सोमवार, ऑगस्ट 4, 2025
Home Blog Page 464

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील, वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ, सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड, मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा, मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार, रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके, सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई, बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील, कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर, गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर, परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर आणि अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

सविस्तर परिपत्रक वाचा : https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/01/DOC-20250119-WA0015-1.pdf 

०००

 

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि.19 : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन  उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते. इथं मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहे, याची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना

मुंबई दि.१९ : स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने  आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले.

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. यापूर्वी श्री. फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबईत दोन वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजन झाले होते. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत पाचव्या स्थानावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता.

आताही या दावोस दौर्‍यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल यादृष्टीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको यांचे अधिकारी शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

0000

स्वामित्व योजना ही ग्रामविकासाची चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.18(जिमाका):- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावर कब्जा केला जातो. कोर्टकचेऱ्यांमध्ये हेलपाटे मारताना पिढ्यानपिढ्या खर्ची पडतात. वकिलांची फी, कोर्टाचे खेटे यात अनेक कुटुंबे अक्षरशः रडकुंडीला येतात. कितीतरी दावे आजही कोर्टात पडून आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा वेळ, श्रम आणि पैशाचा अपव्यय होतो. देशातल्या अशा करोडो लोकांना चिंतामुक्त करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना आणली. ही फक्त एक सरकारी योजना नाही तर ग्रामविकासाची चळवळ आहे. या चळवळीत आपण सगळ्यांनीच सहभागी व्हायचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, विकास गजरे, मल्लिकार्जून माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, भूमी अभिलेख कार्यालयाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि स्वामित्व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावातील आबादी क्षेत्रातील घरांसाठी सनद व मालमत्ता पत्रक देणे, हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

स्वामित्व योजनेचे लाभ सर्वात महत्वाच्या व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिनस्त असलेले तालुका ठाणे, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मधील एकूण 43 गावात स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचे कार्यक्रम संबधित गावांमध्येही आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामित्व योजनेच्या या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहोत. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरणही करण्यात आले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सुखाचे आणि चिंतामुक्त दिवस आले आहेत.

ते म्हणाले, भारताचा आत्मा गावात आहे, असे आपण नेहमी म्हणतो. परंतू, दुर्देवाने ग्रामीण भाग काहीसा दुर्लक्षित राहतो. परंतु, 2014 नंतर परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागाची ‘आर्थिक प्रगती’ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात असंख्य लोकाभिमुख योजना आणल्या. 2020 मध्ये सुरू केलेली “स्वामित्व योजना” ही त्यापैकीच एक अत्यंत यशस्वी योजना आहे. ही योजना म्हणजे ग्रामस्वराज्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ग्रामीण भागातील गरिबांना आत्मनिर्भर करणारी मोहीम आहे. हे केवळ मालमत्तेचे कार्ड नाही तर त्यांचे “स्वाभिमान कार्ड” आहे. “माझी संपत्ती माझा अधिकार” असे सांगणारे हे कार्ड आहे.

श्री.शिंदे म्हणाले की,देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास करतानाच कल्याणकारी योजनांची मालिका गेल्या 10 वर्षांत आपल्याला पहायला मिळत आहे. देशातल्या 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पंतप्रधान श्री.मोदी यांच्यामुळे मिळत आहे. उज्वला योजनेतून मोदीजींनी अनेक बहिणींच्या डोळ्यातील अश्रू पुसले, पंतप्रधान आवास योजनेतून लाखो गरिबांना घरे मिळवून दिली. किसान सन्मान निधीतून बळीराजाची ताकद वाढविली. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणासाठी “सहकार से समृध्दी” चा मंत्र दिला.  आज देशातल्या 50 हजार गावांतील 58 लाख लोकांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन वितरण झालंय. आपल्या राज्यातील 36 हजार 195 गावांना याचा फायदा होणार आहे. आत्तापर्यंत 15 हजार 327 गावांचे प्रॉपटी कार्डस् तयार आहेत. तसेच 23 हजार 132 गावांचे अंतिम नकाशेही तयार झाले आहेत. यात गावांचे ड्रोनने सर्वेक्षण केले जाते तसेच जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील जमिनीचे सीमांकन होते. आत्तापर्यंत देशातल्या सव्वातीन लाख गावांमधून ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 2.19 कोटी प्रॉपर्टी कार्डस् तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये गावांच्या रहिवासी क्षेत्राचे नकाशे नव्हते. त्यामुळे बँकांकडून कर्ज मिळत नव्हते. या नव्या योजनेमुळे अनेक मालमत्ताधारकांना त्यांच्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून बँकेचे कर्ज घेता येणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या भिवंडीच्या बळीराम माणेकर यांना या योजनेतून जागेचा मालकी हक्क प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना व्यवसायासाठी बँकेने 60 लाख कर्ज मंजूर केले. त्यातून ते आत्मनिर्भर झाले आहे. प्रॉपर्टी नावावर असल्याने बँकेतून कर्ज घेणे सोपे होतंय. दुसऱ्या तिसऱ्याकडून जास्त व्याजाने पैसे घेण्याची आफत येत नाही. त्यामुळे कर्जबाजारीच्या दुष्टचक्रातून अनेक जण बाहेर पडले आहेत, याचा मला विश्वास आहे.

या योजनेमुळे गरिबांना कुणापुढे हात पसरायला लागणार नाही. आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्नं आहे ते अशाच योजनांच्या माध्यमातूनच साध्य होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होत आहेत. गावठाणातील सीमा निश्चित होवू लागल्या आहेत. प्रत्येकाचे प्रॉपर्टी कार्ड तयार होतंय. सरकारचा महसूल वाढतोय. गावातील मालकी हक्काचे आणि हद्दीचे वाद कमी होत आहेत. ग्रामपंचायतीला ग्राम विकासाचे नियोजन करण्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होतोय, त्यातून विकास योजना मार्गी लागत आहेत.

ते म्हणाले की, या मोहिमेत ग्राम परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आपल्याला वाढवायचे आहे. गावांचे अन् इथल्या बळीराजाचेही सामर्थ्य वाढवायचे आहे. देशाला बलशाली करायचे आहे. देशातील अशा रेकॉर्ड नसलेल्या मालमत्तांची किमत तब्बल 1 लाख 37 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. बाजारभाव यात विचारात घेतला आहे. प्रत्यक्षात त्याची किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. त्यामुळे एवढ्या किंमतीच्या मालमत्तांचे अधिकार आपण मूळ मालकांना प्रदान करीत आहोत. ही क्रांतिकारी योजना आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे त्यातून कल्याण होणार आहे.

शेवटी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला या योजनेत आघाडी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवून नियोजन करा. हे कार्ड म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही विकास आणि विश्वासाचा मंत्र आहे. त्यामुळे एक विशिष्ट डेडलाईन ठरवून टाईम बाऊण्ड पध्दतीने ही योजना राबविली, तर आपल्याला नियोजित लक्ष्य गाठता येईल. ही योजना कागदोपत्रीच राहिली, असे होता कामा नये. विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्याला माहीत आहेत. स्वामित्त्व प्रॉपटी कार्ड हे त्यांच्यासाठी संजीवनी कार्ड ठरेल. भारताच्या उज्वल भविष्याचे आपण एक प्रकारे मॅपिंग करतोय. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या योजनेतील प्रॉपर्टी कार्ड वितरण योजनेला संपूर्ण प्राधान्य द्यावे आणि योग्य पद्धतीने ग्रामपंचायतींमध्ये याचे प्रशिक्षण देवून आपल्या राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गावठाण भूमापन सनद आभासी वितरण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश, ओरिसा महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या राज्यातील स्वामित्व योजनेच्या प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला व त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

पंतप्रधान महोदयांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना गावठाण भूमापन सनद वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर केला.यानंतर स्वामित्व योजनेची सविस्तर माहिती देणारी लघुचित्रफीत सभागृहात दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती जोशी यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन,

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे,

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

सातारा : शंभूराज देसाई,

रायगड : कु.आदिती तटकरे,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

गोंदिया : बाबासाहेब पाटील,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची खात्री करण्याचे निर्देश

मुंबई दि 18 :- टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 17 जानेवारी 2025 रोजी आवाज फाउंडेशनने केलेल्या निरीक्षणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने स्पष्टीकरण दिले आहे. आवाज फाउंडेशनने Atmos sensor-based monitors चा वापर केला असून, ही उपकरणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या मान्यताप्राप्त निकषांनुसार नसल्याचे MPCB कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CPCB मान्यताप्राप्त पद्धतींचा अभाव

MPCB च्या म्हणण्यानुसार, Atmos सेन्सर-आधारित मॉनिटर्स हे फक्त सूचक आकडेवारी देऊ शकतात, पण नियामक-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे अचूक मोजमाप करण्यासाठी CPCB ने निर्देशित केलेली उपकरणे व पद्धती आवश्यक आहेत.

हवामान व स्थानिक घटकांचा परिणाम

आवाज फाउंडेशनने 17 जानेवारीला केलेली मोजमापे मॅरेथॉनच्या दिवशी (19 जानेवारी) असलेल्या हवामानाशी तंतोतंत जुळतीलच असे नाही. वाऱ्याचा वेग, तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे हवेची गुणवत्ता बदलू शकते.

याशिवाय, 17 जानेवारी रोजी वाहतूक, बांधकामे आणि स्थानिक प्रदूषण स्रोतांमुळे झालेली उत्सर्जने मॅरेथॉनच्या दिवशी वेगळी असण्याची शक्यता आहे.

मॅरेथॉनसाठी नियामक मॉनिटरिंगची व्यवस्था

मॅरेथॉनसाठी नियामक-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण CPCB मान्यतांनुसार करण्यात येणार असल्याचे MPCB ने स्पष्ट केले आहे. या निरीक्षणाद्वारे मॅरेथॉनदरम्यानची वास्तविक आणि अचूक माहिती मिळेल.

हवेच्या गुणवत्तेसाठी MPCB चे पाऊल

MPCB ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ला मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

शनिवारी संध्याकाळपासून रस्त्यांचे झाडणे टाळण्याचे आणि बांधकामे नियमांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

आज (18 जानेवारी) संध्याकाळपासून MPCB कडून 8 मोबाइल हवेच्या गुणवत्तेचे मॉनिटरिंग व्हॅन तैनात केल्या जाणार आहेत.

जनतेसाठी आवाहन

MPCB ने नागरिकांना आवाहन केले आहे की, हवेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करताना प्रमाणित व मान्यताप्राप्त स्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि अशास्त्रीय पद्धतींवर आधारित निष्कर्ष काढणे टाळावे. असे MPCB तर्फे कळविण्यात आले आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गासंदर्भात आवाज फाउंडेशनने केलेले मॉनिटरिंग हे नॉन स्टॅंडर्ड प्रोटोकॉलवर आधारित – पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांची माहिती

मुंबई, दि. 18 : मुंबईत उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आवाज फाउंडेशनने काल केलेल्या मॉनिटरिंगसाठी वापरलेली मानके आणि निष्कर्ष सुयोग्य नसून मुंबईतील तसेच मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले. तसेच हवेचा बदलणारा वेग, तापमान, आद्रता अशा विविध घटकांमुळे हवामानाच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो. त्यामुळे काल केलेल्या मॉनिटरिंगच्या आधारे उद्या होणाऱ्या मॅरेथॉनच्या मार्गासंदर्भात निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

आवाज फाउंडेशन काल 17 जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर आठ ठिकाणी केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणाच्या आधारे प्रदूषणामुळे एथलेटिक्सच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मार्ग सुरक्षित नाही, असे म्हटले आहे.

या अनुषंगाने स्पष्टीकरण करताना प्रधान सचिव श्रीमती सिंगल म्हणाल्या की, आवाज फाऊंडेशनने टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर काल 17 जानेवारी रोजी आठ ठिकाणी केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी सादर केलेल्या डेटाची वैधता आणि विश्वासार्हता लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आवाज फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये Atmos सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता मॉनिटर्स वापरण्यात आले.  हे सेन्सर-आधारित मॉनिटर्स सूचक डेटा प्रदान करू शकतात, परंतु हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) स्थापित केलेल्या मानकांचे आणि प्रोटोकॉलचे ते पालन करत नाहीत.  देशभरातील हवेच्या गुणवत्तेच्या डेटाचे सातत्य, अचूकता आणि तुलनात्मकता सुनिश्चित करण्यासाठी CPCB विशिष्ट उपकरणे आणि पद्धती अनिवार्य करते, असे त्यांनी सांगितले.

नॉन-स्टँडर्ड मॉनिटरिंग प्रोटोकॉल

आवाज फाउंडेशनद्वारे वापरलेले Atmos सेन्सर-आधारित मॉनिटर्स हे मंजूर पद्धतींशी संरेखित करत नाहीत. परिणामी, संकलित केलेला डेटा हा नियामक-श्रेणीच्या हवेच्या गुणवत्तेच्या मोजमापांचा प्रतिनिधी मानला जाऊ शकत नाही, असे श्रीमती सिंगल यांनी सांगितले.

हवामानशास्त्रीय परिस्थितीतील तफावत :

प्रधान सचिव श्रीमती सिंगल म्हणाल्या की, वाऱ्याचा वेग, तापमान आणि आर्द्रता यासारख्या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे हवेच्या गुणवत्तेवर खूप प्रभाव पडतो. 17 जानेवारी रोजीची परिस्थिती ही मॅरेथॉन दरम्यान 19 जानेवारी रोजी अपेक्षित असलेल्या परिस्थितीपेक्षा लक्षणीय भिन्न असू शकते.  परिणामी, संकलित केलेला डेटा हा इव्हेंट दरम्यान वास्तविक हवेच्या गुणवत्तेची परिस्थिती प्रतिबिंबित करत नाही.

तात्कालिक आणि अवकाशीय घटकांचा प्रभाव :

17 जानेवारी 2025 रोजी केलेल्या निरीक्षणाच्या वेळी उपस्थित क्रियाप्रक्रिया आणि उत्सर्जन हे मॅरेथॉनच्या दिवशीच्या घटकांशी संरेखित होऊ शकत नाहीत.  रहदारीचे प्रमाण, बांधकाम आणि प्रदूषणाचे इतर स्थानिक स्त्रोत यासारखे घटक लक्षणीयरीत्या बदलू शकतात, जे मॅरेथॉन दिवसाच्या परिस्थितीसाठी मॉनिटरिंग डेटाची प्रासंगिकता मर्यादित करतात, असे त्यांनी सांगितले.

मॅरेथॉन डे एअर क्वालिटी मॉनिटरिंगसाठी प्रोटोकॉल :

TATA मुंबई मॅरेथॉनचा ​​एक भाग म्हणून, अचूक आणि कृती करण्यायोग्य डेटा सुनिश्चित करण्यासाठी CPCB मानकांचे पालन करून नियामक-श्रेणीच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जाते.  मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेची सर्वसमावेशक समज प्रदान करून हे निरीक्षण रीअल-टाइम परिस्थिती आणि इव्हेंट-विशिष्ट घटकांचा विचार करते.

ऍथलेट्स आणि उपस्थितांचे आरोग्य आणि सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य

TATA मुंबई मॅरेथॉनमधील सहभागी होणारे ऍथलेट्स आणि उपस्थितांचे आरोग्य आणि सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि असत्यापित किंवा गैरमानक पद्धतींमधून निष्कर्ष काढणे टाळण्यासाठी मंजूर आणि प्रमाणित स्त्रोतांकडून मिळालेल्या डेटावर अवलंबून राहण्याचे आवाहन श्रीमती सिंगल यांनी केले आहे.

याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (MPCB) ने मुंबई शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने विविध प्रयत्न केले आहेत. मॅरेथॉनसाठी MPCB ने मुंबई महापालिकेला मॅरेथॉन मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता करणे, तसेच शनिवार संध्याकाळपासून साफसफाई न करण्याची आणि मार्गावरील बांधकामासाठी  नियमांच्या पूर्ण पालनाची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  शिवाय, ⁠MPCB आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी 8 वायू गुणवत्ता मॉनिटरिंग मोबाईल व्हॅन ठेवेल, असे श्रीमती सिंगल यांनी सांगितले.

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, दि.18 : केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे स्वामित्व योजना प्रभावीपणे राबवत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेशीर स्वत:चे मालमता पत्रक मिळत आहे. ही योजना अंमलबजावणी करुन शासनाने उचललेले क्रांतिकारक पाऊल आहे. यातून ग्रामीण भागाचा विकास होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
दूरदृश्य प्राणलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० लाख मालमता पत्रकांचे आभासी वितरण करुन लाभार्थ्यांना संबोधित केले.   या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरावरील लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रक वितरण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.  या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील,  जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.
ड्रोनद्वारे 550 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांचे डिजीटल नकाशे तयार झाले आहेत, असे सांगून बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, 500 गांवाचे काम अपूर्ण आहे,  ते येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल.  डिजीटल नकाशे मालमत्ता पत्रकामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद-विवाद मिटणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कायद्याने वैध असे मालमत्ता पत्रक मिळणार आहे. अशा प्रकारचा पथदर्शी कार्यक्रम हा महाराष्ट्रात पहिल्यांदा राबविण्यात आला असून तो केंद्र शासन संपूर्ण देशात राबवित आहे.
सातारा जिल्हा हा नेहमीच शासनाच्या विविध योजना प्रभाविपणे राबविण्यात राज्यात अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न करणार आहे. सातारा येथील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग  यावेत अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे उद्योग आणण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध असून याला प्रशासनानेही सहकार्य करावे, असेही बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.
भारतातील नागरिक हे जास्त करुन ग्रामीण भागात राहत आहे. स्वामित्व योजनेमुळे त्यांना कायद्याने वैध असे मालमत्ता पत्रक मिळणार आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. ही योजना देशभरात लागू झालेली आहे. जिल्ह्यातील 502 गावांचे ड्रोनद्वारे मोजणी झालेली आहे. मोजणीमुळे वाद विवाद मिटणार असून गावातील रस्त्यांसह गावाचा संपूर्ण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमा विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना – इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेचा ठोस दस्तऐवज मिळून त्याआधारे विकासासाठी लोक अर्थसहाय्य उपलब्ध करु शकतील. ग्रामपंचायतींचा महसूल वाढून ग्रामीण अर्थकारणाला गती मिळेल, असे प्रतिपादन इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी केले.

स्वामित्व योजना म्हणजे जमिन मालमत्तेचा ठोस पुरावा देणारी देशातील एक महत्त्वाची घटना आहे. डिजीटल युगात या डिजीटल दस्तऐवजाला महत्त्व असेल,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

जमिनीच्या अचूक मोजणीमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे,असे खासदार डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे कार्ड म्हणजेच सनद वितरणाचा आज देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.  दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयात करुन देण्यात आली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपसंचालक भुमि अभिलेख किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेंद्र देसले यावेळी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पातळीवरही मालमत्ताधारकांना प्रातिनिधीक स्वरुपात मालमत्ता कार्ड म्हणजेच सनद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, जमिनीच्या सिमांकनामुळे अनेक प्रश्न निकाली निघतील. हे सर्व्हेक्षण ड्रोनद्वारे झाले असल्याने त्यात अचुकता व पारदर्शकता आहे. आपल्या मालमत्तेचा डिजीटल वैध दाखला आपणास सनद स्वरुपात मिळाल्याने तो आपल्या मालकीचा भक्कम पुरावा होईल. त्यामुळे ग्रामिण भागातील अर्थकारणाला गती मिळेल. ग्रामपंचायतींचा महसूल सुद्धा वाढेल. मालमत्तेच्या आधारे विविध अर्थसहाय्य सुद्धा लोक उपलब्ध करुन घेऊ शकतील. शेतीसोबत जोडधंदा करुन आपले उत्पन्न वाढवू शकतील.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मालमत्तेच्या सर्व्हेक्षणामुळे आता मालकीचा अचूक नकाशा आणि ठोस पुरावा मिळेल. जमिनीच्या व्यवहारात होणारे फसवणूकीचे प्रकार यामुळे टाळता येऊ शकतील. जमिनीच्या मालकीचा ठोस पुरावा देण्याची ही देशातील महत्वाची घटना असून या योजनेकडे एक मिशन म्हणून पहावे. सध्याच्या डिजीटल युगात जमिनीच्या डिजीटल सर्व्हेक्षणातून तयार झालेले हे उतारे महत्त्वाचे दस्तऐवज ठरतील.

खा. डॉ. कराड म्हणाले की, देशातील जमिन मोजणी आणि सिमांकनामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ग्रामिण भागात आपल्या मालमत्तेच्या आधारे विविध उद्योग व्यवसायांना अर्थसहाय्य उभे करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण, अवैध कब्जा या सारख्या अपप्रवृत्तींना आळा बसून ग्रामिण भागातील विकासाचे नेमके नियोजन करता येणार आहे.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनीही या योजनेचे कामकाज जिल्ह्यात व विभागात चांगले झाले असून यामुळे मालमत्ताविषयक अनेक प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल,असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विजय वीर यांनी माहिती दिली की, स्वामित्व योजना ही ग्रामिण भागामध्ये सुधारीत तंत्रज्ञानासह, सर्व्हेक्षण आणि मॅपिंग अर्थात मालमत्तेचे सर्व्हेक्षण करणारी केंद्र पुरस्कृत योजना आहे. जमिन मालकाला त्याच्या जमिनीचा कायदेशीर रितसर हक्क मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात ९२५ गावांपैकी ७२७गावांमध्ये ही मोजणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख १३ हजार प्रॉपर्टी कार्डस तयार झाले आहे.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना सनद वितरण करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दिल्ली येथून झालेले संबोधनही उपस्थितांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पाहिले. सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले.

स्वामित्व योजनेंतर्गत गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा; मालक आणि शेतकऱ्याला मिळेल जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नंदुरबार, दिनांक 18 जानेवारी, 2025 (जिमाका) : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार, संबंधित मालकाला, शेतकऱ्याला त्याच्या जमिन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 29 गावांना केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयकुमार कुसुरकर, नोडल अधिकारी जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख किरणकुमार पाटील, पदाधिकारी विजय चौधरी, निलेश माळी यांच्यासह 29 गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, देशातील सर्वच भागात जमिनींच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच विवाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. या  सारख्या गोष्टींचा विचार करून देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबवली आहे. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांकडे आजही आपले घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाते. सर्वेक्षण केल्यांनतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल. जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या 29 गावांना मिळाले स्वामित्व प्रमाणपत्र

  • अक्कलकुवा तालुका बि. अंकुशविहीर, घोटपाडा, शलटापनी, घुणशी, वीरपूर, व सिंगपूर बुद्रूक.
  • तळोदा तालुका– मोहिदा, मोरवड, दलेलपूर, सिंगसपूर, व राणीपूर.
  • शहादा तालुका बिलाडी त.स., उंटावद, भडगांव, बुडीगव्हाण, व चिरडे.
  • नंदुरबार तालुकापळाशी, खोडसगांव, ओझर्दे, खैराळे, व वरुळ.
  • नवापूर तालुकाकोठडा, वडखुट, अंठीपाडा, कडवान, तारापूर, बिलदा, नगारे व नावली.

या 15 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले ‘ई-प्रॉपर्टी कार्ड

सुक्रीबाई पुंजऱ्या कोकणी, हिरालाल मोतीराम कोकणी (ओझर्दे), सतीश नरसु पाटील, नलीबाई टिला पाटील (पळाशी), रमेश पोज्या गावित,दिवाजी राज्या गावित (खैराळे), राणीबाई सुरेश पाडवी, वीरसिंग पवार (वरुळ), यशवंत जगनलाल ठाकरे, पिंटू विश्राम ठाकरे (खोडसगांव), जेसमी रुना वळवी, मालती उखाड्या गावित, बैसी जेहऱ्या वळवी, विलास गावा वळवी व चिमा जिवल्या नाईक (नावली).

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा...

0
नांदेड,३ ऑगस्ट:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात...

‘संपूर्णता’ अभियानातील कामगिरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा सन्मान

0
नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, 2025 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात...

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण...

0
नाशिक, दि. 3 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण

0
परभणी, दि. ३ (जिमाका) - शेतकरी, घरगुती ग्राहक आणि नवउद्योजकांना २४ तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच...

सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. 03 : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही...