सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 478

समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब करीता संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ या परीक्षेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी करण्यात आले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये १२८ अर्ज निकाली

पालघर दि. 16(जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये 128 अर्ज निकाली काढण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 340 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 128 अर्ज निकाली काढण्यात आले. तर 112 अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि 16 : काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. असे प्रकार बंद करण्यासाठी आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कांबळगाव येथील आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉ. हेमंत सवरा आदी मान्यवर उपस्थित होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या घटनेची अद्ययावत माहिती जाणून घेतली असे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

पोषण आहार बनवत असताना यासाठी असणाऱ्या आदर्श पद्धती (sop) चे पालन केले जात नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले असून या सर्व बाबींची नियमित देखरेख करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. २० ऑगस्टला याप्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्यात येणार असून कोणी हेतुपुरस्सर असे गैरप्रकार करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आश्रमशाळेतील पोषण आहार व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

शहिदांच्या स्मृती जपत ‘विकसित भारत मजबूत भारत’ हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिमूर क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 16 : चिमूर ही शहिदांची भूमी आहे. देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले, या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे. भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत”  हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

16 ऑगस्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसेच शहिदांना अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, मितेश भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, प्रा. अतुल देशकर  यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दीन, दलित, आदिवासी, शेतकरी अल्पसंख्यांक, महिला तसेच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करत आहे. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी विदर्भात सर्वाधिक विकास निधी चिमूर मतदार संघासाठी खेचून आणला आहे. रस्ते, सिंचन, पिक विमा ही सर्व कामे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमदार बंटी भांगडिया यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शेवटी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन, म्हणजेच खरा विकास होय, या सूत्रानुसार राज्य सरकार काम करीत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. गरीबी संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक चांगले निर्णय घेतले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार पुढील आठवड्यापासून देण्यात येणार आहे. ई पिक पाहणीत  नाव नसले तरी  सातबाराच्या नोंदीनुसार पैसे मिळणार आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. चिमूर तालुक्यात आतापर्यंत पिक विमा योजनेचे 30 कोटी रुपये जमा झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे.

शेतकऱ्यांचे विजेचे बिल आता सरकार भरणार असून शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस 12 तास मोफत वीज मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारने गोसीखुर्द प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. 125 किलोमीटर सिंचनाचे पाणी पोहोचत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

आमच्या सरकारने स्त्रियांसाठी सर्वात जास्त योजना सुरू केल्या असून महिलांना एस.टी.मध्ये 50 टक्के प्रवास सवलत, तसेच लेक लाडकी योजनेतून 18 व्या वर्षी मुलीच्या खात्यात 1 लक्ष रुपये जमा करण्यात येत आहे. मुलींसाठी व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करणे सुरू झाले आहे .17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसा जमा झालेला असेल. एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांकरिता प्रशिक्षण देण्यात येत असून राज्यातील 10 लाख तरुणांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून नोकरी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार बंटी भांगडिया म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर क्रांती दिनी या शहिदांच्या भूमीत आले यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तरुण पिढीला शहिदांचा इतिहास माहित झाला पाहिजे, त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिमुरचे अनेक प्रश्न मी सातत्याने मांडत आलो आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले आहे. चिमूर येथील रस्त्यांच्या विकासासाठी 117 कोटी, नागभीड येथे रस्ते आणि नाल्या बांधकामाकरिता 62 कोटी रुपये तसेच चिमूर आणि नागभिड मध्ये संत जगनाडे महाराज सभागृहासाठी प्रत्येकी सहा कोटी रुपये, रेल्वेच्या भूसंपादनासाठी 77 कोटी रुपये अशा अनेक विकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे,  असे आमदार बंटी भांगडिया म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

या कामांचे झाले ऑनलाइन भूमिपूजन चिमूर व नागभीड तालुक्यात विविध 39 कामांचे (अंदाजीत किंमत 438.239 कोटी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात

1.चिमूर तालुक्यातील 29 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (4.35 कोटी)

2.नागभीड तालुक्यातील 23 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (3.60 कोटी)

3.चिमूर येथे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय बांधकाम (3.50 कोटी)

4.चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती व सुधारणा (5.98 कोटी)

5.नागभीड तालुक्यात शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम (5.77 कोटी)

6.चिमूर आणि नागभीड तालुक्यातीत विविध रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा  (एकत्रित किंमत जवळपास 70 कोटी) याशिवाय इतरही कामांचा भुमिपूजनमध्ये समावेश आहे.

0000000

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

पात्र महिलांची नाव नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव; अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटातील महिलांचा सन्मान

लातूर, दि. 16 : राज्य शासनाने गरजू महिला-भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नावनोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या उदगीर, जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ना. बनसोडे बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीरचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, आशा कार्यकर्ती, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील पात्र महिलांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची दखल घेवून त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत. तसेच काही महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटींची दुरुस्ती करावी. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार जोडलेले नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

उदगीर येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून याठिकाणी मोठे उद्योग सुरु होवून युवकांसाठी रोजगार उपलब्ध होतील. तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाचे काम गेल्या पाच वर्षात करण्यात आले आहे. रस्त्याच्या विकासामुळे दळणवळण सुविधा गतिमान झाल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी ना. बनसोडे यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रकम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याबद्दल आभार मानले. ना. बनसोडे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि महिलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार  -पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील

आमझरी पर्यटन संकुलला भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी संवाद

अमरावती, दि. 16 : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकिक व्हावा तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देणार, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील ‘आमझरी निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’ला पालकमंत्र्यांनी आज भेट ‍देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली.‍ त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) श्री. लुनावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील ‍म्हणाले की, आमझरी येथील निसर्ग  पर्यटन संकुलात स्थानिक 20 युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत असून त्यांना साधारणतः 10 हजार रुपये मानधन दिल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून येथे उत्पादीत होणारे विशेष उत्पादन, तृणधान्य, खपली गहू, मध, खवा, मोहफुलावर प्रक्रीया करुन उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमझरी हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मधापासून निर्माण होणारे विविध उत्पादन तयार करुन विपणन केंद्र निर्माण करण्यात यावे. या अशा अनेक उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटातील ग्रामीण क्षेत्राचा विकास साधला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खटकाली येथील प्रकाश जाम्भेकर यांच्या  ‘प्रकाश होम स्टे’ ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. होम स्टे ला येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, भोजन व्यवस्था आदी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील कॉफी प्रकल्प व उत्पादनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शहापूर येथील खादी व ग्रामोद्योग आयोगाव्दारे पुरस्कृत शिवस्फुर्ती प्रक्रीया फाउंडेशनला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्र्यांची चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

दरम्यान यावेळी पालकमत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून वैद्यकीय सोयी- सुविधांचा आढावा घेतला. हतरु गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृती विषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

चिखलदरा तालुक्यातील हतरु येथे काही दिवसापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली.

तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्हा क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे. येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्हास्तराप्रमाणे ग्रामीण भागातील मुला-मुलींनाही तालुकास्तरावरच क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच या क्षेत्राकडे वळतील. व आपसुकच युवा पिढीचे आरोग्यही सुधारेल. तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आज जिल्हा क्रीडा संकुल लोकार्पण होत असतांना आनंद होतो की, संकुलाच्या 28 हजार चौ. मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज, स्क्वॅश कोर्ट, आधुनिक जीम, कब्बड्डी, ज्युदो, कुस्ती, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा सुविधा 11 कोटी निधीमधून निर्माण झालेले आहे. त्या लवकरच खेळाडूंसाठी खुल्या करण्यात येतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा 1 कोटीवरुन 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटीवरुन 25 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटीवरुन 50 कोटी वाढविण्यात आलेली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संकुलातून निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुलासाठी 9 एकर शासकीय जागेत 14.32 कोटी रुपये प्राप्त निधीमधून जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारत, इनडोअर हॉल, धनुर्विद्या रेंज, प्रेक्षक गॅलरी, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युतीकरण व जनरेटर इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे कमी वेळेमध्ये करण्यात आली असून उच्चदर्जाची व सुबक आखणी करुन या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा विद्युत वापर कमी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलात सोलर सिस्टम बसविणे व हायमास फ्लड लाईट लावणे या कामास 50 लक्ष खर्च अपेक्षित आहे. ही कामे महाउर्जा विकास अधिकारण या यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या धर्तीवर तालुका पातळीवर सर्व क्रीडा सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रीडा प्रोत्साहपर निधीचे वितरण

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत तालुका, जिल्हा , विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तर या क्रमाने विविध 93 खेळांच्या 14, 17, 19 या वयोगटातील मुले, मुली यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यादृष्टीने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. अनुदानाचे स्वरूप म्हणून प्रमाणपत्र व तीनही वयोगटात प्रथम, व्दितीय, तृतीय  प्राविण्यानुसार अनुक्रमे एकूण 9 शाळांना, संस्थांना रू. 1 लाख, 75 हजार, 50 हजार रूपये देण्यात येते.

यानुसार 14 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत ज्ञानमाता हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तोमई प्रायमरी इंग्लिश स्कुलचा व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच 17 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत ज्ञानमाता हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाचा व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे 19 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाला व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर रामकृष्ण क्रीडा विद्यालयाला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आर्चेरी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध मोहोड (क्रीडा प्रबोधिनी खेळाडू) ज्युनि.वर्ल्ड चॉम्पियनशिप व एशियन कप यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सन 2024-25 मध्ये नाविण्यपूर्ण योजनेतून इनडोअर हॉलला ॲक्वास्टिक ट्रिटमेंट करणे सिंथेटिक्स फ्लोअर असलेली स्केटिंग रिंग, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रीकेट या क्रीडा सुविधा विकसित करुन खेळाडूंना उपलब्ध होण्यासाठी 1 लक्ष रुपयाचे नियोजन प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर आणि डॉ. नितीन चवाळ यांनी केले.

चिखलदरा पर्यटनस्थळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 16 (जिमाका): विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग, सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. त्‍यामुळे चिखलदऱ्यामध्ये पर्यटकाला अधिक आकर्षक करण्यासाठी पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण करुन देऊ, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसिलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे, सुधीर शेटे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, चिखदऱ्यातील पर्यटकांना व निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आमझरी येथे ‘निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’, गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील ‘निसर्गानुभव मचाण’ व  भीमकुंड येथील ‘साहसी खेळ’ अशा उपक्रमामुळे येथे निश्चितच पर्यटकाच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या महसुल वाढण्यास निश्चितच मदत होईल. पर्यटन स्थळावर मुलभूत सुविधा निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देणाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य द्यावे. या भागात जास्त उत्पादन होणाऱ्या पिकांचे राष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग व ब्रॅन्डिग करुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आराखडा तयार करावा. यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी शेती पिकावरच अवलंबून न राहता जोडधंदाचा पर्याय स्वीकारावा. चिखलदरा क्षेत्रामध्ये पर्यटनाला मोठी संधी असून त्याचा लाभ आदिवासी युवक-युवती व शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार

मुबंई, दि. 16 : होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही  तांत्रिक  अडचणीमुळे  उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी तसेच  मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

000

संजय ओरके/वि.सं.अ.

मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट तर ‘’मर्मर्स ऑफ द जंगल’ ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राला पाच पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 16 : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेंजो दारो”  या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’(लेगसी)’ या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि  आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी  ज्यूरीमध्ये फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष निला मधब पांडा, आणि बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा ज्यूरीचे अध्यक्ष गंगाधर मुढालैर हे उपस्थित होते.

फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

फिचर फिल्म श्रेणीत वर्ष 2022 साठी मराठी भाषेमधून ‘वाळवी’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वाळवी हा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला आहे . तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या  लघुपटाला  जाहीर झाला आहे. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.

या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे,  या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.

आणखी एक मोहेन्जो दडो” यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक

ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जो दडो” या चित्रपटाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे उद्दिष्ट म्हणजे प्राचीन मोहेन्जो दडो संस्कृतीच्या गूढतेला आणि इतिहासातील या महान संस्कृतीच्या पुनर्निर्माणाला उजाळा देण्याचा महत्व देणारा चित्रपट आहे.

चित्रपटात मोहेन्जो दडोच्या उत्खननांमध्ये आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून त्या काळातील समाजजीवन, संस्कृती, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संशोधनाच्या आधारे मोहेन्जो दडोची समृद्ध परंपरा, त्यातील रहस्य आणि हडप्पा संस्कृतीचा विकास कसा झाला याचे बारकाईने चित्रण केले आहे.

या चित्रपटाने इतिहासातील प्राचीन सभ्यतेच्या महत्वाच्या पैलूंना प्रकाशात आणले असून प्रेक्षकांना त्या काळाच्या जीवनशैलीची सजीव अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचे चित्रण, निर्देशन आणि ऐतिहासिक सत्यता यामुळेच याला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी)  या माहितीपटाला जाहीर झाला.  यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपत असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहिर

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे  यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा  पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोबतच सर्वोत्तम बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी,  केजीएफ 1: चॅप्टर 2′ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा  राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहे.

0000

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...