बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 453

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

नवी दिल्ली, दि. 25 :  पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48  पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी  एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), 95 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी (एमएसएम)  पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत.

देशातील  पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती  विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)

  1. डॉ रविंद्र  कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक
  2. श्री दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक
  3. श्री सुनिल बळीराम फुलारी -पोलिस महानिरीक्षक
  4. श्री रामचंद्र बाबू केंडे – पोलिस कमांडंट

राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

  1. श्री संजय भास्कर दराडे,महानिरीक्षक
  2. श्री वीरेंद्र मिश्रा,महानिरीक्षक
  3. श्रीमती आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
  4. श्री चंद्र किशोर रामजीलाल मिना,महानिरीक्षक
  5. श्री दीपक कृष्णाजी साकोरे,उपमहानिरीक्षक
  6. श्री राजेश रामचंद्र बनसोडे,पोलीस अधीक्षक
  7. श्री सुनील जयसिंग तांबे,पोलीस उपअधीक्षक
  8. श्रीमती ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
  9. श्री धर्मपाल मोहन बनसोडे,सहाय्यक पोलीस आयुक्त
  10. श्री मधुकर माणिकराव सावंत,निरीक्षक
  11. श्री राजेंद्र कारभारी कोते,निरीक्षक
  12. श्री रोशन रघुनाथ यादव,पोलीस उपअधीक्षक
  13. श्री अनिल लक्ष्मण लाड,पोलीस उपअधीक्षक
  14. श्री अरुण केरभाऊ डुंबरे,सहाय्यक पोलीस आयुक्त
  15. श्री नजीर नसीर शेख,उपनिरीक्षक
  16. श्री श्रीकांत चंद्रकांत तावडे,उपनिरीक्षक
  17. श्री महादेव गोविंद काळे,उपनिरीक्षक
  18. श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर,उपनिरीक्षक
  19. श्री आनंदराव पुंजाराव मस्के,सहाय्यक उपनिरीक्षक
  20. श्री रवींद्र बाबुराव वानखेडे,उपनिरीक्षक
  21. श्री सुरेश चिंतामण मनोरे,निरीक्षक
  22. श्री राजेंद्र देवमान वाघ,उपनिरीक्षक
  23. श्री संजय अंबादासराव जोशी,सहाय्यक उपनिरीक्षक
  24. श्री दत्तू एकनाथ गायकवाड,सहाय्यक उपनिरीक्षक
  25. श्री नंदकिशोर ओंकार बोरोले,सहाय्यक उपनिरीक्षक
  26. श्री आनंद रामचंद्र जंगम,सहाय्यक उपनिरीक्षक
  27. श्रीमती. सुनिता विजय पवार,सहाय्यक उपनिरीक्षक
  28. श्री जितेंद्र विठ्ठल म्हात्रे,सहाय्यक उपनिरीक्षक
  29. श्री प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे,सहाय्यक उपनिरीक्षक
  30. श्री राजेंद्र शंकर काळे,सहाय्यक उपनिरीक्षक
  31. श्री सलीम गनी शेख,सहाय्यक उपनिरीक्षक
  32. श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळे,सहाय्यक उपनिरीक्षक
  33. श्री रामभाऊ संभाजी खंडागळे,हेड कॉन्स्टेबल
  34. श्री संजय भास्करराव चोबे,प्रमुख कॉन्स्टेबल
  35. श्री सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन,सहाय्यक उपनिरीक्षक
  36. श्री विजय दामोदर जाधव,हेड कॉन्स्टेबल
  37. श्री रामराव वामनराव नागे,सहाय्यक उपनिरीक्षक
  38. श्री दिलीप भोजुसिंग राठोड,हेड कॉन्स्टेबल
  39. श्री आयुबखान अकबर मुल्ला,हेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

  1. श्री विवेक वसंत झेंडे,अतिरिक्त अधीक्षक
  2. श्री अहमद शमशुद्दीन मणेर,हवालदार
  3. श्री गणेश महादेव गायकवाड,हवालदार
  4. श्री प्रल्हाद दत्तात्रय कुदळे,हवालदार
  5. श्री तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

000

 

 

निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

नवी दिल्ली, दि. २५ :  निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.  निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू होत्या. याप्रसंगी केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वात राज्याने निवडणूक व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करून निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली. त्यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला. मतदारांच्या सहभागात वाढ करून त्यांचा मतदानाचा अनुभव अधिक सुलभ होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे विशेष कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यांनाही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक संजय यादव यांना मतदान केंद्रांवरील विविध सुविधांचा दृष्टीकोन ठेवून विधानसभा निवडणुकांचे सुरळीत संचालन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना मतदान केंद्रांचे व्यापक सुसुत्रीकरण, प्रशिक्षणाची अंमलबजावणी आणि ई-व्होटिंगच्या माध्यमातून यशस्वी निवडणूक आयोजन केल्याबद्दल गौरविण्यात आले.

000

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् परिश्रम होतं.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला, तर क्रांतीवीर भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.

तथापि, स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालविण्यासाठी राज्यघटना तयार करणं क्रमप्राप्त असते. अर्थातच देशाच्या राज्यकारभाराला दिशा दाखविणारा सर्वोच्च कायदा (Basic Law) म्हणजे राज्यघटना होय. नवराष्ट्राची वाटचाल कशी व्हावी; तेथे कशाप्रकारे शासन असावे; कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्याय मंडळ यांचे अधिकार व कार्य प्रणाली कशी असावी; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ; तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे अधिकार व कर्तव्य कोणते; नागरिकांचे मूलभूत अधिकार, त्यांच्या रक्षणाची हमी व नागरिकांची कर्तव्ये यासंबंधी मार्गदर्शन करणारा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना होय.

या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी  या समितीचे अध्यक्षपद भूषवून, त्यांनी एक मसुदा समितीची नियुक्ती केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अन् त्यात अन्य सहा सदस्य समितीत होते. मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशांचे दौरे करून तेथील राज्यघटनांमधील तरतुदींचा अभ्यास केला. याशिवाय देशांतर्गत विविध राज्यांच्या भाषा, भौगोलिक परिस्थिती व संस्कृतीची माहिती संकलित करण्यासाठी राज्यांचा अभ्यास दौराही केला. प्रत्यक्षात या कामास 29 ऑगस्ट 1947 रोजी सुरुवात झाली अन् सदर काम 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अविरत चालले. यात 413 कलमे व 12 परिशिष्टे यांचा समावेश करण्यात आला.

अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने सदर राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर लगेच 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अमलात येऊन भारत देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून नावरूपाला आला. आणि त्याच दिवसापासून स्वतंत्र भारताची राज्यघटना अमलात आली, अन्  हिंदुस्थानाने एका नव्या युगात प्रवेश केला. या नवनिर्मित राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वधर्मीय नागरिकांना मतदानाचा आणि अन्य मूलभूत अधिकार बहाल करण्यात आले. हीच हिंदुस्थानात संसदीय लोकशाहीची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ठरली.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती केल्याबद्दल घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन केलं. यावेळी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या महासभेला संबोधित करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “राज्यकर्त्यांनी देशाशी प्रामाणिक राहून भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी भरीव योगदान द्यावे. तसेच भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने प्रत्येक जाती-धर्माविषयी समान आदरभाव असावा. प्रजासत्ताक राज्य निर्मितीसाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड द्यावी. राज्यघटना, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा राज्यकर्त्यांसह नागरिकांनी आदर करावा. आपल्या पसंदीचा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी राज्यघटनेने सर्वधर्मियांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. कुठल्याही नागरिकांवर अन्याय झाल्यास त्याला न्यायालयात दाद मागणे चा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे”. न्यायाचे राज्य निर्माण करण्याचा घटनाकारांचा उद्देश होता, हे सिद्धीस येते.

प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार देवाची उपासना करण्याकरिता धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. तथापि, राज्य हे कोणत्याही धर्माशी घटनात्मकदृष्ट्या बांधील नाही वा कुठल्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही. याशिवाय कुठल्याही विषयावर आपले मत व्यक्त करण्यासाठी नागरिकांना घटनेने विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. तथापि, विचार स्वातंत्र्याचा वापर करताना इतरांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. महत्वाचे म्हणजे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नागरिकांना उद्योग-व्यवसाय करण्याचा अधिकार ही बहाल करण्यात आला आहे. स्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, कामगार-मालक असा भेदाभेद न करता, भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार-समान संधी प्रदान केली आहे. अत: वरील बाबींकडे पाहिल्यास संसदीय लोकशाही ही खऱ्या अर्थाने आदर्श राज्यपद्धती आहे, हे सिद्ध होते.

घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय घटनेत मागासवर्गीयांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं आहे.इतकेच नव्हे तर, मागास वर्गीय जाती-जमाती, आर्थिकदृष्या दुर्बल घटक, अपंग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शैक्षणिक व आर्थिक सवलती, सोयी-सुविधा घटनेच्या माध्यमातून प्रदान करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, सार्वजनिक करमणुकीची स्थळे, धार्मिक ठिकाणे येथे भेदाभेद न करता प्रत्येकाला प्रवेश दिला जातो. अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा आहे, असे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या माध्यमातून घटनाकारांनी विविध संप्रदाय, भाषा, पंत, संस्कृती-परंपरा असलेल्या देशात विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच संसदीय लोकशाही ही सर्वधर्मियांसाठी अन् समाजामधील सर्वच थरांतील नागरिकांसाठी वरदान ठरली आहे.

प्रत्येक नागरिकाने देशाप्रती कर्तव्याची जाणीव ठेऊन भारताचे सार्वभौमत्व,अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे; सार्वजनिक संपत्तीची जपवणूक करणे; सांस्कृतिक वारसाचे जतन करणे; अरण्य, सरोवर, नद्या, वन्यजीवसृष्टी या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे; राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणे आणि वेळप्रसंगी देश रक्षणाच्या कार्यात सहभागी होणे, ही मूलभूत कर्तव्ये पार पाडावीत, हा मोलाचा सल्ला घटनाकारांनी नागरिकांना दिला आहे. तात्पर्य, प्रत्येक नागरिकाने भारतीय प्रजासत्ताकाचा सन्मान करून त्याला अधिक मजबूत करण्यासाठी कटिबध्द व्हावे. त्याबरोबरच त्याचे नावलौकिक वाढेल यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे,म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करणे खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल. भारतातील सर्वधर्मीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

जय हिंद, जय भारत

जय महाराष्ट्र!

0000

लेखक – रणवीर राजपूत

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा

रायगड जिमाका दि. २५ : रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.

रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा   जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्‍या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन, आदी उपस्थित होते.

रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती.

रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्याची सुरूवात होत आहेत हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे.लवकरच २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण होणार आहे.याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

जनतेची कामे करताना संवेदनशील रहावे लागते. कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे असे खासदार श्री. तटकरे यांनी सांगितले. दूरपल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्यात यासाठी प्रयत्न होता. ते आज पूर्ण होत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे  विशेष आभार त्यांनी यावेळी मानले. रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या इथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील असे आश्वासनही खा. तटकरे यांनी दिले.

०००

शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

धुळे, दिनांक 25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक, तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक आहे. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षिरसागर आदी उपस्थित होते.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतानाच शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशियल इंटिलीजन्स) सारख्या माध्यमांचा शालेय शिक्षणात उपयोग करावा. प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले पाहिजे. पहिलीच्या विद्यार्थ्यास किमान बाराखडी व अंक गणिताची ओळख असणे, दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येणे आवश्यक तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना पाढे यावे अशा सोप्या पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येईल. शाळेतील शिक्षण ग्रामसमितीला सोबत घेऊन काम करावे. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करावा. मनरेगा योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भितींचे काम करावीत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच शाळेतील स्वच्छता गृहाची साफसफाईची कामे  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावी. 14 वा 15 व्या वित्त आयोग, क्रीडा विभाग, स्थानिक स्वराज्य निधी, आमदार, खासदार निधी तसेच अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सीएसआर फंडातून शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर विद्यार्थ्यांवर पोलीस विभागाने दामिनी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातील दोन शाळांना पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करुन ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह सुविधा, तसेच विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सुपर 50 सारखे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत. आगामी काळात किमान आठवीपासून आठ झोनमध्ये विविध क्षेत्रातील शाळा सुरू करणार आहे. यात कला, क्रीडा, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, विज्ञान, डिजिटल शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 200 पेक्षा जास्त पटाच्या शाळेच्या एक गट स्मार्ट शाळा म्हणून सुरु करणार, शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जलदगतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शाळाबाह्य कामे कमी करण्याचा आगामी काळात प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी शिक्षण विभागामार्फत राबवावयाचा 10 सुत्री कार्यक्रम तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविणेबाबत, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण कॉपीमुक्त अभियान याबाबत माहिती दिली.

प्रांरभी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षिरसागर यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीस शिक्षण विभागाचे सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

कृतिशील विचारवंत हरपले – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 25 : ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारे कृतिशील विचारवंत आज आपल्यातून हरपले आहे. मराठी साहित्य, भाषा, आणि संस्कृतीसाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

व्यक्तिचित्रण आणि ललित लेखनातून त्यांनी साहित्यप्रेमींना प्रेरित केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठी साहित्याला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या जाण्याने न्याय, समाज, आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव आपल्याला नेहमीच भासत राहील, असे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

राष्ट्रीय मतदार दिन : राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव

भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली, आणि त्यानिमित्ताने देशभर जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात.

मतदान : लोकशाहीचे प्रतीक आणि राष्ट्रीय कर्तव्य

मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य नसून, लोकशाही टिकविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगभरात आदर्श मानली जाते. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या माध्यमातून आज आपली मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.

लोकशाही मजबूत असेल तर देशाचा विकास सुकर होतो. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाने मतदानात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते.

मतदान नोंदणी : पहिला पाऊल

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात मतदार नोंदणी सोपी झाली आहे. www.nvsp.in या वेबसाइटद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येते.

राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की; प्रभातफेरी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा,मतदान जागृतीवर व्याख्याने, पोवाडे, पथनाट्याद्वारे जनजागृती विशेषत: तरुण पिढीला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

लोकशाहीचे संरक्षण : आपली जबाबदारी

भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली देशातील निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने होतात. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही सबबी न सांगता, आपला हक्क बजावणे हे आपल्या राष्ट्रप्रेमाचे खरे दर्शन आहे.

“आपले मत महत्त्वाचे आहे! चांगले राज्यकर्ते निवडण्यासाठी आजच आपली मतदार नोंदणी करा.”

मतदान हा आपला अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाहीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. चला, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, आपल्या समाजाला लोकशाहीचे खरे मूल्य समजावून देऊ.

 

आपली मतदार नोंदणी करा, देशाच्या विकासात आपले योगदान द्या!

0000

श्री. हेमकांत सोनार

रायगड-अलिबाग

 

ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुःख

मुंबई दिनांक २५: ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या न्यायमूर्ती चपळगावकर यांनी मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले.

मराठवाड्याच्या या सुपुत्राने सामाजिक, न्याय विषयांवर तसेच व्यक्तिचित्रण, ललित लिखाण देखील केले. आपल्या वैचारिक लिखाणातून समाजाला नेहमी जागृत आणि ज्ञानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर, राज्यातील साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

0000

चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी

मुंबई, दि. २५ :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे.

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

 

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- “ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती  नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

—-००००—-

ताज्या बातम्या

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...

कांदळवन नुकसान व अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्काळ कार्यवाही करावी –  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई,दि.५ : अलिबाग परिसरात काही कंपन्यांकडून होणारे कांदळवनाचे नुकसान व अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांची संबंधित विभाग व यंत्रणांनी गांभीर्याने नोंद घेऊन त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे ...