बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 608

चिखलदरा पर्यटनस्थळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 16 (जिमाका): विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग, सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. त्‍यामुळे चिखलदऱ्यामध्ये पर्यटकाला अधिक आकर्षक करण्यासाठी पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण करुन देऊ, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसिलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे, सुधीर शेटे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, चिखदऱ्यातील पर्यटकांना व निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आमझरी येथे ‘निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’, गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील ‘निसर्गानुभव मचाण’ व  भीमकुंड येथील ‘साहसी खेळ’ अशा उपक्रमामुळे येथे निश्चितच पर्यटकाच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या महसुल वाढण्यास निश्चितच मदत होईल. पर्यटन स्थळावर मुलभूत सुविधा निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देणाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य द्यावे. या भागात जास्त उत्पादन होणाऱ्या पिकांचे राष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग व ब्रॅन्डिग करुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आराखडा तयार करावा. यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी शेती पिकावरच अवलंबून न राहता जोडधंदाचा पर्याय स्वीकारावा. चिखलदरा क्षेत्रामध्ये पर्यटनाला मोठी संधी असून त्याचा लाभ आदिवासी युवक-युवती व शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार

मुबंई, दि. 16 : होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही  तांत्रिक  अडचणीमुळे  उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी तसेच  मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

000

संजय ओरके/वि.सं.अ.

मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट तर ‘’मर्मर्स ऑफ द जंगल’ ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राला पाच पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 16 : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेंजो दारो”  या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’(लेगसी)’ या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि  आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी  ज्यूरीमध्ये फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष निला मधब पांडा, आणि बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा ज्यूरीचे अध्यक्ष गंगाधर मुढालैर हे उपस्थित होते.

फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

फिचर फिल्म श्रेणीत वर्ष 2022 साठी मराठी भाषेमधून ‘वाळवी’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वाळवी हा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला आहे . तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या  लघुपटाला  जाहीर झाला आहे. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.

या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे,  या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.

आणखी एक मोहेन्जो दडो” यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक

ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जो दडो” या चित्रपटाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे उद्दिष्ट म्हणजे प्राचीन मोहेन्जो दडो संस्कृतीच्या गूढतेला आणि इतिहासातील या महान संस्कृतीच्या पुनर्निर्माणाला उजाळा देण्याचा महत्व देणारा चित्रपट आहे.

चित्रपटात मोहेन्जो दडोच्या उत्खननांमध्ये आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून त्या काळातील समाजजीवन, संस्कृती, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संशोधनाच्या आधारे मोहेन्जो दडोची समृद्ध परंपरा, त्यातील रहस्य आणि हडप्पा संस्कृतीचा विकास कसा झाला याचे बारकाईने चित्रण केले आहे.

या चित्रपटाने इतिहासातील प्राचीन सभ्यतेच्या महत्वाच्या पैलूंना प्रकाशात आणले असून प्रेक्षकांना त्या काळाच्या जीवनशैलीची सजीव अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचे चित्रण, निर्देशन आणि ऐतिहासिक सत्यता यामुळेच याला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी)  या माहितीपटाला जाहीर झाला.  यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपत असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहिर

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे  यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा  पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोबतच सर्वोत्तम बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी,  केजीएफ 1: चॅप्टर 2′ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा  राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहे.

0000

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई दि. १६ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे.

‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे, मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली

१. छायाचित्रण स्पर्धा.

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या थीमशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित व्हिज्युअल नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

२. रिल्स स्पर्धा.

* रील्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही

* कोणतेही कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल

* मानक रील्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रील्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

 ३. लघुपट स्पर्धा.

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कोणीही… भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही कॉपीराईट उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.

* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क कडे असतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे.

०००००

भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलद गतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामांबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, जोतिबा विकास आराखड्याची कामे करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करा. हा परिसर जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. या परिसरात वृक्ष लागवड करा. मंदिर परिसरातून पाण्याचा निचरा व्यव‍स्थित होईल, याची दक्षता घ्या. तांत्रिक सल्ला घेवूनच सांडपाणी व्यवस्थापन करा. मंदिराचे कामकाज व दैनंदिन धार्मिक विधीला व्यत्यय न येता तातडीने कामे सुरु करा. मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विषयांचा आढावा घेवून स्वच्छतेच्या कामांसाठी दोन शिफ्टमध्ये काम करणारी यंत्रणा नेमा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या कामाचा आढावा घेताना मंत्री श्री. देसाई म्हणाले, या स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा. या कामासाठी 99 लाखांचा निधी मंजूर झाला असून यापैकी 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे उर्वरित निधी तात्काळ वितरित करुन नियोजित  कामे जलद गतीने पूर्ण करुन लवकरात लवकर लोकार्पण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, श्री क्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण विकास आराखड्याचा 1 हजार 816 कोटी रुपयांचा कमीत कमी बांधकाम व पर्यावरण पूरक बांधकामाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

हा आराखडा करतेवेळी जैवविविधता जपणूक, वनीकरण, डोंगर माथ्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्रोत्र इ. गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक जलसाठ्यांचा विकास करुन त्यांना पुनर्ज‍िवीत करण्यात येणार आहे. डोंगरमाथ्याचा नैसर्ग‍िक उत्तार, पाण्याचे स्त्रोत विचारात घेण्यात आले  आहेत. येथील बांधकामामध्ये कमीतकमी आरसीसी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करताना यामध्ये जैवविविधता बगीचा, फुलपाखरु बगीचा, पक्षीतीर्थ, केदार विजय गार्डन, हत्ती कुरणे, प्राणी व पक्षी संग्रहालय, अपारंपरीक उर्जा स्रोतांचे माहिती केंद्र व संग्रहालय इ. पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते टिपेश्वर अभयारण्याच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

यवतमाळ, दि.१६ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या बहुभाषिक संकेतस्थळाचे महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याने संकेतस्थळ https://tipeshwarwildlife.com असे आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राजेश देवते आदी उपस्थित होते. अभयारण्याचे स्वतंत्र संकेतस्थळ करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार भुषण नस्करी आणि यशेष उत्तरवार यांनी हे संकेतस्थळ तयार केले. सदर संकेतस्थळ वन्यजीव प्रेमी, पर्यटक आणि संरक्षणवादी यांच्यासाठी एक अनमोल साधन ठरणार आहे.

या नवीन संकेतस्थळाने टिपेश्वरच्या समृद्ध जैवविविधतेचा सखोल अभ्यास करणे सहज केले आहे. यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांची तपशीलवार माहिती, एक संवादात्मक चॅटबॉट आणि एक आकर्षक इमेज आणि व्हिडिओ गॅलरी उपलब्ध आहे. इमेज गॅलरीत अभयारण्याच्या सुंदर लँडस्केप्स आणि विविध वन्यजीवांचे चित्रण आहे तर व्हिडिओ गॅलरीत अभयारण्याच्या सुरम्य दृश्यांचे दृश्य दाखवले जाते.

पर्यटकांसाठी संकेतस्थळाने कसे पोहोचावे, फ्लोरा आणि फॉना, आगामी भेटीचा सर्वोत्तम काळ आणि आसपासच्या पर्यटनस्थळांची माहिती यासारख्या महत्वपूर्ण विभागांची माहिती दिली आहे. संकेतस्थळावर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे वापरकर्ते टिपेश्वरसंबंधी आपले अनुभव आणि छायाचित्रे सहज शेअर करू शकतात.

संकेतस्थळ अत्यंत वापरकर्ता अनुकूल आणि सर्व उपकरणांवर सुलभ आहे, तसेच इंग्रजी, मराठी आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. सोशल मीडिया आणि न्यूजलेटरच्या एकत्रीकरणामुळे समुदायाच्या सहभागास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या अनुभवांचे शेअर करू शकतात आणि अभयारण्याच्या मिशनशी जोडलेले राहू शकतात.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अखर्चित राहता कामा नये – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

यवतमाळ, दि.16 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो. बरेच लोकप्रतिनिधी विविध लेखाशीर्षाखाली निधी मंजूर करून आणतात. त्यामुळे या योजनेतून मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहता कामा नये. विशेषत: जिल्हा परिषदेंतर्गत यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खा.संजय देशमुख, खा.प्रतिभा धानोरकर, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनिल नाईक, आ.नामदेव ससाने, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे, लघिमा तिवारी, नियोजन उपायुक्त सुशील आगरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीस मागील वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. चालू वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा पालकमंत्र्यांनी यंत्रणानिहाय आढावा घेतला. निधी वितरित होऊनही कामे वेळेत पूर्ण न झाल्याने काही विभागांकडे पडून राहतो. जिल्हा परिषदेकडे दोन वर्षापूर्वींचे 21 कोटी रुपये प्रलंबित आहे. त्याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मागील वर्षी विकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना देऊनही विमा कंपनीने त्यांना भरपाई देण्याचे नाकारले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सुनावणीत भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले. तेच आदेश मंत्रालयात सचिवांनी काय ठेऊन भरपाई देण्याच्या सूचना केल्या. तरीही कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे यावेळी लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणले. कंपनीला आठ दिवसात नुकसाई भरपाई देण्याची नोटीस द्या. त्यानंतरही भरपाई न दिल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठ्याची कामे तातडीने पुर्ण केली जावी. ज्या ठिकाणी सुधारीत मान्यता पाहिजे आहे, अशा प्रस्तावास मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करू. सद्या सोयाबिनवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सुरक्षात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन करावे. खनिज विकास निधीतून सोलर झटका मशीन आपण देतो आहे. अभयारण्यालगतच्या शेतकऱ्यांचा देखील यासाठी समावेश करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गेले काही दिवस सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. लवकरच वाढीव दराने मदतनिधी जिल्ह्याला प्राप्त होईल. त्याचे वितरण लवकर केले जावे. पेसा गावांना विकासकामासाठी देण्यात येत असलेला निधी, लम्पी आजारामुळे जनावरे मृत झालेल्यांप्रकरणी अनुदान वाटप आदींचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.

या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर निधी विभागांनी लवकरात लवकर खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी खासदार, आमदार व निमंत्रित सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीला विशेष निमंत्रित सदस्य क्रांती राऊत, सदबाराव मोहटे, सिताराम ठाकरे, अब्दूल वहाब अब्दूल हलिम उपस्थित होते.

लाडकी बहीणच्या कामासाठी प्रशासनाचे कौत

शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे कमी कालावधीत जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केले. जिल्ह्यात 4 लाख 68 हजार महिलांची नोंदणी करण्यात आली. प्राप्त अर्जांची युद्धस्तरावर छाननी करून 4 लाख 60 हजार अर्ज निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले. येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने योजनेसाठी केलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 16 : विदर्भ हा सुरवातीपासूनच हरीतक्रांतीचा प्रदेश राहिला आहे. यात धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरचेही योगदान आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला कसे सुखी करता येईल, याचा संकल्प करण्यात आला असून जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या 16 एकर जमिनीवर कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट, हायटेक नर्सरी, खाद्य संस्कृती विकसीत करण्यासाठी फूडकोर्ट आदींकरीता 65 कोटी रुपये मंजूर केले असून चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करण्याचा आपला मानस आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी भवन येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी,सी., सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

‘जय जवान, जय किसान’ चा नारा देणा-या शेतकरी बांधवांना सुखी करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून माझ्याकडे ‘रान’ तर भाजी कृषी विभागाकडे आहे. रानभाजी, वनऔषधी यासाठी जिल्ह्यात नैसर्गिक वातावरण आहे. लोकांना निरोगी आयुष्यासाठी या रानभाज्यांचे महत्व सांगता आले पाहिजे. योग्य पध्दतीने समोर गेलो तर वनऔषधी आणि रानभाजी आपण निर्यातही करू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि शेती हे दोन्ही घटक उर्जितावस्थेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान केंद्र तसेच नाविण्यपूर्ण कल्पनेतून फूडकोर्ट तयार करण्यासाठी 64 कोटी 99 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. फूटकोर्टच्या माध्यमातून आपली खाद्य संस्कृती विकसीत होईल. विविध प्रकारच्या रानभाज्या कधी खाव्यात, कशा खाव्यात आणि त्याचा उपयोग, या बाबी आपल्याला सुरवातीला ‘आजीच्या बटव्यातून’ कळत होत्या. आता मात्र 10 मिनिटात मोबाईलवरून पिझ्झा येतो आहे. काटवलच्या भाजीमध्ये कोंबडी आणि बकरीच्या मांसाहारापेक्षा जास्त प्रोटीन्स मिळतात. लोकांना याचे महत्व अधोरेखांकीत करत उत्पादन वाढविले पाहिजे. तसेच मुंगण्याच्या शेंगा, पाने विकसीत करण्याची गरज आहे. तसेच बांबुची लागवडही फायदेशीर ठरू शकते, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील भाजीपालाही निर्यात होऊ शकतो : जगात दुस-या क्रमांकाचा भाजीपाला भारतात पिकतो. पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे. भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहत आहे. त्यातून दर्जेदार उत्पादन येईल आणि हळूहळू भाजीपाला निर्यात होऊ शकतो, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

लोकांपर्यंत रानभाजीचे महत्व पोहचावे : जिल्हाधिकारी विनय गौडा

सध्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आहारातून अनेक प्रकारची रसायने  पोटात जातात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी व सकस आहारासाठी रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पौष्टिक तृणधान्यातून शरीराला चांगला आहार मिळू शकतो. शेतक-यांनी अधिक जागृत होऊन पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

रानभाज्यांचे 18 स्टॉल: रानभाजी महोत्सवात एकूण 18 स्टॉल लावण्यात आले. यात चंद्रपूर आणि भद्रावती तालुक्यातून प्रत्येकी 5 स्टॉल, पोंभुर्णा आणि सिंदेवाही येथील प्रत्येकी  2 स्टॉल, आणि नागभीड, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी तालुक्यातून प्रत्येकी 1 स्टॉल लावण्यात आला आहे. यात धानभाजी, केला भाजी, कुंजीर भाजी, गोपीन भाजी, कुकुरडा, खापरखुरी भाजी, तरोटा, कुड्याचे फूल, काटवल, फेटरे, भुईनिंब काढा, इगडोडी, धोपा, करवंद, विविध प्रकारचे लोणचे, बांबु वायदे आदींचा समावेश होता.

शेतक-यांना धनादेशाचे वाटप: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेतक-यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात सुरेश गरमडे, महादेव आदे, परसुराम लेळांगे, नामदेव डडमल, विमला गेडाम यांचा समावेश होता. तर गोदाम बांधकामासाठी कांचणी प्रोड्यूसर कंपनीला 12 लक्ष 50 हजार रुपयांचा धनादेश तसेच आनंद वासाडे यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सानुग्रह रक्कम देण्यात आली.

प्रास्ताविकातून आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर म्हणाल्या, कृषी भवन येथे दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन आहारात भाज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 55 रानभाज्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्या

 सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व या कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन सेवा हक्क आयोग पुणे चे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सेवा संदर्भात सेवा हक्क आयोग पुणे चे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह तहसिलदार, नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य आयुक्त दिलीप शिंदे  म्हणाले, प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कार्यालये येथे संबंधित ठिकाणी देत असलेल्या सेवांबाबत प्रत्यक्ष जावून तपासणी करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवर आदर्श आपले सरकार सेवा केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या सेवा ऑनलाईन आहेत त्या सेवा ऑफलाईन देणे बंद करावे. संबंधित विभागांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. कामामध्ये पारदर्शकता, कालबध्द व कार्यक्षमतेने सेवा देणे हा या कायद्याचा उद्देश आहे. जी आपले सरकार सेवा केंद्र बंद आहेत ती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. देण्यात येणाऱ्या सेवाबाबत दर्शनी भागात फलक लावावा. वेळेत सेवा द्यावी, प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी यंत्रणांना केले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवा व पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली. जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी माहिती दिली.

अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, सेवा हक्क आयोग पुणे चे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करू, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व त्याबाबत केलेली कार्यवाही याचा समग्र आढावा घेतला.

शेतीपंपाला मोफत वीज

राज्यातील शेतकरी अधिकाधिक प्रगत आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने शेतीला वीज देऊन शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’, ‘मागेल त्याला सौर ऊर्जा पंप’ आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024’ जाहीर केली आहेत.  या योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.

भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज असून त्यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” घोषित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील जवळपास 45 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही 5 वर्षासाठी असून एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविली जाणार आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या योजनेमध्ये  राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा वापर करणारे सर्व शेतीपंप ग्राहक पात्र आहेत.

महाराष्ट्रात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के हे कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 द.ल.युनिट आहे. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीचा काळात 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्या ही ग्राहकांना किंवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार  वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात येते. सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रू.6 हजार 985 कोटी अधिक वीज बिल माफी नुसार सवलत रूपये 7 हजार 775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रति वर्ष रु.14 हजार 760 कोटी शासनाकडून शेतकऱ्याच्या हितासाठी खर्च होणार. ही योजना राबविण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे. या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून आता महाराष्ट्राचा बळीराजाची शेती ही सुजलाम सुफलाम होऊन राज्याची वाटचाल विकासाकडे होत आहे.

संजय डी. ओरके                                                  

(विभागीय संपर्क अधिकारी)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय   

000

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...