सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 437

अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे योगदान : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक, दि. 10 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
आज यूथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2025 समारोप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार छगन भुजबळ, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अण्णासाहेब मोरे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                                                                                                    जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त गुंतवणूक या क्षेत्रात केली जाणार आहे.  नवनवीन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व समृद्ध शेतीसाठी अविरतपणे सेवा सुरू आहे. नव्या पिढीला रचनात्मक कामांमधून नवी दिशा देण्याचे काम स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीची नवीन औजारे, पीकपद्धती,  फळे व पीकांचे नवीन वाण यामुळे शेती उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणारे 65 टीएमसी पाणी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे महत्वाचे नियोजित असून यासाठी 50 ते 60 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात हे काम पूर्ण  करुन गोदावरी खारे दुष्काळमुक्त करण्याची शासनाचे प्रयत्न आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाण्याचे नियोजन करतांना बिगर सिंचन क्षेत्रासाठी असेलेले पाण्याचे काटकोर नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभाग व नाशिक महानगरपालिका यांना दिल्या असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


शेतीक्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल स्वीकारतांना येणाऱ्या काळात निर्यातक्षम शेतीसाठी अधिक संधी कशा उपलब्ध होतील यासाठी अधिक प्रयत्नांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी जैविक शेती व सेंद्रीय खतांचा वापर करून कमी खर्चात शेतीची उत्पादकता अधिक वाढण्याच्या कृषी  विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीपूरक दुग्ध व्यवसायास अधिक चालना देण्यासह शेती उत्पादनांची  विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


000000

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार – कृषिमंत्री कोकाटे

रायगड (जिमाका) दि.10 : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषिमंत्री श्री.कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले. या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सह संचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे, अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड.कोकाटे म्हणाले, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या,अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरीभिमुख कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत. शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात शेतीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. कृषी विद्यापीठ यांनी केलेले प्रयोग, विकसित केलेले तंत्रज्ञान, हवामान बदल, पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी. समाज माध्यमे, विविध संदेश वहनाची साधने वापरावी. तसेच शेतकऱ्याशी सातत्याने संवाद ठेवावा. कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सह.संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

या परीसंवादात कोकण विभागातील आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी,  भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, भाजीपाला व फूलशेती अशा विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्याला दिशा देणाऱ्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करताना, विविध योजनांचे थकित अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीकविमा, पायाभूत आणि काढणीपश्‍चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडी-अडचणी, पीक क्लस्टर आदीं महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने, समस्या मांडल्या.  कृषिमंत्री कोकाटे यांनी 4 तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले.ज्या ठिकाणी बदल शक्य आहेत, त्या विभागाशी चर्चा करून सुधारणा करण्यात येईल. तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल. ज्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय, निधीची आवश्यकता आहे त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेण्यात येतील असे  आश्‍वासित केले.

कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकरी केंद्रबिंदू मानून प्रभावी निर्णय, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी, विविध प्रयोगशील व्यक्ती, कृषी विद्यापीठ आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती मध्ये बदल घडवू शकतो. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांकडून कृषी योजना,कृषी निविष्ठा,नैसर्गिक आपत्ती,कृषी बाजार व्यवस्थापन याबाबत परिसंवाद प्रश्नावली भरून घेण्यात आली.

आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी आभार मानले.

००००००

नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा ‘चॅम्पियन’

चंद्रपूर, दि 10 : चंद्रपूर येथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत 356 गुणांसह ‘जनरल चॅम्पियनशीप’ चा किताब पटकाविला. तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला 305 गुण मिळाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा विजयी चमुसह ‘जनरल चॅम्पियनशीप’’ चषक स्वीकारला.

दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नागपूर येथील उपायुक्त दिपाली मोतिहाळे, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, कश्मिरा संख्ये, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करा  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे. दैनंदिन काम करीत असतांनाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी – कर्मचा-यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते. खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे. प्रशासनामध्ये काम करीत असतांना आपण आपली ओळख निर्माण करतो, तशीच ओळख खेळाच्या माध्यमातूनही निर्माण झाली पाहिजे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत आता नागपूर विभाग आणि चंद्रपूर जिल्ह्यानेसुध्दा उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन : आमदार किशोर जोरगेवार

राज्य शासनाच्या 590 कोटीतून ही सैनिक स्कूल उभी राहिली आहे. खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा येथे आहेत. शासनाला महसूल प्रशासनाकडून जास्त अपेक्षा असतात. महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणेच नागपूर विभागाने इतरही शासकीय  विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयेाजित कराव्यात. जेणेकरून इतर विभागातील अधिकारी कर्मचा-यांनासुध्दा स्वत:तील कलागुण विकसीत करता येईल. या क्रीडा स्पर्धांचे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट आयोजन केले, असे त्यांनी सांगितले.

राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर राहावा : विभागीय आयुक्त माधवी खोडे

महसूल विभागावर प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि आयुक्त कार्यालयाच्या टीम येथे आल्या. सर्वांनी चांगली कामगिरी केली असून खेळभावना केवळ खेळातच नव्हे तर कामातूनही दिसू द्यावी. तसेच संपूर्ण राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर असावा, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, तीन दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून एकूण 1080 अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात सहभाग नोंदविला. 22 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अशा स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, तहसीलदार विजय पवार, श्रीधर राजमाने यांच्यासह इतर खेळाडू अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे संघ ठरले विजेता आणि उपविजेता : कबड्डी – विजेता गडचिरोली जिल्हा, उपविजेता चंद्रपूर जिल्हा. व्हॉलीबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली.  थ्रो बॉल – विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो  महिला : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो पुरुष : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. क्रिकेट – विजेता चंद्रपूर, उपविजेता नागपूर. फुटबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली. याशिवाय उत्कृष्ट गायन सोलो, उत्कृष्ट अभिनय सोलो, वैयक्तिक नृत्य, उत्कृष्ट वेशभुषा, नक्कल, युगल गीत, दिग्दर्शन, कलाप्रकार मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली.

००००

 ‘जल जीवन मिशन’ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १०: ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण ११६४ योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७  योजना असून, उर्वरित ४४० कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गत योजनांची आर्थिक आणि भौतिक प्रगती, सिल्लोड, गंगापूर-वैजापूर ग्रीड, देवगाव, पिशोर, लाडसावंगी, केळगाव, चारनेर, शिरसाळा, ३५ गावे औरंगाबाद, रेल कनकावतीनगर पाणी पुरवठा योजनांची सद्य:स्थिती, कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या समस्या, १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळ जोडणी अंतर्गत ७१८ गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नळ जोडणीच्या १४ च्या राबविण्यात येत आहे. यामध्ये १४ लाख २२ हजार ६५१ लोकसंख्येत २ लाख ८५ हजार ९८ घरे आहेत. २ लाख २६ हजार ६५४ नळ जोडणी पूर्ण केली असून, दोन लाख ३७ हजार ११५ नळ जोडणी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत साध्य करण्यात येणार आहे.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (ई- उपस्थित होते.) जल जिवन मिशनचे अभियान संचालक ई. रविंद्रन, मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दी. ह. कोळी, अजित वाघमारे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

समाजात प्रेम, शांतता, सद्भावना निर्माणाचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १०: एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचे समाजात प्रेमभावना, शांतता व सद्भावना निर्माणाचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारी संस्था ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहे, त्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अशावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतात, असे त्यांनी सांगितले.

जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्त्व देतील, असे राज्यपालांनी सांगितले.

कलाकारांच्या जीवनात प्रेम, शांती व सद्भावना महत्त्वाची: पूनम ढिल्लन

चित्रपटसृष्टी ही इतरांना आनंद देणे व मनोरंजन करण्यासाठी निर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या समस्या असतात. त्यामुळे कलाकारांना आत्मिक शांतीसाठी प्रेम, शांतता व सद्भावनेची विशेष गरज असल्याचे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. जीवनात इतरांशी तुलना नको कारण प्रत्येक जण अद्वितीय असतो, असे त्यांनी सांगितले.

०००

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १०: जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून नक्की यश मिळेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. लिहिण्याच्या सवयीतून आपले मत व्यक्त होत असते.

अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्ग, संतूलित आहार, नवनवीन तंत्रज्ञान, नेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘एक पेड मा के नाम’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता, त्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाने ही सर्वांसमोर असतात. सकारात्मकतेने त्यावर मात करावी, विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा. सरावाने सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतो, यामुळे प्रधानमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमधील क्षमता वाढविण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे. प्रधानमंत्री अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताची नवी ओळख तयार केली आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान मिळावे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ. अदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

०००

बी.सी. झंवर/विसंअ/

मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १०:  मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ताज ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर, इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे आणि पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची  एक नवी ओळख निर्माण करेल.

टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. “ताज हे केवळ एक हॉटेल नसून, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे,” असे सांगताना कुलाब्यातील ऐतिहासिक ताज हॉटेलचा उल्लेख करण्यात आला. तसेच “२० व्या शतकातील कुलाब्यातील ताजप्रमाणे, २१ व्या शतकातील नवे प्रतिक हे हॉटेल ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आणखी नव्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज असून, ताज ग्रुपने मुंबईतील संधी हेरून नव्या प्रकल्पांची उभारणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिका वेगवान निर्णयात सकारात्मक असेल. “येत्या काळात या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा आला, तरी आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत. प्रशासन ही केवळ नियामक संस्था नसून, विकासाची भागीदार आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये अजूनही ताज हॉटेल नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. “आशा आहे की, पुनीतजी आज नागपूरसाठीही एक घोषणा करतील!” याला प्रतिसाद देत नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधासह हॉटेल निर्माण करण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे ग्रुपने जाहीर केले.

या संपूर्ण प्रकल्पामागे टाटा समूहाचे मार्गदर्शक, अध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. रतन टाटा यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही सर्वांनी परिश्रम घेतले. त्यांच्या साक्षीने हा प्रश्न सुटावा, अशी आमची इच्छा होती, आणि ती आता पूर्ण झाली, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.

याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले. तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले

०००

आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • भयमुक्त,कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरीता पुढाकार घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई, दि. १०: राज्यातील दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच परीक्षा ह्या कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात या संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्याची संकल्पना आहे.

शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा, असे आवाहन करतानाच विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पुर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

०००

 

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डिजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 10 – राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात राज्यातील तलावांचे ठेके आणि मत्स्य उत्पादन वाढीबाबत झालेल्या बैठकीमध्ये मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्य आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त अभय देशपांडे, संदीप दफ्तरदार, उप आयुक्त ऋता दीक्षित आदी उपस्थित होते.

राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की,  या व्यवसायमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची माहिती विभागाकडे उपलब्ध होत नाही. व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणेही महत्वाचे आहे. यासाठी या व्यवसायाचे ‘डिजिटललायझेशन’ होणे गरजेचे आहे. तलावाचा ठेका कोणाला दिला, किती कालावधीसाठी दिला, कशा स्वरुपाचा होता, उत्पादन किती तसेच मासेमारी व्यवसाय कराणारे, मासळी विक्रेते, मासळी वाहतूकदार यांची माहिती, या सर्व बाबींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असली पाहीजे. यासाठी राज्यभर मोहीम स्वरुपात ‘डिजिटललायझेशन’ करण्याची प्रक्रिया राबवावी. हे ‘डीजिटललायझेशन’ कशा प्रकारे करता येईल यासाठी विभागाने आराखडा तयार करावा. त्यासाठी एक एजन्सी नेमावी.नेमण्यात येणाऱ्या एजन्सीला या कामातील चांगला अनुभव असावा. तसेच गुगल मॅपिंगच्या धर्तीवर नकाशे मागवावेत, त्यांचे वर्गीकरण करावे, असे आदेशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

मंत्री श्री. राणे म्हणाले की, तलावांमधील गाळ काढणे आणि तलावांवर असलेले अतिक्रमण यांचीही माहिती विभागाने तयार करावी. ही माहिती तयार करताना टप्प्या टप्प्याने अतिक्रमण काढणे आणि राज्यभर मत्स्य व्यवसायाचे अधुनिकीकरण कशा प्रकारे करता येईल याचाही कृती आराखडा तातडीने तयार करावा. विभागाला सक्षम करण्यासाठी ‘डीजिटललायझेशन’ सोबतच अधुनिकीकरण आणि व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.  अधुनिकीकरणासाठी संस्था, तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून अभिप्राय मागवावेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवावी. तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून कार्यवाही सुरू करावी. गाळ  काढणे आणि अतिक्रमण हटवणे यासाठी विभागवार कृती आराखडा तयार करावा. तसेच तलाव ठेक्यातील अटींचे पालन होत आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी एक सक्षम यंत्रणा विभागाने उभी करावी.

पहिल्या टप्प्यात तलावांचे ‘डीजिटललायझेशन’ करून त्यानंतर अधुनिकीकरण करायचे आहे. तसेच तलाव ठेक्यांसाठी किमान शुल्क आकारणी, स्पर्धात्मकता आणणे अशा पद्धतीने काम करावयाचे असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

राज्यात सध्या 500 हेक्टर पेक्षा कमी आकाराचे 2 हजार 410 तलाव आहेत. तर 500 ते 1000 हेक्टरचे 41 आणि 1000 हेक्टर पेक्षा मोठ्या आकाराचे 47 तलाव आहेत. तलावांचे अ, ब आणि क वर्ग असे वर्गीकरण करण्यात येत आहे. मासळीचा किमान दर ठरवण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. तावडे यांनी दिली. तसेच संगणकीकरण, अधुनिकीकरण या माध्यमातून गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या निर्णयांची माहिती विभागाने दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ.

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...