सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 439

‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा; जनसामान्यांची सेवा हाच धर्म’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ०९ (जिमाका) : हे शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि जनसामान्यांची सेवा हाच धर्म’ या तत्वांवर चालणारे असून  नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने ६ डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आणि कर्करोग मोबाईल व्हॅन-८, १०२ रुग्णवाहिका-३८४, सीटी स्कॅन-२, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-७, डिजिटल हँड हेड एक्स-रे मशिन-८० चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह, येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार विजय शिवतारे,  नगरविकास विभागचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्री.नविन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी अभियानाचे संचालक डॉ.स्वप्नील लाळे, सुप्रसिध्द अभिनेता तथा माजी खासदार गोविंदा आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी  नेहमीच “जनसामान्यांची सेवा हाच धर्म” असे मानून काम करीत आलो आहे. आत्ताच खोपट बस डेपो येथे एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांच्यासाठी निर्माण केलेल्या उत्तम दर्जाच्या विश्रांतीगृहाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर “जिथे एसटी डेपो तेथे कॅशलेस हॉस्पिटल” ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी जाहीर केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” राज्यात 700 पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे. महिलांचे कुटुंबाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष असते, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काहीही लक्ष नसते. आज आपण लोकार्पण केलेल्या या मोबाईल आरोग्य तपासणी यामुळे प्रत्येक गावागावातील महिलांची आरोग्य तपासणी करणे सहज साध्य होणार आहे. कॅन्सर संपविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जवळपास 51 हजार रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. तब्बल 460 कोटी रुपयांचे सहाय्य आपण गरजू रुग्णांना करू शकलो, यापेक्षा मोठे समाधान नाही, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्या आयुष्यात बदल घडविणे, हेच या शासनाचे ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. सर्वसामान्यांचे हे शासन असेच जोमाने काम करीत राहील. लवकरच “उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष” सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री.शिंदे यांनी यावेळी केली.

आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केले असून, जवळपास दोन कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. यासाठी शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत आधी दीड लाखापर्यंतची मदत केली जात होती. परंतु आता या शासनाने सरसकट सर्वांसाठी त्याची मर्यादा पाच लाखापर्यंत केली आहे. दुर्गम भागातील जनतेसाठीही हे शासन तत्परतेने काम करण्यास कटिबद्ध आहे.

कॅन्सर, टी.बी., हृदयरोग अशा आजारांचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” असे मानून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात हृदयाला छिद्र असणाऱ्या 5 हजार 500 लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या, हीच तर खरी पुण्याई आहे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही व्यवस्थेची महत्त्वाची दोन चाके आहेत. त्यांनी एकत्र मिळून जनतेच्या हिताची कामे करणे अपेक्षित आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगली कामे केली म्हणूनच शासन लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबवू शकले. त्यापैकीच एक “शासन आपल्या दारी” हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. संपूर्ण राज्यात पाच कोटी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.  हे शासन गतिमान आणि लोकाभिमुख आहे आणि यापुढेही हे शासन अशाच प्रकारे काम करेल, असेही ते शेवटी म्हणाले.

आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांनी आपल्या मनोगतात उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की, राजकारणी सर्वसामान्यांसाठी काम करणारे असावेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहिले की याची खात्री पटते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आजपासून राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या  निदान व उपचार करण्यात येणार आहेत. हा सुरु करण्यात आलेला उपक्रम महाराष्ट्रातील तमाम मायमाऊलींसाठी समर्पित आहे.

यावेळी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून 70 कोटी निधी खर्चून नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील हरबल गार्डन उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच आयुर्वेदाचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळण्यासाठी  “हर घर आयुर्वेद”  या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून मायका ॲपचे झाले लोकार्पण

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करणाऱ्या “मायका” या ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या अपॅचा लाभ सर्व वयोगटातील नागरिकांना होवू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरुन हे ॲप डाऊनलोड करता येवू शकते, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्करोगतज्ञ डॉक्टरांचा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या डॉक्टरांचा, दंतचिकित्सक तज्ञ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र फूड बास्केट चे वितरण क्षयरोग रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम

  • राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्यानिदान व उपचार करण्यात येणार आहे.
  • राज्यात 8 ठिकाणी अकोला, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे येथे कॅन्सर व्हॅन लोकार्पण सोहळा होणार आहे. या वाहनांमध्ये कर्करोग प्रतिबंधात्मक (Preventive Oncology) समुपदेशन, निदान व बायोप्सी या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हे वाहन ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी कर्करोगासंबधी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्तरावर कर्करोग वाहनाचा दौरा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे.
  • नव्याने खरेदी केलेल्या 7 ALS ॲडव्हान्स लाईप सपोर्ट रुग्णवाहिका सद्य:स्थितीत आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या गडचिरोली-उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा, चंद्रपूर-उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, सिंधुदुर्ग-उपजिल्हा रुग्णालय कणकवळी, पुणे-उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर, रत्नागिरी-प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड, रायगड-ग्रामीण रुग्णालय महाड या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
  • सद्य:स्थितीत अकोला, नाशिक, अमरावती, सातारा, पुणे गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व बीड या 9जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर (किमोथेरपी युनिट) ची स्थापना झालेली आहे.
  • राज्यात ठाणे सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा या 6 जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारासाठी किमोथेरपीची सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅन्सर डे केअर किमोथेरपी सेंटर अंतर्गत प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारीका यांच्यामार्फत कॅन्सर रुग्णांना उत्कृष्ट दर्जाची किमोथेरपी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • उपजिल्हा रुग्णालय वैजापूर, छत्रपती संभाजीनगर व उपजिल्हा रुग्णालय डहाणू, जि.पालघर येथील सार्वजनिक खाजगी भागिदारीतून नव्याने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सीटी स्कॅन सुविधांचे लोकार्पण आज करण्यात आले.
  • राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शोधलेल्या संशयित क्षयरुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून राज्यातील 34 ग्रामीण जिल्हे, 22 महानगरपालिका व मुंबईच्या 24 वार्डासाठी राज्यस्तरावरुन आलेल्या 80 डिजिटल पोर्टेबल हँड एक्स-रे मशीनचे लोकार्पण आज करण्यात आले.
  • राज्यामध्ये 102 योजनेंतर्गत गरोदर माता व नवजात शिशुंना रुग्णालयात संदर्भित करण्यासाठी384 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

000000

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – पर्यावरण व वातावरणीय  बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

नाशिकदि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : शहरीकरण आणि नागरिकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहेअसे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. 

नाशिक येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टदिंडोरीदिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीराज्य शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2025 मध्ये आज सकाळच्या सत्रात ‘पर्यावरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छावआमदार सीमा हिरे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीदआबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते शेतीत विविध उपक्रम राबविण्याऱ्या शेतकऱ्यांसह पर्यावरण पूरक केंद्र म्हणून जळगाव जिल्ह्यातील आनंद नगर यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या कीभविष्यातील पिढीसाठी संपत्ती नव्हेतर सुरक्षित पर्यावरण राखून ठेवणे काळाची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. मोठमोठी बांधकामे करताना रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. नाशिक  त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये कुंभमेळा होईल. आगामी कुंभमेळा हा स्वच्छपर्यावरणपूरक ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी पर्यावरण विभागातर्फे नियोजन केले जाईल.  गोवंश संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून पुष्पगुच्छऐवजी बियांचे पाऊच दिल्यास अधिक उपयोगी ठरणार आहे. तशा सूचना सुद्धा देण्यात येतील. तसेच ग्रामीण भागात उद्योजक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईलअसेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. 

यावेळी श्री. मोरेडॉ. गिरासे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर मंत्री श्रीमती मुंडे यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी शेतकरीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन

शिर्डी, दि.९ – सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित हेत्तीयाराची, सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतूरे व पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बागडे म्हणाले, भारतात १९०४ मध्ये सहकार कायदा झाला. त्याआधी महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे रूजली आहेत. राज्य सहकारी बँकेची सुरुवात पतसंस्थेपासून झाली आहे. पतसंस्थेच्या चळवळीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम करण्याची गरज आहे‌. सहकार क्षेत्रातील चुका लपविण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा.  आजही लोकांचा सहकारावर विश्वास आहे. त्यामुळे सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीतील असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे राज्यपाल श्री. बागडे यांनी सांगितले.

सहकारात व्यापक दृष्टीकोन ठेवून आपण केले पाहिजे.  ज्यांच्या ठेवींचे व्याज कमी त्या ठेवींच्या परतीची हमी असते. त्यामुळे अधिक ठेवी, अधिक व्याज ही स्पर्धा पतसंस्थांनी निर्माण करू नये, असे आवाहनही राज्यपाल श्री.बागडे यांनी केले.

चांगल्या कामगिरीच्या आधारे आदर्श निर्माण करा – मंत्री विखे पाटील

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यातील अनेक सहकारी संस्था उत्कृष्ट कार्य करत आहेत. अन्य संस्थांनीही चांगली कामगिरी करून देशासमोर आदर्श निर्माण करावा. केंद्र शासन सहकार चळवळीला उत्तेजन देत आहे. शेतमाल साठवणुकीचे गोदाम सहकारी संस्थांनी उभे केले पाहिजेत, अशी‌ अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठेवीदारांच्या ठेवीना संरक्षण मिळाले तरच ठेवीदार सहकारी संस्थांत पैसे गुंतवतील‌. ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करणे सहकारी संस्थांचे कर्तव्य आहे. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री बाबासाहेब पाटील

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १६ हजारपेक्षा अधिक पतसंस्था कार्यरत असून या चळवळीत सुमारे ३० कोटी लोक सहभागी आहेत. सहकाराला उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे. कर्ज वाटप करतांना पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे. शासनाचे धोरण विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्याचे आहे.

सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

श्रीकृष्ण वाडेकर, उदय जोशी, रणजित हेत्तीयाराची यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ‘सहकार वृक्ष’ या संकल्पनेंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले. उपस्थितांना राज्यपाल श्री.बागडे यांनी सहकाराची शपथ दिली. आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात काका कोयटे यांनी मांडली.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य देशवासियांसाठी प्रेरणादायी – प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर दि.९- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये   समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे हे कार्य  संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.शिंदे बोलत होते.

यावेळी राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा केंद्रीय समितीच्या सचिव  कॅप्टन मीरा दवे, चौंडीच्या सरपंच मालनताई शिंदे, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, डॉ. पी.व्ही. शास्त्री आदी उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्म आणि समाजाच्या विकासासाठी काम केले. देशातील १२ ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराबरोबरच मंदिर निर्माणासाठी काम करत अनेक संघर्षातुन एक इतिहास निर्माण केला. सामाजिक न्याय, महिलांचे कल्याण, व्यापार, कृषी व न्याय व्यवस्थेसाठीचे त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ३०० वे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण देशभरामध्ये साजरे करण्यात येत आहे.  चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात  लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविक श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी केले.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिकेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘एकता’  मासिकाचे तसेच ‘अदम्य चैतन्याची महाराणी’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित परिसंवाद व चर्चासत्र संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित परिसंवादातून व चर्चासत्रातून त्यांचे अद्वितीय नेतृत्वगुण, सामाजिक न्यायासाठी घेतलेले निर्णय,  धर्म व प्रशासन यातील संतुलन या विषयावर विचारमंथन करण्यात आले.

अहिल्यादेवींनी त्यांच्या कारकीर्दीत प्रजाहितासाठी अंमलात आणलेली  तत्त्वे, विशेषतः न्यायदान व करप्रणाली ही वाखाणण्याजोगी होती. विविध धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण, राज्यव्यवस्थेची जबाबदारी आणि स्त्रीशक्तीच्या दृष्टिकोनातून त्यांचे योगदान अतुलनीय होते.  व्यापार, शेती आणि करसंकलनाचे सुधारित धोरण व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे होते तर मराठा साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी राबवलेले संरक्षण व सैन्यव्यवस्थापनाचे धोरण राज्यव्यवस्थेला दिशादर्शक ठरले असल्याचा सूर या परिसंवादातून निघाला.

परिसंवादात चिन्मई मुळे, डॉ.माला ठाकूर,  डॉ. आदिती पासवान, नयना सहस्त्रबुद्धे, डॉ. माधुरी खांबोटे आदींनी सहभाग घेतला. यावेळी विविध विभागामध्ये चर्चासत्रही संपन्न झाले.

कार्यक्रमास राज्यभरातून महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र ११ फेब्रुवारी रोजी मुलाखत

मुंबई दि. ९ :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा, याविषयी ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्र यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

000

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन

मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२४ चे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड्. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ वाजता मुलुंड पश्चिम येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री व विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ग्रंथदिडी

दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम ९ ते १०.३० या वेळेत आहे.ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते व मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ,प्रशासकीय अधिकारी, टी वॉर्ड, कैलास चंद्र आर्य, सहायक डॉ.विजयकुमार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रम

या ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी  ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड (पश्चीम) येथे उद्घाटन होणार  आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआहेत. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य वर्षा गायकवाड, संजय दीना पाटील, विधानसभा सदस्य राम कदम, सुनिल राऊत, मंगेश कुडाळकर, मिहिर कोटेचा, पराग शहा, अशोक पाटील तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त्‍ शिक्षण डॉ.प्राची जांभेकर, पोलिस उपायुक्तविजयकांत सागर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुजाता खरे,कार्यकारी अभियंता सचिन धात्रक, प्र.ग्रंथपाल शालिनी इंगोले हे उपस्थित राहणार आहेत.

चर्चासत्र व मार्गदर्शन

१२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात ‘मराठीतील पहिले ज्ञानपीठ’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ,प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे,प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ.अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र’ या विषयावर व्याख्यान, तर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत ‘राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन’  या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.दुपारी ३.३० ते ४.३० ‘अभिजात मराठीतील शब्द वैभव’ या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.तसेच लहान मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘कथा कवितेच्या राज्यात’ या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण.’भारतीय संविधान माझा अभिमान’ या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे ‘लोककला समुजन घेताना’ या विषयावर श्रीमती डॉ.मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.दुपारी २ ते २.४५ या वेळेत ‘आधुनिक शेती’या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके,मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे ‘कोवळ्या पालेभाज्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत ‘संत साहित्य गाण्यामधून’ या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

या कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी,वाचनप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

०००

 

आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. ०९ :अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकासविभाग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी उपस्थित होते.

मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 75 वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे.

अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा प्रधानमंत्री यांचा संकल्प :

प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन 2015 मध्ये भारतात प्रती लक्ष 9.73 कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष 5.52 रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील.

आनंदवनच्या अनुदानात वाढ :

आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र, निवासी 500 लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन 2012 पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रती रुग्ण 2200 ऐवजी आता सहाहजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रती रुग्ण दोनहजार वरून सहाहजार रुपये देण्यात येणार आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित 65 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता शासन  पुढाकार घेईल. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय : उद्योगमंत्री उदय सामंत

आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान 2 टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे, असे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले.

विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन : बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

००००००

 

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी १०, १३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यांत परीक्षा

मुंबई दि. ९ : महिला व बालविकास विभागांतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. १०, १३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यात ४५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून https://www.wcdcommpune.com/ या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.

संरक्षणअधिकारीगट-ब (अराजपत्रित)  दोन पदे, परिविक्षा अधिकारी गट-क 72 पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी) गट -क एक पद, लघुलेखक (निम्नश्रेणी) गट -क दोन पदे, वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहाय्यक गट-क 56 पदे, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)गट- क 57 पदे, वरिष्ठ काळजी वाहक गट -ड चार पदे, कनिष्ठ काळजी वाहक गट -ड 36 पदे, स्वयंपाकी गट -ड सहा पदे या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 236 रिक्त पदे भरण्याकरीता कॉम्पुटरबेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परिक्षा टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे.

परिक्षार्थी यांचे स्थानिक व जिल्ह्यात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षक, तर आयुक्तालयामार्फत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर सिग्नल जॅमर बसविण्यात येणार असून यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. तसेच, केंद्रांवर बायोमेट्रीक व आय स्कॅनिंग व फेस रिडींग केले जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना पुरेसा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नये, कुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे अथवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवित असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त श्री. मोरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालय कार्यालय अथवा 020-26333812 या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

 

 

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

सांगली, दि. ८ (जि. मा. का.) : जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू. पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देऊ, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज केले. करजगी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक, उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संदीप यादव, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, जिल्हा चाईल्ड लाईन कक्षाच्या  समन्वयक आदी उपस्थित होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणारी व वेदनादायी असून, या घटनेचा निषेध करते. या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे त्या म्हणाल्या.

घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

पुणे दि. 8 :   महाराष्ट्र विधिमंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकार करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण कायदे मंजूर केले असून, लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग अत्यंत महत्त्वूपर्ण आहे. असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ – क्षमता वृद्धी कार्यक्रमात ‘संसदीय कामकाजातील सर्वोत्तम आयुधे’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी. जोशी, संमेलनाचे संस्थापक-संयोजक राहुल कराड, युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाने संगणकीकृत आणि पेपरलेसच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात केली आहे. राज्यात सुरुवातीला रोजगार हमी कायदा अंमलात आला व हा कायदा पुढे देशपातळीवर स्वीकारला गेला. महाराष्ट्र विधानपरिषदेला समृद्ध परंपरा लाभली आहे.  वेगवेगळ्या राज्यातील आमदारांचा संवाद आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने एमआयटीने सुरू केलेल्या हा उपक्रम स्त्युत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेल्या ‘वन नेशन वन प्लॅटफॉर्म’ या उपक्रमासाठी ‘एमआयटी’ सारख्या शिक्षण संस्थांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागत आहे असेही श्री. शिंदे म्हणाले.

जनतेला न्याय देण्यासाठी विधिमंडळात संसदीय आयुधांचा परिणामकारक वापर करावा : डॉ. नीलम गोऱ्हे

‘विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव अशी सोळा प्रकारची आयुधे असतात. त्यांचा योग्य व परिणामकारक वापर केल्यास जनतेच्या समस्या सुटून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो,’ असे मत  महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

‘जनतेच्या अस्वस्थतेला वाचा फोडणारे प्रश्न आमदारांनी विधिमंडळात मांडले पाहिजेत. त्यासाठी त्यांना विविध अधिकाररुपी आयुधांचा वापर करता येऊ शकतो. तारांकित, अतारांकित प्रश्न मांडल्यास त्याची माहिती जनतेलाही कळाली पाहिजे.  प्रसिद्धीसाठी काम करण्यापेक्षा लोककल्याणाचे योग्य मुद्दे चर्चेत यावे, यावर भर दिला पाहिजे,’ असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

आमदारांच्या क्षमता विकसनातून विधिमंडळाचे कामकाज गुणवत्तापूर्ण करण्याचा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो म्हणाले. ‘विधानसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जनहिताचे काम करू शकतात. त्यासाठी आमदारांना विधासभेच्या कामकाजाची बारकाईने माहिती असली पाहिजे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी विविध अधिकार-आयुधांचा वापर केला पाहिजे. कायदे आणि अर्थसंकल्पाविषयी आवड असली पाहिजे. कामकाजाचे बारकावे ठाऊक असले पाहिजेत. लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायम जनतेच्या हृदयात स्थान असते,’ असेही महातो यांनी आवर्जून नमूद केले.

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...