गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 688

विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत

मुंबई दि.२२- अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

राज्यात २० फेब्रुवारी २०२४ रोजी विशेष अधिवेशनान महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम (एसईबीसी) २०२४ एकमताने संमत करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आणि शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले. याचा फायदा प्रामुख्याने मराठा समाजाला झाला आहे.

एसईबीसी अधिनियमाचा फायदा घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन प्रमाणपत्र सादर करण्यास वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याच्या सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

0000

ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११ कोटी २४ लाख असून त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण १ कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.

योजनेचे स्वरुप: ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेकरिता राज्य शासनातर्फे १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयांच्या लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसें राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष: ज्या नागरिकांची ३१ डिसेंबर २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधारकार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार येईल.

लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असणार आहे. अर्जदारांने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.

पात्र लाभार्थ्यांच्या बँकच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्यावर विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावे. संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करावे.

अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे.

योजनेची अंमलबजावणी: लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी, केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाजकल्याण, पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. ही योजना वृद्धापकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

६५ वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा पुणे-०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ (ईमेल-acswopune@gmail.com) या पत्त्यावर सादर करावा. – विशाल लोंढे सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे

 

 संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा; दोषींवर कारवाई करा

जळगाव दि. 22 ( जिमाका ) – महावितरणच्या तारा चोरीची प्रकरणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा तसेच याला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील 360 जलजीवन योजनेची कामे झाली असून त्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात, तसेच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असेही पालकमंत्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यातील महावितरणच्या प्रश्नासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह ( अजिंठा ) येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हा पोलीस अधिकारी अशोक नखाते, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, महाजनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते.

जिल्हा नियोजनच्या निधी मधून मागील 5 वर्षात सुमारे 1 हजार 400 एवढी विक्रमी रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर ) देण्यात आले.  हे सगळे देऊनही वेळेत कामं होत नसतील तर लोकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते. त्यामुळे महावितरणने आपल्या कामात झपाट्याने बदल करावा आणि जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे पूर्ण करावीत असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या डीपी साठी वितरण पेट्या आणि कट आउट चे प्रस्ताव जिल्हा नियोजनसाठीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, गावागावात तारा लोंबकळत आहेत, त्यामुळे त्या अधिक धोकादायक आहेत. त्या तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. तसेच जीर्ण झालेले पोल बदलण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देऊन जिल्ह्यात वीजेमुळे मयत झालेल्यांना तसेच गंभीर दुखापत झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे असे आदेशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील यांनी महावितरणसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात मंजूर केले आहेत. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन स्थानिक आमदारांना सोबत घेऊन करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

चिचपल्ली येथील नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.२१- संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.

श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

00000

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

oooo

 

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सदैव कर्तव्यदक्ष राहावे – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 20 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : शासन सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करून घेणे हा शासनाचा नियम आहे. आज 17 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती देऊन त्यांचा पोलीस प्रशासन सेवेत प्रवेश झाला आहे. या सर्वांनी शासकीय सेवा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सदैव कर्तव्यदक्ष राहावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन 75 दुचाकी वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह अधिकारी व अनुकंपाधारकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मागील वर्षापासून वेगवेगळ्या शासकीय विभागातून अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत समावून घेण्याप्रती वेळोवळी पाठपुरावा केला असून आजमितीस 700 पेक्षा अधिक उमेदवारांना याचा लाभ प्रदान करण्यात आला आहे. शासन सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, कुटुंबियांना एक आधार मिळावा हाच उद्देश यामागे होता. ज्या उमेदवारांना आज नियुक्ती मिळाली आहे त्यांची समाजाप्रती मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने याचे भान ठेवून पुढील वाटचाल करावयाची आहे. चांगले कर्तव्य निभावल्यास निश्चितच समाजाकडूनही आपले कौतुक होईल यात शंका नाही. पोलीसांचे जीवन धकाधकीचे आहे. त्यादृष्टीने मालेगावच्या धर्तीवर येणाऱ्या काळात पोलिसांना चांगले निवासस्थान मिळण्याच्या दृष्टीने तसेच पोलीसदल सुसज्ज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नवीन वाहनांचा उपयोग निश्चित पोलीस दलास होईल, असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यावेळी  नवनियुक्त अनुकंपाधारक उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच नियुक्ती झालेल्या उमदेवारांनी पोलीस सेवेत जबाबदारीचे काम करावयाचे आहे. कर्तव्याप्रती सदैव जागरूक राहून चांगली सेवा बजवावी, अशा सूचना दिल्या. तसेच आज प्रदान करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा पोलीसांना गुन्हे शोधण्यात नक्कीच उपयोग होईल. परंतु ही वाहने सुस्थितीत राहतील यादृष्टीने त्यांची देखभाल करणे देखील आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यावेळी म्हणाले,  नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या पात्र उमेदवारांना पालकमंत्री दादाजी भुसे  हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलेत. यात  एकुण १६ पुरुष उमेदवार व १ महिला उमेदवार यांचा समावेश आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाकरिता जिल्हा नियोजन समिती निधीमधुन एकूण ४५ हिरो होंडा शाइन मोटार सायकली प्राप्त झाल्या व त्यासाठी एकूण २५ लाख ९५ हजार १५० रूपये इतका निधी प्राप्त झाला होता. तसेच मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ३० बजाज पल्सर १२५ सीसी मोटार सायकल अशा एकूण 75 दुचाकी प्राप्त झालेल्या आहेत. सदर मोटार सायकलचा वापर करून डायल ११२ चे कॉल असतील अथवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जाणार नाही अशा ठिकाणी वेळेत पोहोचुन लोकांना मदत करणे पोलीस दलास शक्य होईल. नवीन कायद्यांची अंमलबजावणी व त्याकरिता आवश्यक असलेली वाहने ही उपलब्ध करून झाल्यामुळे जिल्हयातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मदत करणे व गुन्हेगारीस आळा बसविणेकरीता निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ग्रामीण पोलीस बॅण्ड पथकाद्वारे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन 75 नवीन दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 20 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्ह्यात वाढत्या डेंग्यू आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने मोहीम स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.

संदर्भ रूग्णालय येथे डेंग्यू आजाराबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे. मनपा अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुनीता पीळवदकर, अतिरिक्त जिल्हा शल्याचिकीत्सक डॉ. निलेश पाटील, वैद्यकीय अधिकारी संदर्भ सेवा डॉ.अरुण पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, अतिरिक्त सहसंचालक मलेरिया विभाग डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यात डेंग्यू रूग्णसंख्या 474 वर पोहचली असून ही वाढती संख्या लक्षात घेता, यास वेळीच प्रतिबंध व नियंत्रण करणे ही सर्व आरोग्य यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती तात्काळ नष्ट करणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या निदानासाठी प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी किट, औषधे, गोळ्या व इतर आरोग्य सुविधांची कमतरता भासणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच हा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. शहरासह ग्रामीण पातळीवरही या उपाययोजना राबविण्यात याव्यात. लोकसंख्येच्या घनतेनुसार आवश्यक ठिकाणी सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत औषध व धुर फवारणी करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.

डेंग्यू आजाराबाबत मोहीम स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागासह शिक्षण विभागानेही ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. जनजागृतीसाठी फ्लेक्स, स्थानिक केबल वाहिन्यांवरून माहितीपर स्क्रोल, तसेच आकाशवाणीवरून प्रबोधनपर जिंगल्स यांचा वापर प्रभावी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

डेंग्यू आजाराच्या निर्मूलनासाठी आरोग्य अधिकारी यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्या मार्फत विशेष ड्राईव्ह राबवावा. यासाठी ॲप तयार करावा. लोकेशन ट्रेस केल्यास कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी अधिक जबाबदारीने काम करतील. या कामात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. त्याचप्रमाणे नाशिक व मालेगाव येथे चाचणी लॅबसाठी आठवडाभरात प्रस्ताव पाठविण्यात यावेत. शहरातील सिडको व नाशिकरोड तसेच ग्रामीण भागात दिंडोरी व निफाड भागात रूग्णसंख्या अधिक असल्याने याठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार फवारणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केल्यास त्यांच्याकडून फवारणीसाठी मिनी टॅक्टर उपलब्ध होवू शकतील असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सूचित केले.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संदर्भ रूग्णालयातील इतर आरोग्य सेवाविषयक बाबींचाही आढावा घेतला.

‘धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २०: ‘धडपड भाग २’ या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोगाथा पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली असून हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित  पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अजित इंगवले, लेखक श्याम दौंडकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, धडपड भाग २ या पुस्तकात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील १२९ व्यक्तींच्या कार्याचा समावेश आहे. हे पुस्तक वाचनीय असून त्यामध्ये चिकाटी, जिद्द व ध्येय उराशी बाळगून या व्यक्तींनी यश संपादन केल्याचे पाहायला मिळते.

गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या व्यक्तींच्या संघर्ष कथा श्री. दौंडकर यांनी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी जिल्हा परिषद, ग्रामपंचायती येथील समस्यांचा  अभ्यास करून त्या योग्यरीतीने मांडल्या आहेत. नागरिकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शासनाने तरुण-तरुणी, शेतकरी, माता, भगिनी करिता विविध योजना  आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या लाभाचे वितरण केले जाईल.

महिलांना समृद्ध करणे, त्यांना आत्मबल देणे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे  मुख्य उद्दिष्ट आहे. कुटुंबाचे ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. गरीब व होतकरू लाभार्थ्यांना याचा लाभ होईल. योजना राबविताना त्यात सातत्य राहावे यासाठी भरीव तरतूद केली आहे. विविध लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी ‘चला जगाचा प्रवास करूया’ या सुनिता निराळे यांच्या वाहनाची पाहणी केली.

पीडीसीसी बँकेच्या नूतनीकृत शाखेचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मर्यादित बँकेच्या (पीडीसीसी) नूतनीकृत  जिल्हा परिषद शाखेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक दत्तात्रय येळे, प्रदिप कंद, प्रविण शिंदे, सुरेश घुले, कु. पूजा बुट्टेपाटील, निर्मला जागडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, शाखा व्यवस्थापक प्रतिभा ऊभे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.२०- राज्यातील भगिनींसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.

विधानभवन येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार,  खासदार मेधा कुलकर्णी,  सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख २९ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या २७ जुलै रोजी पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असल्याने भविष्यातही चांगला रोजगार मिळण्यासाठी  याचा उपयोग होऊ शकेल. अनेक उद्योगांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून प्रशिक्षणार्थीची चांगली कामगिरी असल्यास त्याला कायमस्वरूपी रोजगार देऊ असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही योजना युवकांसाठी रोजगारासाठी चांगली संधी आहे, असे श्री.पवार म्हणाले.

बैठकीत जिल्ह्यातील नद्या व धरणातील प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात येईल. एमआयडीसी क्षेत्रातील प्रदूषणाबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. पवना धरण क्षेत्रातील रिसॉर्टमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साखर कारखान्याद्वारे अशुद्ध पाणी नदीत सोडले जाऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, त्यासाठी कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेतही चर्चा करण्यात येईल. लोकप्रतिनिधींनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी दिले.

शहरी आणि ग्रामीण भागात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, पोलिसांनी ड्रोन विरोधक उपाययोजनांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांसाठी प्रस्ताव सादर करावा. खडकवासला धरण परिसरात सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी पीएमआरडीएने उपाययोजना कराव्यात. क्रीडा साहित्य घेतांना ते दर्जेदार असेल याची दक्षता घ्यावी. कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट घ्याव्यात, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून ज्या विकासकामांना निधी मिळत नाही अशी कामे लोकप्रतिनिधी आणि सदस्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून सुचवावी, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत माहिती दिली. एकूण ६४२ अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. एकूण १ हजार ८०० कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम महाविद्यालयाने योजनेसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र बँक खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात येतील. या योजनेच्या समन्वयासाठी स्वतंत्र प्राध्यापक नियुक्त करणे आणि योजनेची माहिती विद्यार्थिनींना देण्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या २५ जुलै रोजी राज्यातील ६  हजार महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार  उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दत्तात्रय भरणे,  दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सुनील शेळके, संग्राम थोपटे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, अतुल बेनके, रवींद्र धंगेकर, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण, गड-किल्ले संवर्धन, पुरंदर आणि जनाई शिरसाई योजना, देहू आणि आळंदी येथे पोलिसांचे निवासस्थान, बिबट प्रवण क्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता

पालकमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२३-२४ मधील मार्च २०२४ अखेर झालेल्या १ हजार ४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १३४ कोटी ९० लाख रुपयांच्या आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५१ कोटी ११  कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  २०२४-२५ मध्ये १ हजार २५६ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १४५ कोटी आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५५ कोटी ८९ लक्ष रुपये नियातव्यय अंतिम करण्यात आला आहे. राज्यस्तर बैठकांमध्ये  पुणे जिल्ह्याकरिता २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये २५६ कोटी ८९ लक्ष एवढा वाढीव निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफी या योजनांविषयी सदस्यांना माहिती देण्यात आली.

नागपूर येथे मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

नागपूर, दि. 20 : नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज दि. 20 जुलै रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळित झाले.  दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सखल भागातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने जनजीवन व वाहतूक पूर्वपदावर आली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा जोर लक्षात घेता तत्काळ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज सकाळी साधारणतः सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले.  जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे स्वत: विविध सखल भागात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महानगरपालिका तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. पावसामुळे सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्वपदावर आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील अनेक भागांना भेटी देऊन पाहणी केली.

नागपूर ग्रामीण भागात पावसाचे पाणी वस्तीमध्ये घुसल्याने अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. कामठी तालुक्यामध्ये खेडी येथे 15 व्यक्ती, पावनगाव येथे 12 व्यक्ती, महलगाव येथे 10 व्यक्ती हे त्यांच्या राहत्या घराच्या परिसराला पाण्याने वेढा पडल्यामुळे अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हिंगणा तालुक्यात वाघधरा येथे 5 व्यक्ती वेणा नदीच्या पुरात अडकली होती. एसडीआरएफ मार्फत या व्यक्तींना सुखरुप स्थळी हलविण्यात आले. कुही तालुक्यात 21 घरांची, भिवापूरमध्ये 16 घरांची तर मौदामध्ये 10 घरांची पडझड झाली. याठिकाणी महसूल विभागाची टीम प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आली असून पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करीत आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
छत्रपती संभाजीनगरमधील मैदान परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक निर्देश  - उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 17 : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मालकीच्या सार्वजनिक...

विधानसभा कामकाज

0
प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. १७ : शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात...

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १७ : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे....

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

0
मुंबई, दि. 17 : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील...

स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी : स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

0
नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण...