शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 562

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांचे स्मरण करताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, साहित्यिक, समाजसुधारक सर्वकाही होते. सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील. डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार, आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी जातीयवादापासून मुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते. अज्ञान, असमानता, दारिद्र्य यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, विकासाची समान संधी मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिल परिसरात आकाराला येत आहे. हे स्मारक देशातीलंच नव्हे, तर जगातील नागरिकांसाठी, विशेषत: युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी-सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. श्री. फडणवीस म्हणाले,  सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ.बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानले जाते. त्यांनी तेव्हा लिहिलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार करुन संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही ते म्हणाले.

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

श्री. शिंदे म्हणाले, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. त्याचा उपयोग शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार –  उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी काम केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला एकता, बंधुता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी मान्यवरांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

०००

 

 देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

मुंबई, दि. ५ :  अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केले.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. श्रीमती वैष्णवी जितेंद्र खामकर, श्रीमती मनाली महेश नारकर, श्रीमती शारदा शरद कदम, श्रीमती प्राची प्रफुल्ल पवार, श्रीमती रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.

0000

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करून विकासाचा वेग वाढविण्यात येईल. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल.

राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक उद्योगांशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. हे उद्योग राज्यात आल्यानंतर रोजगार निश्चित वाढेल. मागील वर्षभरात राज्यात थेट परकीय गुंतवणुकीपैकी 90 टक्के गुंतवणूक केवळ मागील सहा महिन्यात आली आहे.  हा वेग असाच कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारशी संवाद साधण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००००

३१ जिल्ह्यांतील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणीसंदर्भात १०४ अर्ज प्राप्त

मुंबई,दि.05:- राज्यातील 31 जिल्हयांतील एकूण 95 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण 104 अर्ज प्राप्त झालेले आहेत.  या 104 अर्जांमधून महाराष्ट्र राज्यातील 1,00,486 मतदानकेंद्रापैकी 755 मतदानकेंद्रावरील ईव्हीएम संचाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  राज्यातील उर्वरित सिंधुदुर्ग, नंदुरबार, अमरावती, वर्धा व गडचिरोली या 5 जिल्हयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भातील अर्ज प्राप्त झाले नाहीत.

भारत निवडणूक आयोगाने  01 जून 2024, 16 जुलै, 2024 व 30 जुलै, 2024 रोजीच्या पत्रांन्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना दिलेल्या आहेत. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीदरम्यान निवडणूक याचिका दाखल नसलेल्या प्रकरणी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पार पडलेली प्रक्रिया पुन:श्च पार पाडली जाते. त्यानुसार, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते.  अंतिमत: सीयु मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशिन्स मधील स्लीप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येऊन संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते.

30 जुलै, 2024 रोजीच्या पत्रान्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात उत्पादक कंपनीकडून तपासणीच्या तारखेआधी 3 दिवस पर्यंत अर्जदार त्यांचा तपासणीचा अर्ज कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतो. त्यानुसार संबंधित अर्जदारास त्याने जमा केलेले शुल्क त्यांना परत करण्याची तरतूद आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

000

 

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई, दि. 5 : नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. नौदल दिनानिमित्त  समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

व्हाईस ऍडमिरल निवासस्थानी स्वागत समारंभाला उपस्थिती

या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला.

००००

Governor Radhakrishnan attends Beating Retreat Ceremony on Navy Day

Mumbai Dated 5 : Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the ‘Beating Retreat’ and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy on the occasion of Navy Day at Gateway of India in Mumbai on Wed (4 Dec).

The impressive event included breath-taking performances by the naval central band, the Beating Retreat Ceremony, helicopter fly-past, Continuity drill by naval personnel and the Hornpipe Sailor’s Dance by girls of the Sea Cadet Corps.

Vice Admiral Sanjay J Singh, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, serving and retired officers of Indian Navy and invitees from various walks of life were present.

At Home Reception

The Governor also attended the At Home reception organised by the Vice Admiral Sanjay J Singh at the Navy House on the occasion of Navy Day. The Governor extended his Navy Day greetings to the serving officers and veterans present on the occasion.

0000

 

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन

मुंबई, दि.५ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच जिजामाता शहाजीराजे भोसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संक्षिप्त परिचय 

मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

जन्म : २२ जुलै, १९७०

जन्म ठिकाण  : नागपूर

शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता.

अपत्ये  : एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय : सामाजिक कार्य.

पक्ष : भारतीय जनता पक्ष.

मतदार संघ : ५२ – नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा – नागपूर.

इतर माहिती :

कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.

१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, नागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, नागपूर शहर; १९९५-२००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मार्चा; २००४ – २००९, २००९ –२०१४ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, २०१० महामंत्री, २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी;

उपाध्यक्ष, ग्लोबल पार्लमेंट फोरम, हाबीतात; १९९२ व १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;

१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य,  महाराष्ट्र विधानसभा, सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी. सी, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न; अध्यक्ष, निती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समिती, भारत सरकार, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार प्राप्तः ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा “मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड” प्राप्त, हिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाचा “बी. के. बोस अॅवॉर्ड” प्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार, प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.

यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती -गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

0000

उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांचा संक्षिप्त परिचय 

जन्म : ६ मार्च १९६४.

जन्म ठिकाण : अहिर, तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा.

शिक्षण : बी.ए.

ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता.

अपत्ये : एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी – पाचपाखाडी, जिल्हा – ठाणे.

इतर माहिती :

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रम शाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेने तर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, बाल नाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ‘जाणताराजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना, पूरग्रस्तांना मदत,

ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; एमएमआरडी सक्षम बनविण्यात यश, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग, वांद्रे- वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडीपुल, मुंबई –पुणे द्रुतगतीमार्गची क्षमता वाढविण्यासाठी खालपूर- लोणावळा टनेल मार्ग, शिळ – कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले; आरोग्य मंत्रीपदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली; आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास केला; ठाणे मेट्रोच्या कामाला गती दिली; ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मंजुरी मिळविली; ठाणे जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या अडचणी सोडविण्यात यश; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली; एमएमआरडीला क्लस्टर योजना सुरू केली; ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश; १९८४ शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

२००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गट नेते; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधीपक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गट नेते; नोव्हेंबर २०१९ –जून २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ. खाती – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

०००००

उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचा संक्षिप्त परिचय

जन्म : २२ जुलै १९५९

जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका – राहुरी, जिल्हा – अहमदनगर.

शिक्षण : बी.कॉम.

ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा.

अपत्ये :एकूण २ (दोन मुलगे).

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २०१ – बारामती, जिल्हा-पुणे,

इतर माहिती :

विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि. संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; १९ डिसेंबर २००५ पासून संचालक,  महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई; २८ सप्टेंबर २००६ पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मार्च २०१३ पासून अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, सप्टेंबर २००५ ते २३ मार्च, २०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, १३ ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन;

१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ सदस्य, लोकसभा १९९१-९५ (पो.नि.), १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधान सभा; २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, १९९२ ते फेब्रुवारी, १९९३ जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर २००३ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४ ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; ९ नोव्हेंबर २००४ ते ७ नोव्हेंबर २००९ जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; ११ नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा);  २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१९ उपमुख्यमंत्री, डिसेंबर २०१९ – जून २०२२ उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), काहीकाळ राज्य उत्पादन शुल्क या खात्याचा अतिरिक्त कार्यभार.

जुलै २०२३ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, खाती – वित्त व नियोजन

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

००००

 

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

००००

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

ऐतिहासिक आझाद मैदानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शपथविधी

मुंबई, दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा

मुंबई, दि. ०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

००००

 

ताज्या बातम्या

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...