गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 700

विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

मुंबई, दि. २ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आज मर्यादित २० षटकांच्या विश्व करंडक स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला होता.

नुकत्याच पार पडलेल्या नवव्या मर्यादित २० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात बर्बाडोस येथील किंग्सटन ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारताने पराभव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

००००

निलेश तायडे/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २ : कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते देण्यासाठी महामंडळाला शासनाकडे मदत मागायची गरज पडू नये यासाठी महामंडळाला अधिकाधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

एसटी महामंडळाबाबत सदस्य कृष्णा गजबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, महामंडळाच्या ताफ्यात ५,१५० नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार सर्व आगारांना बस देण्यात येत आहेत. बी. एस. मानकाच्या २ हजार ४२० बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच १ हजार जुन्या डिझेल बस सीएनजीवर आणि ५ हजार बस एलएनजी (लिक्विड नॅचरल गॅस ) वर रूपांतरित करण्यात येत आहे. यामुळे डिझेल व दुरुस्तीवरील खर्चात बचत होणार आहे. शासनाने महामंडळाला विद्यार्थी प्रवास सवलत योजनेपोटी ८३७ कोटी, अमृत ज्येष्ठ नागरिक विनामूल्य प्रवास सवलत योजनेसाठी १ हजार १२४ कोटी, महिला सन्मान योजनेकरिता १ हजार ६०५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक अमृत योजना आणि विद्यार्थी प्रवास सवलत योजना यामधून शासन महामंडळाला प्रतिपूर्तीपोटी कोट्यवधींचा निधी देत आहे.

महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १०  तारखेच्या आत करण्यात येत आहे. मागील काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर शासनाने आंदोलनकर्त्यांसमवेत समवेत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे आंदोलन स्थगित झाले. शासनाने वेतन, भत्ते, वेतनवाढ, बोनस, महागाई भत्ता याबाबत मागण्या पूर्ण करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या समितीने अहवाल दिल्यानंतर अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या प्रश्नावरील चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, बच्चू कडू, रोहित पवार, विश्वजित कदम यांनी भाग घेतला.

०००

निलेश तायडे/विसंअ/

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील  पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, किशोर जोरगेवार यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सध्या ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला 15 दिवसांत उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

महाड शहरातील चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती मंत्री श्री.सामंत यांनी सभागृहात दिली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता १ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ जुलै २०२४ ते ३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आयोगाने कळविले आहे.

या परीक्षेमधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तथापि दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही.

यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करूया- मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि. २: आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन  ‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

वानवडी येथे कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले,  कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजना,  कौशल्याबाबतचे ज्ञान व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यादृष्टीने कौशल्य विकास दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ५ हजार विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

कौशल्य विकासात राज्य अग्रेसर रहावे, युवकांनी कौशल्य आत्मसात करावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी  राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्याने कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येतील. या केंद्रांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना, उपक्रम राबविले जातात याची माहिती वारीतील वारकऱ्यांना, नागरिकांना व्हावी, हादेखील या दिंडीच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळांच्या साथीने विठूनामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली.

कौशल्य विकास दिंडीचे आषाढी वारी सोबत भैरोबा नाला ते गाडीतळपर्यंत आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा  सहभाग होता.

०००

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नाशिक, दि, २ (विमाका वृत्तसेवा): नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार श्री. दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची  32 हजार 309 मते घेत नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर श्री. संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये  जिंकून येण्यासाठी 31 हजार 576 इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची  5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा., जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल , जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर,  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

०००

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी घोषित-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  11 हजार 598  मते वैध ठरली तर 402  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83  मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

0000

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी – विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार  226 मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  66 हजार 036  इतक्या मतांचा  कोटा ठेवण्यात आला.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719

2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस  :- 28 हजार 585

3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  :- 536

4) अमोल अनंत पवार, अपक्ष  :- 200

5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310

6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302

7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  :- 424

8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64

9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215

10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33

11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष  :- 208

12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष  :- 334

13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष  :- 141

पहिल्या पसंतीची  1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार  निरंजन वसंत डावखरे  हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

भुशी धरण धबधबा दुर्घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे            

मुंबईदि. : लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहाने एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या घटनेत मार्गदर्शक तत्वानुसार कर्तव्य न बजावणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावीअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावीअसेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या हडपसर येथील अन्सारी कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्देवी आपत्तीची दखल डॉ.गोऱ्हे यांनी घेतली असून आपद्ग्रस्त कुटुंबास मदत पुरविण्यात यावी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात यावेअसे निर्देशही त्यांनी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना दिले आहेत.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

हरित महाराष्ट्र करणे हीच वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. १ : गेल्या काही वर्षांत तापमान वाढपर्यावरण असमतोलअवेळी पाऊस असे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील हरित महाराष्ट्र व्हावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हरित आच्छादित महाराष्ट्र हीच वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कृषी दिन, वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलआमदार निलय नाईकआमदार राजेश राठोडआमदार इंद्रनील नाईकराहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटीलप्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवालेसचिव दीपक पाटीलविश्वस्त डॉ. आनंद पटवर्धनमुश्ताक अंतुर्ले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या योगदानाशिवाय देशाचा किंवा महाराष्ट्राचा उत्कर्ष अशक्य आहे. शेतकरी हा अन्नदाता आहेअसे मानणारे राज्य शासन असून त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शेतकरी पुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचीकष्टाची जाणीव होती. अन्नधान्याच्या टंचाईत त्यांनी विविध योजना राबविल्या. संकरित ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले.  त्यांनी हरित क्रांतीचे स्वप्न पाहिले. हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने मिशन बांबू लागवड सुरू केले आहे. बांबू हे हिरवे सोने असून त्यापासून विविध उत्पादने तयार केले जातात. त्यामुळे राज्यात एकूण २१ लाख हेक्टर क्षेत्रात बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषात बदल केले. शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दुप्पट केली. दोन हेक्टर क्षेत्राऐवजी तीन हेक्टर क्षेत्राचा निकष लागू केला. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानालाही भरपाई मंजूर केली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर सहा हजार रुपयांची मदत सुरू केली. अर्थसंकल्पात सात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल माफ केले आहे. शासनाने विविध निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याबरोबर तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीवसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे. वसंतराव नाईक यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना देशाला मार्गदर्शक ठरली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्यात येतो. त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी पुरस्कार विजेत्यांपासून प्रेरणा घेत अन्य शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करतीलअसा विश्वास मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बारवाले यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले.

प्रतिष्ठानचे पुरस्कार विजेते असे : वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार- श्री कन्हय्यालाल बहुउद्देशीय संस्थारोहोडता. साक्रीजि. धुळे. वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कास्ट प्रकल्पराहुरीजि. अहमदनगर. वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार- कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत बी. कलंत्रीनागपूर. वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार- श्रीकांत कुवळेकरमुंबई. वसंतराव नाईक कृषी निर्यात पुरस्कार- लुकमान इस्माईल शेखअंतुर्लीता. मुक्ताईनगरजि. जळगाव. वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार- भीमराव कडूपार्डी- देशमुखता. कळमेश्वरजि. नागपूर. वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कारमधुकर ईश्वरदास गवळीमु. पो. उगावता. निफाडजि. नाशिक. वसंतराव नाईक दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार- श्री. दगडू व सौ. कविता लोखंडेमु. पो. बेवणूरता. जतजि. सांगली. वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार- वैजिनाथ घोंगडेमु. पो. वाडेगावता. सांगोलाजि. सोलापूर. वसंतराव नाईक जैवविविधता संवर्धन पुरस्कारबोरगड राखीव वनसंवर्धन क्षेत्रबोरगडजि. नाशिक (राजेश कुरुपअनमल खान). वसंतराव नाईक आधुनिक फुल शेती पुरस्कार- डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटीलपुणे. वसंतराव नाईक आधुनिक कृषी यंत्र निर्मिती स्टार्टअप पुरस्कार- अजित खर्जुलमु. पो. एकलहरेता. जि. नाशिक. वसंतराव नाईक सामाजिक वनीकरण पुरस्कार- संजीव शशिकांत करपेमु. पो. पिंगुर्लीता. कुडाळजि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम विकास पुरस्कार- मु. पो. परुळे बाजारता. वेंगुर्लाजि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक नावीण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- राहुल अमृता रसाळमु. पो. निघोजता. पारनेरजि. अहमदनगर. वसंतराव नाईक नैसर्गिक शेती पुरस्कार- वासुदेव भास्कर गायकवाडमु. पो. चळेता. पंढरपूरजि. सोलापूर. वसंतराव नाईक कडधान्ये संवर्धन पुरस्कार- शरद सर्जेराव पवारमु. पो. अहिरवाडीता. वाळवाजि. सांगली.

००००

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी – विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

नवी मुंबई, दि. ०१:- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६४ हजार २२२  मते वैध ठरली तर ३ हजार ४२२ मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  ३२ हजार ११२  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :- ४४ हजार ७८४ (विजयी)

2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- १८ हजार ७७२

3) योगेश बालकदास गजभिये  :- ८९

4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- ३९

5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- ११

6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- ४६४

7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- २६

8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- ३७

पहिल्या पसंतीची ४४ हजार ७८४ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

 

000

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...