बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 607

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘मोबाईल मेडिकल क्लिनिक’चे लोकार्पण

फिरत्या मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच उपचार सुविधा उपलब्ध होईल – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

अमरावती, दि. 16 : मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला सदिच्छा भेटप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, मेळघाटातील अतिदुर्गम गावात रस्ते सुविधा कमी असल्याने प्राथमिक औषधोपचारासह इतर वैद्यकीय उपचार सुविधा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी दूर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. फिरते मेडिकल क्लिनिकमुळे आजारी व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होऊन वेळेत संबंधित रुग्णाला उपचार सुविधा देता येईल, असे त्यांनी सांगितले. ही फिरते मेडिकल युनिट असलेली अँम्ब्युलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय, रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम उद्या बालेवाडी येथे होणार

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

 

पुणे, दि. १६: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.

राज्य शासनाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमात महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

पुणे जिल्ह्यातील ५ लाखावर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.

बहिणींसाठी अखंड कार्यरत आहे यंत्रणा

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत सर्व पात्र महिलांना लाभ मिळेल, कोणीही पात्र भगिनी वंचित राहणार असे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा अखंड कार्यरत ठेवल्यामुळे राज्यात सर्वाधिक महिलांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. राज्यात १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९ लाख ७४ हजार ६६ महिलांनी नोंदणी केली आहे.

प्रशासनाच्या गतीमानतेमुळे ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टलवर भरणे, अर्जांची छाननी करणे आदींसाठी २४ बाय ७ तत्त्वावर काम केल्यामुळे ९९.५४ टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्रशासनाच्यावतीने सुरू असून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेकरिता उर्वरित पात्र महिलांना ३१ ऑगस्टअखेर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्री कु. तटकरे आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी घेतला तयारीचा आढावा

उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमात येणाऱ्या महिलांची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

संतांच्या निरुपणातून मनाला उभारी, समाजाला सकारात्मक दिशा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • पंचाळे येथील श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट
  • नाशिक जिल्ह्यातील ६ वारकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा

नाशिक, दि. 16 : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील 6 वारकऱ्यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पंचाळे येथे आयोजित श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार माणिकराव कोकाटे, जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार हेमंत गोडसे आणि सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महंत गुरूवर्य रामगिरीजी महाराज, प्रा. रमेश बोरनारे, शिवाजी तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

10 ऑगस्टपासून हा सप्ताह सुरू असून उद्या काल्याचा दिवस आहे. अखंड नामस्मरणाने वातावरणात प्रसन्नता आहे. हरिनाम सप्ताहाची परंपरा 177 वर्षे सुरू ठेवल्याबद्दल अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून माणूस धावपळीच्या युगात थोडा काळ हरिनामात तल्लीन होतो. त्यामुळे भक्त वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात ही मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. आषाढी कार्तिकीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, उपस्थित टाळकरी, माळकरी यांना वंदन करुन आपण माझ्यासाठी विठ्ठलरूप आहात, असे ते म्हणाले.

संतांच्या आशीर्वादाने चांगले काम करण्याची उर्मी मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा करता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनाही शासनाने सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत. माता भगिनींना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत 80 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यातही रक्कम जमा होतील. ही योजना बंद होणार नाही, याची तरतूद केल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगितले. तसेच, लेक लाडकी लखपती योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी  मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजना, आनंदाचा शिधा अशा विविध योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह इथे सुरू आहे. लाखो वारकरी संप्रदायातील भाविक येथे भवरूपी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी येथे उन्हाची तमा न करता उपस्थित आहेत. 177 वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह असाच पुढे अखंड सुरू राहणार आहे. वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद कऱण्यात येत आहे. यापूर्वी सरला बेटला 7.5 कोटींचा निधी वारकऱ्यांच्या मंडपासाठी उपलब्ध करून दिला आहे. बालाजी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर पंढरपूर येथे 120 कोटींच्या निधीतून शेड उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

0000

 

 

राज्यपालांच्या उपस्थितीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ-लोणेरे’चा २६ वा दीक्षान्त समारंभ

भारत देशाची २०४७ पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

रायगड (जिमाका)दि.16:- भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. 2047 पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या 26 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.  आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले.

पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखा‌द्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले.

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले.

मा.राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000

 

समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब करीता संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ या परीक्षेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी करण्यात आले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये १२८ अर्ज निकाली

पालघर दि. 16(जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये 128 अर्ज निकाली काढण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 340 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 128 अर्ज निकाली काढण्यात आले. तर 112 अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि 16 : काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. असे प्रकार बंद करण्यासाठी आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कांबळगाव येथील आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉ. हेमंत सवरा आदी मान्यवर उपस्थित होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या घटनेची अद्ययावत माहिती जाणून घेतली असे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

पोषण आहार बनवत असताना यासाठी असणाऱ्या आदर्श पद्धती (sop) चे पालन केले जात नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले असून या सर्व बाबींची नियमित देखरेख करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. २० ऑगस्टला याप्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्यात येणार असून कोणी हेतुपुरस्सर असे गैरप्रकार करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आश्रमशाळेतील पोषण आहार व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

शहिदांच्या स्मृती जपत ‘विकसित भारत मजबूत भारत’ हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिमूर क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 16 : चिमूर ही शहिदांची भूमी आहे. देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले, या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे. भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत”  हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

16 ऑगस्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसेच शहिदांना अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, मितेश भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, प्रा. अतुल देशकर  यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दीन, दलित, आदिवासी, शेतकरी अल्पसंख्यांक, महिला तसेच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करत आहे. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी विदर्भात सर्वाधिक विकास निधी चिमूर मतदार संघासाठी खेचून आणला आहे. रस्ते, सिंचन, पिक विमा ही सर्व कामे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमदार बंटी भांगडिया यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शेवटी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन, म्हणजेच खरा विकास होय, या सूत्रानुसार राज्य सरकार काम करीत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. गरीबी संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक चांगले निर्णय घेतले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार पुढील आठवड्यापासून देण्यात येणार आहे. ई पिक पाहणीत  नाव नसले तरी  सातबाराच्या नोंदीनुसार पैसे मिळणार आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. चिमूर तालुक्यात आतापर्यंत पिक विमा योजनेचे 30 कोटी रुपये जमा झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे.

शेतकऱ्यांचे विजेचे बिल आता सरकार भरणार असून शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस 12 तास मोफत वीज मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारने गोसीखुर्द प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. 125 किलोमीटर सिंचनाचे पाणी पोहोचत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

आमच्या सरकारने स्त्रियांसाठी सर्वात जास्त योजना सुरू केल्या असून महिलांना एस.टी.मध्ये 50 टक्के प्रवास सवलत, तसेच लेक लाडकी योजनेतून 18 व्या वर्षी मुलीच्या खात्यात 1 लक्ष रुपये जमा करण्यात येत आहे. मुलींसाठी व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करणे सुरू झाले आहे .17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसा जमा झालेला असेल. एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांकरिता प्रशिक्षण देण्यात येत असून राज्यातील 10 लाख तरुणांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून नोकरी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार बंटी भांगडिया म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर क्रांती दिनी या शहिदांच्या भूमीत आले यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तरुण पिढीला शहिदांचा इतिहास माहित झाला पाहिजे, त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिमुरचे अनेक प्रश्न मी सातत्याने मांडत आलो आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले आहे. चिमूर येथील रस्त्यांच्या विकासासाठी 117 कोटी, नागभीड येथे रस्ते आणि नाल्या बांधकामाकरिता 62 कोटी रुपये तसेच चिमूर आणि नागभिड मध्ये संत जगनाडे महाराज सभागृहासाठी प्रत्येकी सहा कोटी रुपये, रेल्वेच्या भूसंपादनासाठी 77 कोटी रुपये अशा अनेक विकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे,  असे आमदार बंटी भांगडिया म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

या कामांचे झाले ऑनलाइन भूमिपूजन चिमूर व नागभीड तालुक्यात विविध 39 कामांचे (अंदाजीत किंमत 438.239 कोटी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात

1.चिमूर तालुक्यातील 29 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (4.35 कोटी)

2.नागभीड तालुक्यातील 23 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (3.60 कोटी)

3.चिमूर येथे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय बांधकाम (3.50 कोटी)

4.चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती व सुधारणा (5.98 कोटी)

5.नागभीड तालुक्यात शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम (5.77 कोटी)

6.चिमूर आणि नागभीड तालुक्यातीत विविध रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा  (एकत्रित किंमत जवळपास 70 कोटी) याशिवाय इतरही कामांचा भुमिपूजनमध्ये समावेश आहे.

0000000

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

पात्र महिलांची नाव नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव; अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटातील महिलांचा सन्मान

लातूर, दि. 16 : राज्य शासनाने गरजू महिला-भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नावनोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या उदगीर, जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ना. बनसोडे बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीरचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, आशा कार्यकर्ती, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील पात्र महिलांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची दखल घेवून त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत. तसेच काही महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटींची दुरुस्ती करावी. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार जोडलेले नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

उदगीर येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून याठिकाणी मोठे उद्योग सुरु होवून युवकांसाठी रोजगार उपलब्ध होतील. तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाचे काम गेल्या पाच वर्षात करण्यात आले आहे. रस्त्याच्या विकासामुळे दळणवळण सुविधा गतिमान झाल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी ना. बनसोडे यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रकम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याबद्दल आभार मानले. ना. बनसोडे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि महिलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार  -पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील

आमझरी पर्यटन संकुलला भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी संवाद

अमरावती, दि. 16 : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकिक व्हावा तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देणार, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील ‘आमझरी निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’ला पालकमंत्र्यांनी आज भेट ‍देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली.‍ त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) श्री. लुनावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील ‍म्हणाले की, आमझरी येथील निसर्ग  पर्यटन संकुलात स्थानिक 20 युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत असून त्यांना साधारणतः 10 हजार रुपये मानधन दिल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून येथे उत्पादीत होणारे विशेष उत्पादन, तृणधान्य, खपली गहू, मध, खवा, मोहफुलावर प्रक्रीया करुन उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमझरी हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मधापासून निर्माण होणारे विविध उत्पादन तयार करुन विपणन केंद्र निर्माण करण्यात यावे. या अशा अनेक उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटातील ग्रामीण क्षेत्राचा विकास साधला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खटकाली येथील प्रकाश जाम्भेकर यांच्या  ‘प्रकाश होम स्टे’ ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. होम स्टे ला येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, भोजन व्यवस्था आदी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील कॉफी प्रकल्प व उत्पादनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शहापूर येथील खादी व ग्रामोद्योग आयोगाव्दारे पुरस्कृत शिवस्फुर्ती प्रक्रीया फाउंडेशनला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्र्यांची चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

दरम्यान यावेळी पालकमत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून वैद्यकीय सोयी- सुविधांचा आढावा घेतला. हतरु गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृती विषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

चिखलदरा तालुक्यातील हतरु येथे काही दिवसापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...