सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 732

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे ;

  • आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.
  • विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार/कौशल्यानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)
  • सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल
  • विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.
  • आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

  1. इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा. अथवा,
  2. ro.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेलवर पीडीएफ (pdf) स्वरुपात पाठवावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

000

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/आंतरवासिता-2024-1-pdf.pdf” title=”आंतरवासिता 2024-1 pdf”]

पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

मुंबई, दि २८ : राज्यातील पर्यटन वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे नरिमन भवन येथील मुख्यालय दि. ०६/०५/२०२४ पासून साखर भवन, चौथा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नरिमन पॉइंट मुंबई ४०००२१ येथे स्थलांतरित झाले आहे.

तरी, पर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व संस्था/ भागधारक, पर्यटक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २८ : सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जात असून या प्रशिक्षणासाठी, पात्र प्रशिक्षणार्थी निकष पुढीलप्रमाणे आहेत.

प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे दिनांक २० जून २०२४ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहिती करिता सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वा. सावरकर यांना अभिवादन केले.

००००

Birth Anniversary of Swatantryaveer Savarkar

Governor Bais offers tributes to Veer Savarkar

 

Mumbai Dated 28 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Tue (28 May).

Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion.

0000

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

०००

धोंडिराम अर्जुन/स.सं

 

डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार

मुंबई, दि. २७ : जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त होत्या. यामध्ये आर्थिक भ्रष्ट्राचार, लैंगिक छळ आदींचा समावेश होता. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेऊन सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार करण्यात आले आहे, असे उपसंचालक, आरोग्य सेवा यांनी स्पष्टीकरणात कळविले आहे.

डॉ. भगवान पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशीदरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी असणार आहे.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप अशा स्वरुपाच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्य‍ीय चौकशी समिती स्थापन केली होती.

डॉ. पवार यांच्या विरुद्ध असणाऱ्या तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी करुन समितीने अहवाल दिला. त्यानुसारच डॉ. पवार प्रथमदर्शनी दोषी आढळून आले व त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. पवार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1) (अ) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात यावे तसेच निलंबन कालावधीत डॉ. पवार यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, नंदूरबार येथे ठेवण्यात यावे अशी चौकशी समितीने शिफारस केली व त्यानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तीचे पालन करणे आवश्यक असताना त्यांनी त्याचा भंग केला असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण

मुंबई, दि. २६ : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता आज बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, सहायक सचिव बलभद्रानंद, मुंबई रामकृष्ण  मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद, सुशीम दत्ता, शंतनू चौधरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबई केंद्राने गरीब व वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

रामकृष्ण मिशन ही आत्मोद्धारासोबत लोकहिताचे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल मिशनचे अभिनंदन करून मिशनने भारतातील युवकांसाठी कौशल्य विकास, क्रीडा विकास व समग्र व्यक्तिमत्व विकासासंबंधी उपक्रम राबवावे. तसेच वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सशक्तीकरणाची योजना राबवावी, असे ही त्यांनी सांगितले.

विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले ‘माँ शारदा भवन’ निर्माण केल्याबद्दल मिशनचे कौतुक करून रामकृष्ण मिशनतर्फे ठाणे येथे नवे केंद्र सुरु करण्यात येत असल्याबद्दल राज्यपाल श्री. बैस यांनी आनंद व्यक्त केला.

0000

Maharashtra Governor presides over Centenary of Ramakrishna Mission Mumbai

Mumbai 26 : Maharashtra Governor Ramesh Bais presided over the Valedictory function of the yearlong Centenary Celebrations of Ramakrishna Mission Mumbai at a function held at Balgandharva Rang Mandir, Bandra, Mumbai on Sunday (26 May).

Swami Divyananda Maharaj, Vice President, Ramakrishna Mission Belur Math, Balbhadrananda, Assistant Secretary, Satyadevananda, Adhyakshya, Ramakrishna Math Mumbai, Sushim Dutta, Shantanu Choudhury and heads of various Ramakrishna Mission centres from across the country were present.

0000

माझी वसुंधरा अभियान ४.0 व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील माझी वसुंधरा अभियान 4.0  व स्वच्छ भारत अभियानाचे काम उत्कृष्ट झाले असून 31 मे 2024 अखेर निर्देशकाचे नियोजन करून जनजागृती व लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्याचे सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित माझी वसुंधरा अभियान 4.0  व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, सहाय्यक आयुक्त नगरप्रशासन देवानंद ढेकळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, संबंधित कर्मचारी उपस्थितीत होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. आढाव्यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात उर्वरित कालावधीत निर्देशाकानुसार नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे. यामध्ये वातावरणीय बदल जनजागृती, ई-प्लेज नोंदणी व पुर्तता, स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे अभियानाची प्रसिध्दी, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम, पर्यावरण सेवा येाजनेत शाळांचा सहभाग आदींचा समावेश आहे. जेणेकरून भूमी, वायु, जल, अग्नि, आकाश या क्षेत्रात गुणांकन सुधारता येतील. तसेच, अभियांनाची माहिती संकलन व मुल्यांकनाचा त्रुटींचीही माहिती देवून नियोजनपूर्वक सुधारणा करण्याच्या सूचनांही यावेळी देण्यात आल्या.

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे प्रकल्पाविषयी माहिती घेण्यात आली.  जिल्ह्यातील मुख्याधिकारी यांनी स्वच्छ भारत अभियानात संबंधित भागातील सुधारणा व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण व शहरी भागात स्वच्छ भारत अभियानात लोकसहभाग महत्वाचा आहे. केंद्र व राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केलेली आहे त्याचा अनिधिकृत साठा व विक्री करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशा सूचना दिल्या.

प्लास्टिक विरोधात मोहिम

विभागीय आयुक्त यांनी प्लास्टिक हा पर्यावरणास हाणीकारकच आहे असे सांगून “मी प्लास्टिक वापरणार नाही, वापरू देणार नाही” याची जनजागृतीही केली पाहिजे. कापडी पिशवी वापरावी. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुटुंबातील व्यक्तीही प्लास्टिक वापरास आळा घालतील. प्रेरणा व कृतीत बदल होण्यास समाजातील सर्वच घटकांनी पर्यावरण जनजागृतीद्वारे प्लास्टिक विरोधात मोहिम उभारली पाहिजे असे सांगितले.

या बैठकीत माझी वसुंधरा अभियान 4.0, स्वच्छ भारत अभियान डीप क्लिनींग अभियान, पथ विक्रेता सर्वेक्षण व धोरण, मालमत्ता व पाणीपट्टी कर, प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेवून कृती व कार्यातून जनजागृती करण्याची सूचना देण्यात आल्या.

000000

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून आढावा

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): पंचगंगा नदी  प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक उपाययोजनेसह प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदुषणाबाबत आढावा बैठकीत पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहाआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदुषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत मा. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 2014 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती.  यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणेचे अधिकारी समितीमध्ये असतात. पंचगंगा नदीचे प्रदुषण होवू देवू नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात या प्रगतीचा दर 3 महिन्याला अहवाल सादर केला जातो. या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.

दीर्घकालीन उपाययोजनेध्ये कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याचे चालू असून कामे संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. प्रदुषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर व आरोग्याच्या तक्रारीबाबतही यावेळी आढावा घेतला.

तसेच तात्कालिक उपाययोजनेमध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदी नव्याने कोणत्याही प्रकारे प्रदुषण होणार नाही व प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी. नैसर्गिक व प्रदुषण मुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देवून होणाऱ्या प्रदुषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीनंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या.

000000

समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई दि. २५ : मतदान प्रक्रिया बाधित होत आहे, असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.

000000

Clarification  of  Chief  Electoral  Officer  Maharashtra

Mumbai date.25 : It is noticed that some old video from other states are getting circulated through social media showing miscreants trying to vitiate the poll process and particularly tampering with EVM. It is clarified that such videos are not related to Lok Sabha Elections 2024 in Maharashtra. The poll in the state is completed smoothly and peacefully.

 

 

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...