बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 704

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २८:  राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या  विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४- २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील महिला, बेरोजगार युवक-युवती यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलीना व्यावसायिक शिक्षण मोफत, पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प, शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण, एकूणच दुर्बल घटकाचे दारिद्रय नाहीसे करण्यासाठी केलेला निश्चय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. विशेषत: महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण यामुळे राज्य शासनाने महिलांप्रती बांधिलकी व्यक्त केली आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहे हेही या अर्थसंकल्पातून दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की “गाव तेथे गोदाम” या नवीन योजनेमुळे धान्य साठवणुकीचा प्रश्न निकाली निघेल. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार अर्थसहाय, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, मागेल त्याला सौर उर्जा पंप या योजना देखील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणतील.

जागतिक वारसा नामांकनासाठी  पंढरपूर वारी, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्याचा तसेच रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णयही महत्त्वाचा आणि आपल्या संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये, “निर्मल वारी” साठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-  आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी  मार्गावरील  सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी,  मोफत औषधोपचार करण्याची केलेली घोषणा म्हणजे आमची वारकरी संप्रदायाप्रती भक्तिभावाचे उदाहरण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्राधान्य क्षेत्रात आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याने गुंतवणुकीबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की  मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रशिक्षण मिळणार आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये “सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन करण्यात येणार असल्याने त्याचाही युवा वर्गाला मोठा फायदा होईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत अर्थसहाय्य वाढविणे, विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधण्यासाठी तरतूद करणे, दिव्यांग व्यक्तींसाठी “धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना यामुळे दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी राज्य शासनाने खंबीर पाऊले टाकली असल्याचे स्पष्ट होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत २३ हजार किमी रस्त्यांची कामे, महापालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविणे, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायत कार्यालये बांधणे व इतरही प्रमुख पायाभूत्त सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असल्याने राज्याचा झपाट्याने विकास होईल, असेही ते म्हणाले.

०००

विधानसभा प्रश्नोत्तरे

वाळू धोरणामध्‍ये सुलभता येणार– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि.२८ : राज्यातील जनतेला  सहज व स्वस्त दरात वाळू उपलब्‍ध होण्‍यासाठी शासन वाळू धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. या धोरणामध्‍ये अधिक सुलभता आण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, या धोरणातील बदलाबाबत काही सूचना आल्‍यास त्‍यांचा स्वीकार करून धोरणात सुधारणा करण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, नाना पटोले, राजेश टोपे, यशोमती ठाकूर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

महसूल मंत्री  श्री. विखे पाटील म्हणाले की, वाळू व्‍यवसायातून गुन्‍हेगारीकरणही वाढले. सर्वसामान्‍य  माणसाला होणारा त्रास कमी व्‍हावा म्‍हणूनच या सभागृहात चर्चा करुन, सर्वकष असे वाळू धोरण सरकारने आणून त्‍याची अंमलबजावणी सुरु केली. या धोरणाबाबत अजूनही सर्वांशी संवाद साधून, तज्‍ज्ञांची चर्चा करुन या धोरणात अधिक सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मागील पाच ते सहा वर्षांची आकडेवारी पाहिली असता नवीन वाळू धोरणामुळे राज्याच्या महसूल उत्‍पन्‍नात कुठेही नुकसान झालेले नाही. यामुळे वाळूच्या धोरणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्‍याचे निर्माण केलेले वातावरण निराधार आल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

वाळू व्‍यवसायातील गुन्‍हेगारीकरण थांबविण्‍यासाठी शासनाचा प्रयत्‍न  आहे.  महसूल आधिकारी, कर्मचा-यांवर होणा-या हल्‍ल्‍यांबाबतही जिल्‍हाधिका-यांना कारवाईचे सर्व अधिकार देण्‍यात आले असल्‍याचेही मंत्री श्री. विखे  पाटील यांनी सांगितले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत करणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. २८: राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार  ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची मदत शासन एन.डी.व्ही.आय  (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत करणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तासात दिली.

अवकाळी पाऊस नुकसानाबाबत सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नुकसानाबाबत मदतीचा ४९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झाला आहे.  याबाबत ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस्ताव  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून एन.डी.व्ही.आय चे निकष तपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मागणीनुसार  15 जुलै 2024 पर्यंत मदत करण्यात येईल. तसेच फळबागांच्या नुकसानाबाबतही मदत देण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ/

राज्याचा ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात सादर

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती, राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा, ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नवी मुंबईत महापे येथे जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची निर्मिती, सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती, बारी समाजासाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन, महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अशा अनेक निर्णयांचा समावेश असलेल्या, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी  वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातंच जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या ‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले… उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे | ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर… ऐसा विटेवर , देव कोठे || ऐसे संतजन ,  ऐसे हरिचे दास… ऐसा नामघोष , सांगा कोठे |  तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें… पंढरी निर्माण, केली देवें… ||’ या अभंगाने केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सादर केलेल्या 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात  एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसूली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये तर, महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. वार्षिक योजना कार्यक्रम खर्चासाठी एक लाख 92 हजार कोटी रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेकरीता 15 हजार 360 कोटी रुपये तसेच जिल्हा वार्षिक योजनेसाठी  18 हजार 165 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. महसुली तूट 20 हजार 51 कोटी रुपये, राजकोषीय तूट 1 लाख 10 हजार 355 कोटी रुपये आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, “स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी” हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बी-बियाणांसाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादीबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. “नमो शेतकरी महासन्मान निधी योजने” अंतर्गत आजतागायत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. “एक रुपयात पीक विमा योजने” अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने” अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने” अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. यासाठी चालू अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद; व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट, मुद्रांक शुल्क दंडात कपात, मुद्रांक शुल्क परतावा आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सुट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे १२ हजार जवानांना होईल.

नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रक्कमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २% वरुन १% करण्यात येणार. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :  

          दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी  राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, आता सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

          केंद्र सरकारच्या पहिल्याच मंत्रीमडंळ बैठकीत वाढवण बंदर प्रकल्पाला मंजूरी-एकूण किंमत 76 हजार 200 कोटी रुपये -10 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती.

          अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदतीवर भर.

वारकरी बांधवांसाठी…

          पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव.

          पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये.

          ‘निर्मल वारी’ साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी.

          मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी  मार्गावरील  सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी,  मोफत औषधोपचार.

महिलांसाठी विविध योजना

          सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची  सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये.

          ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी.

          दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक.

          पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी.

          “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये.

          राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये.

          रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका.

          जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर.

          ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला  घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ.

          लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ.

          महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट.

          महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे  राज्यात आयोजन.

          ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती.

          मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित. ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती.

          या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार.

शेतकऱ्यांसाठी विविध योजना

          नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत.

          नोव्हेंबर – डिसेंबर, २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २4 लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटी रुपयांची मदत.

          नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत.

          खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू.

          नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू.

          ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान.

          ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा.

          ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप.

          ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये  अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत.

          नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6 हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबविण्यात येणार.

          मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख  रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना लाभ.

          विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्हयातील केशरी शिधापत्रिकाधारक 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा.

          राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात २ लाख 14 हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1 हजार 239 कोटी  रुपये अनुदान.

          ‘गाव तेथे गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती.

          कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी.

          आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी.

          खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य.

          कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान.

          कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी.

          खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांप्रमाणे 1 हजार 350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान.

          नोंदणीकृत 2 लाख 93 हजार  दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले  अनुदानही त्वरित वितरीत करणार.

          दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार.

          पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’.

          शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन  देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प.

          मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी  50 कोटी रुपये निधी.

          अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान .

          राज्यातील पडीक जमीनीवर मोठया प्रमाणात बांबूची लागवड – नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड.

          वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी-  नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये,  कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7 लाख 50 हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये अशी वाढ , शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये वाढ.

          सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम- 108 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता -दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- सुमारे 3 लाख 65 हजार हेक्टर सिंचन क्षमता.

          महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम- 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे 4 लाख 28 हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ.

          विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य.

          म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प – अंदाजित किंमत एक हजार 594 कोटी रुपये- सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकरी कुटुंबांना लाभ.

          स्वच्छ व हरित उर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय  उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण -४ हजार 200 कोटी रुपये खर्च.

          वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प- नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ.

          कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार 200 कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम.

          जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत  मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.

          ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. 6 हजार शेतकऱ्यांना  लाभ.

          मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.

युवा वर्गासाठी विविध योजना

          मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना- दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन -दरवर्षी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च.

          शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण.

          जागतिक बॅंक सहाय्यित 2 हजार 307 कोटी रुपये किमतीचा ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान. आणि कौशल्य विकास’ – 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण.

          मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता.

          पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड.

          ‘स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी’ मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित – ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन – 15 ते 45 वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण.

          आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),  महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2 लाख 51 हजार 393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण- 52 हजार 405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त.

          संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी.

          शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद.

          अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठीदेखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना  लागू.

          इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता.

          गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतीगृहे स्थापन करण्यास मंजूरी.

          राज्यात सध्या असलेले 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टरचे प्रमाण  सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100 हून अधिक करण्यासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये  आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये  स्थापन करण्यास मान्यता.

          मौजे सावर, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता , बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ.

          थ्रस्ट सेक्टरमधे अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुतंवणुक- 50 हजार रोजगार निर्मिती.

          हरित हायड्रोजन- २ लाख ११ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक- ५५ हजार ९०० रोजगार निर्मिती

          महापे, नवी मुंबई येथे 25 एकर जागेवर ‘इंडिया जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क’ नियोजित- 2 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश-50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – एक लाख रोजगार निर्मिती.

          एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028- पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक-5 लाख रोजगार निर्मिती.

          खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी लघु-वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार.

          सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हींग केंद्र- 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित – 800 स्थानिकांना रोजगार.

दुर्बल घटकांसाठी विविध योजना

          ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्य्र नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय.

          संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन  योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या  दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ –  सन 2023-24 मध्ये 45 लाख 60 हजार लाभार्थींना  7 हजार 145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप.

          पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना.

          नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद.

          दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ – पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरकुल बांधणार.

          दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार.

          तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ.

          धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी  खारघर, नवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड.

          महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना.

          मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये.

          महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू.

          आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये – एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध.

          ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’  ३४७ ठिकाणी कार्यान्वित.

          पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी.

          प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल बांधण्यात येणार.

          सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरीता 7 हजार 425 कोटी रुपयांची तरतूद.

          बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन.

          सन 2024-25 साठी  स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद.

पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना

          मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता -127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका   वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार.

          शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम  डिसेंबर 2025 अखेर  पूर्ण करण्यात येणार.

          ठाणे किनारी मार्ग- लांबी 13.45 किलोमीटर – 3 हजार 364 कोटी रुपये किमतीचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित.

          प्रधानमंत्री ग्रामसडक योजना- तिसऱ्या टप्पा-सुमारे 6 हजार 500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारणांचे उद्दीष्ट -2 हजार 303  किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण.

          मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 23 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार.

          भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद.

          संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच  अंमलबजावणी.

          19 महानगरपालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येणार.

          ‘ड’ वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी 615 कोटी रुपयांची योजनाराबविण्यात येणार.

          धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या मुंबई, नंदूरबार, नांदेड, वर्धा, अमरावती आणि कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी तसेच अस्तित्वातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी 125 कोटी रुपयांचा निधी.

          मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2 हजार 567 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे.

          जागतिक वारसा नामांकनासाठी  शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला,  कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव  याबाबतचे प्रस्तावही पाठविण्यात येणार.

          शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार.

          वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प.

          सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर.

          कल्याण-नगर मार्गा माळशेज घाटात सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक व्ह्युईंग गॅलरी उभारण्यात येणार.

          नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात २११ कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार.

          अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे स्मारकासाठी पावडदौना, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे विकास 77 कोटीचा आराखडा तयार करणार.

          संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार.

          कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार.

          बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशिय सभागृह उभारण्याकरीता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ,बोरगाव-काळे तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार.

          छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा, जिल्हा सांगली येथे त्यांचे स्मारक उभारणार.

          संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार.

            आदिवासी कलांचे प्रदर्शन, वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हतगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादालन स्थापन करण्यात येईल.

          मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ३०५ कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता.

          जिल्हास्तरावर संस्थात्मक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी ‘महास्ट्राईड’ हा 2 हजार 232 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणार.

          मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना- राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या  शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार- 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार.

          राज्यातील सर्व योजनांचे लाभ पात्र लाभार्थींपर्यंत थेट पोहोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार.

एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी

          सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना 18 हजार 165 कोटी रुपयांचा नियतव्यय

          वार्षिक योजना २०२४-२५ मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख 92 हजार कोटी रुपये

          अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेकरीता 15 हजार 360 कोटी रुपये नियतव्यय

          सन 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद

          महसूली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये,महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये

          महसूली तूट 20 हजार 51 कोटी रुपये, राजकोषीय तूट 1 लाख 10 हजार 355 कोटी रुपये

०००

सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे  सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.

चिल्ड्रेन एड सोसायटीतील उन्हाळी सुट्टीत घरी न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरांच्या आयोजनाचा उपक्रम राज्यभर राबवावा

मुंबई, दि. 28 :- महिला व बाल विकास विभागाच्या चिल्ड्रेन एड सोसायटीमधील जे विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत घरी जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरांचे आयोजन करावे. त्याचप्रमाणे हा उपक्रम राज्याच्या सर्व विभागात राबविण्यात यावा, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वी, 12वी तसेच व्यवसाय प्रशिक्षणात उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पॅराऑलिंपिक खेळामध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूचा सत्कार मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज  चिल्ड्रेन  एड सोसायटी, माध्यमिक शाळा, मानखुर्द येथे करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याला  विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, मुख्याधिकारी बापूराव भवाने, प्रकल्प बालविकास अधिकारी श्रीमती प्रेमा घाटगे, शरद कुऱ्हाडे तसेच इतर अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यातील कोकण विभाग आणि विशेषतः दहावी, बारावीतील विद्यार्थिनी ह्या नेहमी परीक्षेत अव्वल असतात, असे सांगून मंत्री कु.तटकरे यांनी सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

000

संजय ओरके/विसंअ/

विधानपरिषदेच्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शोकप्रस्ताव

मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेचे माजी दिवंगत सदस्य गंगाधर गाडे, मधुकर वासनिक, मधुकर देवळेकर,  वसंत मालधुरे आणि बळवंतराव ढोबळे यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत शोक प्रस्तावाद्वारे दुःख व्यक्त केले. या माजी सदस्यांना सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिवंगत माजी सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. गंगाधर गाडे यांच्याबाबत बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, श्री.गाडे यांनी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नोव्हेंबर 1999 ते एप्रिल 2000 या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. मधुकर देवळेकर यांच्याबाबत संवेदना व्यक्त करताना उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, श्री.देवळेकर हे 1978 ते 1982 मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर काम केले होते. ते अत्यंत निस्पृह सदस्य होते.

डॉ.मधुकर वासनिक यांच्या कार्याचा गौरव करताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की डॉ.वासनिक हे नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून नागपूर पीपल्स वेल्फेअर सोसायटी व पंचशील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. सन 1990 मध्ये विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून ते निर्वाचित झाले होते. वसंत मालधुरे यांच्याबाबत भावना व्यक्त करताना, श्री.मालधुरे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी विदर्भातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष योगदान दिले होते. सन 1990 साली अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर ते निर्वाचित झाले होते, अशी माहिती उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिली. बळवंतराव ढोबळे यांच्याविषयी बोलताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, श्री.ढोबळे हे नागपूर महानगरपालिकेत अनेक वर्ष सदस्य होते. नागपूर मधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून 1998 साली ते विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२७: महाराष्ट्र विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत वि.स. पागे, जयंतराव टिळक, रा.सू. गवई अशा अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या विचारांची परंपरा लाभलेली असून या सभागृहाच्या माध्यमातून संसदीय आयुधांचा वापर करून सदस्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्वश्री सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे पाच सदस्य २१ जून २०२४ रोजी निवृत्त झाले. या निवृत्त झालेल्या सदस्यांना आज विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वरिष्ठ सभागृहाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाचा लौकिक वाढवला, पावित्र्य जपले. विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्यांनी आपापल्या भागाचे प्रतिनिधित्व करून त्या भागातील समस्यांना न्याय मिळवून दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी निवृत्त झालेल्या सदस्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. विचारमंचाचे सभागृह आहे. विविध वैचारिक चर्चा या सभागृहात होतात. मर्यादित सदस्य संख्या असल्यामुळे त्यांच्या विचाराला या ठिकाणी वाव मिळतो. त्यामुळे सदस्यांना मत मांडण्यासाठी वेळ मिळतो. सदस्य आपले विचार सविस्तर मांडून जनतेला न्याय देण्याचे काम करू शकतात. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी या सभागृहात उत्कृष्ट असे काम केले असल्याचे सांगून त्यांनी सर्व सदस्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व निवृत्त होणाऱ्या सदस्यांचे सभागृहातील कामगिरी, योगदानाबद्दल अभिनंदन केले. विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे वेगळे महत्त्व आहे. या महत्त्वाच्या सभागृहात काम करून सभागृहात जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठीचा अनुभव आल्याने भविष्यात अधिक उत्तम काम आपल्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जनतेबद्दलची तळमळ त्यांना नक्कीच पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि राजकीय व सामाजिक कार्यामध्ये यापुढेही त्यांची प्रगती होत राहील, असे त्यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व निवृत्त सदस्यांचे सभागृहाच्या कामकाजात सहकार्य मिळाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, उपसभापती म्हणून सभागृहात कामकाज पाहत असतांना सदस्यांच्या स्वभावाची जाणीव होते. कोण सभागृहात बोलतात, कोणाला बोलायला देणे आवश्यक असते हे लक्षात आले. सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया या सर्व सदस्यांचे सभागृहातील योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः नरेंद्र दराडे यांनी तालिका सभापती म्हणून दिलेले योगदान नेहमी लक्षात राहील, असे त्या म्हणाल्या.

प्रत्येक निवृत्त सदस्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांनी यावेळी निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या. निरोप समारंभ का महत्त्वाचा असतो, हे सांगताना त्यांनी कै. प्रमोद नवलकर यांचा निरोप समारंभ राहिल्याची आठवण करून दिली. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विधानपरिषदेचे नियम, कार्यकाळ आणि सदस्य निवड यांविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह निवृत्त होणारे सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे यांनी आपला अनुभव कथन केला. तर आमदार राजेश राठोड, डॉ.मनीषा कायंदे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार डॉ.सत्यजित तांबे यांनी केले. समारंभानंतर उपस्थित सर्वांचा विधिमंडळाच्या प्रांगणात एकत्रित फोटो काढण्यात आला.

00000000

विधानसभा निवडणूक : मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

मुंबई, दि. २७ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने  दि.१  जुलै २०२४  या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात २५ जूलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

कार्यक्रमाचे टप्पे

पुनरिक्षण – पूर्व उपक्रम– यामध्ये दि. २५ जून  ते २४ जूलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी , मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण.

मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ.  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे,  नमुना १-८ तयार करणे, ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे हे कामकाज  करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण उपक्रम

या अंतर्गत दि. 25.07.2024 (गुरूवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील. तर  दि.25.07.2024 (गुरूवार ) ते दि. 09.08.2024 (शुक्रवार )दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहील. विशेष मोहिमांचा कालावधी यामध्ये दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत,मुख्य निवडणूक अधिकारी, यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार आहे. (i) दावे व हरकती निकालात काढणे

(ii) अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, (iii) डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 19.08.2024 (सोमवार) पर्यंत असून दि.  20.08.2024 (मंगळवार) रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

घरोघरी भेट देऊन पडताळणी

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, 2024 अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती गोळा केलेली आहे. तथापि, येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 मध्ये काही नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत. यामुळे आता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25.06.2024 ते 08.07.2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, 2024 दरम्यान शिल्लक राहिलेल्या घरांना गृह भेटी देणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा सार्वत्रिक निवडणूका, 2024 मध्ये मतदार यादीत नावे आढळून न आल्याबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे गृहभेटी देतील. त्या गृहभेटी दरम्यान पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल :-  नोंदणी न केलेले पात्र मतदार (०१ जुलै, २०२४ रोजी पात्र), तसेच  एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/ कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती या प्रमाणे कामकाज करण्यात येईल.

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण

याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि.20 जून 2024 च्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचना विचारात घेवून करण्यात येणार आहे. याद्वारे मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रे निवासाच्या जवळ ठेवण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहे.

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणादरम्यान अति ऊंच इमारती/हौसिंग सोसायटी समूह जेथे सामान्य सुविधा असलेली जागा किंवा सभागृह त्या इमारतीच्या परिसरामध्येच तळमजल्यावर उपलब्ध आहे अशी ठिकाणे, शहरी भागातील झोपडपट्टी तसेच विस्तारीत होणारे शहरी /निम शहरी भाग यामध्ये नविन मतदान केंद्र प्रस्तावित करण्याबाबत योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

सर्व कुटुंब एकाच ठिकाणी आणि शेजारी हे एकाच विभागात असतील आणि मतदार यादीत व मतदार ओळखपत्रात एकसमानता यावी अशाप्रकारे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमात मतदार ओळखपत्र (EPICs) संदर्भातील १०० % त्रुटी दुर करण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यांचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाही, असे होऊ नये, यासाठी पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25 जुलै ते 9 ऑगस्ट, 2024 या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी, त्यांचे नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशिल बरोबर आहे का ते तपासून घेऊन, त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत तो तपशील दुरुस्त करुन घ्यावा. यातून मतदार यादी अधिकाधिक बिनचूक होण्यास मदत होईल. दि.1 जुलै, 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत मतदार म्हणून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकतात. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची ही महत्वाची संधी असल्याने पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करावी. मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी व नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी किंवा मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी पुढील दोन ऑनलाईन पर्यायांचा वापर करु शकता.

मतदार सेवा पोर्टल – http://voters.eci.gov.in/  ,  त्याचप्रमाणे वोटर हेल्पलाईन ॲप त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट देऊनही प्रत्यक्ष अर्ज भरता येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या दि.20.06.2024 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार दि.01.07.2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवार दि.25 जून, 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मतदार यादी सर्वसमावेशक व त्रुटी विरहीत करण्यावर आयोगाचे कायम लक्ष केंद्रीत आहे.  कोणताही पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून तसेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहू नये अशी आयोगाची भावना आहे. सबब त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे, जर आतापर्यंत नावनोंदणी झाली नसेल तर नावनोंदणी करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

******

वंदना थोरात/विसंअ/

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २७ : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत शुल्क चलन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी siac.org.in मधील SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET २०२४-२५ नोंदणीसाठीची लिंक मधील REGISTRATION NOW ला जाऊन प्रवेश अर्ज नोंदणी करावी. तसेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण २०२५ च्या अधिक माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी  दिलेल्या   मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सामाईक प्रवेश परीक्षा समनव्यक संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले आहे.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, अंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र, अंबरनाथ, ठाणे महानगर पालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे ई. केंद्रामधील प्रवेश परिक्षेसाठी सन २०२४ च्या अंतिम वर्षात पदवीला बसलेले व यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि  जाहीरातीतील नमुद इतर अटी शतीर्ची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून  नागरी सेवा पूर्व परीक्षा निःशुल्क प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

ही सुधारीत परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सात (मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर) केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

याकरिता  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची  मुदतवाढ १ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधीत आणि दिनांक २१ जुलै २०२४ पर्यत परीक्षा शुल्क चलन भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

पोषण आहार प्रतिलाभार्थी दरात वाढ करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट

मुंबई, दि. २७ : बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षांखालील बालकांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना  पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रतिलाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते, त्यामध्ये वाढ करून १२ रुपये मानधन देण्यात यावे  अशी विनंती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन केली.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पोषण आहार प्रतिलाभार्थी १२ रुपये  दरवाढ दिली तर  बालकांना चांगला आहार आणि बचतगटांना आर्थिक मदत होईल. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिस्सा प्रमाणे  केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येईल.

विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार ८४ अंगणवाड्यांची मागणी असून यासाठी  मान्यता देण्याबाबतचा  प्रस्तावही  केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे  मंत्री तटकरे यांनी दिला. तसेच अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रण साधने ( Growth monitaring Devices)   वापरण्यात येत आहेत. ती जुन्या पद्धतीची असून आयआयटीने विकसित केलेले अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने  उपलब्ध करून देण्यात यावीत. या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभता, अचूकता येईल आणि वेळेची बचतही होईल. महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो  तो तातडीने देण्यात यावा. अशी विनंतीही मंत्री कु. तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली.

नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते. अशावेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी  केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...