बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 705

कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी

मुंबई, दि. 27 : शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैल जोडी भेट पाठवली आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात  विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रदर्शित केले होते.

             वृत्ताची दखल घेत मंत्री श्री. मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज श्री. मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.

            दरम्यान मंत्री श्री. मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला, यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टर साठी देखील अर्ज करावा, असे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू; असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह स्थानिक   पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 27 : महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांवरील आढावा बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत सिल्लोड तालुका दूध संघाने महानंदसोबत सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सिल्लोड तालुक्यातील सोयगाव पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.

SPK DGIPR Mantralay Mumbai

तसेच जिल्ह्यातील महसूल आणि पशुसंवर्धन विभागाशी निगडित इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मंत्री श्री. विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व समस्यांचा आढावा घेत त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

या बैठकीसाठी पणन व अल्पसंख्याक विकास विभाग मंत्री अब्दुल सत्तार, महसूल विभागाचे अपर सचिव राजेशकुमार, महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर तर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया उपस्थित होते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ विधिमंडळात सादर

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४ चा अहवाल आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या दुस-या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ही  7.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा  सर्वाधिक  म्हणजे 13.9 टक्के इतका आहे.

            सन २०२३-२४ मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 1.9 टक्के वाढ अपेक्षित असून, ‘उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन 2023-24  मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 40,44,251  कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन 2011-12 च्या स्थिर किमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न  24,10,898 कोटी अपेक्षित आहे. सन 2022-23 मध्ये  दरडोई राज्य उत्पन्न 2,52,389 होते तर सन 2021-22 मध्ये ते 2,19,573 होते.

                 सुधारित  अंदाजानुसार सन २०२३ -२४  करिता राज्याची महसूली जमा  ,८६,११६  कोटी, तर सन २०२२-२३ करिता ४,०५,६७८ कोटी आहे. सुधारीत अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे  ,९६,०५२  कोटी आणि  ९०,०६४  कोटी आहे. सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा ३,७३,९२४ कोटी (सुधारित अंदाजाच्या ७६.९ टक्के आहे)

            सुधारित  अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता राज्याचा महसूली खर्च ५,०५,६४७ कोटी अपेक्षित असून सन २०२२-२३ करिता ४,०७,६१४ कोटी आहे.सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसूली खर्च ३,३५,७६१ कोटी (सुधारित अंदाजाच्या ६६.४ टक्के ) आहे.

             सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४  करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा २५.९  टक्के असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा २३.०  टक्के आहे. सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार  राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण २.८  टक्के,महसूली तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण ०.५ टक्के आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १७.६ टक्के आहे.

            सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार राज्याचा  वार्षिक योजनांवरील खर्च २,३१,६५१ कोटी असून त्यापैकी २०,१८८ कोटी जिल्हा वार्षिक योजनांवरील आहे.

         ३१ मार्च २०२३ रोजी राज्यातील अनुसूचित वाणिज्यीक बॅंकांच्या एकूण ठेवी आणि स्थूल कर्जे अनुक्रमे ३९.२३ लाख कोटी आणि ३८.६७ लाख कोटी होती. दि.३१ मार्च २०२३ रोजी राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण ९८.६ टक्के होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी  अखिल भारत स्तरावर अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकूण ठेवी (२२.० टक्के) व स्थूल कर्जे (२८.० टक्के) यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे.

            सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य २७ टक्के हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचायी योजना – प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत सन २०२२-२३ पर्यंत सुमारे १०.७६ लाख हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आले. सन २०२२-२३ मध्ये या योजनेअंतर्गत १,७३,०४३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५११.९८ कोटी अनुदान जमा करण्यात आले. राज्यात सन २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन सूक्ष्म सिंचन योजना सुरू झाल्यापासून मार्च, २०२४ पर्यंत ३,९५,४३३ शेतकऱ्यांना  ५९३.१५ कोटी पुरक अनुदान वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ मध्ये सप्टेंबर अनुसूचित वाणिज्यीक बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याद्वारे ६०,१९५ कोटी पीककर्ज ९३,९२६ कोटी कृषिमुदत कर्ज वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ पासून पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६,००० वार्षिक अतिरिक्त आर्थिक अनुदान देत आहे. सन २०२३-२४ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ९२.४३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात ५,२८५.२१ कोटी रक्कम जमा करण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये २७.३५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना  ४३०.२४ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले आणि सन २०२३-२४ मध्ये ११.२५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ३६८ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले.

            सन २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा १६ टक्के आहे. मार्च, २०२४ पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक (१९ टक्के) आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्य देशांत सर्वोच्च स्थानी राहिले आहे.

             नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयावतीने प्रकाशित करण्यात आलेला हा अहवाल मराठी व इंग्रजी मध्ये  (1) https://mls.org.in (२) https://www.finance.maharashtra.gov.in           

(३) https://www.maharashtra.gov.in (4) https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून आर्थिक पाहणीच्या ठळक वैशिष्ट्यांची यादी सोबत जोडली आहे :-

०००

वंदना थोरात/विसंअ/

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे, दि. २७ : संपूर्ण महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9  व शेडवर कारवाई करण्यात आली.

पुणे शहरामध्ये तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व शहरातील अनधिकृत पब्ज, बार व अनधिकृत अमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेत, याची सर्वत्र अंमलबजावणी सुरु आहे. ठाण्यात देखील प्रभाग समितीनिहाय असलेल्या पब्ज, बार आदींवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले असून त्यानुसार आजपासून प्रभाग समितीस्तरावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरू करण्यात आली.

वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बार, इंडियन स्वाद बार, अनधिकृत पानटपरी, गुटखा विक्रेते यांचेवर कारवाई करण्यात आली.

वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात असलेल्या द सिक्रेट बार व हुक्का पार्लर तसेच कोठारी कंपाऊंड येथे असलेल्या पब, बारवर कारवाई करण्यात आली. याच परिसरातील सोशल हाऊस पब येथील अनधिकृत बांधकाम व अवैध पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमिती अंतर्गत  ज्ञानेश्वरनगर राजश्री शाहू महाराज विद्यालय येथील 100 मीटर परिसरात असलेल्या तीन टपऱ्या सील करण्यात आल्या, तसेच सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यालय येथील एक पानटपरी जप्त करण्यात आली.

उथळसर प्रभाग समितीतील अनधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली तर राबोडी येथील के.व्हिला शाळेपासून 100 मीटरच्या आतील पानटपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली.

त्याचप्रमाणे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोड येथील खुशी लेडीज बार व ओवळा येथील मयुरी लेडीज बारवर कारवाई करण्यात आली असून पोकलेन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच चितळसर मानपाडा, सिनेवंडर परिसरातील अनधिकृत बार, कापूरबावडी येथील स्वागत बारवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच ए.पी.शहा कॉलेजजवळील अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले ते स्टॉल जप्त करण्यात आले.

नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या अनधिकृत हॉटेल, बारचे बांधकामदेखील जमीनदोस्त करण्यात आले.  कोपरी परिसरात दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले स्टॉल तसेच अनधिकृत स्टॉल यांची तपासणी  करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणचे स्टॉल सीलबंद करण्यात कारवाई करण्यात आली. या ठिकाणची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत.

कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दिवा प्रभागसमिती अंतर्गत संपूर्ण विभागाचा सर्व्हे करुन शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेल, बार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली.

प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ1 चे उपायुक्त  मनिष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बंदोबस्तात, महापालिकेच्या सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत हॉटेल, पब्ज, बार तसेच पानटपऱ्या पूर्णपणे निष्कसित होईपर्यत सदरची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी यावेळी दिली.

नाशिकच्या कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठीची आवश्यक कार्यवाही गतीने करा

मुंबई, दि. २७ :–  नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामधील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान तीर्थक्षेत्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. येथे नवरात्र उत्सवासह वर्षभर देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.  या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळातील समिती कक्षात श्री जगदंबा देवस्थान (ता. येवला) तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, ग्रामविकास विभागाचे सहसचिव काळू वळवी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान येथे नवरात्र उत्सवात विविध भागांतून येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असते. भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसराच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने त्रुटींची पूर्तता करून घेऊन नियोजन विभागाकडे पाठवावा. नाशिकच्या पालकमंत्र्यांनीदेखील याबाबतची बैठक घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 27 : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर अभ्यासक्रमासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवाही देत असतात. अशावेळी या डॉक्टरांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी, याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी भविष्यात चंद्रपुरात नर्सिंग, डेंटल आणि पॅरामेडिकल कॉलेज आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रणय गांधी, निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड) डॉ. अक्षय वाघमारे, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. प्रशांत मकदूम आदी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष देऊ, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, 175 सुरक्षा रक्षकांचे 1 कोटी 44 लक्ष 51 हजार 439 रुपये 30 मे 2024 रोजी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला देण्यात आले आहे. उर्वरीत रक्कम सुरक्षा मंडळाला त्वरित देण्यात येईल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीकरीता 450 सुरक्षा रक्षकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांचा निधी राज्य शासनाने थेट महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे देण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णासोबत एक नातेवाईक असा नियम आहे. याबाबत रुग्णालयाकडून पास सुध्दा वितरीत करण्यात येते मात्र ब-याचवेळी नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती जर दारु पिऊन असेल तर त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यासाठी 33 कोटी 65 लक्ष रुपयांचा फर्निचरचा प्रस्ताव आणि 42 कोटी 79 लक्ष रुपयांचा अत्याधुनिक साधनसामुग्रीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये चांगल्या कंपनीचे फर्निचर लावा.

निधीची वाट बघणार नाही : विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सामान्य रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, त्यांची स्वच्छता व शुध्दीकरण व इतर मुलभूत सुविधांसाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता जिल्हा नियोजन समिती आणि खनिज विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील, असा विश्वास देत येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. महिला रुग्णालय त्वरीत सुरू करण्याचे तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

मुंबई, दि.27 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची आज घोषणा केली. विधानसभा सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ.किरण लहामटे, समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ

विधानपरिषदेत सभापती तालिका नामनिर्देशित

मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  सभापती तालिकेवरील सदस्यांची नावे जाहीर केली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, डॉ. मनीषा कायंदे यांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित केल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केले.

000

संध्या गरवारे/विसअं

वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात

मुंबई, दि. 27: राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/वि.स.अ

विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली

मुंबई,दि.27- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव सादर केला.

दिवंगत माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेवराव गाडे,  सदस्य मधुकर यशवंत देवळेकर, मधुकर शामराव वासनिक, वसंत पुरुषोत्तम मालधुरे, बळवंतराव गणपतराव ढोबळे या दिवंगत सदस्यांना यावेळी उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

0000

वंदना थोरात/वि.सं.अ

 

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...