रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 461

जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.20 : जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतातील परस्पर संबंध अधिक वृध्दिंगत होतील, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानचे वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन, महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटनवाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटनमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/स.सं

 

जागतिक बँकेसोबतच्या कराराआधारे कौशल्य विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,दि.20 : जागतिक बँकेसोबत झालेल्या 2300कोटी रूपयांच्या कराराच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आगामी शंभर दिवसात 50 हजार युवांना प्रशिक्षण देणार  असून मुंबईबरोबरच नागपूर,पुणे,नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीगर येथे  महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत करत असलेल्या कार्यवाहीची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थाबाबत सर्वसमावेशक असा  एकत्रित कायदा करणार असून, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत 500  विविध अभ्यासक्रमांचे व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे 1000 शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेसोबत झालेल्या कराराआधारे आयटीआयची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. राज्य नाविन्यता कौशल्य विकास सोसायटी मार्फत ‘आयटीआय’च्या कौशल्य विकास केंद्रामार्फत १ लाख १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचबरोबर आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा ऑनलाईन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात 100 रोजगार मेळावे आयोजित  केले जातील.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, कार्यालयातील सोयी व सुविधा वाढवणे, सुकर जीवनमान, गुंतवणूक प्रसार, जनतेच्या तक्रारींचे निवारण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या कृती कार्यक्रमावर भर देणार असून विभागाचा कारभार अधिक गतीमान करण्यात येणार आहे. 1000 विविध सामंजस्य करार करण्यात आले आहे. कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशियल इंटिलिजेसचे 10 हजार युवांना प्रशिक्षण देणार  असल्याचेही श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/स.सं

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई,दि. २० : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे डिसेंबर-२०२४ मध्ये दि. १०/१२/२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, दि. १४/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, दि. १८/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव मासिक, दि. २१/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २५/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या सोडती काढण्यात आल्या असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2412-A/39878 या लॉटरी भंडार, नागपूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रु. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-06-4089 या श्री. गणेश एन्टरप्रायझेस दादर, मुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G56/ 2976 या महालक्ष्मी लॉटरी, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-08/5631 या गुरुदेव दत्त लॉटरी एजन्सी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ०५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय डिसेंबर – २०२४ मध्ये मासिक सोडतीतून १३९०१ तिकीटांना रू. १,२५,०९,७००/- व साप्ताहिक सोडतीतून ५८८१२ तिकीटांना रू. २,०३,६९,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी,असे आवाहन उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवारी

मुंबई, दि. २० : मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती  न्या. आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवार दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता राजभवन, मुंबई येथे होत आहे.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे न्या. आलोक आराधे यांना दरबार हॉल येथे पदाची शपथ देतील.

०००

New Chief Justice of Bombay High court to be sworn in on Tuesday

Mumbai 20: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan will administer the oath of office to the newly appointed Chief Justice of Bombay High Court Justice Alok Aradhe at Darbar Hall, Raj Bhavan, Mumbai at 7 PM on Tuesday 21 January 2025.

‘..ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला अभिमान’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरूष संघांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

या दोन्ही संघांचे कर्णधारपद महाराष्ट्राकडे असताना हा अविस्मरणीय विजय साकारला गेल्याचा विशेष आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिलासंघाची कर्णधार प्रियंका इंगळे, पुरूष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचावण्याची अद्वितीय कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.

“पहिल्याच विश्वचषकावर भारताचे नाव कोरण्याची कामगिरी आपल्या महाराष्ट्र सुपुत्रांनी केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह संघातील खेळाडू अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार तसेच पुरुष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

या विजयात पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक प्राचीताई वाईकर आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. या सगळ्यांनी आपल्या सांघिक कामगिरीने देशासाठी अविस्मरणीय विजयश्री खेचून आणली आहे. या यशात खेळाडच्या मेहनतीसह, त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ महत्वपूर्ण आहे. या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि खेळाडूंच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक- उपमुख्यमंत्री अजित पवार

जालना,(जिमाका)दि.२० : आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 येथील स्थानिक हॉस्पीटलच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अर्जून खोतकर, कल्याण काळे, विक्रम काळे, सत्यजीत तांबे, मनोज कायंदे, डॉ. राजीव डोईफोडे, माजी आमदार राजेश टोपे, अरविंद चव्हाण, सतिष चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असेल तरच त्या व्यक्तीला निरोगी म्हटले जाते. सद्या वाढत असलेल्या विविध आजार, बदलती जीवनशैली यामुळे कोणत्याही वयोगटातील लोकांना कोणतेही आजाराला सामोरे जावे लागत आहे. तसेच सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. त्याकरीता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आरोग्याची कशाप्रकारे घेतात याचे देखील यावेळी उदाहरण दिले. आरोग्याच्या सुविधा देणाऱ्या या वास्तुमुळे जालना शहराच्या वैभवात भर पडली आहे. नागरिकांना विविध आजारांच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अलीकडे अनेक तज्ज्ञ डॉक्टर हे एकत्र येवुन हॉस्पिटल सुरु करुन आरोग्य सेवा देत आहेत. राज्य शासन सर्वांसाठी आरोग्य मिशन घेवून पुढे जात आहे. यामाध्यमातूनच राज्य शासनाने देखील बहूतेक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले आहेत. यामुळे नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगुन, आज लोकार्पण होत असलेल्या हॉस्पिटलला त्यांनी पुढील वाटचाली करीता यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार अर्जून खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील बॅरेजेस, जीएसटी आदी विविध प्रश्न मांडून, जिल्ह्यासाठी ज्या मागण्या केल्या त्याबाबत बैठक आयोजित करुन, सदर प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

 प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी  – अजित पवार

जालना,(जिमाका)दि.२० : प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावीत. तसेच यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय इमारत व नव्याने तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या पाहणी प्रसंगी दिले.

 

यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सतिष चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी न्रमता चाटे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. प्रशासकीय इमारत व नियोजन भवन येथील देखभाल दूरुस्ती सह इतर कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्याकडून कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच सदर कामे करतांना सुरक्षितेच्यादृष्टीने प्रामुख्याने वीज, सोलर पॅनल, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा दर्जेदार कराव्यात. सदर कामे पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसह कार्यालय व परिसर नेहमी स्वच्छ राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 20 : एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

00000

निलेश तायडे/स.सं

देशाला पहिलं खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 20 :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पुणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देऊ व येथील जनतेची कामे करु असे आश्वास्न  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज तलवाडा ता. वैजापूर येथे केले.तलवाडा येथे शिऊर बंगला ते नांदगाव यामार्गाच्या भूमिपुजन कार्यक्रमात  ते बोलत होते.

तलवाडा येथे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिऊर बंगला ते नांदगाव मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण  कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. आमदार प्रा. रमेश बोरनारे, कन्नडच्या आमदार संजना जाधव, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. संजय निकम, साबेर खान, राजीव डोंगरे, बाबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर जगताप,भागीनाथ मगर, रामहरी जाधव, राजेंद्र मगर, नारायण कवडे, विशाल शेळके,  संजय बोरनारे, कल्याण दंगोडे,  रिखाब पाटणी, कचरू डिके, उत्तमराव निकम, एल एम पवार,गोरख आहेर, प्रशांत शिंदे,प्रभाकर जाधव, अंबादास खोसे, बाबासाहेब राऊत, किशोर मगर, अनिल भोसले, संतोष सूर्यवंशी, शांताराम मगर, राजेंद्र साळुंके, सुभाष आव्हाळे, राधाकृष्ण सोनवणे, प्रमोद मगर, भारत साळुंके, डॉ अर्जुन साळुंके, बाळासाहेब जाधव, यांच्यासह तलवाडा, शिऊर, लोणी खुर्द, वाकला आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....