शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 46

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही

मुंबई, दि. १६ : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात, याकरीता बरेचसे वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.

मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत, असे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई होणार नाही, परिपत्रकात नमूद केल आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्याकडून स्वागत

मुंबई, दि. १६ : विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी वरळी नाका शाळा संकुलमधील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

वरळी नाका शाळा संकुल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य प्रकल्प संचालक संजय यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, समग्र शिक्षा अभियानाच्या सहायक संचालक सरोज जगताप, जी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा गांगुर्डे, संकुलातील सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

यावेळी यादव यांनी शिक्षक विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे  आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.

यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

मुंबईतील वॉटर मेट्रोचे काम जलदगतीने सुरू करा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १६ : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे आज मंत्रालयात मंत्री राणे यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह कोची मेट्रो रेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर मेट्रोच्या कामासाठी मंत्री राणे यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आता लवकरच वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी मोठ्या संधी असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विशेषतः बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वॉटर मेट्रोचे मार्ग निवडताना या संधींचा पूर्ण विचार करावा. जास्तीत जास्त प्रवासी असणारा आणि जास्तीत जास्त फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरवताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. तसेच त्यांना वाहतुकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.

मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. १६ : पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आढावा घेतला. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्य सचिव सौनिक म्हणाल्या, पावसाळ्यामध्ये पर्यटक काही पर्यटनस्थळावर मोठ्या संख्येने येतात. अशा ठिकाणी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांची जीवित हानी होऊ नये यासाठी जी ठिकाणे धोकादायक असतील तेथे बंदोबस्त वाढवून आवश्यकता भासल्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात यावी. यानंतरही काही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसतील तर अशा पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

नागरिकांच्या जीविताच्या रक्षणाला प्राधान्य देऊन क्षेत्रनिहाय जबाबदारीचे वाटप करण्याची सूचना करुन होमगार्ड, एनसीसी आदींची मदत घेण्याचे निर्देश मुख्य सचिव सौनिक यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करुन जुन्या पुलांची दुरुस्ती अथवा आवश्यकतेनुसार नवीन पूल उभारण्याचे काम हाती घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या पुणे विभागात अधिक असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर केलेल्या तातडीच्या कार्यवाहीबाबत मुख्य सचिवांना माहिती दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे -मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. १६ : राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या विविध दुर्घटना आणि त्यात झालेले नागरिकांचे मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.

मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडल्याने नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी संबंधित रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका, प्रशासकीय यंत्रणा आदींची बैठक घेऊन रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, पावसाळा आणि त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात सर्व यंत्रणांनी अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. रेल्वेने या कालावधीसाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करून आवश्यकता भासल्यास निवृत्त आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. रेल्वे आणि मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. ज्या ठिकाणी प्रवाशांची अधिक गर्दी होते तेथे डिस्प्लेबोर्ड, अनाउन्समेंट सिस्टीम, सोशल मीडिया, एफएम रेडिओ आदींच्या माध्यमातून प्रवाशांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. लोकलचे दरवाजे बंद होतील अशी व्यवस्था करण्याबाबत पावले उचलावीत. गर्दी जास्त झाल्यानंतर लिफ्टप्रमाणे सायरन वाजेल, अशी व्यवस्था करावी. अधिक पाऊस आणि भरतीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुर्घटनेच्या काळात चुकीची माहिती पसरू नये, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. त्या म्हणाल्या, तातडीने आणि योग्य माहिती नागरिकांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी. याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सर्वत्र बॅगेज स्कॅनर लावण्यात यावेत. दुर्लक्षित बॅगा तसेच कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण, महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, यांच्यासह रेल्वे, महसूल, गृह, परिवहन, नगरविकास आदी विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी ज्या भागात नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, त्याच भागात आवश्यक माहिती प्रसारित होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. त्याचबरोबर माहिती दिल्या जाणाऱ्या विविध माध्यमांतून एकसारखी माहिती दिली जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

पुणे, दि. १६: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी २५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या. सर्व पथकांनी ने एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान २५० स्वयंसेवक काम करत होते.

प्रथम जे लोक जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. तळेगाव येतील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. आज अखेर 35 जखमी रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून, 11 जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या जखमींना तत्काळ आयसीयूमध्ये हलविण्यात आले. आयसीयूमधील रुग्णांची काल रात्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यासाठी सूचना दिल्या.

कुंडमळा येथील घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली व सर्व यंत्रणंना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी घटनास्थळी उपस्थित होते.

कालपासून आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणत्याही पर्यटकाची हरवल्याबाबत तक्रार आज सांयकाळपर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेवटी आज सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबविले असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे. आजच्या शोध मोहिमेत वन्यजीव संस्था, आपदा मित्र, रोहा व महाड येथील आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी देखील भाग घेतला.  यावेळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, बापू बांगर, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव आदी उपस्थित होते.

०००

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु

मुंबई, दि १६ : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

अद्याप ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

०००

 

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध – मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके     

नाशिक, दि. १३ (जिमाका): राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. तेथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी आदिवासी विभाग सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. आज इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथे विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवासह आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास आयुक्त तथा ,शबरी वित्त व आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (मुख्यालय) दिनकर पावरा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नाशिक अर्पित चौहान, तहसीलदार अभिजीत बारवकर, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी विभाग) नाशिकचे कार्यकारी अभियंता निरज चोरे,   सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग प्रदिप दळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, पेसा क्षेत्रातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून  शैक्षणिक वर्ष २०२५–२६  वर्षाच्या अखेरपर्यंत, बाह्यस्रोतामार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी विद्यार्थी-केंद्रीत दृष्टिकोनास प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक साधनसामग्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवासाच्या सुविधा, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विशेष भर देत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेंतर्गत आदिवासी महिला व मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात यावी. या क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध दिला जाईल. आदिवासी विकासाच्या अन्य योजना पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील असे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आज गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबाबत त्यांचा गौरव करतांना मनस्वी आनंद होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच इतर मुलांना प्रोत्साहन मिळणार आहे. आदिवासी जाती-जमाती आयोगास संविधानात्मक दर्जा प्राप्त झाल्यामुळे शासनाचा आभार व्यक्त करीत मंत्री झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येत आहे. या अतंर्गत सर्व अनुसूचित जमातीना शासकीय कामकाजासाठी  लागणारे आवश्यक दस्तावेज आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, रहिवास दाखले, रेशन कार्ड, बँक खाते, किसान क्रेडीट, ईपीक कार्ड, सिकल सेल तपासणी, पी.एम.आवास योजना, उज्वला गॅस योजना, वीज जोडणी, जॉब कार्ड यांचा समावेश आहे. यासह 5 मेडीकल मोबाईल रूग्णवाहिकांद्वारे आदिवासी वाडी-वस्तीवर जावून रूग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त श्रीमती बनसोड यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.

मंत्री डॉ. वुईके यांनी शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवविद्यार्थ्यांचे स्वागत

मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवोगत विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

डिजीटल एनवायरमेंट क्लासरूमचे उद्घाटन व ऑनलाईन संवाद

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प नाशिक व सार्वजनिक बांधकाम ( आदिवासी) विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंडेगाव ता.इगतपुरी या आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतर करणे व डिजीटल क्लासरूम व टॅब लॅबचे उद्घाटन मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका येथील धरती आबा जनजातीय ग्रामउत्कर्ष अभियान योजनेच्या राज्यस्तरीय प्रचार व प्रसिद्धी शुभारंभ कार्यक्रमात मंत्री डॉ. वुईके यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवित ऑनलाईन संवाद साधला.

राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

यावेळी आश्रमशाळांमधील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी कला व विज्ञान परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये दहा हजार, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रूपये सात हजार व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रूपये पाच हजार रकमेच्या धनादेश व सन्मान पत्राचे प्रदान मंत्री डॉ. वुईके आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ए.एन.एम नर्स यांना किट वाटप

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी नियुक्त परिचारिका यांना आरोग्य किट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शबरी वित्त व विकास महामंडळाचे वाहन वाटप व लाभार्थींना धनादेश वाटप

शबरी वित व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला बचत गट यांना धनादेशाचे प्रदान तसेच व्यवसायासाठी वाहनाच्या चावीचे प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

इगतपुरी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगांव येथील विद्यार्थ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

मंत्री डॉ. वुईके यांच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्य बँड पथक संचलनाने झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 15 जून  ते 30 जून 2025 पर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रचार रथाला मंत्री डॉ. वुईके यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान कक्षाला भेट दिली. तसेच यावेळी आयोजित शिबिरात आदिवासी लाभार्थ्यांना ई-रेशन कार्ड, जिवंत 7/12, मनरेगा जॉब कार्ड, जातीचे दाखले, महिलांना बेबी केअर किट अशा विविध लाभांचे प्रदान करण्यात आले.

०००

“मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”– पालकमंत्री गुलाबराव पाटील

▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्या व दप्तरांचे वाटप

▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय

जळगाव दि. १६ (जिमाका): “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती संस्कारांची पाठशाळाही आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांनी समन्वयाने मुलांमध्ये विश्वास व स्वाभिमान रुजवायला हवा. मी बैलगाडीतून आलो कारण शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो… आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी उपस्थितीने एक वेगळीच शैक्षणिक आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कोरली.

इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुद्द पालकमंत्र्यांनी बैलगाडी चालवत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत मिरवणूक काढली. त्यांनी जुन्या शाळेतील आठवणींना स्नेहपूर्वक उजाळा दिला. पुष्पवृष्टीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश केला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केले, हे विशेष!

या शाळा प्रवेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्ये

▪️बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण मातीचा गंध देणारा अनोखा उपक्रम

▪️पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत

▪️पालकमंत्री तब्बल दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमले – जीवनदृष्टीचे बळ दिले

▪️पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात

▪️पालकमंत्र्यांतर्फे दीड लाख वह्यांच्या वितरणाचा – औपचारिक शुभारंभ

गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित होत असलेले बदल व त्या अनुषंगाने असलेली जबाबदारी यांची जाणीव करून दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झालेला असून, ही शाळा एक मॉडेल शाळा आहे.

उपशिक्षक झाकीर सर आणि उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विजय पाटील आणि मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती

माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, प्रकल्प अधिकारी सुरेखा तायडे, उपसरपंच वंदना साळुंखे, मच्छिंद्र कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सरपंच आलिम देशमुख, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, निसार देशमुख, यासीन हाजी, जमील बेग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय महाजन, सुनील झंवर, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्राम विकास अधिकारी शरद धनगर, सुलतान पठाण, तसेच तीनही शाळांचे मुख्याध्यापक – एन. के. देशमुख, अकिल सर, श्रीमती पटेल जहाआरा, मधु साळुंखे, अकबर शेख, यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...