गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 744

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस; जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस सेवेचे उद्घाटन

मुंबई उपनगर दि. 18: ‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी 20 मे 2024 रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी संवाद साधला.

आज वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी प्रसाद खैरनार  उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने  विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर 613 ठिकाणी बेस्ट मार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर देखील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इझी टु मुव्ह या संकल्पने अंतर्गत ज्या विधानसभा मतदारसंघात लोकोमोटर म्हणजेच अस्थिव्यंग मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. अशा 9 विधानसभा मतदारसंघात व्हिलचेअर ॲक्सेसीबल टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय 25 लोफ्लोअर ईलेक्ट्रीक व्हिलचेअर ॲक्सेसीबल बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

००००

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना २० मे रोजी मतदानासाठी विनामुल्य वाहन व्यवस्था उपलब्ध

मुंबई उपनगर, दि. 18: मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग मतदारांना मतदार संघनिहाय विनामूल्य वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून  संपर्क साधण्यासाठी http://tiny.cc/s7b5yz या लिंकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी  प्रसाद खैरनार सांगितले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण 16 हजार 116 दिव्यांग मतदार आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1 हजार 106 दिव्यांग मित्रांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 25 रींगरुट व शटल रूटवर दिव्यांग फ्रेंडली लो-फ्लोअर बस धावणार आहेत. या बसमधून ‘हात दाखवा”बस थांबवा’ या धर्तीवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदार या वाहतूक सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

बस सेवा

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/बस-सेवा-उपलब्ध.pdf” title=”बस सेवा उपलब्ध”]

संपर्क क्रमांक

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/अधिकारी-यांचे-संपर्क-क्रमांक.pdf” title=”अधिकारी यांचे संपर्क क्रमांक”]

0000

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात तयारी पूर्ण – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 18 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही  मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 हजार 353 एवढी मतदार केंद्रे असून रविवार 19 मे 2024 रोजी सर्व मतदान पथके मतदान यंत्रासह रवाना होतील. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की,लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिल ते 6 मे 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. एकूण चार लोकसभा मतदारसंघात 87 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात 26- मुंबई उत्तरमध्ये 19, 27- मुंबई उत्तर पश्चिम 21, 28- मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20, तर 29- मुंबई उत्तरमध्ये 27 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 48 हजार 383 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 116, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 263 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावली, पाणी, एअर कुलर/पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल.

लोकसभेच्या चारही मतदारसंघात मतदानासाठी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. रविवार 19 मे 2024 रोजी शेवटचे प्रशिक्षण पूर्ण होऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आवश्यक साहित्यासह रवाना होतील. निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 22 हजार 44 मतदारांनी आपल्या टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार 513 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 54 लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया रविवार 19 मे 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला मौलिक हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करून या मौलिक अधिकाराचा वापर करीत भारतीय लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. – राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

00000

त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. रॉली यांचे मुंबईहून प्रयाण

मुंबई, दि. १८ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. किथ रॉली यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दु .१.०५ वाजता प्रयाण झाले.

त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांच्यासह राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

मुंबई, दि.१८ : परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांची पक्क्या परवाण्याकरिता वाहनचालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.

तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा हवामान खात्याकडून प्राप्त इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा

 अमरावती, दि. 17 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले.

मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृष्य  प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर उपायुक्त  संजय पवार, गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वक्षण यंत्रणा, महावितरण, जलसंपदा या विभागाचे प्रादेशिक प्रमुख, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत. आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. धरणातील पाणी सोडताना पोलीस, कंट्रोलरूम व संबंधिताना 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित  करुन हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

                                                                         00000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने १८ ते २० मे २०२४ पर्यंत बंद राहणार – निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव

मुंबई दि. 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे  रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे, 6 लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे, असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊन, वाईन शॉप, परमिट रुम, देशी दारूचे गोडाऊन, देशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असून, त्या पथकांच्याकडून अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सत्यवान गवस तथा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.

000

 

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

            मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात.  एप्रिल महिन्यामध्ये ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १९ एप्रिल रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष, १७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गौरव, २४ एप्रिल रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४ वाजता काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

            त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६९० तिकीटांना एकूण ६ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष तिकीट क्रमांक GS-02/9359 या किशोर लॉटरी सेंटर, सांगली यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास २२ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण १ हजार ४९९ तिकीटांना एकूण २९ लाख १० हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-25/1470 या कोमल एजन्सी, औरंगाबाद यांचेकडून  विक्री झालेल्या तिकीटास ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २३ तिकीटांना एकूण ४२ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण ८७६ तिकीटांना एकूण ६ लाख ११ हजार ७०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ७४ तिकीटांना एकूण २ लाख ३१ हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.

            याशिवाय एप्रिल २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६ हजार ३१५ जणांना ८५ लाख ७१ हजार ७०० रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजारावरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. १० हजार रुपयाच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे संबंधित कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे दरवर्षी सहा भव्यतम सोडती काढल्या जातात. त्यापैकी महाराष्ट्र दिन भव्यतम सोडत ७ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात आली. बालाजी मार्केटिंग, नागपूर येथून विक्री झालेल्या तिकीट क्रमांक MD-02/18101 या तिकीटास रक्कम ५० लाख रुपयांचे तिकीटास प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

या सोडतीच्या एकूण ११०२ तिकीटांना एकूण ५७ लाख ७९ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

ठाणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ठाणे, दि. 17 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देशही श्री.चोक्कलिंगम यांनी दिले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम हे ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी श्री.चोक्कलिंगम यांनी संवाद साधून माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या.


यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम, सर्व नोडल अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील निवडणुकीच्या संपूर्ण तयारीची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सोसायट्यांच्या सचिव/अध्यक्षांच्या मदतीने मतदान टक्केवारीसाठी प्रयत्न करा
श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पादर्शक व निर्भिड वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित काम करावे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना घरोघरी पाठवून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी त्या सोसायट्यांच्या सचिव व अध्यक्षांची मदत घ्यावी. त्यासाठी सचिव व अध्यक्षांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून घोषित करावे. शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत पालकांपर्यंत संदेश पोहचवावा.
माथाडी कामगार, विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी यांनी मतदान करावे, यासाठी संबंधित उद्योग/संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच कामगार संघटनांशी संपर्क साधून आवाहन करावे. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेलिब्रेटींकडून आवाहन करावे
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी सेलिब्रिटी, मान्यवरांची मदत घ्यावी. मतदानाचे आवाहन करणारी व्हिडिओ, रिल्स तयार करून ते ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांतून प्रसारित करावे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्या सेलिब्रेटींचे आवाहनाचे बाईटही समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करावेत.

मतदान केंद्रांची माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करावा
मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना सुखद वाटावे, यासाठी केंद्रात व परिसरात वातावरण निर्मिती करण्यात यावी. पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, व्हिलचेअर, सेल्फी पॉईंट आदींची सोय करावी. तसेच मतदारांना रांगेत जास्त वेळ उभे राहू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उभारता येईल का हे पाहावे. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा द्यावी. तसेच मतदान केंद्रांची जागा सुलभपणे सापडण्यासाठी क्यूआर कोड, गुगल मॅपचा वापर करून माहिती द्यावी. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आचारसंहिता भंगाविरुद्ध गुन्हे दाखल करा
शांततेत व निर्भिड वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवावा. तसेच आचारसंहिता भंग होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करावे. तसेच कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच चुकीची माहिती प्रसारित होत असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव न सापडण्याच्या, नावे गायब होण्याच्या तक्रारी मतदानाच्या दिवशी येत असतात. अनेक मतदारांची नावे ही दुसऱ्या मतदार यादीत गेलेली आढळून येतात, त्यामुळे त्यांना नावे सापडत नाहीत. अशा मतदारांना मदत करण्यासाठी व तक्रारींची दखल घेऊन नावे शोधण्यासाठी हेल्पडेस्क तयार करण्याचे निर्देशही श्री. चोक्कलिंगम यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे, तीनही पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तीनही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघात केलेल्या तयारीची माहिती सादर केली.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ठाण्यातील स्ट्रॉंगरुमला भेट

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्री. एस.चोकलिंगम यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली.

ठाणे जिल्ह्यात येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन स्ट्रॉंगरुमध्ये ठेवण्यात येणार आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रुम होरायझन स्कूल येथे आहे. या स्ट्रॉंग रुमची पाहणी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये आदीउपस्थित होते. यावेळी श्री. शिनगारे व श्रीमती जायभाये यांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. श्री. चोक्कलिंगम यांनी स्ट्राँगरुमची व्यवस्था चांगली केल्याचे समाधान व्यक्त केले.

०००००

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...