शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 48

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात
  • दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार

मुंबई, दि. १५ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन या संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

०००

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट

मुंबई, दि. १५:   भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात मागील २४ तासामध्ये (१५ जून रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी., रायगड जिल्ह्यात ६५.३ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ५३.८ मिमी, ठाणे २९.६  आणि यवतमाळ जिल्ह्यात १७.५ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड गौरीकुण्डरिकुण्ड येथे आज दिनांक १५जून, २०२५ पहाटे ०५.४५ वाजता हेलिकॉप्टर अपघात झाल्याने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दापोडा गाव, भिवंडी, ठाणे (प.) या ठिकाणी केमिकल गोडाऊनला लागलेल्या आगीच्या  घटनेत एक व्यक्ती मृत झाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

नागपूर जय कमल कॉम्प्लेक्स येथील आगीच्या घटनेत २ व्यक्ती मृत व १ व्यक्ती जखमी झाली आहे. जगबुडी नदीची खेड येथे ईशारा पातळी ५ मीटर असून सध्या नदीची पाणी पातळी ५.९ मीटर इतकी पाणी पातळी आहे.  जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर आहे.

मुंबई जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १ व्यक्ती जखमी झाली आहे.  वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती जखमी,  धुळे जिल्ह्यात वीज पडून एक मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून चार व्यक्ती व पाच प्राण्यांचा मृत्यू आणि पाच व्यक्ती जखमी, नंदुरबार जिल्ह्यात एक व्यक्ती मृत्यू व एक जखमी आणि अमरावती जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

०००
20250615 daily situation report

 ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५: शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधितांना त्यांचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम १६ जूनपासून राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

०००

विभागाने घरपोच चिकित्सा सेवा द्यावी -मंत्री पंकजा मुंडे

अमरावती, दि. १५ : शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशू पालनाकडे कल वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने या पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास विभागाने पशूंच्या चिकित्सेसाठी घरपोच सेवा द्यावी, असे निर्देश पशूसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

आज घेतलेल्या पशूसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पशू संवर्धन विभागाचे डॉ. वाय. एस. वंजारी, डॉ. शशिकांत कानफाडे, डॉ. संदिप इंगळे, डॉ. शिवेंद्र महल्ले, डॉ. सुधीर चौधर, डॉ. राजेंद्र पेठे, डॉ. दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या, पशूंच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी. जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि चिकित्सागृह असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. प्रामुख्याने तालुकास्तरावर घरपोच सेवा देण्यात यावी. गोशाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा असाव्यात. गोशाळेला तारेचे कुंपण घालण्यात यावे. याठिकाणी दाखल होणाऱ्या पशूंना योग्य उपचार करण्यात यावे.

देशी गाय परिपोषण योजनेतून तीन हजारावर गायींना अनुदान देण्यात आले आहे. त्यासोबच मानव विकासमधून दुधाळ जनावरे वाटप आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. या वाटप करण्यात आलेल्या जनावरांची माहिती ठेवावी. तसेच त्यांना आवश्यक असलेली मदत पुरविण्यात यावी. दुधाळ जनावरांना वैरणाची आवश्यकता असल्याने वैरण विकास कार्यक्रमामधून कामे घेऊन चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. महामेष योजनेतून 217 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र प्राधिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

यानंतर त्यांनी पर्यावरण विभागाचा आढावा घेतला. महानगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेची कार्यक्षमपणे हाताळणी करावी. प्रामुख्याने नागरी क्षेत्रात पाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचविण्यात यावे. विभागातील सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारे पाणी गोळा करण्यासाठी संबंधित पालिकांना व्यवस्था करण्यास सांगावे. उद्योग क्षेत्रात वायू आणि जलप्रदूषणाच्या तक्रारी येतात. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यास प्रकल्पांना सांगावे. अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग आहे. त्याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा तपासण्यात यावी. वीज निर्मिती केंद्रामधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे प्रकल्पामधून निघणारी राख आणि सांडपाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.

०००

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा अहवाल शासनास त्वरीत सादर केला जाईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री अतुल सावे दिली.

आज अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, अर्धापूर शिवार, लहान शिवारात नुकसान झालेल्या केळी व पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदींची उपस्थिती होती.

यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानुसार येत्या मंत्रीमंडळ बैठकीत नुकसानीचा अहवाल सादर करुन नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धापूर तालुक्यातील चिंचबन येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेट्टे, अर्धापूर शिवारातील व्यंकटराव साखरे, लहान शिवारातील गिरीश कल्याणकर व विठ्ठल  इंगळे यांच्या शेतात जाऊन केळी व पपई या पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा  

पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यात अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या केळी व पपई या फळ पिकांचा तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत अहवाल तयार करुन शासनाला सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना दिल्या.

जिल्ह्यातील केळी या पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. यासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.

या बैठकीस खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच विविध विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

000000

 

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील राजुरेश्वर, एकेश्वरी तांबवे पाणीपुरवठा योजना संदर्भात साजुर, तांबवे, किरपे, शेणोली रस्ता क्रॉसिंगबाबत बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडचे तहसीलदार कल्पना ढवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता नजीर नायकवडी, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, रस्त्याचे काम सुरू करताना स्थानिक नागरिकांच्या व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेण्यात आल्या नाहीत. कामे करताना नळ योजनांच्या पाईपलाईन काढल्यामुळे पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी  साचून राहिले आहे. आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याकडेला बंदिस्त गटारीचा काढण्याचा विचार करण्यात आला नाही. या कामाविषयी लोकांच्या तीव्र भावना आहेत.

जोपर्यंत शेतातील पाणी काढून ओढ्याला जोडले जाणार नाही, नळ योजनांच्या नवीन पाईपलाईन टाकून नळ योजनेचे पाणी चालू करून देणे, गावांच्या बाजूला गटारांची व्यवस्था करणे ही कामे केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत दिले. मंत्रालयात याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही  त्यांनी सांगितले.

बैठकीस  संबंधित गावचे  नागरिक उपस्थित होते.

000

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाण संदर्भातील बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे,  कराड तहसीलदार कल्पना ढवळे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी सुपने, केसे गावातील संबंधित लोकांच्या गावठाणांचा प्रश्न हा खूप वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत  प्रस्ताव पाठवून शासन स्तरावर सादर केला जाईल. शासन स्तरावर बैठक घेऊन याला शासन मान्यता  घेण्यासाठी प्रयत्न करेन. यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवावा.   गावठाणाचा प्रश्न प्रलंबित असलेल्या नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

यावेळी संबंधित नागरिकांना येणाऱ्या  अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.

गावठाण नोंदीची अडचण असलेल्या संबंधित लोकांच्या जमिनी कोयना धरणाच्या नदीकाठावरील व भूकंपग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी वसवण्यासाठी ग्राम कमिटीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमिनी संपादन करून पुनर्वसन केले आहे.  आज घडीला काही जमिनीवर मूळ शेतकऱ्यांची नोंद तर काही जमिनीवर सरकार म्हणून नोंद असल्याबाबत माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

बैठकीस  संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000

रोजगार हमी योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

  • रोहयो कामे, पीएम आवास, स्मार्ट पीएचसीचा आढावा
  • विहिरीचे आदेश पंचायत समितीतून थेट लाभार्थ्यांना द्या

यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनस्तरावरून मंजूर दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील कामे तसचे प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या प्रगतीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. रोजगार हमी योजनेची मंजूर कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

महसूल भवन येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय जोशी, दारव्हा, नेर, दिग्रस तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकून 588 कामे मंजूर आहे. त्यात दारव्हा 258, दिग्रस 141 व नेर तालुक्यातील 189 कामांचा समावेश आहे. यापैकी 384 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यातील 85 कामे पुर्ण झाली तर 39 कामे प्रगतीपथावर आहे. प्रगतीपथावरील कामे तातडीने पुर्ण करा. जी कामे काही कारणास्तव सुरु झाली नाही, ती कामे सुरु करून लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

मंजूर सर्व कामे ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केली जात आहे. बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर तहसिलदारांकडून प्रशासकीय मान्यता घेऊन कामे पुर्ण करणे अपेक्षित आहे. ज्या कामांच्या अद्याप मान्यता झाल्या नसतील त्या तातडीने देऊन कामांना गती देण्यात यावी. कामांमध्ये गावातील सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॅाकची कामे व सिमेट रस्ता व पेव्हर ब्लॅाक अशा कामांचा समावेश आहे. प्रलंबित कामे कालमर्यादेत पुर्ण करण्यासाठी आराखडा करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या.

रोहयोमधून शेतकऱ्यांना विहीरी मंजूर झाल्यानंतर काही ठिकाणी त्यांच्याकडून पैसै घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे. असे कुठेच होता कामा नये. लाभार्थ्यांना पंचायत समितीस्तरावरून थेट मंजूरी आदेश द्या. मधे कुठलीही यंत्रणा ठेऊ नये. पैसे घेत असल्याच्या तक्रारी येऊ नये. सद्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांसाठी सर्वे सुरु आहे. राज्याच्या अन्य योजनेतून घरकुल मंजूर होणार असले तरी प्रधानमंत्री आवास योजनेत या लाभार्थ्यांची नावे घेण्यात यावी. या योजनेतून लवकर निधी उपलब्ध होत असल्याने या योजनेतून लाभ देण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.

खनिज विकासमधून जिल्ह्यात 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट पीएचसी करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. दोन उपजिल्हा रुग्णालयांना देखील निधी देण्यात आला. टप्प्याटप्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना निधी देऊन स्मार्ट करण्यात येणार आहे. ज्यांना निधी देण्यात आला, त्या कामांच्या प्रगतीचे सादरीकरण करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या. मांजर्डा, येवती व वरझडी या गावातील पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याच्या तक्रारी आहे, त्यामुळे या तिनही गावांना आरओ सयंत्र बसविण्याचे त्यांनी सांगितले.

0000

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली. नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, बांधकामचे कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी उपस्थित होते.

नाट्यगृहाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. बैठक व्यवस्था, रंगमंच आदी जवळपास सर्व व्यवस्था पुर्ण झाल्या. आता केवळ विद्युत व्यवस्था, वातानुकुलीत व्यवस्था, साऊंड सिस्टीम व नाट्यगृहात आवाज घुमू नये यासाठी करावी लागणारी व्यवस्था ही कामे व्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे. सोबतच सुरक्षा व्यवस्थेवर काम करणे आवश्यक आहे. ही कामे झाल्यानंतर नाट्यगृह सुरु करता येऊ शकतो. पुढे नाट्यगृहाच्या अद्यावतीकरणासाठी अनेक कामे करणे आवश्यक असल्याचे यावेळी पाहणीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले.

नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी जी कामे लगेच करणे करणे आवश्यक आहे, त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यासाठी येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी मंजूर करू. जी कामे भविष्यात करणे आवश्यक आहे, ती देखील करण्यात येतील. त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. नाट्यगृहाचे बांधकाम व इतर कामे चांगली झाली आहे. आतील कामे निधी दिल्यानंतर तातडीने करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. मुख्याधिकाऱ्यांनी नाट्यगृह बांधकामाची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती यावेळी दिली.

00000

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन

मुंबईदि. 14 : आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगारसंशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विले पार्ले येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या नवीन इमारतींचे उद्घाटन व एस.व्ही.के.एम.चे नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानएनएमआयएमएस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू अमरीशभाई पटेलएसव्हीकेएमचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेलआमदार पराग आळवणीआमदार अमित साटममाजी आमदार कृपाशंकर सिंहभरत सांगवीजयंत गांधीप्राध्यापकविद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीएनएमआयएमएस सारख्या संस्थांनी शैक्षणिक गुणवत्तापारदर्शक प्रवेशप्रक्रिया आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देत देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  केंद्र सरकारच्या सहकार्याने नवी मुंबई येथे 250 एकरांवर एज्युसिटी’ संकल्पना राबवण्याचे जाहीर केले आहे. येथे अ‍ॅबरडीन विद्यापीठयॉर्क विद्यापीठवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठइलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन यांसारख्या पाच आघाडीच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र सुरू होणार आहे. यामुळे जागतिक ज्ञान भारतात येईलखर्च कमी होईल आणि विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.

पूर्वी शिक्षणपद्धती संथ आणि जड होती. अभ्यासक्रम बदलायला वर्षे लागायची. आता एनईपीमुळे (राष्ट्रीय शिक्षण धोरण) लवचिकता आणि गतिशीलता आली आहे. आज महाराष्ट्र आणि मुंबई हे भारताचे स्टार्टअप हब बनले आहे. राज्य सरकारने फंड तयार केला आहेयामुळे नवउद्योजकांना मदत होत आहे. शिक्षण संस्थांच्या इमारतींच्या उंचीची मर्यादा वाढवण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात येऊन त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच निर्णय घेतला जाईलतसेच विद्यार्थी आणि परिसरातील तरुणांसाठी एक जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाच्या वैचारिक पुनरुत्थानासाठी ऐतिहासिक पाऊल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

भारताची स्वातंत्र्याची लढाई केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हतीतर शिक्षण व्यवस्थेतून भारतीय मूल्यांचा संचार करण्याची होती. ब्रिटिशांनी मॅकॉले शिक्षणपद्धती लागू करत भारताच्या पारंपरिक ज्ञान व्यवस्थेचे नुकसान केले आणि आपल्याला दासत्व मनोवृत्तीकडे ढकलले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे देशाच्या वैचारिक व मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेतअसे मत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहासत्यातील बदलांची गरज आणि भविष्यातील दिशादर्शक भूमिका यावेळी स्पष्ट केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले कीनरसी मोनजीसारख्या संस्था ही केवळ शिक्षणसंस्था नसूनत्या नवभारताच्या उभारणीसाठी प्रेरणास्थान आहेत. एसव्हीकेएम संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा ठरू शकणाऱ्या कॉमर्सट्रेडिंग व उद्योजकतेसारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले पाहिजे. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, “तुम्ही केवळ विद्यार्थी नसूननवभारताचे सेनानी आहात. विकसित भारताच्या निर्मितीत तुमचे योगदान महत्त्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांबरोबर संवाद

मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या इमारतीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. यावेळी त्यांनी ऑटोमेशन लॅबमॅन्युफॅक्चरिंग लॅब मधील विद्यार्थ्यांकडून नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच प्रा. वाय.के. भूषण इन्फॉर्मेशन अँड नॉलेज रिसोर्स सेंटर येथील डिजिटल व फायनान्स लॅब आणि ग्रंथालयाची पाहणी केलीयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.

0000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...