बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 476

ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर दि.19 (जिमाका): पॅरिस येथील ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक व त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ घेण्यात येणार आहे, या समारंभात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक व सत्कार समारंभाबाबत नियोजन बैठक पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मिरवणुकीदरम्यान स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर ढोल ताशा, हलगी व झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या कोल्हापूरच्या सुपुत्राच्या कौतुक सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या या भव्य मिरवणूक व सत्कार समारंभात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा

देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाचीही भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ‘ नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता केंद्रशासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील  पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली. त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही ३० मे २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली. या दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी  85 लाख रुपये जमा झाले आहेत.

लाभार्थी पात्रतेचे निकष

ज्यांच्या नावे भूमी अभिलेखामध्ये वहितीलायक क्षेत्र आहे अशी सर्व शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून अशा पात्र शेतकरी कुटुंबियांस दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. पात्र शेतकऱ्यांना लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते.

लाभ मिळण्यास अपात्र व्यक्ती

या योजनेकरीता जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, महापौर, जि. प. अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारितील कार्यालयातील आणि स्वायत्त संस्थांचे तसेच स्थानिक स्वराज संस्थांमधील नियमित अधिकारी, कर्मचारी, मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती, ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्तीवेतनधारक, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळण्यास अपात्र आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 31   हजार 511 कोटी 90 लाख रुपये जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यात 116.65 लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात एकूण सतरा हप्त्‌यांत आजपर्यंत 31 हजार 511 कोटी 90 लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे.

पीएम-किसानला राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची जोड

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्याचा निर्णय ३० मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून प्रति वर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि  तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यप्रमाणे दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे, पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. संनियंत्रणासाठी ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून 5 हजार 304 कोटी 95 लाख रुपयांचा लाभ

राज्यात या योजनेअंतर्गत ई-केवायसी, आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून 13 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 91.93 लाख शेतकरी कुटुंब  पात्र आहेत. एकूण तीन हफ्ते मध्ये त्यांच्या बँक खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून एकूण पाच हजार 304 कोटी 95 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत.

महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव (सरळ सेवा – निकाल) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 

परळी वैजनाथला होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट देण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. 19 : कृषी विभागातर्फे बुधवार 21 ते 25 ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांना या माध्यमातून आपापसातील विचारांची देवाण घेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध करु शकतील.

शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत  पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा. तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून या प्रदर्शनात 400 पेक्षा जास्त दालने लावण्यात येणार आहेत. तसेच परिसंवाद, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रक्रिया उद्योग यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पौष्टिक तृणधान्य महोत्सव, सेंद्रीय शेती दालन, खरेदीदार विक्रेता संमेलन, पशू प्रदर्शन, ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, रानभाजी महोस्तव,धान्य व इतर शेतीमाल प्रदर्शन व विक्री, शेती निगडित औजारे खरेदी विक्री दालन व कृषी उत्पादने, स्वयं सहाय्य महिला बचत गट निर्मित वस्तू /पदार्थ विक्री भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात पाच लाखांपेक्षा जास्त शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करुन रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी रान भाज्यांचे प्रदर्शन हा या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

पालघर आदिवासी महिला, ब्रह्माकुमारी यांच्याकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना राखी; विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

मुंबई, दि. 19 : रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची आज राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या भगिनींनी राज्यपालांना ओवाळले व राखी बांधली तसेच माउंट अबू येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी ब्रह्मकुमारी रुक्मिणीबेन, बी के वंदना, बी के नेहा, बी. के. माला व बी. के. केतन भाई उपस्थित होते.

‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्र, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरणस्नेही राखी बांधली. यावेळी ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक रमेश पतंगे, संचालक प्रदीप गुप्ता, मुख्याधिकारी लुकेश बंड उपस्थित होते.

भारत विकास परिषद माटुंगा संस्थेचे अध्यक्ष रिषभ मारू यांनी संस्थेच्या सदस्य व माजी नगरसेविका नेहल शाह यांच्यासह राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांना राखी बांधली.

दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह) सासवड संस्थेच्या अधिक्षक स्मिता पानसरे व सुजाता गायकवाड यांनी संस्थेतील विद्यार्थिनींसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली तसेच संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

००००

Various organisations tie Rakhi to Governor on Raksha Bandhan

Mumbai 19 : Various socio-cultural and religious organisations celebrated Raksha Bandhan with State Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Mon (19 Aug). The Governor extended his greetings and good wishes to all those who met him.

Brahmakumari Rukminiben, BK Vandana, BK Neha, BK Mala and BK Ketan Bhai from the Nepean Sea Road and Matunga Centers of Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya tied the Rakhi to the Governor. They also extended an invitation to the Governor to visit the Headquarters of the institution at Mount Abu.

Tribal women Bamboo workers from Palghar district working at the ‘Seva Vivek’ Gram Vikas Kendra project at Bhalivali, District Palghar tied the eco-friendly rakhi made of bamboo to the Governor.

Advisor of ‘Seva Vivek’ Padmashree Ramesh Patange, Director Pradeep Gupta and CEO Lukesh Band were present.

Rishabh Maru, President of Bharat Vikas Parishad accompanied by members of the Sanstha and former Corporator Nehal Shah met the Governor and tied the rakhi to his wrist.

Office bearers and inmates of the Mamata Bal Sadan (Balgruha) founded by the late social worker Sindhutai Sapkal met the Governor and tied rakhi to his wrist. They invited the Governor to visit the Sanstha located at Saswad (Pune).

००००

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध उद्योग समूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांना आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उद्योगांकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अनेक उद्योगसमूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने पाण्याची उपलब्धता विचारात घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून त्याचे नियोजन करावे.

उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सविस्तर सर्वेक्षण करून ते उच्चाधिकार समितीसमोर मांडण्याची त्याचप्रमाणे पाण्याचा प्रकल्पक्षेत्र निहाय वापर लक्षात घेऊन आरक्षणाबाबत व्यावहारिक निर्णय घेण्याची सूचना केली.

उद्योगांची भविष्यातील गरज लक्षात घेऊन बारवी, राजनाला बंधारा, पाताळगंगा, सूर्या, भातसा उपसा सिंचन आदी प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी उद्योग विभागामार्फत यावेळी करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

00000

 

 

‘उमेद’ महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन

  • मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या, औक्षणामुळे मंगल वातावरण 

मुंबई, दि. 19 : – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जस-जशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,” असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापूर्वी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी पोहचून, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे औक्षण करून, राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा निवासस्थानी मंगल आणि रक्षाबंधनाचे आगळे उत्साही वातावरण होते. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहेत. या संकल्पाची सुरवात वर्षा निवासस्थानी झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ही केवळ रक्षाबंधनाची ओवाळणी नाही, तर माहेरचा कायमचा आहेर आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता, तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. अन्य महिलांच्या खात्यातही हळूहळू आधार सींडिंग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच, पैसे जमा होतील. यातून माझ्या बहिणींच्या संसाराला आर्थिक हातभार लागेल, ही आमची भावना आहे, असेही ते म्हणाले.

‘उमेद’ अभियानामुळे राज्यात ८४ लाख महिला बचतगटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. ही संख्या देखील १ कोटीवर न्यायची आहे, सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपण सगळ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देत आहात. तुमच्या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ मिळावी असे आमचे प्रयत्न आहेत. मोठमोठ्या मॉलमध्ये, अमेझॉन, फ्लिपकार्ट या प्लटफॉर्मवरही आपली उत्पादने विकली जावीत, यासाठी आमचे प्रय़त्न सुरु आहेत. बसस्थानकावर आपल्या स्टॉल्सला जागा मिळाव्यात, असे निर्देश दिलेच आहेत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाबत केंद्रांशी संपर्क साधून आहोत. उमेद अभियानातील महिला बचतगटांच्या चळवळीला बळकट करण्यासाठी विशेष बैठक बोलावून उपायोजना करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बहिणींनी असेच आमच्या पाठिशी राहावं, सरकारची ताकद जस-जशी वाढत जाईल, तस तसा या योजनेतील निधीही वाढवला जाईल. आपण बहिणींनीही आम्हाला ताकद द्यावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या योजनेला बदनाम करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. तसेच महिलांसाठी, मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी, लखपती दीदी या योजनांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित भगिनींनी औक्षण करून, मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या.  याचवेळी एका महिला भगिनीने आपण परभणी येथून आले असल्याचे सांगून मुख्यमंत्री भाऊरायाप्रमाणे आपल्या पा‍ठिशी उभे राहिल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनीही या बहिणींचे फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान आलेल्या या सर्व बहिणींचे असल्याची भावनाही व्यक्त केली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री दिलीप लांडे, संजय शिरसाट, ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.

 

०००

जळकोट तालुक्यातील पीक नुकसानीची मंत्री संजय बनसोडे यांनी केली पाहणी

नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, तालुका कृषि अधिकारी आकाश पवार यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

केकत शिंदगी, होकर्णा, वडगाव येथील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर ना. बनसोडे यांनी वडगाव येथील हनुमान मंदिरात शेतकरी, नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. पावसामुळे पिकांचे, रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. तसेच सुमारे आठ ते नऊ गावांमध्ये साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

नुकसानीची माहिती मिळताच दूरध्वनीद्वारे प्रशासनाला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आज प्रत्यक्ष पाहणी करताना शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसान पंचनाम्याचा अहवाल त्वरीत शासनाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या चित्ररथास हिरवी झेंडी

नांदेड दि. 18 :  इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे. या अनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंधारे व महेश इंगेवाड हे उपस्थित होते.

जळगावमध्ये २५ ऑगस्टला होणार प्रधानमंत्र्यांचा ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक मेळावा

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली जागेची पाहणी

जळगाव दि. 18 ( जिमाका ) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते.

वाहतुकीसंदर्भात नियोजन

शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जामनेर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...