बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 55

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यपालांनी नॅचरल शुगर युनिट मधील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन तेथील विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. तसेच युनिटची पाहणी केली. तसेच युनिटच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.वानखडे, युनिटच्या अध्यक्षांसह उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, पोलिस अधिकारी श्री. थोरात, महागावचे तहसीलदार अभय मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम आदी उपस्थित होते.

नॅचरल शुगर युनिटच्या भेटीनंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुंज येथून नांदेडकडे प्रस्थान केले.

०००

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केंद्राची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत माहिती जाणून घेतली. मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

०००

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ जनसहभागासाठी राज्य शासनाचे विशेष अभियान

मुंबई, दि. १४ : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान देण्यासाठी https://wa.link/o९३s९m किंवा https://vikasitmaharashtra.civis.vote/consultations/1245 या लिंकवर यावर आपले मत दि.17 जुलै 2025 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा, यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित राज्यांच्या अग्रक्रमात नेण्यासाठी राज्य शासनाने “विकसित महाराष्ट्र 2047” हे दीर्घकालीन (Vision Document) तयार करण्याचा संकल्प केला आहे. 16 संकल्पनांवर आधारिक क्षेत्रनिहाय गट करण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉप्ट पॉवर, तंत्रक्षान व मानव विकास, मनुष्यबळ

व्यवस्थापन असे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे. या अभियानात सामान्य जनतेचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

या उपक्रमाअंतर्गत शासकीय योजना फक्त सरकारी कागदांपुरती मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि अपेक्षा यात सामावून घ्याव्यात, हाच शासनाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्यासाठी जिल्हास्तरीय सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. शासनाने नागरिकांना त्यांच्या मतांचा सक्रिय सहभाग देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. सर्वेक्षणासाठी नागरिकांनी https://wa.link/o९३s९m किंवा https://vikasitmaharashtra.civis.vote/consultations/1245  या लिंकवर यावर आपले मत दि. 17 जुलै 2025 पर्यन्त नोंदवून विकसित महाराष्ट्रच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ

लोहटा-पूर्व गावास महसुली दर्जा देण्याची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करा –  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.१४ : धाराशिव, उल्हासनगर, मुंबई उपनगर या ठिकाणांशी संबंधित विविध महसूल विषयांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेषतः लोहटा-पूर्व या गावास महसुली दर्जा देण्यापासून ते मालाड येथील दफनभूमीच्या विकासापर्यंतचे विषयांवर चर्चा करण्यात आली.

विधानभवन येथे आयोजित बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार अस्लम शेख, कैलास घाडगे-पाटील, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, यांच्यासह संबंधीत जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पूर्वीच्या बुडीत गावांतील नागरिकांना सध्या त्याचा समावेश लोहटा पुर्वमध्ये करण्यात आलेला आहे.या गावास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात एक महिन्याच्या आत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. व्हिलेज कोड जनरेट करून शेतकऱ्यांसाठी डिजिटल माहिती प्रणाली कार्यान्वित करावी अशा सूचनाही मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

उल्हासनगरच्या सर्वेक्षणासाठी विशेष समिती स्थापन करावी

उल्हासनगरच्या सर्वेक्षणासाठी विशेष समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्यात सर्वेक्षण करून नक्शा स्कीम अंतर्गत अहवाल सादर करावा. सिंधी समाजाच्या ताब्यातील निवासी जागा नियमबद्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. शासकीय कार्यालये असलेल्या इमारतीमध्ये भूमी अभिलेख कार्यालय स्थलांतरित करावे. याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. मुस्लिम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमीबाबत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक घ्याव्यात.

मुंबई उपनगरातील अंबोजवाडी परिसरात शासनाच्या पाच एकर जागेवर मुस्लिम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमी यांचा संयुक्त विकास करण्यात यावा.यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर महानगरपालिका, स्थानिक आमदार व संबंधित यंत्रणांबरोबर बैठक घेऊन शासनाकडे अहवाल पाठवावा, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

 

०००००

 

राजू धोत्रे/विसंअ

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

मुंबई, दि. १४ : हिंगोली जिल्ह्यातील ‘संजीवनी अभियान’ हे आरोग्यविषयक नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून कर्करोगावरील लढ्यात एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी संजीवनी अभियाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला होता. महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे, तसेच कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचार उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

हिंगोली जिल्ह्यात अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्हास्तरावरून महिलांच्या आरोग्य समस्या व कर्करोगाची प्राथमिक लक्षणे लक्षात घेऊन विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये गर्भाशयमुख, स्तन आणि मुख कर्करोग यासारख्या प्रमुख कर्करोग प्रकारांसाठी संशयित रुग्णांची ओळख पटविण्याकरिता सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये कर्करोग सदृश, बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य लक्षणे असणाऱ्या व इतर समस्या असणारे महिला व पुरुष असे एकूण 14,542 व्यक्ती संशयित म्हणून नोंदविण्यात आले. यात 7,911 महिला गर्भाशयमुख कर्करोगासाठी, 2,698 महिला स्तन कर्करोगासाठी व 3,933 स्त्री-पुरुष मुख कर्करोगासाठी संशयित आढळले.

पुढील टप्प्यात या संशयित रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. गर्भाशयमुख कर्करोग संदर्भात एकूण 7,431 महिलांची व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसेटिक ॲसिड चाचणी करण्यात आली. त्यापैकी 659 महिलांमध्ये व्हिआयए पॉझिटिव्ह निदर्शनास आले तर 6,772 महिलांची व्हिआयए तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना स्थानिक बुरशीजन्य जंतू संसर्ग  झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत औषधोपचार करण्यात आले. आजमितीस 659 महिला गर्भाशयमुख कर्करोग संशयित असून त्यापैकी 427 महिलांची गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी तपासणी आणि 73 महिलांची बायोप्सी तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या तपासण्यांमध्ये आजअखेर 4 महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे निदान झाले आहे.

स्तन कर्करोग संदर्भात, सर्वेक्षणादरम्यान 2,698 महिला संशयित लक्षणे असल्याच्या आढळून आल्या होत्या. त्यापैकी 2,512 महिलांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत क्लिनिकल बेस्ट तपासणी (सीबीई) करण्यात आली. यामध्ये 228 महिलांमध्ये सीबीई पॉझिटिव्ह निष्कर्ष मिळाले, उर्वरित 2284 महिलांची सीबीई तपासणी निगेटिव्ह असून त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत स्तनाशी निगडित इतर समस्या बाबत औषधोपचार देण्यात आले आहे. आज 228 महिला ह्या स्तन कर्करोग संशयित असून यापैकी 22 महिलांची सूक्ष्म सुई पेशी (एफएनएसी) तपासणी करण्यात आली. यात 4 महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान झाले आहे.

मुख कर्करोगाबाबत, 3933 स्त्री व पुरुष संशयित रुग्णांपैकी 3511 व्यक्तींची तोंडाची दृश्य तपासणी  करण्यात आली. त्यामध्ये 109 व्यक्तींमध्ये मुख कर्करोग सदृश लक्षणे दिसून आली. उर्वरित 3402 स्त्री व पुरुष यांना मुखाच्या इतर समस्यांबाबत दंतशल्यचिकित्सक मार्फत शमन उपचार देण्यात आले आहे. 109 स्त्री व पुरुष हे मुख कर्करोग संशयित असून त्यापैकी 18 व्यक्तींची दंतशल्यचिकित्सकांच्या माध्यमातून बायोप्सी तपासणी करण्यात आली असून त्यामधून 12 रुग्णांमध्ये मुख कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.

संजीवनी अभियानार्तंर्गत आज गर्भाशयमुख कर्करोग संशयित महिलांची संख्या 659, स्तन कर्करोग संशयित महिलांची संख्या 228 व मुख कर्करोग संशयित स्त्री व पुरुष यांची संख्या 109 असे एकूण 996 संशयित कर्करोग स्त्री पुरुष आढळून आले आहेत. आज यात गर्भाशयमुख कर्करोग निदान झालेल्या महिलांची संख्या 4, स्तन कर्करोग निदान झालेल्या महिलांची संख्या 4 व मुख कर्करोग निदान झालेल्या स्त्री व पुरुष यांची संख्या 12 असे एकूण 20 कर्करोग बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर उपचार प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला आहे. 427 पैकी 208 रुग्णांवरील गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी तपासणी अहवाल प्राप्त असून यात 23 महिलांचे बायोप्सी तपासणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत बायोप्सी घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे हिंगोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली.

या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रज्ञा सातव, आयुक्त नयना गुंडे, सहायुक्त राहुल मोरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे. मुलींचा शैक्षणिक दर्जा, कौशल्यविकास आणि जीवनमूल्ये वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. बालगृहास प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच लोकप्रतिनिधी आणि विभागामध्ये चर्चा करून यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बालगृहातील मुलींच्या समस्या समजून घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील सर्व बालगृहे नोंदणीकृत आहेत का, हे पाहण्यासाठी गुगल मॅपिंगद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. आदिवासी विकास, सामाजिक विकास आणि महिला व बालविकास या विभागांतील बालगृहांची यादी एकत्रित केली जात आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संकटात किंवा अन्य अडचणीत असलेल्या महिलांना सहाय्य व आधार देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत महिला सहाय्यता केंद्र, स्वाधारगृह योजना, उज्ज्वला योजना, सखी वन स्टॉप सेंटर योजना, बाल सुरक्षा योजना, किशोरी शक्ती योजना, पालकत्व योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक 181 कार्यरत आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

दिवंगत संजय देशमुख यांना मंत्रालयात श्रद्धांजली

मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय 55 वर्षे) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आज मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, संचालक किशोर गांगुर्डे, संचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे, सहाय्यक संचालक संतोष तोडकर यांनी दिवंगत संजय देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत संजय देशमुख हे मागील दहा वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये एक प्रभावी दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संजय देशमुख यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मोठी हानी झाली. प्रत्येक वेळी मदतीला धावणारे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अकाली निधनामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.

श्रद्धांजली सभेस सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, अवर सचिव अजय भोसले, मा. मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी किर्ती पांडे, उपसंचालक वर्षा आंधळे, उपसंचालक सीमा रनाळकर यांच्यासह महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मौन पाळून दिवंगत संजय देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली.

०००

विधानसभा लक्षवेधी

कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कामगारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. १४:  कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य संजय मेश्राम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा शर्ती) कायदा, १९९६ अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून, जुलै २०२० पासून आयडब्ल्यूबीएमएस प्रणालीच्या माध्यमातून नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, गृहपयोगी वस्तू संच आदी लाभ डीबीटी पद्धतीने थेट दिले जात असून, बायोमेट्रिक प्रमाणिकरणानंतरच वितरण केले जाते. यामुळे मानवी हस्तक्षेप शक्य नाही, आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखली गेली आहे.

उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यांमध्ये जानेवारी २०२५ ते जून २०२५ दरम्यान चार हजार कामगारांना सुरक्षा संच व नऊ हजार कामगारांना गृहपयोगी संच वाटप करण्यात आले आहे.

काही ठिकाणी खासगी दलालांकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे कामगार नोंदणीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याविरोधात दक्षता पथक राबवले असून नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात काही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध माध्यमातून आलेल्या तक्रारींवर चौकशी करून वेळोवेळी कठोर कारवाई करण्यात येत आहे. भविष्यातही अशा बोगस नोंदणीला आळा बसावा यासाठी कठोर आणि पारदर्शक पावले उचलली जातील, असेही मंत्री श्री.फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, प्रवीण दटके, जयंत पाटील यांनी या लक्षवेधी सूचनेत सहभाग घेतला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

अमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मोक्कालावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले

विधानसभा सदस्य विलास भुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या एनडीपीएस अंतर्गत सर्व गुन्ह्यांमध्ये मोक्का लावणे शक्य होत नाही. मात्र या सभागृहाने मंजुरी दिलेली असून, वरील सभागृहातही एक ते दोन दिवसांत मान्यता मिळेल. त्यानंतर वारंवार अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ विरोधात मोहिम सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई सुरु आहे, अँटी-नार्कोटिक्स युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून कारवाया गतिमान झाल्या असून, विशेषतः शाळा संपर्क अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.

गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील ३७९ ते ३८९ शाळांना भेटी देण्यात आल्या असून, २५७ कार्यशाळांद्वारे अमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली आहे.  बेहराम पाडा यासारख्या संवेदनशील भागांमध्ये धडक मोहिमा राबवण्यात येतील.अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. परदेशी नागरिक येथे येऊन गुन्हे करून निकाल लागेपर्यंत राहतात, त्यांची कारवाई रखडते. याबाबत केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून, लघु गुन्ह्यांमध्ये केस परत घेऊन तत्काळ रिपोर्ट करून आरोपींचे ‘डिपोर्टेशन’ करता येईल, यासाठी प्रभावीत कार्यप्रणाली तयार केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ विक्री प्रकरणांमध्ये अनेकदा आरोपी आपले वय कमी असल्याचे दाखवतात. याचा गैरफायदा रोखण्यासाठी व कायद्याच्या ‘कमी वयाच्या अज्ञान’ नियमात सुधारणा करून, जसे बलात्कार प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेतला जातो, तसेच पद्धतीने दोषींचे वय दोन वर्षांनी खाली आणण्याबाबत विचार सुरू आहे. राज्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध विशेष मोहीमा, ड्रग्ज मुक्त अभियान सुरू आहे. नार्कोकोऑर्डीनेशन यंत्रणेची पुनर्रचना करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात अमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलीस घटकामध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

या लक्षवेधी सूचनेत विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी सहभाग घेतला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

कोंढवा शाखेचे विभाजन: नवीन येवलेवाडी शाखा कार्यालय होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : पुणे परिमंडळातील रास्तापेठ शहर मंडळाच्या सेंटमेरी उपविभाग अंतर्गत असलेल्या कोंढवा शाखा कार्यालयाची वीज ग्राहक संख्या लक्षणीय वाढल्याने या कार्यालयाचे विभाजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन येवलेवाडी शाखेची स्थापना करण्यात  येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर आणि कोंढवा बुद्रुक या भागांमध्येही स्वतंत्र शाखा कार्यालय स्थापनेसंदर्भात ग्राहक संख्या, महसुली वाढ आणि महावितरण कंपनीच्या आर्थिक दायित्वाचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये वीजपुरवठा सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या योजनांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मान्यता प्राप्त झाली असून, त्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच, शून्य ते शंभर युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्यात येणार असून, या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

आरडीएसएस योजनेंतर्गत पुणे झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, क्लस्टर रिडक्शनसाठी १६२ कोटी, फिडर सेग्रिगेशनसाठी २५० कोटी, सिस्टिम स्ट्रेंथनिंगसाठी असे एकूण ४१२ कोटी खर्च करत आहोत.

सिडबीच्या माध्यमातून ३७ कोटी आणि पॉवर ॲव्याक्युएशनसाठी ४३ कोटी असे एकूण १०५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या योजनेंतर्गत सहा नवीन उपकेंद्रे, सहा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर आणि जवळपास ७०० नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे उद्दिष्ट आहे.

पुणे शहरात कोंढवा-येवलेवाडी उपशाखेसह एकूण आठ नवीन उपशाखा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उपशाखांमध्ये धायरी-मढे, किरकटवाडी-नांदेड सिटी, मांजरी-शेवळवाडी, देहू रोड-रावी, मुंढवा-नगरपट्टा आणि मुळशी-बोऱ्हाडेवाडी या प्रस्तावित उपशाखांचा समावेश आहे.

विशेषतः ज्या भागांमध्ये विद्युत वितरण बॉक्सेस तुटलेले किंवा जीर्णावस्थेत आहेत, त्या ठिकाणी तत्काळ नवीन आणि सुरक्षित बॉक्सेस बसवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या मीटरसाठीचा खर्च ग्राहकांच्या वीजबिलातून वसूल न करता एनर्जी सेव्हिंगमधून भरून काढला जाणार आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ४० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, केवळ एक टक्का मीटरबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना सोलर अवर्समध्ये १० टक्के सवलत दिली जात असून, त्यामुळे त्यांचे वीजबिल प्रत्यक्षात कमी झाले आहे. यामुळे आता स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याच्या तक्रारी आल्याचे जवळपास थांबले आहे.

मीटर रीडिंगमध्ये पारदर्शकता पूर्वी मीटर रीडिंग देताना अनेक त्रुटी होत्या, जसे की जुने फोटो जोडणे किंवा प्रत्यक्षात घरात न जाता फोटो पाठवणे. परंतु स्मार्ट मीटरमुळे हे सर्व प्रकार बंद झाले आहेत. आता वीज वापराचे थेट मोजमाप होते. ग्राहक मोबाईल ॲप डाउनलोड केल्यास, प्रत्येक तासाला आपला वीज वापर पाहू शकतो, अशी सोयही उपलब्ध आहे. शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी सवलतराज्यात वीज दरांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली आहे. गेल्या वीस वर्षांत दरवर्षी वीजदर १० टक्क्यांनी वाढत असतानाच, आता पुढील पाच वर्षांत दरवर्षी दर कमी करण्यात येणार आहेत. विशेषतः शून्य ते शंभर युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये ७० टक्के ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्यासाठी वीज दर २६ टक्क्यांनी कमी केले जात आहेत.

वीज मागील मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ला मंजुरी दिली असून, त्याअंतर्गत राज्य सरकारने स्वतंत्र योजना तयार केली आहे. या योजनेत रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्पासाठी अनुदान (सबसिडी) दिली जाणार आहे. शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हे सौर प्रकल्प बसविल्यास एकही रुपया वीजबिल भरावे लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

या लक्षवेधीमध्ये  विधानसभा सदस्य अमित देशमुख यांनी सहभाग घेतला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यास शासन प्रयत्नशील -जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १४: तापी खोऱ्यातील गिरणा उपखोरे हे सर्वाधिक पाण्याची तूट असणारे खोरे आहे. या उपखोऱ्यात ४० टीएमसी पाण्याची तूट आहे.  ही तूट भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

धुळे जिल्ह्यातील सिंचनाबबत सदस्य राघवेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिल पाटील यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, नार- पार – गिरणा नदीजोड प्रकल्प अतर्गत १०.४९ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक कारणास्तव पार- तापी- नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करण्यात झाला आहे.  हा प्रकल्प रद्द झाला असला तरी उपलब्ध होणारे पाणी तापी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या अनुषंगाने तांत्रिक आर्थिकदृष्ट्या तपासणी सुरू आहे. यामधून  उपखोऱ्यात ९.६७ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू आहे.  तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.

धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा आणि सुलवाडे – जामफळ उपसा सिंचन योजना पुरेसा निधी देण्यात आलेला आहे.  हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात पाणी आरक्षणाबाबत गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. गिरणा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आणखी उपयोजना सुचवून सिंचनाचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्यात येईल,असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

बहुवार्षिक फळपिके: फुलगळती, उत्पादन घट नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करून निर्णय घेऊ  – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. १४ : नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत व्हावी, त्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासन निकषानुसार मदत दिली जात आहे.

बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी निकषानुसार भरपाई देण्यात येत असून आंबिया बहार व मृग बहार मधील फुलगळती व उत्पादन घट संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य उमेश यावलकर यांनी अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील मौजे लोणी व राजुरा येथे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री, सुमित वानखडे, हरीश पिंपळे चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, अमोल जावळे, राजेश वानखडे, अर्जुन खोतकर आणि अनिल पाटील यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना खरीप-रब्बी पद्धतीनेच नुकसान भरपाई दिली जाते. मात्र फळबागा बहुवार्षिक असल्यामुळे या पिकांच्या निकषबाबत लोकप्रतिनिधींच्या उपस्थित केलेले मुद्दे व त्यांच्या भावना लक्षात घेऊन या संदर्भात योग्यतो निर्णय घेतला जाईल.

या लक्षवेधीच्या उत्तरात मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले, नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ मध्ये अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना ३५७.९५ कोटीचा मंजूर करून वितरीत केला आहे. वरुड तालुक्यातील ३७ हजार ७९५  लाभार्थ्यांसाठी ११२.६० कोटीचा मंजूर केला असून यापैकी ३७ हजार ६६ बाधित शेतकरी लाभार्थ्यांना १०९.८८ कोटी वितरीत केले आहेत.  या बरोबरच फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ मधील शेत पिकांच्या नुकसानीसाठी वरूड तालुक्यातील ७ हजार १०९ लाभार्थ्यांसाठी २७ कोटी ७५ लाख निधी मजूर करून तो ४ हजार ८८२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

सन २०२३-२०२४ मधील प्रलंबित असलेल्या मदतीपोटी ३ लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ४४५ कोटीची मदत वर्ग केली  आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.  ही मदत लवकरच जाहीर केली जाईल. जून २०२५ मध्ये झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अहवाल प्राप्त होताच हीही मदत बाधित शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

 

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,  दि. १४:  नाशिक महापालिका क्षेत्रात येणाऱ्या अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य सीमा हिरे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सरोज अहिरे, सदस्य महेश लांडगे,  राहुल डिकले, सदस्य अमित देशमुख, सदस्य नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ६८ किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्याच्या कामासाठी नाशिक महापालिक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये करार झाला आहे. यानुसार १५ किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात सातपूर विभागातील एमआयडीसी परिसरातील विविध रस्त्यांचे कामासाठी ३ कोटी ५० लाख तर नवीन नाशिक विभागातील औद्योगिक वसाहत  मधील रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी ५० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या बरोबरच येणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने नाशिक औद्योगिक वसाहत परिसरातील आठ किलोमीटर रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे.  या पुर्वी केलेली रस्त्यांची कामे, सन २०२५-२०२६ मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या कामांखेरीज जी कामे शिल्लक राहतील तिही प्राधान्याने केली जातील, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

या औद्योगिक वसाहती मधील ड्रेनेजचे कामाचा प्रस्ताव ‘अमृत-२’ मध्ये करण्यात आला असल्याचे नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड , नागपूर येथील औद्योगिक वसाहतीतील रस्ते व आणि सुविधा या संदर्भात बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडून आलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांची होणार अंमलबजावणी

मुंबई, दि. १४: सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर केला आहे. अभ्यासगटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या सूचनांवर आधारित प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल. अभ्यासगटाने स्वीकार केलेल्या निर्णयांबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करुन आगामी अधिवेशनात याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येईल. यातील महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व  मोठ्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रविण दरेकर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन २०१९ मध्ये स्वयंपुनर्विकास ही संकल्पना मांडली गेली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पार पडलेल्या संमेलनात मी स्वत: सहभागी झालो होतो, या संमेलनात जवळपास १९ मागण्या मांडल्या होत्या त्यातील १८ मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकासासाठी एक शासन निर्णय काढण्यात आला. यामध्ये अजून अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आले. त्यामुळे २४ एप्रिल २०२५ ला आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण केला. या अभ्यासगटाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकासासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण शिफारशी केल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई जिल्हा बँकेने उत्स्फूर्तपणे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विकास केला. पण १,६०० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे यांचा विकास करण्यासाठी पतपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन पतपुरवठ्यासाठी देखील या अभ्यासगटाने शिफारशी केल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांसाठी मार्गदर्शक सूचना देखील आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सेस व नॉन सेसच्या इमारतींचा विकास देखील यामध्ये करावा, विमानपत्तनचे नियम, डीम्ड कन्वेयन्स मध्ये सुधारणा करणे, याची शिफारस अभ्यासगटाने केली आहे. स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकासासाठी पतपुरवठा मिळावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे राष्ट्रीय सहकारी विकास निगम कडून निधी प्राप्त व्हावा अशी शिफारस करण्यात आली आहे. ही मदत देखील केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास मध्ये मुंबई जिल्हा बँकेने यशोगाथा निर्माण केली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वयंपुनर्विकास झालेल्या सहकारी सोसायटी यामध्ये विकासक नसल्यामुळे बाराशे ते सोळाशे चौरस फूट क्षेत्र असलेली घर स्थानिक रहिवाश्यांना मिळाली. मुंबई बँक स्वयंपुनर्विकासासाठी भाग भांडवल देत आहे. छोटे गृहनिर्माण प्रकल्प स्वयंपुनर्विकास केले तर स्थानिक रहिवासीधारकांनाच लाभ मिळेल. प्रत्येक व्यक्तीचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न यामुळे साकार होणार आहे. जे लोक मुंबई बाहेर गेले आहेत त्या लोकांना मुंबईत पुन्हा येण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच मोलाची भूमिका बजावेल. स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास मध्ये मुंबई जिल्हा बँकेने यशोगाथा निर्माण केली आहे. आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्यात आला, यातील शिफारशींचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे  उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रविण दरेकर यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल यावेळी सादर केला.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ज्ञानराधा मलटीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी ने मुदत ठेव, बचत ठेव, चक्रवर्ती ठेवींवर १० ते १८ टक्के व्याजदराचे आकर्षण ठेव योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पोलीस, विशेष तपास यंत्रणांना गतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रकाश सोळंके, अर्जुन खोतकर, सुरेश धस, संतोष दानवे, सुभाष देशमुख, विजयसिंह पंडित, अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, उपअधिक्षक शशिकांत सावंत, अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव सहकार व पणन, सहकार आयुक्त उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक सामान्य आणि गोरगरीब ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित १९ आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.  बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करा, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

बीड जिल्ह्यातील सर्व मल्टीस्टेट सोसायट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी एकत्रित बैठक घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही कारवाई आवश्यक असून, या प्रकरणांमध्ये कठोर आणि वेळेत निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ताज्या बातम्या

महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अश्विनी...

0
मुंबई, दि. ६ : महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.एस.व्ही.आर. श्रीनिवास (भाप्रसे) यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०५...

आरे परिसरातील अतिक्रमणांवर प्रतिबंध घाला नवीन बांधकामांना परवानगी नको – दुग्धविकास मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. 6 : आरे कॉलनी परिसरातील अतिक्रमाणांवर प्रतिबंध घालावेत, तसेच या भागात बांधकामांना महापालिकेने परवानगी देऊ नये, अशा सूचना दुग्धविकास मंत्री अतुल सावे...

जलजीवन मिशनसाठी केंद्राकडे त्वरित अनुदानाच्या निर्गमनाची मागणी – मंत्री गुलाबराव पाटील

0
केंद्र सरकारकडून सकारात्मक आश्वासन नवी दिल्ली, दि. ६ :  महाराष्ट्र राज्य शासन ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या जल जीवन मिशनच्या उद्दिष्टाला गती...

चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

0
मुंबई, दि. 6 : चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून...

हतनूर धरण प्रकल्प; ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात सकारात्मक मार्ग काढू – मदत व पुनर्वसन...

0
मुंबई, दि. ६ : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील हतनूर धरण प्रकल्पातील ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक...