रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 465

विकासकामांमधील अडथळा खपवून घेतला जाणार नाही –  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. १७ : लोकप्रतिनिधी म्हणून लोक कल्याणाच्या योजना साकारून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यापर्यंतची धोरणात्मक जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही स्वीकारली आहे. शासन सर्वसामान्यांसाठी ज्या योजना आखते ती कामे पूर्णत्वास नेणे, त्या कामातील गुणवत्ता, दर्जा राखणे यासाठी निधी उपलब्ध व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागाचे मंत्री व सचिव यांच्यामध्ये समन्वय साधणे ही जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून प्रशासनाचीही आहे. शासनाच्या योजना प्रत्यक्षात साकारण्याच्या कामात जर कोणी हलगर्जीपणा, टाळाटाळ करीत असेल तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा पाणीपुरवठा विभाग व इतर विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

मागील काही वर्षात झालेल्या पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी बांधकाम, पाणंद रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांची उपलब्धता व इतर विकासकामांबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा योजना राबविताना जोपर्यंत पाण्याचा मूळ स्त्रोत होत नाही तोपर्यंत इतर पाईपलाईन व कोणतीच कामे करू नयेत, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. असे असतानाही मूळ स्त्रोत नसताना कामे झाल्याच्या तक्रारी आहेत. जर ही वस्तुस्थिती असेल तर संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे निर्देश देऊन ही चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यास सांगितले. प्रत्येक विकासकामांना जिओ टॅग करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रत्येक कामे ही विभागप्रमुखांनी स्वतः तपासून घेतली पाहिजेत. वेळोवेळी आम्हीसुद्धा ग्रामीण भागात या कामांबाबत प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या योजना या ग्रामीण विकास यंत्रणेच्या आराखड्यानुसारच होणे अभिप्रेत आहे. संपूर्ण जिल्ह्याचा अर्थात ग्रामीण भागाच्या विकासाचा आराखडा हा वेळोवेळी ग्रामीण विकास यंत्रणेकडून तयार केला पाहिजे. या आराखड्यानुसार विविध वार्षिक योजनांतर्गत त्याला प्राधान्य दिले पाहिजे. आवास सारख्या योजनांना अधिक जबाबदारीने वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुद्रांक शुल्कचे मिळणार १६८ कोटी

आढावा बैठक सुरू असताना जिल्हा परिषदेचे १६८ कोटी रुपये मुद्रांक शुल्क विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती लेखा विभागाने त्यांना दिली. याबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे, असे सांगून त्यांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यास सांगितले. बैठक सुरू असतानाच त्यांनी दूरध्वनीवर वरिष्ठ अधिका-यांशी बोलून मुद्रांक शुल्कचे १६८ कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

०००

मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ

मुंबई, दि. १७ : मुंबई शहर व उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केले आहे. ५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत नुकतेच हे काम पूर्ण झाले. यामुळे वाहिनी क्र. १ आणि वाहिनी क्र. २ या दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.

या वाहिनीचे यापूर्वीच २७ कि.मी. चे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ कि.मी. चे काम महापारेषणने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. या वाहिनीच्या कामात रेल्वे, हायवे व उच्च विदयुत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतीशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ कि.मी. चे वरील काम तातडीने पूर्ण केले.

या कामामुळे ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-१ च्या क्षमतेत आमुलाग्र बदल होऊन पूर्वीच्या १००० मेगावॅटऐवजी २१०० मेगावॅटपर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे. यापूर्वीही कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-२ च्या क्षमतेत वाढ झाल्याने दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट इतक्या विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.

०००

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दिनांक 17:- ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून  दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात  येतील.’ असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने  पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने 17  ते 19 जानेवारी,  2025  या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त  शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.‌

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना  राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची  संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना मिळकत करात सवलत द्यावी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई करताना दिव्यांगाना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची सूचना श्री.पवार यांनी केली.

दिव्यांग भवनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे यावर भर देण्यात येईल आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांतील पदे लवकरच भरण्यात येतील. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे असे श्री. पवार म्हणाले.

पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा  मला आनंद झाला आहे असून पर्पल जल्लोष कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी पाहावा असा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार

पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. पवार यांनी यावेळी केली.

प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात 40 पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्पल जल्लोष कार्यक्रमास दिल्या शुभेच्छा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव या अभिनव उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आवश्यक असणारी माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, कायदे, अधिनियम आणि हक्क याबाबत माहिती मिळेल. यामुळे दिव्यांगांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल.

महोत्सवात साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांगाना आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी महाउत्सव एक आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

परांजपे स्किमचे व्यवस्थापकीय संचालक शंशाक परांजपे, युनिसेफचे संजय सिंह, अभिनेते दर्शिल सफारी यांचा दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली. दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, दिव्यांग बांधव, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्कृती व परंपरेतून आलेले मूल्य जपण्यासह ती नव्या पिढीपर्यंत प्रवाहित व्हावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. 17 : हजारो वर्षांपासून गंगेचा वाहत आलेला प्रवाह दररोज नित्य नुतन भासतो. सनातन विचार हा गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ असून यात पुरातन व नित्य नुतनतेचा संगम आहे. आपण जेव्हा गंगेच्या धारेत जातो तेव्हा तेवढीच शुध्दता व तजेलतेची अनुभूती आपण घेतो. आपल्या संस्कृतीतूनपरंपरेतून आलेली जी मूल्य आहेतजे विचार आहेतज्या चेतना आहेत त्या पुर्नस्थापित करण्याचे कार्य मुकुल कानिटकर सारखे व्यक्तिमत्व करत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘बनाए जीवन प्राणवान’ हे पुस्तक त्याचेच द्योतक आहेअसे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुकुल कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘बनाए जीवन प्राणवान’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमास श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जीलेखक मुकुल कानिटकरप्रकाशक देवेंद्र पवार व मान्यवर उपस्थित होते.

आपल्या देशाला एक महान परंपरा लाभली आहे. हजारोवर्षांपासून प्रगल्भतेने सिध्द असलेल्या संस्कृतीवर आपला देश उभा आहे. आपली सिंधु संस्कृती याचे दर्शन घडवते. सूमारे 9ते 10 हजार वर्षांपूर्वी असलेली सभ्यता आपण पहातो. याचे अवशेष आजही आपल्याला आढळतात. परिपूर्ण नगराचे स्वरुप त्याचे अवशेष आपण पहातो. पाश्चिमात्यांकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या आपल्याकडे होत्या.  समृध्दीसह विचारविवेकपरंपरासभ्यता याचा समृध्द वारसा आपल्याकडे त्या कालापासून आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या समृध्द परंपरेला इंग्रजांनी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. याला छेद कसा देता येईल यासाठी इथल्या परंपरांवरही त्यांनी घाला घातला. आपण समृध्द होतो म्हणून आपल्यावर अनेक आक्रमण झाली. जगातील व्यापारात आपली हिस्सेदारी ही त्या काळी तीस टक्क्यांपेक्षा अधिक होती. जगाच्या व्यापारात आपला जीडीपी हा 28 ते 29 टक्के एवढा होता असे प्रशांत पोळ यांनी विविध संदर्भ देऊन याची मांडणी केली आहे. आपल्या स्थापत्य शास्त्रात सांडपाणी व्यवस्थापनापासून सर्वच बाबी होत्या. ही समृध्दता इथल्या परंपरेतूनइथल्या मूल्यातूनसनातन जीवनशैलीतून विकसित झालेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजेअसे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आपल्या सभ्यतेलापरंपरेला शाश्वत मूल्यांना जपत यातील काही मूल्य काळाच्या परिघावर तपासून त्याला नव्या स्वरुपात स्वीकारण्याचे धैर्य भारतीयांनी दाखविले आहे. या सांस्कृतिक वारसामध्येविचारातमूल्यांमध्ये विज्ञाननिष्ठता आहे हे आपण विसरता कामा नये. संपूर्ण जगावर राज्य करण्याची भूमिका आपल्या संस्‍कृतीची नसून‍ आपल्या विचारांचेसभ्यतेचे अनुकरण सर्वत्र व्हावेयातून मानवता वाढावी ही शिकवणूक आपली परंपरा देते असे त्यांनी स्पष्ट केले. यादृष्टीने मुकुल कानिटकर यांचे हे पुस्तक नव्या पिढीपर्यंत सशक्तपणे पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. ती जबाबदारी आपली असून यासाठी प्रत्येक जण याला प्रवाहित करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सनातन परंपरा ही विवेकाच्या विचारातूनसंवेदनेतून आलेली आहे. ज्यांनी धर्मशास्त्र वाचले नाहीअशा अनेक लोकांच्या वर्तनात या सभ्य संस्कृतीचा अंश पोहचलेला आहे. एखाद्या परक्या ठिकाणीनवीन गावात जर आपण जाऊ तर त्या ठिकाणची आपली माता बहीण आपल्याला हातपाय धुण्यास सांगते. याचा अर्थ ती आपल्याला जेवनाला निमंत्रण देत असते. जेवणाअगोदर हातपाय धुण्याची ही कृती विज्ञाननिष्ठेच्या पूढे जाणारी असल्याचे श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जी यांनी आपल्या आशिर्वादपर मार्गदर्शनात सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक देवेंद्र पवार यांनी केले. भारतातील लहानातली लहान बाब एक अनुभूती आहे. त्यात ज्ञान आहे. दगडात सुध्दा प्राण असतात ही भावना त्यातील शक्तीलासभ्यतेला जपणारी असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बाबी आपल्याला विनासायास परंपरेतून मिळाल्या. त्याचे कशात मोल करता येणार नाही असे मुकुल कानिटकर यांनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली 17: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकर, बुद्धिबळ विश्वविजेता  डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 40 वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच, महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वरळीच्या कामगार विमा योजना रूग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई, दि. 17 : वरळी येथील राज्य कामगार विमा योजना रूग्णालयाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून कामगारांच्या वैद्यकीय सेवेसाठी ही रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यावर भर द्यावा.

यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णांना आरोग्य सेवा सुविधा तत्परतेने देण्याचे निर्देश दिले.

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

उत्पन्नाचे अंदाज अधिक प्रभावीपणे परिगणित करण्यासाठी माहितीची गतिमान देवाणघेवाण आवश्यक – राज्य उत्पन्न सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. अभय पेठे

मुंबई, दि. 17 : शासनाच्या विविध विभागांतर्गत माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान आणि व्यापक केल्याने राज्य उत्पन्नाचे अंदाज अधिक प्रभावीपणे परिगणित करण्यासाठी ते सहाय्यक ठरेल, त्यादृष्टीने समितीने संशोधन आणि प्रक्रिया बळकटीकरणास प्राधान्य द्यावे, अशा सूचना राज्य उत्पन्न सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अभय पेठे यांनी येथे दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पन्न सल्लागार समितीची पहिली बैठक झाली, बैठकीस अशासकीय सदस्य डॉ. जितेंद्र व. चौधरी, संचालक (संशोधन), महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन, मुंबई, डॉ.एस. चंद्रशेखर प्राध्यापक, इंदिरा गांधी इन्स्टीट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई, डॉ.जे. डेनिस राजकुमार, अर्थतज्ज्ञ, (ऑनलाईन) तसेच शासकीय सदस्य आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई उपसचिव, अपर महासंचालक, राष्ट्रीय लेखा विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार यांचे प्रतिनिधी प्रधान सल्लागार, सांख्यिकी विभाग, भारतीय रिझर्व बँक यांचे प्रतिनिधी, अपर संचालक, शाश्वत विकास ध्येय कक्ष, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई, आयुक्त, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी, विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी, आयुक्त, वस्तू व सेवा कर, महाराष्ट्र राज्य यांचे यांचे प्रतिनिधी, प्रादेशिक सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय नाशिक, नागपूर व पूणे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी व पुणे तर समितीचे सदस्य सचिव सहसंचालक, राष्ट्रीय उत्पन्न शाखा, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई उपस्थित होते.

यावेळी राज्य उत्पन्न परिगणित करण्यासाठी सध्या वापरण्यात येत असलेल्या पायाभूत वर्षांमध्ये (२०११-१२) बदल करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य उत्पन्न परिगणित करण्याच्या एकंदरीत कार्यपद्धतीचा अभ्यास करुन अधिक प्रभावी कार्यपद्धती ठरविणे, जिल्हा उत्पन्न व त्रैमासिक राज्य उत्पन्न परिगणित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी विविध तज्ज्ञांचे  कार्यगट, संवादसत्र आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. नवीन पायाभूत वर्षानुसार राज्य उत्पन्न परिगणित करुन ते प्रकाशित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमावरही या बैठकीत विचार – विनिमय करण्यात आला.  सहसंचालक अमोल खंडारे यांनी समितीच्या कार्यपद्धतीसंदर्भात सादरीकरण केले.

राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे मोजमाप करण्याचे स्थूल राज्य उत्पन्न’ व ‘दरडोई राज्य उत्पन्न हे महत्वाचे निर्देशक आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध अंगी अभ्यासासाठी तसेच राज्याची वित्तीय स्थिती समजण्यासाठी स्थूल राज्य/ जिल्हा उत्पन्नाच्या तसेच दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी, संलग्न सेवा, उद्योग, सेवा इत्यादी विविध क्षेत्रातील वृद्धीदराचे मोजमाप करण्याचे हे एक महत्वाचे साधन आहे. विविध क्षेत्रातील वृद्धीदर वाढविण्यासाठी सर्वांगिण उपाययोजना करण्यासाठी राज्य उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग होत असतो. सध्या राज्य उत्पन्नाची आकडेवारी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली व कार्यपद्धतीनुसार पायाभूत वर्ष २०११-१२ च्या आधारे तयार करण्यात येत आहे. सदर पायाभूत वर्ष बदलण्याचे केंद्र शासनाने निश्चित केले असून त्यावर निर्णय घेण्यासाठी सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, नवी दिल्ली, यांनी २७ जून २०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे (Extraordinary Gazatte) ‘राष्ट्रीय लेखा सल्लागार समितीची’ पुनर्रचना केली आहे,

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य स्तरावर स्थूल राज्य उत्पन्नाचे अंदाज परिगणित करण्यासाठी सुयोग्य पायाभूत वर्ष निश्चित करणे, तसेच स्थूल राज्य उत्पन्न व जिल्हा उत्पन्न अधिक अचूक पद्धतीने परिगणित करण्यासाठी सुयोग्य कार्यपद्धती सुचविणे यासाठी नियोजन विभागाच्या  दि. २७ नोव्हेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये ‘राज्य उत्पन्न विषयक सल्लागार समिती’ (Advisory Committee on State Income) स्थापन केली  आहे. समितीचा कालावधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षांकरिता आहे.

समितीची कार्यकक्षा

केंद्र शासनाने राष्ट्रीय उत्पन्न परिगणित करण्यासाठीच्या पायाभूत वर्षामध्ये बदल करण्याबाबत घेतलेल्या निर्णयास अनुसरुन राज्य उत्पन्न व जिल्हा उत्पन्नांचे अंदाज परिगणित करण्यासाठी पायाभूत वर्ष बदल करण्याबाबत आवश्यक त्या शिफारशी करणे. राज्य उत्पन्नाचे अंदाज अधिक अचूकरित्या परिगणित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन, परिगणित करण्यात येणाऱ्या अंदाजाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा सुचविणे.

नव्याने निर्माण होणाऱ्या विदा स्त्रोतांचा (Data Source) जसे की, वस्तू व सेवा कराचा डेटा, एमसीए (MCA data) इ. स्रोतांचा योग्यरित्या समावेश करण्याबाबत मार्गदर्शन करणे, जिल्हा उत्पन्नाचे अंदाज अधिक अचूकरित्या परिगणित करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करणे,  ज्या क्षेत्र, उप क्षेत्रांसाठी थेट डेटा उपलब्ध नाही, त्या क्षेत्र, उपक्षेत्रांचे राज्य / जिल्हा उत्पन्नाचे अंदाज परिगणित करण्यासाठी आवश्यकतेनुसार सर्वेक्षणासाठी विषय सूचविणे,  राज्य उत्पन्नाचे त्रैमासिक अंदाज परिगणित करणेसाठी कार्यपद्धती सुचविणे, राज्य/जिल्हा उत्पन्नाशी संबंधित आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करणे या बाबतीत समितीची कार्यकक्षा आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

एसटी महामंडळ दरवर्षी स्व मालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 17 : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे.  यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.

परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री श्री.  सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या)होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा.  याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी.  एस. टी. महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात.  कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे. नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी.  जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारे उत्पन्न १०० कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा.

एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे. या पंपाचा व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरु करून  उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा. याबाबत इंधन कंपन्यांची करार करावा, अशा सूचनाही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७ : पर्यटन विभागाने पर्यटन धोरण २०२४ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून  राज्यातील आयकॉनिक  पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर विभागाने भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता,  उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव एन. नवीन सोना, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  श्री.शिंदे म्हणाले की, पर्यटन विभागाने मंजूर प्राप्त निधीचा १०० टक्के विनियोग करावा. अमृत सांस्कृतिक वारसा हा पालघर परिसरात आदिवासी पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सभा मंडप आणि स्कायवॉक पंढरपूर ही कामे प्राधान्याने करावीत. महिलांसाठी राबवण्यात येणारे आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी राज्यभर चांगल्या पद्धतीने करा. महिलांचा या धोरणामध्ये सहभाग वाढावा यासाठी जनजागृती करा. केंद्र शासनाच्या सर्व योजना देखील प्रभावीपणे राबवा असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी  पर्यटन स्थळे आहेत जिथे खाजगी गुंतवणूक होऊ शकते. अशी पर्यटन स्थळ विकसित करण्यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. पर्यटन विभागाने आपली स्वतःची लँड बँक तयार करावी आणि त्यावरती पर्यटन विकासाचा आराखडा बनवा. खासगी क्षेत्राच्या सहभागातून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी दर्जेदार सेवा देऊन पर्यटकांचा ओघ राज्यात वाढवण्यासाठी पर्यटन विभागाचे नियोजन असले पाहिजे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, क्रुझ पर्यटन, जल पर्यटन,  कॅरा व्हॅन  पर्यटन, आदिवासी पर्यटन, विंटेज संग्रहालय, ग्लोबल व्हिलेज, कुंभमेळा, बेट पर्यटन, थीम पार्क, बटरफ्लाय पार्क, साहसी पर्यटन, लोक संग्रहालय, मोबाईल टेंट सिटी अशी नाविन्यपूर्ण पर्यटन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन विभागाने सूक्ष्म नियोजन करून राज्याच्या  पर्यटन विकासासाठी  प्रयत्न करावेत. नवीन महाबळेश्वर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मदत घेऊन ही ठिकाणे विकसित करण्यावर पर्यटन विभागाने समन्वयातून नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

***

संध्या गरवारे/विसंअ/

 

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 17 : परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञान, डिजिटल गॅझेट, गेमिंग कॉम्पुटींग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे आयोजन महत्त्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नागपुरातील भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) उभारण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच एआय मधील महत्वाचे केंद्र ठरेल, राज्यात विविध क्षेत्रातील संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सांगितले. त्यांनी  सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर आयोजित ‘तंत्रज्ञान कॉम्पेक्स-2025’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू, सचिव ललित गांधी, उपाध्यक्ष रोहीत जयस्वाल, कोषाध्यक्ष जयंतीभाई पटेल, सहसचिव संजय चौरसिया, माजी अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. यात तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी असून या क्षेत्राविषयी जनतेमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. गेल्या 30 वर्षांपासून कॉम्पेक्स प्रदर्शनाचे नागपुरात सातत्याने होणारे आयोजन हे विदर्भातील आयटी क्षेत्र, डिजीटल गॅझेट, गेमिंग, क्लाउड कॉम्प्युटींग आदी क्षेत्राच्या वृद्धीसाठी महत्वाचे ठरत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्मीती होत आहे. तरूणांचा अशा आयोजनात सहभाग वाढत आहे. नागपूरसह विदर्भ या आयोजनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पाउल पुढे जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये  कृत्रिम बुद्धिमत्ता  बदल घडवत आहे. याचा स्वीकार करणे गरजेचे असून राज्य शासनाने गुगल सोबत सामंजस्य करार करून नागपूर आयआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय सुरू केले आहे. येत्या काळात हे देशातील महत्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे संशोधनातही काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून तंत्रज्ञान क्षेत्राची यात महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्वाधिक युनिकॉर्नही राज्यातच आहेत. मुंबई ही देशाची अर्थ व तंत्रज्ञान राजधानी ठरत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू यांनी प्रस्ताविक केले तर सचिव ललित गांधी यांनी आभार मानले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनात एकूण 60 स्टॉल्सच्या माध्यमातून संगणक, क्लाऊड सोल्युशन्स, सायबर सुरक्षेसह अन्य क्षेत्रातील नवकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ग्राफिक्स सोल्युशन्स, सीसीटीव्ही आणि क्लाउड  तंत्रज्ञानातील प्रगत उत्पादने व सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता ट्रेंड, तंत्रज्ञानातील करियर व संधी आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार आधी विषय  येथे प्रकर्षाने दिसून येतात.

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....