गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 73

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २३ : राज्य शासनाच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने बाएफ (BAIF) द्वारे  राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यास पूरक वातावरण निर्माण होत आहे. याद्वारे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही उद्दिष्टे साध्य होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला कृतीशील प्रतिसाद देत कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने बाएफ संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात  विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यात स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मागास असलेल्या एटापल्ली  या आकांक्षित तालुक्यात समन्वित उपजिविका विकास कार्यक्रम एटापल्ली तालुक्यातील २० गावात राबविण्यात येत आहे. याची  प्रायोजक संस्था  SBI फाउंडेशन आहे. १ एप्रिल २०२५ पासून पुढील ३ वर्षेपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी  एकूण खर्च: ₹४.९५ कोटी अपेक्षित असून यामध्ये १५०० लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहेत. निवडलेल्या गावांमध्ये हवामान सुसंगत आणि शाश्वत शेतीला चालना देऊन, उपजिविकेच्या संधी वाढवून आणि जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही प्रमुख उद्दिष्टे असून प्रमुख उपक्रमांद्वारे ही  उद्दिष्टे साध्य केली जातील.याअंतर्गत हवामान सुसंगत व शाश्वत शेतीचा प्रसार, बोडी आधारित शेती प्रणालीचा प्रसार,  मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास, बोडीमध्ये अंतर्गत मत्स्यपालन, महिला उद्योजकता विकास व संस्था निर्मिती, समुदाय आरोग्य, स्वच्छता व पोषण या बाबींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्राधान्याने या भागात समुदाय कल्याणास विशेष लक्ष दिले असून २०२५-२६ या वर्षासाठी ३० जून २०२५ पर्यंत ५०० कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे. १५ बोडी (नैसर्गिक शेतीतलाव) गाळमुक्त करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतीसाठी उपयुक्त पाणीसाठा वाढवण्यास मदत झाली आहे. बोडी आधारित शेती पद्धतीत माशांचे संगोपन, बोडीवर कुक्कुटपालन  आणि बोडीतील पाणी शेतीसाठी वापरले जाते. ही पद्धती पाण्याचा कार्यक्षम वापर करते आणि विविध उपजिविका स्रोत प्रदान करते.

२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पात सहभागी कुटुंबांना व्यापक लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट होईल, यामुळे शेती उत्पादकता वाढेल, उपजिविका संधी उपलब्ध होतील, शेतकरी गटांच्या माध्यमातून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्याला कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने BAIF संस्थेमार्फत कृतीशील प्रतिसाद मिळत असल्याचे प्रेरणादायी चित्र गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळते आहे.

—()—

संध्या गरवारे/विसंअ/

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २३ : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. तसेच दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयोमानानुसार ज्येष्ठ असणारे विधवा, परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका पूर्णतः कलेवर अवलंबून आहे, व इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही, असे कलाकार पात्र ठरतील. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळ किंवा नियमित मासिक पेन्शन योजनेत लाभार्थी असता कामा नये तसेच कलाकार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्र फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारची प्रमाणपत्रे (लागू असल्यास) आणि नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्तीसाठी ज्यांनी यापुर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही 

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी १७ जुलै २०२५ रोजी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन  नामांकने मागवण्यात आली होती. तथापि दि.०२.०१.२०२५ रोजीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांच्या आत विहित नमुन्यात नामांकने सादर करण्यात यावीत, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी १७ जुलै २०२५ रोजी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यातील बाबी पुढीलप्रमाणे;

बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या कलम १७ व १८ मधील तरतुदीनुसार व बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग नियम, २००६ मधील दि.२४/०३/२०१४ व दि.०६/०५/२०१४ च्या दुरुस्तीमध्ये नमूद निकषांचा समावेश करुन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून नामांकने दिनांक १७.०७.२०२५ रोजीच्या जाहिरातीनुसार मागविण्यात आलेली आहेत. तथापि, सदर विषयाच्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरातीमधील पहिल्या परिच्छेदामध्ये सात दिवस आणि अंतिम परिच्छेदामध्ये १५ दिवसाच्या आत नामांकने सादर करणे बाबत नमूद करण्यात आलेले आहे.

त्या ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे

दि.०२.०१.२०२५ रोजीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्यांनी यापुर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांचे आत विहित नमुन्यात आयुक्त, महिला व बाल विकास, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांचेकडे नामांकने सादर करण्यात यावीत. असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.

००००

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००००

श्री. धोंडिराम अर्जुन/ससं/

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य उपचार मिळविणे कठीण होते. याच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (Chief Minister Medical Assistance Cell) सुरू केला आहे. हा कक्ष खऱ्या अर्थाने अनेकांसाठी ‘जीवनदायी’ ठरत आहे, आणि यामागे एक सुव्यवस्थित यंत्रणा कार्यरत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र :

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा मुख्य उद्देश हा राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांनाही आर्थिक सहाय्य पुरविले जाते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. मुख्यमंत्री सचिवालयाच्या दि. 13 ऑगस्ट 2015 च्या परिपत्रक क्र. मुमंसनि-2015/प्र.क्र.1/निधी कक्ष नुसार गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत असून, या कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार मिळाले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची (Chief Minister’s Relief Fund and Charitable Hospital Assistance Cell) उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेतः

  1. आर्थिक दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत पुरविणेःराज्यातील गरीब व गरजू नागरिकांना महागड्या व जीवनावश्यक उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणे (जसे को कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, इत्यादी).
  2. धर्मादाय रुग्णालयांमधील सुविधा वाढविणेःराज्यातील धर्मादाय (Charitable) रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे किंवा सुविधा निर्माण करण्यासाठी सहाय्य करणे.
  3. सरकारी आणि खासगी यंत्रणांमधील समन्वयःवैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील सेवा एकत्रित करून नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा उद्देश.
  4. आरोग्य सेवा उपलब्धतेत समता आणणेःगरीब, वंचित, आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न करणे.
  5. सामाजिक जबाबदारी अंतर्गत रुग्णालयांकडून मदत मिळविणेःधर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या CSR (Corporate Social Responsibility) अथवा Trust च्या माध्यमातून अधिकाधिक गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीने उपचार करावेत, यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवणे.
  6. त्वरित निर्णयप्रक्रिया व पारदर्शकताःरुग्णांच्या अर्जावर त्वरीत निर्णय घेणे व निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे.

राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या योग्य आणि पारदर्शक वितरणासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या निधीचा वापर योग्य गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही याची खात्री करण्यासाठी नेमण्यात आल्या आहेत.

राज्यस्तरीय समिती (मंत्रालय स्तर)

राज्यस्तरीय समिती ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या व्यवस्थापनाची आणि धोरणात्मक निर्णयांची शिखर संस्था आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अखत्यारित हा कक्ष कार्य करतो.

प्रमुख कार्ये:

* निधीच्या वितरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे.

* मोठ्या आर्थिक मदतीसाठीच्या अर्जांचे पुनरावलोकन करणे.

* राज्यभरातील निधीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे.

* नवीन आजार किंवा उपचारांचा निधीसाठी समावेश करण्याबाबत विचार करणे.

* राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षांशी समन्वय साधणे.

जिल्हास्तरीय समिती (जिल्हाधिकारी कार्यालय):

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे दि.1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते संपूर्ण राज्यात उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे राज्यस्तरीय प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक हे जबाबदारी सांभाळीत आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रियांका यादव व त्यांचे सहकारी कुशलतेने सांभाळीत आहेत.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरविली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची दि.23 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणेबाबत निर्देश दिले होते.

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य वितरीत करणे, या दोन्ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहेत.

नागरिकांची सोय लक्षात घेऊन, अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अर्जदारांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. जिल्हास्तरीय समिती ही स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि अर्जदारांना तात्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

प्रमुख कार्ये:

* जिल्ह्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठीचे अर्ज स्वीकारणे.

* अर्जांची प्राथमिक पडताळणी करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे.

* लहान किंवा कमी गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घेऊन निधी मंजूर करणे.

* आवश्यकतेनुसार, अर्ज राज्यस्तरीय समितीकडे शिफारशीसाठी पाठवणे.

* रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.

* स्थानिक गरजू रुग्णांना निधी योजनेची माहिती देणे आणि अर्ज भरण्यास मदत करणे.

ही प्रक्रिया अधिकाधिक कागदविरहित (Paperless) करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे अर्जदारांना अधिक सुलभपणे मदत मिळू शकेल.

कोणत्या आजारांसाठी किती मदत? (आर्थिक मदतीची मर्यादा)

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून विविध दुर्धर आणि महागड्या आजारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. या मदतीची रक्कम आजाराची तीव्रता, उपचाराचा खर्च आणि आवश्यकतेनुसार ठरवली जाते. साधारणतः, प्रत्येक आजारासाठी निश्चित केलेली कमाल मर्यादा असते, जी खालीलप्रमाणे असून ही माहिती बदलू शकते, अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळही तपासावे.

मात्र राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णालयांना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार रुपये 25 हजार, 50 हजार, 1 लक्ष आणि महत्तम रुपये 2 लक्ष आजारांनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येते.

* कर्करोग (Cancer): कर्करोगाच्या उपचारासाठी (केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया) मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता असते. यासाठी रु. 1,00,000 (एक लाख रुपये) पर्यंतची मदत मिळू शकते. गुंतागुंतीच्या किंवा महागड्या शस्त्रक्रियांसाठी ही मर्यादा वाढू शकते.

* हृदयविकार (Cardiac Diseases): हृदय शस्त्रक्रिया (बायपास, अँजिओप्लास्टी), हृदय प्रत्यारोपण यांसारख्या उपचारांसाठी रु.2,00,000/- (दोन लाख रुपये) पर्यंत मदत मिळू शकते.

* मूत्रपिंड विकार (Kidney Diseases): मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant) किंवा डायलिसिससाठी रु. 1,00,000/- (एक लाख रुपये) पर्यंत मदत दिली जाते.

* मेंदूविकार (Neurological Disorders): ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया, पक्षाघातावरील उपचार यांसारख्या गंभीर मेंदूविकारांसाठी रु. 1,00,000/- (एक लाख रुपये) पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

* अपघात आणि गंभीर दुखापती (Accidents & Major Injuries) ट्रॉमा: गंभीर अपघातांमुळे होणाऱ्या शस्त्रक्रिया, अवयव निकामी होणे, मुख्यत्वे डोक्याला गंभीर इजा यांसारख्या उपचारांसाठी रु. 50,000/- (पन्नास हजार रुपये) ते रु. 1,00,000/- (एक लाख रुपये) पर्यंत मदत मिळू शकते.

* कॅन्सर (सर्व प्रकार) वरील उपचारांसाठी रु.2,00,000/- (दोन लाख रुपये) पर्यंत मदत मिळू शकते.

* सेरेब्रो व्हॅस्कुलर ॲक्सिडंट (CVA) या बाबीवरील उपचारांसाठी रु.2,00,000/- (दोन लाख रुपये) पर्यंत मदत मिळू शकते.

* प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Organ Transplants – इतर अवयव): यकृत प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण यांसारख्या अतिशय महागड्या शस्त्रक्रियांसाठी विशेष परिस्थितीत रु.1,50,000/- (दीड लाख रुपये) पर्यंत किंवा त्याहून अधिक मदत मिळू शकते. यासाठी ZTCC (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) किंवा शासकीय समितीची मान्यता आवश्यक असते.

* इतर दुर्धर आजार: वरील आजारांव्यतिरिक्त, ज्यांसाठी उपचार खर्चिक आहेत आणि रुग्णाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, अशा इतर दुर्धर आजारांसाठीही रु. 50,000/- (पन्नास हजार रुपये) ते रु. 75,000/- (पंच्याहत्तर हजार रुपये) पर्यंत मदत मिळू शकते.

प्रत्येक प्रकरणाची तपासणी करून आणि वैद्यकीय अहवाल तसेच समितीच्या शिफारशीनुसार अंतिम मदत रक्कम ठरविली जाते.

आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

(1) डिस्चार्ज झालेल्या / उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य देय नाही.

(2) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना (मोफत उपचार):- या योजनेच्या आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास (ठाणे जिल्हा- डॉ. प्रियांका यादव, वैद्यकीय अधिकारी, संपर्क क्र.9561729824) फोन करून पेशंटला नामतालिकेवरील (Empanelled) दवाखान्यात अॅडमिट करावे. www.jeevandayee.gov.in या वेबसाईटवर हॉस्पिटलची यादी उपलब्ध आहे.

(3) चॅरिटी हॉस्पिटल (मोफत / सवलतीच्या दरात):- जिल्ह्यातील चॅरिटी हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर / त्यांचे कार्यालयातून घेऊन त्यानुसार रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात अॅडमिट करावे. www.charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर हॉस्पिटलची यादी उपलब्ध आहे.

(4) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) (मोफत उपचार):- 0 ते 18 वर्षे वयांपर्यतच्या पेशंटसाठी या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातात. www.rbsk.gov.in या वेबसाईटवर हॉस्पिटलची यादी उपलब्ध आहे.

  1. मुख्यमंत्री सहाय्यता निधी:-(1) कॉकलियर इम्प्लांट वय वर्षे 2 ते 6), (2) हृदय प्रत्यारोपण, (3) यकृत प्रत्यारोपण, (4) किडणी प्रत्यारोपण, (5) फुप्फुस प्रत्यारोपण, (6) बोन मॅरो प्रत्यारोपण, (7) हाताचे प्रत्यारोपण, (8) हिप रिप्लेसमेंट, (9) कर्करोग शस्त्रक्रिया, (10) रस्ते अपघात, (11) लहान बालकांची शस्त्रक्रिया, (12) मेंदूचे आजार, (13) हृदयरोग, (14) डायलिसिस, (15) कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), (16) अस्थिबंधन, (17) नवजात शिशुंचे आजार, (18) गुडघ्याचे प्रत्यारोपण, (19) बर्न रुग्ण (MLC), (20) विद्युत अपघात रुग्ण (MLC) या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे आर्थिक सहाय्य केले जाते.

उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. संपर्क क्रमांक: 022-22026948 / व्हॉट्सअॅप क्रमांक: 9049789567.

सद्य:स्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास सुमारे 3 हजार 800 रुग्णालये संलग्नित आहेत. या रुग्णालयांची यादी वेबसाईटवर www.cmrf.maharashtra.gov.in उपलब्ध आहे.

* या योजनेचा लाभ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालये यांसारख्या इतर योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना दिला जातो, जेणेकरून मर्यादित निधीचा योग्य वापर होईल.

* रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या निधीसाठी अर्ज करता येत नाही; उपचार सुरू असतानाच अर्ज करणे अपेक्षित आहे.

पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे आहेत:

* उत्पन्नाचा दाखला: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.60 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. (तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.)

* आधार कार्ड: रुग्णाचे महाराष्ट्र राज्याचे आधार कार्ड. लहान मुलांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक.

* रेशन कार्ड: रुग्णाचे महाराष्ट्र राज्याचे रेशन कार्ड (केशरी किंवा पिवळ्या रंगाचे).

* वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक/प्रमाणपत्र: डॉक्टरांच्या सही-शिक्क्यानिशी मूळ वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक किंवा प्रमाणपत्र. खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत, हे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांनी प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.

* संबंधित आजाराचे रिपोर्ट्स: आजाराशी संबंधित सर्व वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट्स).

* अपघातग्रस्त असल्यास: FIR (First Information Report) किंवा MLC (Medico-Legal Case) रिपोर्ट आवश्यक.

* प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी: ZTCC (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) किंवा शासकीय समितीची मान्यता आवश्यक.

* रुग्णालयाची नोंद: उपचार घेत असलेल्या रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. (फक्त नोंदणीकृत रुग्णालयेच मदत निधीसाठी पात्र असतात.)

अर्ज प्रक्रिया:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

अर्ज व आवश्यक कागदपत्रे aao.cmrf-mh@gov.in या ई-मेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे.

* अर्ज डाऊनलोड करावा: मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विहित नमुन्यातील अर्ज संबंधित संकेतस्थळावरून (उदा. cmrf.maharashtra.gov.in) किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त करावा.

* कागदपत्रे जमा करावेत: अर्जासोबत वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्व-साक्षांकित (Self Attested) करून जोडावीत.

* अर्ज सादर करावा: पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्षात सादर करावीत. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

* अर्जाचा पाठपुरावा: अर्ज सादर केल्यानंतर त्याच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधता येतो. अनेक ठिकाणी यासाठी टोल फ्री क्रमांक किंवा ऑनलाईन ‘अर्ज स्थिती’ तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  1. अर्ज (विहीत नमुन्यात).
  2. रुग्ण दाखल असल्यास त्याचा Geo Tag फोटो सोबत जोडणे / पाठवणे बंधनकारक आहे.
  3. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्होल सर्जन यांचेकडून हॉस्पिटल खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  4. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला घालू वर्षाचा (रुपये 1.60 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  5. रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक आहे.
  6. रुग्णांचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे).
  7. संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  8. अपघातग्रस्त रुग्णांसाठी FIR रिपोर्ट आवश्यक आहे.
  9. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
  10. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री राहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

अर्थसहाय्याची मागणी ई-मेल द्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मूळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाद्वारे तत्काळ पाठविण्यात यावेत.

1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 दरम्यान मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने झालेली मदत

शेकडो गरीब व गरजू रुग्णांना दिलासा:-

1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 दरम्यान या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल 14 हजार 651 रुग्णांना 128 कोटी 6 लाख 68 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मंजूर करण्यात आली आहे.

FCRA सर्टिफिकेटमुळे परकीय देशातील देणगीचा मार्ग मोकळा:- जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला FCRA प्रमाणपत्र मिळाले, महाराष्ट्र-एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरले. त्यामुळे आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला परदेशातील व्यक्ती, संस्था, कंपन्यांकडून थेट आर्थिक मदत स्वीकारता येणार आहे.

चरणसेवाउपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी:- वारीच्या काळात ‘चरणसेवा’ उपक्रमाद्वारे 2.75 लाख वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली, तर 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य विषयक जनजागृती पोहोचविण्यात आली.

महत्वपूर्ण तांत्रिक सुधारणा ऑनलाईन पडताळणी प्रणाली:- जून महिन्यात उत्पन्न प्रमाणपत्रांची पडताळणी महसूल विभागाच्या ऑनलाईन प्रणालीशी थेट जोडण्यात आली. त्यामुळे बनावट दस्तऐवजांना आळा बसला असून पात्र रुग्णांना जलद मदत मिळू शकते.

धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यक्षमतेवर लक्ष:-

धर्मादाय रुग्णालयांतर्फे देण्यात येणाऱ्या 10% मोफत आणि 10% सवलतीच्या उपचार सेवांची नियमित तपासणी व अहवाल प्रणाली अधिक सक्रिय करण्यात आली आहे.

एकूण मदत:- 148 कोटी 60 लाख 02 हजार

एकूण लाभार्थी संख्या:- 23 हजार 269

विभाग:-

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (CMRF),रुग्ण/लाभार्थी संख्या – 14 हजार 651 रूग्ण, मदत (रक्कम)-128 कोटी 6 लाख 68 हजार.

धर्मादाय, रुग्ण/लाभार्थी संख्या – 8 हजार 507 रूग्ण, मदत (रक्कम) – 15 कोटी 24 लाख 34 हजार.

नैसर्गिक/कृत्रिम आपत्ती, रुग्ण/लाभार्थी संख्या- 111 व्यक्तींना, मदत (रक्कम) – 5 कोटी 29 लाख.

एकूण – 23 हजार 269 लाभार्थी, मदत (रक्कम) – 148 कोटी 60 लाख 02 हजार.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हे महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी एक महत्त्वाचे आणि संवेदनशील पाऊल आहे. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून, तसेच स्पष्ट पात्रता निकषांमुळे, ही योजना आर्थिक अडचणींमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, यासाठी कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून मिळणारी मदत खरोखरच अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

०००००

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

ठाणे

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

मुंबईदि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटनभूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यानदिवसभरात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूपंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहविविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपालअनेक केंद्रीय मंत्रीज्येष्ठ नेते शरद पवारमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारप्रफुल्ल पटेलसुनील तटकरे तसेच इतरही अनेक मान्यवरांचा समावेश होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात 4.5 एमटीपीए स्टील प्लांटच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावली. हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असूनयातून 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहेतर 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत. हेडरी ते कोनसरी या महाराष्ट्रातील पहिल्या आणि विक्रमी वेळात पूर्ण झालेल्या स्लरी पाईपलाईनचे त्यांनी उद्घाटन केले. यामुळे कार्बन उत्सर्जनात 55 टक्के घट होणार आहे. हेडरी येथील आयर्न ओर आणि ग्राईंडिंग युनिटचे त्यांनी उदघाटन केले. हे महाराष्ट्रातील पहिले युनिट आणि पोलाद क्षेत्रात नवे मापदंड स्थापन करणारे आहे. कोनसरी येथे पॅलेट प्लांटचे उदघाटन केले. हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकाच रचनेतील भारतातील सर्वांत मोठा प्रकल्प असून शाश्वत पोलाद निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोनसरीत 100 खाटांच्या रुग्णालयाचेआधुनिक सीबीएसई शाळेचे तसेच सोनमपल्ली येथे लॉईडसच्या टाऊनशीप त्यांनी भूमिपूजन केले. दुपारी हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या मोहीमेतही भाग घेतला. नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीत त्यांनी जवानांसोबत साजरा केला होताया भल्या मोठ्या विकासकामांतून एकप्रकारे गडचिरोलीच्या विकासाचा टिळा मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी लागला.

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत राज्यभरात आरोग्याचेही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते. रक्तदान शिबीरआरोग्य तपासणी शिबिरआभा कार्ड वाटपअवयव दानाचा प्रचारकृत्रिम अवयव वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत सुद्धा योगदान दिले.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद, सर जे. जे. महानगर रक्त केंद्र व हरिवंश राय बच्चन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात राज्य माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार रामभाऊ गुंडीले, फिरोज मासुकदार, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी, तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक निवृत्ती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी  सर जे. जे. महानगर रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा आचार्य, सर जे जे रुग्णालय व महाविद्यालयाच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीता डांगे, तसेच प्रतिष्ठानचे हरीश रावल आदींनी सहभाग घेतला.

सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरास सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी, शासकीय व पोलीस अधिकारी, कर्मचारी, व नागरिकांनी भेट दिली. यावेळी रक्तदानाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

000

किरण वाघ/विसंअ/

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना” राबविण्यात येणार आहे. कृषी समृद्धी योजनेत दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीवर आधारित असून आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम  होण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविणे आवश्यक  होती. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे. सूक्ष्म सिंचन, हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, कमी खर्चीक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्यसाखळी तयार करण्यावर भर दिला जाईल. डिजीटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामग्री सेवा, कृषी हवामान सल्ला सेवा, गोदाम व लॉजिस्टिक्स, प्रक्रिया व निर्यात, तंत्रज्ञान प्रसारासाठी नवोन्मेष केंद्र (Innovation Hub) स्थापन करण्यावर भर दिला जाईल. निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल. जिल्हानिहाय खातेदार संख्या, जिल्हानिहाय निव्वळ पेरणी क्षेत्र, जिल्हा असुरक्षितता निर्देशांक आणि जिल्हानिहाय प्रति हेक्टर, सकल सरासरी जिल्हा मूल्यवर्धन संयुक्त निर्देशांकावर आधारित जिल्हावार निधी वाटप करण्यात येईल.

योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येईल. जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत, त्या ठिकाणी मापदंड निश्चिती ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहील. वनहक्क कायद्यांतर्गत वैयक्तिक वनहक्क प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाही, अशा वैयक्तिक वनहक्क प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येईल. योजनेंतर्गत शेतकरी, महिला गट, उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येईल. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. प्राधान्यक्रमाचा महा-डिबीटी आयटी प्रणालीमध्ये समावेश असेल. योजनांचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल. यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यात सन 2025-26 पासून नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे. सन 2023-24 पासून राज्यात सुरु असलेल्या “सर्वसमावेशक पीक विमा योजनेत” सुधारणा करुन, ही “सुधारित पीक विमा योजना”, पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनानुसार राबविली जाईल.

कृषी समृद्धी योजना तीन भागात विभागली जाईल

डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांना वैयक्तिक, तसेच, सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित सध्या कार्यान्वित असलेल्या विविध योजनांसाठी या अंतर्गत तरतूद असेल. सूक्ष्म सिंचन, भाडेतत्वावर कृषी अवजारे बँक व सामुदायिक साधने यावर भर दिला जाईल. कृषी यांत्रिकीकरण, मूल्य साखळी विकसन, जैविक शेती, साठवणूक, अन्न प्रक्रिया, नैसर्गिक शेती, प्रशिक्षण, माती परीक्षण, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि विस्तार यावर देखील मोठ्या प्रमाणात भर देण्यात येईल. हा निधी मागणीवर आधारित असेल आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, जिल्हास्तरावरील स्थानिक गुंतवणूक गरजांसाठी सदरचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. राज्यस्तरीय प्रकल्पामध्ये संशोधन आणि बळकटीकरणामध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रामार्फत संशोधन, प्रशिक्षण, नवोपक्रम, प्रयोगशाळा बळकटीकरण, गुणवत्ता नियंत्रण व विस्तार सेवा, राज्यस्तरीय प्रकल्प इत्यादींचा समावेश असेल. वैयक्तिक, तसेच, सामुहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित कार्यान्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी ४००० कोटी तर निधी ८० टक्के असेल. जिल्हास्तरावरील स्थानिक गरजा लक्षात घेऊन गरजेनुसार तयार करण्यात येणाऱ्या योजनांसाठी रूपये ५०० कोटी रूपये असतील १० टक्के गुंतवणूक असेल. राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रकल्प आधारित राज्यस्तरीय योजनेसाठी ५०० कोटी रूपये तर १० टक्के निधीची तरतुद केली जाईल.

धोरणात्मक गुंतवणूक क्षेत्रे

पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म-सिंचन मध्ये जलव्यवस्थापनास प्राधान्य दिले जाईल. जसे – शेततळे, सूक्ष्म-सिंचन प्रणाली आणि जलसंधारण संरचनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक. मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास मध्ये  मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन आणि अचूक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन करणे आवश्यक. हवामान-अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापरमध्ये कडधान्ये, भरड धान्ये, तेलबिया, फलोत्पादन आणि औषधी वनस्पती अशा प्रकारे बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक. मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधामध्ये साठवण सुविधा, कोल्ड चेन, शेतमाल सुकवण्याची जागा, लघु प्रक्रिया युनिट्स, पॅकहाऊस मध्ये गुंतवणूक आणि बाजारपेठ जोडणी. उपजिविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रमामध्ये शेळीपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, रेशीम उद्योग, फळबाग लागवड, इ. संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणी मध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि ग्राम कृषी विकास समित्या यांचे बळकटीकरण. शेतकरी व विस्तार कार्यकर्ते यांच्या क्षमता बांधणीसाठी वनामती, रामेती, विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके मध्ये हवामान स्मार्ट कृषिसाठी स्केलेबल मॉडेल्स तयार करण्यासाठी संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

ज्ञान, संशोधन व नवोन्मेष मध्ये कृषी विद्यापीठांना संशोधन निधी, मृदा व पाणी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, कीडनाशके अंश तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण, हवामान लवचिक तंत्रज्ञान, कमी खर्चिक यांत्रिकीकरण, कीड व पोषण व्यवस्थापन, मूल्यसाखळी विकासावर लक्ष, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांचे डिजीटल सुविधा बळकटीकरण, बियाणे, खते, किटकनाशके व यंत्र सामुग्रीसाठी गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था मजबूत करणे. प्रशिक्षण व क्षमता विकासमध्ये कृषी समृद्धी योजनेसाठीच्या एकूण निधीपैकी एक टक्का रक्कम प्रशिक्षणासाठी राखीव असेल. यासाठी कृषी आयुक्तालयात प्रशिक्षण कक्ष स्थापन करुन शेतकरी व विस्तार अधिकाऱ्यांसाठी सविस्तर आराखडा तयार केला जाईल. वनामती व रामेतीच्या प्रशिक्षण क्षमतेत वाढ केली जाईल. वनामतीद्वारे ज्ञान व शिक्षण व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जाईल, ज्यावर ई-लर्निंग मॉड्युल्स, प्रशिक्षण साहित्य व संवादात्मक मंच उपलब्ध राहतील. तसेच, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून जैविक उत्पादने, कीड नियंत्रण, पीक संवर्धन यावर प्रशिक्षण दिले जाईल. वरील गुंतवणूक क्षेत्रांमध्ये, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील व राज्य शासनाच्या प्रचलित योजनांतील सर्व घटकांचा समावेश असेल. याशिवाय, नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन, देशी गाईंच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व साहाय्य देणे या व अशा सारख्या बाबींचा समावेश असेल.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून राज्यात असे शंभर मेळावे आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विकासाची दूरदृष्टी असलेले आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहचवणारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांच्या रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला आहे. या मेळाव्यातून राज्यातल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होत असून उज्जवल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात यापुढेही असे उपक्रम सुरूच राहतील असा विश्वास मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खासगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात  रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण २५ आस्थापनांनी सहभाग घेतला यात पाच शासकीय महामंडळाचाही सहभाग होता. तसेच पाचशे युवक युवतींनी या मेळाव्यात नोंदणी केली.

रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असला तरी, तरुणांना शासकीय योजनांची माहिती तसेच स्वयं रोजगाराबाबत समुपदेशन ही कौशल्य विभागा मार्फत सुरू असल्याची माहिती  कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी यावेळी दिली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विद्या शिंगे आणि मुकेश संखेही यावेळी उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २२ : वर्ल्डवन एनर्जी कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात चांगली सुरुवात केली असून येत्या काळात उमरेड परिसरात सौर व हरित ऊर्जेची उत्तम परिसंस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उमरेड येथील एमआयडीसी परिसरात स्थित वर्ल्डवन एनर्जी प्रा. लि. च्या १.२ गिगा वॉट क्षमता सौरऊर्जा उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि २.५ मेगा वॉट क्षमतेच्या हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.संजय मेश्राम आणि डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे आणि राजू पारवे, वर्ल्डवन एनर्जिजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मुर्तजा कोठावाला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्ल्डवन एनर्जी कंपनीने उमरेडमध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकची २५ टक्के ऊर्जा निर्मिती होणार आहे. यासोबतच हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातूनही पर्यावरण अनुकूल ऊर्जा निर्मिती होणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून उमरेड परिसरात एक उत्तम परिसंस्था तयार होणार असून या भागाच्या विकासासाठी हा महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

वर्ल्डवन एनर्जिजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मुर्तजा कोठावाला यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.

००००००

 

 

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...