मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 430

‘रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी – रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. 12 : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी, असे  रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी  सांगितले.

मंत्रालयात मनरेगा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सचिव गणेश पाटील, उपसचिव ज. जि. वळवी तसेच विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुशल आणि अकुशल कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच धडक सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीच्या अडचणी असल्यास तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. गोगावले यांनी दिले.

पीटीओची (प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर) माहिती सादर करण्याचे तसेच राबविण्याचे विभागातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात आणि १०० दिवसांत पूर्ण करावयाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश रोहयो मंत्री गोगावले यांनी दिले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १२ : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे.

मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिनीचा प्रस्ताव सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागामध्ये उद्योगक्षेत्र वाढावे, आदिवासी समाजातील उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रोत्साहन मिळावे, यादृष्टीने ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) जमीन हस्तांतरीत करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी शासकीय जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्याबाबत श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक झाली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात औद्योगिक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगून जांबुटके येथे मोफत जमीन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, तसेच येथे आदिवासी समाजातील उद्योजकांना 50 टक्के प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश यावेळी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १२ – नागपूर येथील फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाले असल्याचे आढळून आले असून, याबाबत पाहणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या अतिक्रमणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागपूरच्या फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीसंदर्भात श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.

श्री.बावनकुळे म्हणाले, या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

ही जागा नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मालकीची असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. तसेच ३० वर्षे मुदतीकरिता फुटाळा जलाशय परिसर एकात्मीकृत प्रकल्पाकरिता महामेट्रो महामंडळास हस्तांतरीत केलेली आहे. या परिसरात महामेट्रो महामंडळामार्फत एकात्मीकृत प्रकल्पांतर्गत विविध कामांचे कार्यान्वयन सुरू आहे. तेलंगखेडी येथे फुटाळा तलाव परिसर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आल्याच्या अनुषंगाने अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

मुंबई, दि. १२ : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, असा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “या मागणीचा जरुर विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

000

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील ‘किऑक्स’ मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तके ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयमध्ये, त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देऊन या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील वाचक, विद्यार्थी, ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्पर्धा परीक्षांची माहिती आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. मुंबई उपनगर, मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.

ॲड. शेलार म्हणाले की, ग्रंथ म्हणजे प्रत्येकाचे जीवन संपन्न करणारे एक दालन आहे. प्रत्येकाला जगण्याची दिशा देणाऱ्या ग्रंथांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत किंवा जगभरातील प्रभावी लोक महान साहित्यिक होते.

पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. आता मराठी भाषा जगभराच्या विद्यापीठात शिकवली जाणार आहे. विविध विद्यापीठात मराठी भाषा अध्ययन केंद्र सुरू होतील. शासकीय कामकाजात देखील मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. नुकतीच राज्यात पहिली  हॅकेथॉन स्पर्धा जाहीर करण्यात आली असून बहुभाषिक पद्धतीने सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअपना संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी पारितोषिक देखील ठेवण्यात आले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.

सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, प्रकाश गंगाधरे, लेखक चंद्रकांत भोंजाळ, बृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या मंजिरी वैद्य यांना  ‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.

दुपारच्या सत्रात ‘मराठीतील पहिले ज्ञानपीठ’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र’ या विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभव’ या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारीला होणारे कार्यक्रम

दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘कथा कवितेच्या राज्यात’ या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. ‘भारतीय संविधान माझा अभिमान’ या विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे ‘लोककला समजून घेताना’ या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  दुपारी २ ते २.४५ या वेळेत ‘आधुनिक शेती’ या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर ‘कोवळ्या पालेभाज्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत ‘संत साहित्य गाण्यामधून’ या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.  कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

शहीद जवान महेश नागुलवार यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार

गडचिरोली,(जिमाका),दि. १२: माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीस मुख्यालयात मानवंदना

तत्पूर्वी, आज सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन) राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण

भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

०००

 

 

आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने…

साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय धुळे संकलित साहित्य संमेलने पार पडलेल्या ठिकाणांविषयी माहिती देणारा लेख… 

 माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।

असे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहून ठेवले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यामुळेच यंदाचे देशाची राजधानी दिल्लीत होत असलेले 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असणार आहे हे ही विशेष. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन 1878 मध्ये पुण्यात झाले होते, ज्याचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे हे होते. तर 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झाले असून या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.

आतापर्यंत झालेल्या 97 मराठी साहित्य संमलेनापैकी सर्वाधिक 14 संमलने आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्यास मिळाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत 10 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यात सन 1936 साली 22 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे संपन्न झाले. त्यानंतर 1939 साली अहमदनगर, 1942 नाशिक तर 29 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धुळे जिल्ह्यात 1944 साली झाले असून या संमलेनाचे अध्यक्ष भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे होते. त्यानंतर 1952 अमळनेर (जि. जळगाव), 1984 जळगाव, 1997 अहमदनगर, 2005 आणि 2021 नशिक तर 2024 मध्ये अमळनेर (जि. जळगाव) येथे झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा, साहित्य आणि विचारांबाबत मौलिक अशी मेजवाणी साहित्यरसिकांना मिळते. मराठी साहित्य जगतास दिशा दाखवणारे व विचार देणारे अध्यक्षीय भाषण हे या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. संमेलनातील विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे मानवी जीवनमूल्यांचे व विचारांचे पोषण घडते. पुस्तकांचे अफाट विश्व ग्रंथप्रदर्शन व पुस्तकांच्या लावलेल्या स्टॉलमधून उलगडत जाते. साहित्य हे जगण्यासाठी महत्वाचे सांस्कृतिक मूल्य आहे यांची जाणीव अशा संमेलनातून होते. समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास या साहित्य संमेलनामुळे मदत मिळते. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या संमलेनाचे ठिकाण व त्यांचे अध्यक्ष यांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाची माहिती..

संमेलन वर्षे ठिकाण अध्यक्ष
1 1878 पुणे न्या. महादेव गोविंद रानडे
2 1885 पुणे कृष्णशास्त्री राजवाडे
3 1905 सातारा रघुनाथ पांडूरंग करंदीकर
4 1906 पुणे वासुदेव गोविंद कानिटकर
5 1907 पुणे विष्णू मोरेश्वर महाजनी
6 1908 पुणे चिंतापण विनायक वैद्य
7 1909 बडोदे कान्होबा रामछोडदास किर्तीकर
8 1912 अकोला हरी नारायण आपटे
9 1915 मुंबई गंगाधर पटवर्धन
10 1917 इंदूर गणेश जनार्दन आगाशे
11 1921 बडोदे नरसिंह चिंतामण केळकर
12 1926 मुंबई माधव विनायक किबे
13 1927 पुणे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
14 1928 ग्वाल्हेर माधव श्रीहरी अणे
15 1929 बेळगाव शिवराम महादेव परांजपे
16 1930 मडगाव वामन मल्हार जोशी
17 1931 हैद्राबाद श्रीधर व्यंकटेश केतकर
18 1932 कोल्हापूर सयाजीराव गायकवाड
19 1933 नागपूर कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर
20 1934 बडोदे नारायण गोविंद चापेकर
21 1935 इंदूर भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
22 1936 जळगाव माधव जुलियन
23 1938 मुंबई विनायक दामोदर सावरकर
24 1939 अहमदनगर दत्तो वामन पोतदार
25 1940 रत्नागिरी नारायण सिताराम फडके
26 1941 सोलापूर विष्णू सखाराम खांडेकर
27 1942 नाशिक प्रल्हाद केशव अत्रे
28 1943 सांगली श्रीपाद महादेव माटे
29 1944 धुळे भार्गवराव विठ्ठल वरेरकर
30 1946 बेळगाव गजानन त्र्यंबक माडखोलकर
31 1947 हैद्राबाद नरहर रघुनाथ फाटक
32 1949 पुणे शंकर दत्तात्रय जावडेकर
33 1950 मुंबई यशवंत दिनकर पेंढारकर
34 1951 कारवार अनंत काकबा प्रियोळकर
35 1952 अमळनेर कृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी
36 1953 अमदाबाद विठ्ठल दत्तात्रय घाटे
37 1954 दिल्ली लक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी
38 1955 पंढरपूर शंकर दामोदर पेंडसे
39 1957 औरंगाबाद अनंत काणेकर
40 1958 मालवण अनिल
41 1959 मिरज श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
42 1960 ठाणे रामचंद्र श्रीपाद जोग
43 1961 ग्वाल्हेर कुसुमावती देशपांडे
44 1962 सातारा नरहर विष्णु गाडगीळ
45 1964 मडगाव वि. वा. शिरवाडकर
46 1965 सातारा वामन लक्ष्मण कुलकर्णी
47 1967 भोपाळ विष्णु भिकाजी कोलते
48 1969 वर्धा पु. शि. रेंगे
49 1973 यवतमाळ गजानन दिगंबर माडगुळकर
50 1974 इचलकरंजी पु. ल. देशपांडे
51 1975 कराड दुर्गा भागवत
52 1977 पुणे पु. भा. भावे
53 1979 चंद्रपूर वामन कृष्ण चोरघडे
54 1980 बार्शी गं. बा. सरदार
55 1981 (फेब्रुवारी) अकोला गो. नी. दांडेकर
56 1981 (डिसेंबर) रायपूर गंगाधर गाडगीळ
57 1983 अंबेजोगाई व्यंकटेश दिगंबर माडगुळकर
58 1984 जळगाव शंकर रामचंद्र खरात
59 1985 नांदेड शंकर बाबाजी पाटील
60 1988 मुंबई विश्राम बेडेकर
61 1988 ठाणे वसंत कानेटकर
62 1989 अमरावती केशव जगन्नाथ पुरोहित
63 1990 (जानेवारी) पुणे यु. म. पठाण
64 1990 (डिसेंबर) रत्नागिरी मधु मंगेश कर्णिक
65 1992 कोल्हापूर रमेश मंत्री
66 1993 सातारा विद्याधर गोखले
67 1994 पणजी राम शेवाळकर
68 1995 परभणी नारायण सुर्वे
69 1996 आळंदी शांता शेळके
70 1997 अहमदनगर ना. स. इनामदार
71 1998 परळी वैजनाथ द. मा. मिरासदार
72 1999 मुंबई वसंत बापट
73 2000 बेळगाव य. दि. फडके
74 2001 इंदूर विजया राजाध्यक्ष
75 2002 पुणे राजेंद्र बनहट्टी
76 2003 कराड सुभाष भेंडे
77 2004 औरंगाबाद रा. ग. जाधव
78 2005 नाशिक केशव मेश्राम
79 2006 सोलापूर मारुती चित्तमपल्ली
80 2007 नागपूर अरुण साधू
81 2008 सांगली म. द. हातकणंगलेकर
82 2009 महाबळेश्वर आनंद यादव
83 2010 पुणे द. भि. कुलकर्णी
84 2010 (डिसेंबर) ठाणे उत्तम कांबळे
85 2012 चंद्रपूर वसंत आबाजी डहाके
86 2013 चिपळूण नागनाथ कोत्तापल्ले
87 2014 सासवड फ. मुं. शिंदे
88 2015 घुमान (पंजाब) संदानंद मोरे
89 2016 पिंपरी चिंचवड श्रीपाल सबनीस
90 2017 डोंबिवली अक्षयकुमार काळे
91 2018 बडोदे लक्ष्मीकांत देशमुख
92 2019 यवतमाळ अरुणा ढेरे
93 2020 उस्मानाबाद फादर फ्रान्सिस
94 2021 नाशिक जयंत नारळीकर
95 2022 उदगीर भारत सासणे
96 2023 वर्धा न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
97 2024 अमळनेर रविंद्र शोभणे

(संदर्भ-लोकराज्य)

०००

  • संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

 

 

 

 

 

सक्षम, समर्थ, कल्पक समाजाच्या निर्मितीसाठी संमेलनाला लागणारा निधी ही भांडवली गुंतवणूक –  डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

नागपूर,दि. १२: साहित्य संमलने ही सुद्धा एक व्यापक चळवळ आहे. ही चळवळ युवकांनी निर्माण केलेली आहे. साहित्यामधून, वाचनातून भाषिक समाज समृध्द होत जातो. संमेलने हा या समृध्दीचा एक मार्ग आहे. संमेलनाची फलश्रुती ही कोणत्याही आर्थिक फुटपट्टीवर मोजता येणार नाही.  संमेलनासाठी लागणारा निधी  ही उद्याच्या सशक्त समाजासाठी, समाजाच्या कल्पकता वृद्धीसाठी, सहिष्णूतेसाठी, विवेकासाठी केलेली भांडवली गुंतवणूक आहे, असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्याने  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने विविध साहित्यिकांशी संवाद साधला जात आहे. महाविद्यालयीन युवकांमध्ये वाचनाची अधिक गोडी निर्माण व्हावी यादृष्टीने साधलेल्या संवादात ते बोलत होते.

वाचनाचे माध्यम हे वैयक्तिक माध्यम आहे. मेंदुतील धिम्या लहरी वाचन करताना सक्रिय असतात. आकलनाला अवकाश त्यामुळे लाभतो, रसग्रहणाची प्रक्रिया त्यातून विकसीत होत राहते. वाचनाद्वारे आपल्या कल्पना शक्तीला, निर्मितीक्षमतेला चालना मिळते. आपण जे वाचतो त्यातील प्रतिमा विश्व मेंदूत साकारली जात असते. एक प्रकारे ही प्रक्रिया आपल्या निकोप मनासाठी अत्यंत आवश्यक असून लेखकासमवेत वाचकांना सहनिर्माता होण्याची संधी यातून मिळते, अशा शब्दात ज्येष्ठ कवी ,साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सरणारी प्रत्येक पिढी ही नव्या पिढीला दोष देण्याच्या भूमिकेत आढळते. परंतु सर्वात जास्त अभिव्यक्ती ही युवा वर्गाकडूनच  होत असते. ते चांगला विचार करतात. महाविद्यालयीन रंगभूमीला समृध्द करण्याचे काम याच मुलांनी केले आहे. मात्र असे असले तरी  ही मुलं वाचनापासून दूर आहेत. त्यांना वाचनाच्या जवळ आणावयाचे असेल तर शालेय जीवनातच मुलांवर  वाचनाचे संस्कार करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर ज्या सार्वजनिक वाचनालयांनी महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी जी व्यापक चळवळ उभी केली, ती चळवळ गारठल्याची स्थिती आहे. जवळपास 12 हजार 500 सार्वजनिक ग्रंथालये आज महाराष्ट्रात आहेत. साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, शासनाची ग्रंथालये यांनी स्वत:हून पुढे येत विविध उपक्रमांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : एक अपूर्व योग

नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील साहित्य परंपरेचा वाशिमचे जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी घेतलेला वेध…

आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब मानावी लागेल….

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन `सरहद, पुणे`च्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार होता येईल.

भारताची राजधानी नवी दिल्ली जिथे विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा एकत्र येतात. या बहुरंगी वातावरणात महाराष्ट्राची ओळख जपणाऱ्या आणि मायमराठीचा जागर घालणाऱ्या मराठी बांधवांची संख्या मोठी आहे. दिल्लीतील मराठी मंडळी केवळ आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवत नाहीत, तर ती मोठ्या उत्साहाने साजरीही करतात.

दिल्लीतील मराठी संस्कृतीचे अस्तित्व

दिल्ली ही जरी मुख्यतः हिंदी भाषिकांचा गड असला, तरी इथे मराठी भाषिकांचे योगदान मोठे आहे. शिक्षण, प्रशासन, कला, साहित्य आणि उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणसांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. विविध मराठी संस्था, मंडळे आणि संघटना दिल्लीतील मराठी संस्कृतीला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य करतात.

मराठी माणूस आपल्या सण-उत्सवांना आणि परंपरांना पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. गणेशोत्सव, शिवजयंती, गुढीपाडवा, नवरात्रोत्सव यांसारखे मोठे सण येथे उत्साहाने साजरे होतात. मराठी नाट्यसंस्कृतीही येथे चांगलीच रुजली आहे. वेळोवेळी होणाऱ्या नाट्यस्पर्धा, कविसंमेलने, संगीत संध्या यामुळे मराठी रसिकांना एकत्र येण्याची संधी मिळते.

विविध साहित्य संमेलने, ग्रंथ प्रदर्शने आणि कवी संमेलनांमध्ये मराठी साहित्याचा स्वतंत्र ठसा उमटतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि विचारवंत दिल्लीच्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडतात. साहित्य अकादमी आणि अन्य राष्ट्रीय संस्थांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

राजकीय, प्रशासकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातही मराठी माणसांची मोठी संख्या आहे. संरक्षण क्षेत्र, नागरी सेवा, शिक्षण, संशोधन आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये मराठी मंडळींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र – पुढील वाटचाल

आजच्या काळात डिजिटल माध्यमांमुळे दिल्लीतील मराठी लोक अधिक जवळ येत आहेत. ऑनलाइन मराठी गट, वेबिनार, वाचन कट्टे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही मायमराठीचा जागर सुरू आहे. भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.

दिल्ली ही फक्त देशाची राजधानी नाही, तर ती विविधतेतील एकतेचं उत्तम उदाहरण आहे. इथे राहणारा प्रत्येक मराठी माणूस आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगतो. दिल्लीतही मायमराठीचा जागर अविरत सुरू राहणार आहे !

साहित्यिक परंपरेचा अभिमानस्पद वारसा :महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा केवळ ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर त्याची एक समृद्ध साहित्यिक परंपराही आहे. संतसाहित्यापासून आधुनिक साहित्यप्रवाहांपर्यंत वाशिमने अनेक साहित्यिक घडवले आहेत.

संतसाहित्य आणि वाशिमचा वारसा

वाशिम जिल्ह्याचा संतसाहित्याशी फार जवळचा संबंध आहे. संत वामनभाऊ, संत चोखामेळा आणि संत नामदेव यांचे विचार या भागात रुजलेले आहेत. संतपरंपरेतील भक्तिसाहित्य आणि अभंगांनी इथल्या लोकजीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे.

साहित्य संमेलने आणि वाशिमचा सहभाग

वाशिम जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलनांसाठी विशेष ओळख आहे.स्थानिक पातळीवर वाचन कट्टे, काव्यगोष्टी आणि साहित्य चर्चा नियमितपणे होतात. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर साहित्यिक उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो.

साहित्य आणि सामाजिक चळवळींची सांगड:

वाशिममध्ये साहित्य हे केवळ करमणुकीचे साधन नाही, तर सामाजिक चळवळींसाठी प्रभावी माध्यम ठरले आहे. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि स्त्रीवादी लेखन यांना वाशिम जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळतो.

वाशिमचा साहित्यिक प्रवाह: नव्या पिढीची जबाबदारी

आजच्या डिजिटल युगात वाशिम जिल्ह्यातील साहित्यिक परंपरा ब्लॉगिंग, सोशल मीडिया, ई-पुस्तकं आणि पॉडकास्टिंगच्या माध्यमातून पुढे नेत नव्या पिढीला प्रेरित करत आहे.

आधुनिक साहित्यविश्वातील वाशिमचा ठसा

वाशिमच्या मातीतून अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि लेखक निर्माण झाले.

त्यापैकी  बाबाराव मुसळे हे वाशिम जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे हे मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे लेखक आहेत. त्यांनी विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन केले आहे.

डॉ. विजय जाधव यांचा ‘गोरवेणा’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या या साहित्यकृतीला राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रा. लता जावळे यांनी मराठी साहित्य निर्मितीमध्ये महिला साहित्यिकांचे योगदान या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

पद्मश्री नामदेव कांबळे हे मराठी साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते विशेषतः दलित साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे लेखक म्हणून ओळखले जातात.

प्रा. मोहन शिरसाट हे १९८६ पासून वाशिम येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विद्यालयीन जीवनात प्रथम विठ्ठल वाघ यांच्या तोंडून वऱ्हाडी भाषेतील कविता ऐकून, त्यांना वाचन आणि लेखनाची आवड निर्माण झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा महत्त्वाचा ठरतो. वाशिम जिल्ह्यात मराठी साहित्याची समृद्ध परंपरा असून, अनेक लेखक, कवी, विचारवंत आणि साहित्यिक चळवळी येथे घडल्या आहेत.

वाशिम जिल्ह्याची साहित्य संमेलनाच्या संदर्भात विशेष वैशिष्ट्ये:

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा :वाशिम हे पूर्वी वत्सगुल्म म्हणून ओळखले जात असे आणि हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे ठिकाण होते.येथे अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि संस्कृतीला चालना देणारे ठिकाणे आहेत.संत नामदेव, संत तुकाराम यांचा प्रभाव असलेल्या या भागात वारकरी संप्रदायाचे महत्त्व आहे.

साहित्यिक परंपरा आणि योगदान :

वाशिम जिल्ह्यात अनेक साहित्यिक कार्यरत आहेत. बाबाराव मुसळे, नामदेव कांबळे यांसारखे लेखक आहेत त्यांच्या दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आणि सामाजिक परिवर्तनवादी साहित्याची येथे विशेष परंपरा आहे.

साहित्य संमेलनासाठी अनुकूल वातावरण :

वाशिममध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो.येथे साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, त्यामुळे संमेलनाचे आयोजन अधिक प्रभावी ठरू शकते.शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि स्थानिक साहित्य मंडळे यांचा सक्रीय सहभाग राहतो.वाशिमसारख्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा असलेल्या जिल्ह्यात नव्या साहित्यिकांना या संमेलनाच्या माध्यमातून नवा दिशा आणि प्रेरणा मिळू शकते.

वाशिम जिल्ह्याने संतपरंपरेपासून ते आधुनिक साहित्यापर्यंत आपली वेगळी छाप सोडली आहे. येथे साहित्यिक वारसा समृद्ध असून तो पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. वाशिमचा हा उज्ज्वल साहित्यिक वारसा असाच फुलत राहो हीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा व्यक्त करतो.

०००

  • यासेरोद्दीन काझी, जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम.

 

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...