मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 463

सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षासाठी प्रस्ताव सादर करणार – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि.21 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी  नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

दोन वर्षांवरील कामांसाठी अंदाज पत्रक तयार करावे

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा कक्षासाठी प्राथमिक स्वरूपाचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कुंभ कक्षासाठी लागणाऱ्या अनुषंगिक बाबी व सोयी-सुविधांसाठी  प्रस्ताव तयार करून आगामी काळात आवश्यक फेरबदलासह तो पूर्णत्वास येईल. सिंहस्थ कुंभमेळासाठी विविध विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावात नमूद कामांपैकी ज्या कामांसाठी दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे, ती कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश देतानाच अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

मोबाईल कंपन्यांसमवेत संवाद साधावा

रामकालपथसाठी सल्लागार यांच्याशी चर्चा करून अंतिम निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. नाशिक व त्र्यंबकेश्वर व शहरालगतचे महामार्ग येथे कुंभमेळा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोबाईल डाटा वापर वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करून कुंभमेळा कालावधीत इंटरनेट सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने टॉवरची संख्या वाढविणे, इंटरनेट डाटा क्षमता वाढविण्याबाबत चर्चा करून नियोजन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी  बैठकीत दिल्या.

माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनी, निर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसा, परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवर, सोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर ‘एआय’चा मोठा प्रभाव पडणार आहे. ‘एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता, आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडून, मंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्र, तरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्र, माध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे श्री. चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी शासनाने पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवावे, अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार श्री. यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडे, मंदार पारकर, खंडूराज गायकवाड, सुरेंद्र गांगण, संजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन 2023) आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी (सन 2024)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्य, लोकसत्ता

वृत्तवाहिनी – पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य – ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत, सातारा

वृत्त वाहिनी – मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलार, पुढारी, मुंबई

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी – संचालक डॉ. गणेश मुळे

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलद गतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय विभागांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही शासकीय ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यम हे प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे या धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. संचालक डॉ. मुळे म्हणाले, राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. सामान्य लोकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि तत्परतेने मिळाव्यात, यासाठी देखील पाऊले उचलली आहेत. या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी प्रसारमाध्यमांची भुमिका महत्वाची आहे. पहिल्या 100 दिवसांत नागपूर विभागातसुध्दा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशल इंटलिजन्स) वापर करून अधिक जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचे प्रशिक्षणसुद्धा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पत्रकार रविंद्र जुनारकर, संजय रामगिरवार, प्रमोद उंदिरवाडे, अरुणकुमार सहाय, हरविंदरसिंग धुन्ना, यशवंत दाचेवार, मुरलीमनोहर व्यास, कल्पना पलीकुंडवार, सुनील तिवारी, अनिल देठे, राजेश सोलापन, डॉ. आरती दाचेवार, वैभव पलीकुंडवार, रवी नागपुरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : तत्पूर्वी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची भेट घेतली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पहिल्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अंमलबजावणीकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कटिबध्द असून सर्व जिल्ह्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होईल, याबाबत जिल्हा‍धिकाऱ्यांना अवगत केले.

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

मुंबई, दि. 21 : वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर ‘जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड – पाटील, प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. निवतकर म्हणाले, रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य तसेच मौखिक आरोग्यामध्ये कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिवस साजरा केला जातो.

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धा, क्रॉसवर्ड कोडे, सर्जनशीलता, स्लोगन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दंत चिकित्सामध्ये कृत्रिम दंतशास्त्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण जागरुकतेसाठी कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध उपचारांबद्दल माहितीपत्रकांचे प्रकाशन करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१:- ‘अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार, संत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण असे आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची त्यांनी सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संताची साहित्य संपदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान- शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथ निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी भावी कित्येक पिढ्यांसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकास, तत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवार, तसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख – सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 21 : जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे  वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे, कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते बोलत होते. “भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान” या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होत आहे.

विचार व्यक्त करतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच संकटांचा यशस्वी सामना केला. घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले, मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.

“लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. एकाला सोडून  दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही. तसे झाल्यास लोकशाही  संदर्भातील मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचेल” या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक अशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.

0000

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा

मुंबई, दि. २१ : आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. यास्तव अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस संस्थेच्या वरळी मुंबई येथील सभागृहात सोमवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

झारखंड येथे आपण राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला ७३ लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता, तर २०२४ साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आवाहनानुसार ७४० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसाला ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नॅब संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे योगदान होते हे समजल्यामुळे आपला त्यांच्याप्रती असलेला आदर शतपटींनी वाढला आहे, असे सांगून नॅब ही संस्था अंध तसेच दृष्टिबाधित व्यक्तींकरिता आशा जागवणारी व सक्षमीकरणाची हमी देणारी संस्था ठरली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

आपले पूर्ववर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी ‘नॅब’ला ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदी करण्यास अर्थसहाय्य केले असल्याचे नमूद करून यापुढे देखील राजभवन नॅबच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या ब्रेल प्रिंटिंग प्रेस, टॉकिंग बुक्स, परफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नॅब दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम, संस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके वितरण करण्यात आली.

0000

Governor attends 74th Foundation Day Celebration of NAB;

presents awards to Young Achievers

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over the 74th Foundation Day of the National Association for the Blind (NAB) India at its premises in Worli, Mumbai on Mon (20 Jan.) The Governor presented various awards and Young Achievers awards on the occasion.

The Governor lauded NAB India’s initiatives, including the Braille Printing Press, Talking Books, Perfumery Training, and Teacher Training, which equip visually impaired persons with essential skills and opportunities for a dignified life.

The Governor congratulated the award recipients and Young Achievers for their extraordinary contributions, stating that their achievements are a source of inspiration.

President of NAB India Hemant Takle, Honorary Secretary General Harinder Kumar Mallik, Acting Honorary Secretary General Dr. Vimal Dengla, Executive Director Smt. Pallavi Kadam, and others were present.

००००

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.20 (जिमाका): दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. झालेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल -राधानगरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा प्रकल्पातील सर्व धरणग्रस्तांच्या जमिनींची स्वामित्व योजनेअंतर्गत प्राधान्याने मोजणी करुन घेवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्या. जमिनीची मागणी व भूखंड वाटपाच्या अनुषंगाने जमिनीची मागणी असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी अर्ज सादर करावा. पात्रता तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संकलन रजिस्टर मध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांना सुनावणीची संधी देऊन संकलन रजिस्टर अद्ययावत करा. प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या जमिनीबाबत निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी सरकारजमा करण्याबाबतचा निर्णय घ्या. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना देवून पाण्याच्या पातळीच्या बाहेर राहिलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याबाबत वनविभागासोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच मौजे मुडशिंगी पैकी न्यू वाडदे येथील डावा कालव्याची पाहणी करुन सुरक्षा भिंतीबाबत योग्य ती कार्यवाही करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी संबंधित भूमी अभिलेख विभागाकडून करवून घेवून या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. आतापर्यंत वाटप झालेल्या जमिनींचा सातबारा देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन घेतली जाईल, असे सांगून पुनर्वसनाच्या अनुषंगाने तक्रार असल्यास याबाबत अर्ज सादर करा. यावर चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांनी आतापर्यंत केलेल्या व सध्या करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली.

0000

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले…. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले.

वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकीतकर यांनी दिली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंची वरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठविण्याबाबत सहकार्य करण्यात येईल,असे सांगितले.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.

या उपक्रमाची पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रसादने मागील 3 वर्षामध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. आजच्या “डे विथ कलेक्टर” उपक्रमात त्याने आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार यादव, पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, आई-नम्रता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे. तसेच विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तिन्ही वर्षी विज्ञान उपकरणे तयार करुन ती प्रदर्शनात सादर केली होती.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” या उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी “कॉफी विथ कलेक्टर” हा अभिनव उपक्रमही राबविण्यात येणार आहे.  दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात निवड केलेल्या शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी श्री. येडगे संवाद साधणार आहेत.

*****

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय

0
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज...

व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ५ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी  व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे...

लोकायुक्त यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि.५ : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी उप लोक आयुक्त संजय भाटिया यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई...

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

0
मुंबई, दि. ०५ : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले....

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत

0
मुंबई, दि. ५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’...