सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 438

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 10: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयीसुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरणारा आहे. या प्रकल्पाचे काम विहित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मत्सव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला. बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सहआयुक्त महेश देवरे, मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर,  कोकण प्रादेशिक मत्स्य उपआयुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणाले, प्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात यावे. निविदा स्तरावरील कामे कशाप्रकारे लवकर सुरू होतील, याबाबत नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये. पावसाळ्यात कामे करता येणार नाही. त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत. या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा. परवानग्या मिळविण्याची कार्यवाही पुढील 15 दिवसांत पूर्ण करावी.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोनमधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढविणे, उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणे, नौकानयन मार्गातील गाळ काढणे, भराव व सपाटीकरण, लिलावगृह, जाळी विणण्यासाठी दोन शेड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, मच्छिमारांसाठी दोन निवारा शेड बांधणे, पुर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणे, अस्तित्वातील धक्का व जेट्टीदुरूस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत. टप्पा दोन अंतर्गत एकूण कामे 22 असून 3 कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

०००

निलेश तायडे/विसंअ

प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा बनविणार – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि.१० : नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असून, नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषण नियंत्रणासाठी, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्याची घोषणा पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

आयआयटी पवई येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आयआयटी, पवई यांच्या संयुक्त वि‌द्यनाने स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात सांडपाण्याचे व्यवस्थापन  व शाश्वत उपाययोजना  (मुन्सिपल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट गॅप्स,  सस्टेनबिलिटी अँड वे फॉरवर्ड) या विषयावर एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

यावेळी नगर विकास (२) विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव  डॉ. अविनाश ढाकणे, आयआयटी पवईच्या पर्यावरण विभाग व इंजिनिअरिंगचे प्रोफेसर मुनेश कुमार चंदेल, प्रोफेसर अनिल कुमार दीक्षित, राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण अधिकारी तथा तंत्रज्ञ या कार्यशाळेला उपस्थित होते.

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामपंचायती,नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या त्या स्थानिक भागातील प्रदूषित पाणी या नद्यांमध्ये थेट मिसळले जाते. प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषित पाणी थेट पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नद्या व तलावांचे संवर्धनही भविष्याची गरज ओळखून त्याचा सुनियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडून बनवला जाणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये लोकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी पर्यावरण विभाग एक तांत्रिक कक्ष देखील स्थापन करून करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून प्रदूषणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवता येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शेतीमध्ये पिकांवर फवारणी करण्यात  येणारी  कीटकनाशके यामुळेदेखील पाणी प्रदूषित होत आहे. जल,वायू,मृदा प्रदूषण रोखण्यासाठी परस्पर संबंधित शासनाच्या विभागांच्या समन्वयाने प्रदूषण टाळण्यासाठी काटेकोरपणे उपायोजना  करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आवश्यक तिथे जनजागृती करणे.जिथे कायद्याची गरज भासल्यास कायदेशीरदृष्ट्या कारवाई करणे. त्याचप्रमाणे कायदा व नियमांची माहिती लोकांना करून देणे यासाठी देखील पर्यावरण विभाग भर देणार आहे. पर्यावरणावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.प्रत्येकाने हे प्रदूषण रोखण्यासाठी काळाची गरज ओळखून आतापासूनच काम केले तर आपण पुढील पिढीला आपण चांगले वातावरण आणि चांगले आरोग्य देऊ शकतो.पर्यावरणासाठी काम करून आपण सर्वांचे जीवन सुसह्य करणार आहोत त्यामुळे या कार्यशाळेचा नक्कीच सर्वांना लाभ होईल असेही त्या म्हणाल्या.

प्रधान सचिव के. एच. गोविंदराज म्हणाले की, शहरामध्ये निर्माण होणारे सांडपाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळले जाते.मात्र प्रदूषित झालेल्या सांडपाण्याचा जर आपण त्याच ठिकाणी पुनर्वापर केला तर प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी मदत होऊ शकेल. आपल्याला प्रदूषणाची वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही माहित आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने या समस्यावर मात करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे. स्थानिक ठिकाणी प्रदूषण कमी होण्यासाठी जनजागृती करणे यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.आज झालेल्या कार्यशाळेतून मिळणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या क्षेत्रांमध्ये पोहोचवा असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी महाराष्ट्रातील पालिका क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे सद्यस्थिती आणि त्याचा होणारा परिणाम याविषयी सादरीकरण केले. इंदोर येथील डॉ. राकेश कुमार, आयआयटी  मुंबईचे प्रोफेसर अनिल कुमार यांनी नैसर्गिकरित्या प्रदूषण आपण कसे थांबवू शकतो यावर आधारित आपले विचार मांडले.

‘प्रदूषित पाणी शुद्धीकरणासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे’ या विषयावर आयआयटी खरगपूरचे इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर ब्रिजेश दुबे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, इको एन्व्हायरमेंट प्रॅक्टिस चे मुख्य अधिकारी कैलास शिरोडकर, ‘राज्यातील प्रदूषित पाण्यावरती राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण प्रयोग यशोगाथा’ ची माहिती मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा नागपूर, अमरावती  या भागातील पालिका अधिकाऱ्यांनी यांनी सादर केल्या. ‘शाश्वत शुद्ध पाण्यासाठी उपाय योजना’  या विषयावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सादरीकरण केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ९ : विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार चित्रा वाघ, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार चैनसुख संचेती, माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव पी. अनबलगन,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचे काम या महोत्सवात झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे  मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल. आगामी काळात पर्यटन आधारित परिषदेचे आयोजन व्हावे, असेही ते म्हणाले.

प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक – नितीन गडकरी

अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्ती मधून विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात  जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू असून नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील – पीयुष गोयल

विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान स्कील युनिव्हर्सिटी तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्री. गडकरींनी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी केले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती, खासदार प्रफुल पटेल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सवावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी विदर्भातील सुवर्णकार यांनी फडणवीस यांचा सत्कार केला महोत्सवाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी भेट दिली.

सामंजस्य करार :

आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातुन १०० रोजगार निर्माण होणार आहे.  राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरातील आगामी गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोसमध्ये झाला होता.

0000

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

अमरावती, दि. 09 : येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा. मुंबई यांच्या वतीने आयोजित धारणी येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आज पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, इंद्रजीत महादेव कोळी, ॲड राजीव गोंडाणे, नवनियुक्त न्यायमूर्ती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

श्री. गवई म्हणाले, मेळघाट परिसर हा निसर्ग संपन्न आहे. या भागात आदिवासी समाज बहुसंख्येने आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे.  या शिबिराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. समाजात राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेने संरक्षण दिले आहे. देशात 75 वर्षे संविधानाने पूर्ण केले आहे. त्यामुळे देशात लोकशाही प्रस्थापित झाली आहे.  मात्र समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. राज्यघटनेत समानतेचे संरक्षणासाठी मूलभूत तत्वे आणि अधिकार दिले आहेत. त्यानुसार  न्यायालय निर्णय देत आहे. देशात समानतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा, शिक्षण, रोजगाराच्या संधी, दिव्यांगांना मदत  देऊन दरी मिटवण्याचे कार्य करावे.

श्री. ओक यांनी राज्यघटनेने कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा विकास करताना निवास, आरोग्य आणि त्याच्या उत्पन्नाची साधनाची सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने मूलभूत सुविधा पोहोचवून कुपोषणासारखा प्रकार प्रभावीपणे हाताळावा. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात यावे, असे आवाहन केले.

श्री. आराधे यांनी, लोकअदालतीच्या माध्यमातून सामंजस्याने न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. श्री. चांदूरकर यांनी धारणी येथे न्याय मेळावा आयोजित केला आहे. या ठिकाणी कायदेविषयकही सल्ला मिळणार आहेत. याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. श्रीमती ढेरे यांनी भारतात लोकशाहीचा पाया रुजला आहे. प्रत्येकाला न्याय मिळणे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.  श्री. सांबरे यांनी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. श्रीमती जोशी यांनी शिबिराच्या माध्यमातून न्याय नागरिकांच्या दारी पोहोचलो आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दुर्गम भागात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येकाला मदत मिळावी यासाठी प्रशासन कार्यरत आहे, असे सांगितले. श्री. यार्लगड्डा यांनी सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.

यावेळी ज्योती पटोरकर, नारायण कासदेकर, मोहम्मद अरिफ अब्दुल हबीब, सतीश नागले, तरहाना शेख परवीन, आदर्श पटोलकर, अर्जुन पटोरकर, कमला जावरकर, रतई तारशिंगे, श्याम जावरकर, रामदास भिलावेकर, माही राठोड, पार्वती नागोरे यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

वनस्पतींना पाणी देऊन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. सुरवातीला बरडा येथील समूहाने गजली सूसून आदिवासी नृत्याने स्वागत केले. जिल्हा परिषद महाविद्यालयाने स्वागत गीत सादर केले.

00000

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल – न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी 

  • न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक
  • भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण

नांदेड, दि. 9 :- लोकशाही सशक्त बनविण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेत मुलभूत सुविधा प्राप्त करुन देणे आवश्यक आहे, यामुळे न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम होईल व यातून एक नवीन पर्व सुरु होईल. भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या या नूतन विस्तारीत इमारतीमुळे सर्वाना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

भोकर येथे सुमारे 14 कोटी 51 लाख 65 हजार रुपये खर्च करून बांधलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन विस्तारीत न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रम्हे, खासदार अशोकराव चव्हाण,  खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. सांळुखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ विधीज्ञ आदीची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वी भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आज त्यांच्याच उपस्थितीत या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच ही इमारत पूर्णत्वास गेली असल्याचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी सांगितले. न्यायालयात परिसरात काम करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून न्यायालयीन प्रक्रीया अधिक सक्षम बनविण्यावर भर द्यावा. तसेच ही इमारत स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.

कुठलीही वास्तू उभी राहण्यासाठी अनेक संर्घषाचा सामना करावा लागतो. अनेक कष्टकऱ्यांचे योगदान या इमारतीच्या बांधकामासाठी लाभले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारती उभी राहीली असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी. ब्रम्हे यांनी केले. नवीन इमारतीसोबत इतर सोयी-सुविधाही हळूहळू सुरु करता होतील. विधीज्ञ व न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तळागाळातील पक्षकार हा केंद्रबिंदु ठरवून कामकाज करावे. तसेच बदलत्या परिस्थितीत वकीलांनी अन्यायापासून वंचित असणाऱ्या लोकासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

भोकर येथील न्यायालयाची नूतन व जुनी इमारत तीन ठिकाणी जोडली असून सदर इमारत एकूण 27 हजार चौरस फुटाची आहे. तीन मजल्यावर ही इमारत उभी आहे.  या इमारतीत बिजनेस सेंटर, फ्रंट ऑफिस, मीडिया सेंटर, रेकार्ड रुम, बार रुम, स्त्री व पुरुष विटनेस रुम, शासकीय अभियोक्ता कार्यालय, स्त्री व पुरुषासाठी स्टाफ रुम, कन्सुलेशन रुम इत्यादी केले आहे. तसेच पार्कीग, कोर्ट हॉल, जज चेंबर, ॲन्टी चेंबर, कोर्ट ऑफिससह  प्रस्तावित केले आहे.

वृक्ष संवर्धन काळाजी गरज असून या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देवून करण्यात आली. यावेळी बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. साळुंखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. संदिप भिमराव कुंभेकर यांनी तर आभार जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के.पी. जैन देसरडा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भोकरचे ए. पी. कराड यांनी केले.

00000

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 9 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या आठवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या गुणवत्ताधारक पाल्यांना टॅब व शैक्षणिक आज्ञावलीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभाग प्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचेही हात व मेहनत आहे, याची जाणीव उद्योग मंत्री म्हणून मी प्रत्येक वेळेस ठेवली आहे. या जाणिवेतूनच आपल्या आरोग्य विमाबाबत, आपल्याला लागणाऱ्या सेफ्टी साहित्य  याचबरोबर दुचाकी वाहनासाठी पूर्वी असलेली मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या वर्षात महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन यासाठी लागणारी कामे अतिशय अल्प कालावधीत पूर्ण करून दाखवले. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क साठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हे केवळ 45 दिवसात आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागपूर व अमरावती विभागातील 51 पाल्यांना टॅब देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य राजेश झंजाड, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे व मान्यवर उपस्थित होते.

00000

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती; राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

सगरोळी (नांदेड ) दि.९ फेब्रुवारी : विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत गेलो व  माझ्या हातून विविध विषयांवर ५६ पुस्तकांची निर्मिती झाली असल्याचे जेष्ठ साहित्यिक डो. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. सगरोळी (ता.बिलोली) येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी  व्यासपीठावर देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी साहित्यिक देविदास फुलारी आदींची उपस्थिती होती. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

रविवार (ता.९) रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व येथील संस्कृति संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.

‘मुसाफिर’ या पुस्तकाने अनेकांच्या आत्महत्या रोखल्या, बोर्डरूम हे पुस्तक वाचून अनेकांनी उद्योग उभारले. समाजास याचा लाभ होत असल्याने समाधान वाटते. उद्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित असून हे सर्वांना समजावे म्हणून मराठीतून पुस्तके लिहिली. तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहावे.  प्रचंड वाचन, गाणी, चर्चा यासह त्यातील  मुख्य शिलेदार, माणसे, त्याची थेरी, मूलतत्त्वे याचा अभ्यास केला. लोकांचा विश्वास व  माझाही आत्मविश्वास वाढला, माझ्यामुळे सहलेखक तयार झाले. येथील संस्थेचे काम पाहून प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले.

माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने अभिमानास्पद आहे. येथे अनेक कार्यक्रमातून नागरिकांची जडणघडण होत असल्याचे आमदार जितेश अन्तापुरकर म्हणाले.

सगरोळी येथील कर्मयोग्याच्या भूमीत हे संमेलन व्हावे अशी मनापासून इच्छा होती. यापुढे सगरोळी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे अशी इच्छा मार्तंड कुळकर्णी यांनी व्यक्त केली. प्रमोद देशमुख यांनी सर्व मान्यवर व सारस्वतांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. परिसरास कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी तर सभा मंडपास मराठवाड्याचे भूमिपुत्र कविवर्य दे.ल. महाजन यांचे नाव दिले होते. यावेळी साहित्यिक व श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी  मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते,  परंतु त्यांनी आभासी पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देऊन संमेलनास शुभेच्छा दिल्या.

0000

‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ९ : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात ‘सायबर हॅक-२०२५’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते.

देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. येत्या काळात  विशेषतः सायबर क्राईमवर लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॅार्म तयार केला आहे. केंद्र शासनानेही या प्लॅटफॅार्मचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सायबर हॅक हा नागपूर शहर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा यासंबंधीच्या आगामी आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीचा एक आगळावेगळा उपक्रम होता. सायबर गुन्ह्यांशी संबंधित  समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पाच विषयांवर ६ जानेवारी २०२५ रोजी सुरु झाली. पहिल्या टप्प्यात (ऑनलाईन फेरी) आयोजित करण्यात आली. या पहिल्या फेरीत देशभरातून ६०० संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले. या ६०० संघांमधून २० संघांची अंतिम फेरीसाठी (ऑफलाईन फेरी) निवड करण्यात आली. अंतिम फेरी ७ आणि ८ जानेवारी २०२५ दरम्यान आयआयएम नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील रामदेवबाबा महाविद्यालय (प्रथम), इन्फोसिस कॅार्पोरेट (द्वितीय) तर रायसोनी महाविद्यालय (तृतीय) या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

००००

 

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

भारतामध्ये लाखो मुले दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी भारत सरकारने १०९८ चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24X7 कार्यरत असतो. चला जाणून घेऊया या हेल्पलाइनचे महत्त्व, कार्यपद्धती…

१०९८ चाइल्ड हेल्पलाइन: काय आहे आणि कशी कार्य करते ?

१०९८ चाइल्ड हेल्पलाइन ही एक राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आहे, जी 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्यरत आहे. संकटात सापडलेल्या किंवा असुरक्षित स्थितीत असलेल्या मुलांना संरक्षण, समुपदेशन, पुनर्वसन आणि अन्य गरजेच्या सेवा पुरवण्याचे काम ही हेल्पलाइन करते. देशभरातील कोणत्याही फोनवरून १०९८ हा क्रमांक डायल करून त्वरित मदत मिळू शकते.

या हेल्पलाइनच्या माध्यमातून तज्ज्ञ समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते मुलांना मानसिक आधार, कायदेशीर मदत, पुनर्वसन सुविधा आणि गरजेनुसार इतर सेवांसाठी मार्गदर्शन करतात.

1098 हेल्पलाइन कोणत्या परिस्थितीत मदत करू शकते?

ही सेवा संकटात असलेल्या मुलांसाठी अनेक प्रकारे मदत करू शकते. खालील परिस्थितींमध्ये १०९८ वर संपर्क साधला जाऊ शकतो

  • हरवलेले किंवा पालकांशिवाय असलेले मुले: जर एखादे बालक हरवले, मुलगा मुलगी हरवली असेल असेल किंवा कोणत्याही पालकाविना आढळले तर १०९८ च्या माध्यमातून त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते.
  •  शोषण किंवा अत्याचार होत असेल: शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना संरक्षण आणि कायदेशीर मदत पुरवली जाते.
  •  बाल विवाह आणि बालकामगार: मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे बाल विवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी १०९८ वर तक्रार नोंदवता येते.
  •  भिक्षा मागणारी मुले किंवा व्यसनाधीनता: बालक जर भिक्षा मागताना दिसला किंवा व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला योग्य मदत मिळवण्यासाठी १०९८ वर कॉल करता येतो.
  • शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित समस्या: शिक्षणापासून वंचित असलेल्या किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या मुलांना आवश्यक सेवा पुरवण्याचे काम हेल्पलाइन करते.
  •  अनाथ, समर्पित किंवा दत्तक घेण्यास पात्र मुले: पालकविना राहणाऱ्या किंवा पुनर्वसन आवश्यक असलेल्या मुलांसाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळते.

१०९८ चाइल्ड हेल्पलाइनद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा

ही हेल्पलाइन फक्त तक्रारींचे नोंदणी केंद्र नसून, संकटात सापडलेल्या मुलांना संपूर्ण मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते :

समुपदेशन

मुलांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असतात. हे समुपदेशन बालकांना त्यांच्या परिस्थितीतून सावरायला मदत करते.

त्वरित हस्तक्षेप

जर एखाद्या मुलाला तातडीने मदतीची गरज असेल, जसे की अत्याचार किंवा बालमजुरीच्या स्थितीत असेल, तर स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने त्वरित कारवाई केली जाते.

रेफरल सेवा

जर एखाद्या मुलाला पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय मदत किंवा पुनर्स्थापनेसाठी विशेष सेवांची गरज असेल, तर हेल्पलाइन त्या संबंधित संस्थांकडे त्याचा तपशील पाठवते.

माहिती आणि मार्गदर्शन

१०९८ च्या माध्यमातून बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवली जाते. पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठीही ही सेवा मार्गदर्शन करते, जेणेकरून मुलांचे संरक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.

१०९८ चाइल्ड हेल्पलाइनचा प्रभाव

ही हेल्पलाइन सुरू झाल्यापासून लाखो मुलांना मदत मिळाली आहे. खालील महत्त्वाचे परिणाम यामुळे दिसून आले आहेत: 10 दशलक्षाहून अधिक कॉल्स: हेल्पलाइनला दरमहा सरासरी 50,000 हून अधिक कॉल्स प्राप्त होतात. 5 दशलक्षाहून अधिक मुलांना मदत: दुर्लक्ष, शोषण, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवर वेळेत कारवाई करण्यात आली आहे. 1 लाखांहून अधिक मुलांची सुटका: संकटात सापडलेल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत

१०९८ हेल्पलाइनसाठी नागरिकांची जबाबदारी

कोणत्याही समाजाचे भविष्य हे त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेवर आणि विकासावर अवलंबून असते. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, संकटात सापडलेल्या मुलांची मदत करण्यासाठी योग्य ती तक्रार 1098 वर नोंदवावी.

आपण काय करू शकतो ?

  •  सतर्क राहा: जर आपल्या आजूबाजूला बालकांचे शोषण, दुर्लक्ष किंवा अत्याचार होत असल्याचे आढळले, तर १०९८ वर कॉल करा.
  •    जागरूकता वाढवा: 1098 चा प्रचार करून अधिकाधिक लोकांना या सेवेबद्दल माहिती द्या.
  •   सहकार्य करा: प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून संकटात असलेल्या मुलांना मदत करा.

१०९८ चाइल्ड हेल्पलाइन ही भारतातील असंख्य संकटग्रस्त मुलांसाठी जीवनरेखा ठरली आहे. ही सेवा केवळ मदतीचा एक मार्ग नसून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

मुलांचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन १०९८ चा योग्य वापर केल्यास, अनेक निरपराध बालकांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी बनवू शकतो. चला नांदेड जिल्ह्यातील या कामात मदत करूया ! वंचित शोषित असाह्य मुले कुठे आढळल्यास एक शून्य नऊ आठ चा उपयोग करूया!

-प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

००००

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.९(जिमाका) : एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून ‘फाईव्ह स्टार’ परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे.    मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून ” खड्डेमुक्त बसस्थानक ” हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण-तणाव मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारांमध्ये वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे  निर्देश त्यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या  महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या  कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे.

यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...