी असेल त्याच ठिकाणी ते ड्युटी स्लिप दाखवून आपला मतदानाचा हक्क  बजावू शकतात तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान दुसऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असेल तर त्यांच्यासाठी आपण पोस्टल मतदान प्रक्रिया राबवली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे.  जे सैनिक मतदार आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट आपण त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात आले होते.

प्रश्न : मतदाराला मतदानाच्या दिवशी मतदान स्लिप मिळाली नसेल किंवा अद्याप मतदार यादीत नाव सापडले नसेल तर त्या लोकांसाठी काय व्यवस्था असेल

जिल्हाधिकारी : मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन आपले नाव शोधू शकतात.  बी. एल. ओ. मार्फत  वोटर स्लिप दिले जाणार आहे त्या वोटर स्लिपच्या माध्यमातून मतदार मतदान च्या ठिकाणी पोहोचू शकतात तसेच मतदार सुविधा केंद्र प्रत्येक मतदान केंद्रावर उभारण्यात आलेला आहे.

प्रश्न : मतदानाची वेळ काय असेल.

जिल्हाधिकारी: सोलापूर लोकसभा व माढा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान असणार आहे मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. जर कोणी मतदार सायंकाळी सहाच्या आत जर तो मतदार रांगेत उभा असेल त्याचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्र सुरू राहील जर कोणी सहाच्या नंतर जर मतदान केंद्राकडे आले असेल तर त्यांना मतदान करता येणार नाही.

प्रश्न : मतदारांना काय आवाहन कराल ?

जिल्हाधिकारी : जिल्ह्यातील सर्व मतदारांनी दिनांक 7 मे 2024 रोजी घराबाहेर पडून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे व लोकशाहीच्या या उत्साहात सहभाग घ्यावा, असे आवाहन मी करतो.

 

                                                                000

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन

भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत

रायगड जिमाका दि.6- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी International Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे.

या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत करण्यात आले. या विदेशी प्रतिनिधी मंडळ मध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे आहेत.

या प्रतिनिधींनी जी.एस.एम. महाविद्यालयात सुरु असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाचे साहित्य वाटपाची पाहणी केली. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.  याबरोबरच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ ज्योस्ना पडियार यांनी ई व्ही एम, व्ही व्ही पॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविले. या मंडळाने नेहूली येथील स्ट्रॉंगरूम ची पाहणी केली. मतदानानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची विधानसभा मतदार संघनिहाय रचना केली जाते. त्याची पाहणी केली. त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच मतमोजणी कशा पद्धतीने होते, मतमोजणी केंद्राची रचना, आवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.

०००

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती 

सातारा, दि. ०५ : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काल दि. ०४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. आजच्या दिवशी जिल्ह‌्यामध्ये मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ यांचे निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापक जनसंपर्क पाहता विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व अधिनस्त सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांची  जिल्हयात एकाच दिवशी २००० पथकांची नियुक्ती करुन मतदार यादीनिहाय १०० %  कुटुंबापर्यंत पोहचून जनजागृती करण्याच्या उद्देश्याने १ लाख कुटुंबांना भेटी देण्यात  आल्या. यावेळी मतदानाचे महत्व सांगण्यात आले तसेच मतदारांना मतदाना दिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचारी यांना सूचना केल्या.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना  तालुका निहाय भेटी देण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार सर्व अ‍धिकाऱ्यांनी नेमूण दिलेल्या तालुक्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष गृहभेटी करुन मतदान जनजागृती बाबत आवाहन केले.
तसेच सातारा जिल्हा परिषदेमार्फत गावातील ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांना गावातील गृहभेटी साठी दि.३ ते ७ मे पर्यंत दिवसातून ३ वेळा गावातील मतदारांच्या कुटुंबांना भेटी देऊन १०० % मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांच्या मदतीसाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा,ग्रामपंचायत कर्मचारी , प्राथमिक शिक्षक, बचतगट ग्रामसंघ यांचा समावेश असेल.
०००००

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी प्रदर्शन

बीड, दि.5: (जीमाका) जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी मतदार जनजागृतीसाठी व्यंगचित्र प्रदर्शनाचे दालन उभारले. या त्यांच्या उपक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चमन गार्डन येथील आठवडी बाजारपेठेत आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त स्वखर्चाने मतदार जनजागृतीसाठीचे व्यंगचित्र प्रदर्शन उभारले. या व्यंगचित्र प्रदर्शनीला बाजारपेठेतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

सुहास पालीमकर यांनी बीड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती करण्यासाठी व्यंगचित्र तयार करून दिले असून व्यंगचित्र बीड लोकसभा मतदारसंघातील मोक्याच्या ठिकाणी लावली आहेत. त्यांच्या या उपक्रमाशीलतेला जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

0000

बीड लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

बीड, दि.5 (जिमाका) बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा निहाय एकूण 2355 मतदान केंद्र असणार आहेत. यापैकी 11 मतदान केंद्रांवर दिव्यांग तर 22 मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेला अधिक सुरळीत आणि व्यापक करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आखलेल्या आहेत. या अंतर्गत तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी युवा मतदान केंद्र उभारलेली आहेत. दिव्यांग  नागरिकांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी दिव्यांग मतदान केंद्र नियोजित केले आहे.

दिव्यांग मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष व 2 इतर मतदान अधिकारी असे एकूण 4 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी असतील. असे प्रत्येक तालुक्यात 01 दिव्यांग मतदान केंद्र आहे. असे एकूण 11 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात आहेत.

तसेच बीड लोकसभा मतदार संघातील एकूण सहा विधानसभा मतदार संघात 22 मतदान केंद्र ही युवा (स्त्री/पुरुष) मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येकी 01 तालुक्यात 02 युवा मतदान केंद्र असणार आहेत.  ज्यांचे वय 35 पेक्षा कमी असेल असे नागरिक हे युवा मतदान केंद्र चालवणार आहेत या मतदान केंद्रातही 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष 2 इतर मतदान अधिकारी असे 4 युवा (स्त्री/पुरुष) मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असून यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात परदानशीन बुथ् उभारण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बुथवर एक महिला सहाय्यक अधिकारी असणे आवश्यक आहे. याप्रमाणे गेवराई विधानसभा मतदारसंघात  27, माजलगाव विधानसभा मतदार संघात 48, बीड विधानसभा मतदारसंघात 136, आष्टी विधानसभा मतदारसंघात 26, केज (राखीव) विधानसभा मतदारसंघात 39, परळी विधानसभा मतदारसंघात 42 असे एकूण 318 परदानशीन बुथ उभारण्यात आलेले आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात 397 मतदान केंद्र, माजलगाव विधानसभा मतदारसंघात  379,  बीड विधानसभा मतदारसंघात 382, आष्टी विधानसभा मतदारसंघात 440, केज विधानसभा मतदारसंघात 415, परळी विधानसभा मतदारसंघात 342 असे एकूण 2355 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात असणार आहेत.

0000

विदेशी प्रतिनिधी मंडळ रायगड जिल्हा निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करणार

रायगड दि. 5 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी international Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता दिनांक ६ ते ८ मे, २०२४ या कालावधीत रायगड जिल्हा भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
सदर प्रतिनिधी मंडळामध्ये 7 सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदार संघातील विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्रातील केवळ रायगड जिल्ह्यामध्ये हे मंडळ भेट देणार आहे.
या विदेशी प्रतिनिधी मंडळ मध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी)
कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलजा हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका)
झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बोबे)आहेत.
हे विदेशी प्रतिनिधी मंडळ उद्या दि. 6 मे रोजी सकाळी 9 वा अलिबाग येथे मतदान प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. पोलिंग पार्टी चे आगमन व प्रस्थान, साहित्य वाटप याची जी एस एम कॉलेज येथे पाहणी करणार आहेत. त्यानंतर दु. 3 वा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार आहे.
दि. 7 मे रोजी विविध मतदान केंद्राना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती घेणार आहेत.
०००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत

मुंबई, दि. ५: ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंगळवार ७ मे  २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन ‘एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ, त्यांची मतदार संख्या, निवडणुकीत काम करणारे विविध विभाग, मतदार जनजागृती करण्यासाठी राबविलेला स्वीप उपक्रम, वंचित घटक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व बेघर मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमा, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, निवडणूक पारदर्शक  वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आवाहन केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ६, १०, ११ आणि १२ मे रोजी पोस्टल मतदान करता येणार

बीड, दि. 5(जीमाका) : बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणारे 230 बीड विधानसभा मतदारसंघात दि.6, दि.10, दि.11 आणि दि.12 मे रोजी पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीड लोकसभा मतदारसंघात इतर दहा जिल्ह्यातील मतदार असलेले मतदारांना यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश असून ते दि.6, दि.10 आणि दि.11 मे रोजी तहसील कार्यालयातील, तहसीलदार यांच्या दालनात पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथे मतदान करू शकतात.

तर दि.12 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ( एपीएमसी) येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथेही उर्वरित अधिकारी, कर्मचारी मतदान करू शकतील.

0000

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 7 मे 2024, मंगळवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 11 मे 2024, शनिवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, सातवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.

तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/खात्याचे विवरणपत्र, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी नमूद केले.

00000

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी ! 

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे....

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार

0
मा.मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री...

क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्यात सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात...

‘डिजिटल गव्हर्नन्स’ ही गरज नाही तर आवश्यकता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राने डिजिटल रेग्युलेशन आणि प्रणालीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे डिजिटल गव्हर्नन्स ही गरज नाही तर आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व शासकीय सेवा, शासकीय योजना ह्या...

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार ‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन

0
मुंबई, दि. २१ : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी) प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने...