शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 47

माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.१६ : माजी सैनिकांच्या विविध मागण्या लक्षात घेता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पावनगड निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे, उपसंचालक पुनर्वसन ले.कमांडर ओंकार कापले, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदचे कोकण  प्रांतचे अध्यक्ष मेजर विनय देगांवकर, राज्य सचिव वीरेंद्र महाजनी, एअर मार्शन प्रदीप बापट, ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव उपस्थित होते.

माजी सैनिकांची जिल्हा कल्याण समिती स्थापन करून या समित्यांमध्ये आखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेच्या सदस्यांना घेणे, माजी सैनिकांना विविध शासकीय सर्वेक्षण, मतदार नोंदणी, तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे, निवृत्त अग्निवीर सैनिकांसाठी शासकीय व निमशासकीय खात्यामध्ये १० टक्के नोकरीमध्ये आरक्षण जाहीर करणे, शांतीकाळात दहशतवादी निरसन कार्यात शहिद सैनिकांच्या विधवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत अनुकंपा योजनेनुसार रूजू करून घेण्याबाबत सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.

सैनिक सेवेदरम्यान बहाल झालेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची शासकीय सेवेकरिता वैधता देणे या सर्व मागण्यांचा शासन सकारात्मकतेने विचार करून सविस्तर प्रस्ताव तयार करून याला मान्यता घेण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी अ. भा. पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या सदस्यांना दिले.

०००

संध्या गरवारे/विसअ/

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे, दि.१६ : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.

आज शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला असे सांगून श्री. पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

शिक्षकानेही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीने अध्यापन केले केले पाहिजे.

राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा  प्रयत्न आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आलेगावचे पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ आदी उपस्थित होते.

0000

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस निरीक्षक मंडलिक यांच्यासह महावितरण आदी  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी जलद गतीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर करावे. वीज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवित हानी व वित्त हानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल मोफत बियाणाचे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाणाचे लाभार्थ्यांना योग्य रित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्री भुजबळ म्हणाले की, तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून या भागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात १ जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुणेगाव – दरसवाडी – डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचा आढावा

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेतला. अस्तरीकरणाचे  काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. आवश्यक तेथे पोलीस सुरक्षा पोलीस विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अस्तिरीकरणाचे राहिलेले टप्पा १ मधील काम जूनअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

येवला शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

येवला शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेऊन नियोजन करावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. येवला शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात यावी. येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

०००

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, नगर रचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी हनुमंत हेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 1,153 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात  नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

यामध्ये महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा या चार तालुक्यातील 265 गावांचा समावेश आहे. या क्षेत्रात पर्यटन वाढीच्या अनुषंगाने अनेक योजना प्रस्तावित आहेत.

पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विकास केंद्र संकल्पना राबविण्यात येणार असून पर्यटकांच्या सुविधांसाठी हे हब राहील याद्वारे सभोवतालच्या स्पॉक्स मधील पर्यटन नंदनवनाशी जोडले जातील. या अंतर्गत बामनोली जलपर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार असून यामध्ये कॅम्पेनिंग साईट, साहसी उपक्रम,  नौकाविहार, रोपवे अशा ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. यामध्ये होम स्टे, ऍग्रो टुरिझम या योजना 20 गावांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

१४ उद्योग समृद्धी केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया, तयार उत्पादने, बांबू आधारित उत्पादने, औषध आधारित उत्पादने यांचा समावेश राहील. 44 ग्राम समूह विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांचाही समावेश आहे.महाबळेश्वर विभागामध्ये 30 जावळीत 33 सातारा 27 आणि पाटणमध्ये 57 असे पर्यटक नंदनवन एकूण 147 प्रस्तावित आहेत. यामध्ये नियोजनबद्धरीतीने वृक्षारोपण करण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या अखंड प्रवासापासून आरामदायी निवास आणि जेवणाचे पर्याय आणि प्रसन्न अनुभव या पर्यटक नंदनवन मधून पर्यटकांना मिळेल. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होईल असा विश्वास आहे.

या प्रकल्पाच्या विकासासाठी अल्पकालीन, मध्यम कालीन व दीर्घकालीन अशा योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. पाच एकरावर न्युरोपॅथी सेंटर, शंभर एकरामध्ये आयुष मंत्रालयामार्फत बोटॅनिकल गार्डन प्रस्तावित आहे.

०००

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

महिला सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.१५: महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध आहे. महिलांचे सन्मान आणि प्रगती ही सामाजिक जबाबदारी असण्यासोबतच महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सहायक गट विकास अधिकारी नंदन जंराडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, गट शिक्षणाधिकारी निलेश गवळी, बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवकुमार कुपल, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दीवर्ष, कोल्हापूर करवीर संस्थानच्या संस्थापक छत्रपती रणरागिणी महाराणी ताराबाई ३५० वा त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष असून यानिमित्ताने राज्य शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली अध्याय असून हा गौरव जपण्यासोबतच वाढविण्याचे काम करावे. महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा असून त्यांनी कृतीतून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करायची आहे, त्यांच्या कार्याचा वारसा जपत पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अलौकिक असून त्या सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या, शासक होत्या, त्यांच्या अंगी प्रजेच्या कल्याणाप्रती असलेली तळमळ ही त्यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांनी देशात सुंदर मंदिरे उभी करण्यासोबतच विविध नद्यांच्याकडेला घाट, धर्मशाळा, गावोगावी रस्त्याचे बांधकाम, पाणपोई उभारणीचे काम केले असून असे लोककल्याणकारी कार्य त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत. त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले बारव, घाट नादुरुस्त झालेले असल्यास त्याची दुरुस्ती करण्याचे काम राज्यशासनाने हाती घेतले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध क्रांतिकारी निर्णय

देशाला आत्मनिर्भर करतांना महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, याकरीता राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध लोककल्याणकारी, क्रांतिकारी निर्णय, उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये स्वतंत्र महिला धोरण, वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, शासकीय सेवेत ३३ टक्के राखीव जागा, स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण, एसटी बस भाड्यात ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षणदेण्यासोबतच उच्च व तांत्रिक शिक्षण मोफत यांच्यासह

राज्यात ७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांच्या उन्नतीकरिता माझी लाडकी बहीण योजना, नमो महिला सक्षमीकरण अभियान, पिंक महिला रिक्षा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, लखपती दिदी, राजमाता माँ जिजाऊ गृहस्वामीनी योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घर खरेदी करतांना मुद्रांक शुल्कात सवलत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांनी प्रवास सवलत योजना, नव तेजस्वी ग्रामीण महिला उद्यम विकास योजना, तेजस्विनी विशेष बस सेवा, चौथे अष्टसूत्री महिला धोरण, नावांमध्ये आईचा नावाचा समावेश, शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अनुदानात वाढ, गरोदर महिला आणि बालकांना आरोग्य संस्थेत नेण्यासाठी  ३ हजार ३२४ रुग्णवाहिका खरेदी, ५० नवीन शक्ती सदनाची निर्मिती, बाल संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, १२ जिल्ह्यात वात्सल्य भवन उभारणी,  महिला आणि बाल सशक्तीरणाकरिता जिल्हा नियोजन समितीत ३ टक्के निधी राखीव, राज्य राखीव महिला पोलीस दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारामती तालुक्यात महिला बचतगटांना ४ कोटीहून कर्ज वाटप

या वर्षी बारामती तालुक्यातील बचत गटांना सुमारे ३ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून १ कोटीहून अधिक रुपयांच्या कर्ज मंजूरी आदेश वाटप करण्यात येत आहे, ही रक्कम नसून नव्या प्रवाशाची सुरुवात आहे, घराघरामध्ये नवीन उद्योग उभारण्यास हातभार लागणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ मिळणार असून पाल्यांना शिक्षण, कुटुंबाला स्थर्य पर्यायाने गावाची समृद्धी होण्यास मदत होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

डॉ. बागल यांनी प्रास्ताविक केले.

०००

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच सुमारे २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

०००

शाळा प्रवेशोत्सव २०२५; पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई, दि. १५: राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार 16 जून, 2025 रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळा, कोडोली येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली आहे.

MLA-MP-Shala Pravesh

Officers-Shala Pravesh 

०००

जखमी शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१५:अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

आज येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे यांच्या घराचे पत्रे उडून झालेले नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस मंत्री भुजबळ यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाणे व ट्रॅक्टरचे वाटप

राष्ट्रीय गळीत धान्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग(155 क्विंटल), सोयाबीन (95 क्विंटल) बियाण्यांचे वाटप मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकरी बाळू कदम, सोमठाणा देश, असराबाई खांडेकर, नगरसुल, कानिफनाथ वारे, पाटोदा यांना राज्य कृषी पुरस्कृत यांत्रिक यांत्रिकरण योजनेतून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.

०००

शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन जबाबदारी पार पाडावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १५: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. माऊलीच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, पालखी मार्गावरील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभागाचे उपअभियंता रवीकुमार आंबेकर, लोणंद नगराध्यक्ष मधुमती कालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, लोणंद मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री देसाई आणि मंत्री पाटील यांनी नीरा नदीवरील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करून तयारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेनी उत्तम नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, पालखीतळ स्वच्छता, शौचालये, पाणी, आरोग्य, सुरक्षा, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

लोणंद नगरपंचायतीला पालखी सोहळ्याच्या सुविधांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पालखी मार्गावरील प्रशासनाने पालखी मार्गावर टँकरद्वारे पालखी तळावर वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा. पालखी मार्गावर स्थिर वैद्यकीय पथके, औषध साठा, रुग्णवाहिका सुविधेसह सर्प व श्वान दंश इंजेक्शन उपलब्ध  ठेवावीत. सर्दी, ताप, खोकला आदी आजार असणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक तपासणीची व औषधे व्यवस्था आरोग्य पथकांकडे उपलब्ध ठेवावीत. महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. विद्युत जनरेटरची व्यवस्था ठेवावी.  जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील हद्दीतील सर्व शौचालये सुस्थितीत व स्वच्छ ठेवावीत. तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता ठेवावी.

पोलीस विभागाने पालखी आगमनावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून नियंत्रण ठेवावे. यासाठी अतिरिक बंदोबस्त तैनात करावा.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पालखी प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयातील 10 टक्के बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था करावी. पालखी मुक्कामी असणाऱ्या तळावर सायंकाळी पुरेसा विद्युत पुरवठा करावा. प्रसंगी जनरेटर ही उपलब्ध ठेवावेत, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी रस्त्यांच्या मार्गांची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्यासह आरोग्य, विद्युत, बांधकाम, रस्ते नगरपालिका अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने संयुक्तकरित्या पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणारआहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच थेट त्याचे गुगल लोकेशन मॅपही पाहायला मिळणार आहे. हा क्यूआर कोड वारकऱ्यांच्या दर्शनासाठी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी सर्व ठिकाणी प्रसिद्ध करावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

०००

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...